क्रांतिसूर्य सावरकर
क्रांतिसूर्य सावरकर
भारतीयावर खटला भरला देशद्रोहाचा,
इंग्रज परका, द्रोह तो कसला, युक्तिवाद त्याचा..
‘सत्तावनचे समर' लिहिले हा असे अपराध,
नाना तात्या लक्ष्मीबाईला देत असे प्रतिसाद..
आपुल्या न्यायपणाची टिमकी जे ऐकवती सकला,
एकाच जन्मी दोन जन्मठेपा सुनावल्या त्याला ..
पन्नास वर्षे काळे पाणी हा रे न्याय कुठला
‛तमा नसे जीवाची मजला' हसतच तो वदला..
हास्यमुखाने सामोरी गेला क्रूर त्या शिक्षेला,
गनिमी कावा बनवीत मेंदूत नवा कट शिजला..
हाच तो मेंदू होता जॅक्सन वधामागे प्रेरणा,
बॉम्बबनवण्या शिकविलेलोका राष्ट्रक्रांती कारणा..
विनायकाला चढविले बोटी अंदमान धाडण्या,
कुटील डाव हा देशभक्ताची क्रांतीज्योत मारण्या..
फ्रान्स देशाची किनारपट्टी पडता नजरेला,
भयंकर त्या युक्तीने त्याच्या ठाव मनी बसला..
‘शौचकूपातची जाऊनि येतो' वदे चौकीदारा,
खिडकीवरती काढून ठेविला अंगातील सदरा..
पोर्टहोलची मोजमाप मग जानव्याने केली,
खिडकीमधून झोकून दिधले स्वतःस त्यावेळी..
शेकडो जखमा घेऊन चालला बघा कुठवरती,
समुद्रातील खारे पाणी, जखमा भळभळती..
चौकीदार ही एव्हाना मग सावध तो झाला,
तडीताघातासम हा एकच गोंधळ तो उडला..
गेला गेला पक्षी पिंजऱ्यातून पहा गेला,
झाला झाला गडबड गोंधळ, इशाराही झाला..
पोहत पोहत गाठले मार्सेलीसच्या बंदराला,
सहा फुटी भिंतीला लांघिले, प्रासादास धावला..
हाय रे दुर्दैव नी हाय रे नशिबाचा फासा,
गोऱ्यांच्या गळाला लागला सजीवसा मासा..
चिरीमिरी घेऊन शिपायाने आगळीक केली,
इतिहासी मग नोंद तयाची कागळीक झाली..
बेड्या ठोकुनी जेरबंद असा आला बोटीवरती,
विजयी मुद्रा, ओठांवरती निखळ हास्य दिसती..
कुणी म्हणे उडी गाजवलेली, कुणी म्हणे फसली,
कर्मदारिद्र्या काय सांगू तुज महती त्यातली..
मातेसाठी समुद्रास जे ओलांडून गेले,
हनुमंतामग विनायकाचे नाव जगी झाले..
ज्वाळेसम जो उभा पेटला स्वातंत्र्यासाठी,
प्रणाम माझा क्रांतिसूर्याला अखंड दिन राती..