जीवन एक संघर्ष
जीवन एक संघर्ष
क्षणभराचं हे जीवन मात्र
किती सहन करावं लागतं
देह मातीचा पुतळा जरी,
देह दहन करावं लागतं
कधी सुख तर कधी दु:खाला कवटाळत
इथं सारंच झेलावं लागतं
जगण्या-मरण्याच्या प्रवासात
कधी वेदनेलाच पेलावं लागतं
नसता अपेक्षा कसली
सारंच सोसावं लागतं
एक दिवस मरण्यासाठी या देहाला
आयुष्यभर पोसावं लागतं
कधी साऱ्यांची मनं राखत, तर
कधी स्वत:चंच मन मारत जगावं लागतं
थोड्या सुखासाठी या जीवाला
मरणाच्या दारातही बघावं लागतं
नात्याच्या जाळ्यातही कधी
स्वत:लाच गुरफटुन घ्यावं लागतं
जगताना मात्र इथं आपलं
अस्तित्वही विसरावं लागतं
कधी वेळेचे गुलाम होऊन
स्वत:च्याच जीवाशी खेळावं लागतं
आहे असं हे जीवन संघर्षाचं
इथं जगण्यासाठी आयुष्यही जाळावं लागतं
