स्वप्न ते अधुरेच...
स्वप्न ते अधुरेच...
झाल्या चिंध्या चिंध्या त्या
रेशमी वाटणाऱ्या मखमलीच्या
जिला आयुष्यभर पांघरण्याचं
पाहिलं होतं एक बेहद स्वप्न
तेच झालंय आज बेचिराख..
झाली अंधकारमय ती
तेजस्वी दुनिया, अन् माझ्या
नशिबाच्या वाटा गहिवरल्या..
का पक्के नव्हते माझ्या त्या
हिरमुसल्या जीवनाचे वायदे?
का नव्हती माझ्या त्या वायद्यांना
पक्क्या, कणखर बाहुंची जोड?
हे सारं समजण्या पलीकडे
गेलंय आज..!
चांगलं नेमकं काय असावं
आयुष्य की नशीब? हेही माहित
करुन घ्यावं लागतं इथे.!
हे आयुष्य जीवन आहे की मरण?
हेही कळण्या पलीकडेच गेलंय आता
माझी बहरलेली,कोमल मखमल
का झालीय बेरंग.?का तिचं ते कोमल
अस्तित्व माझ्यापासून हिरावलंय?
पुन्हा बहरेल का ती नव्याने.?
हे पाहण्यास मन माझं आतुरलंय
अन् ते भावना व्यक्त करत
शब्दांची रांगोळी काढतंय..
माझ्या त्या विझुविझल्या
डोळ्यांतील, ते निरपेक्ष स्वप्न
आज आत्महत्या करुन त्याची
अंत्ययात्रा निघतांना मी पाहतेय
असे हे जीवन माझे
करुन प्रयत्न अथक
तरीही ते अपुरेच..
म्हणतात ना नशीबाचेच
खेळ सारे; शेवटी
स्वप्न ते अधुरेच..
स्वप्न ते अधुरेच..!
