जांभळं आभाळ
जांभळं आभाळ
त्याची प्राक्तन रेषा रेखाटलेले तिचे एक भाळ..
एक तो.. एक ती.. आणि..
जांभळं होत चाललेलं त्याचं तिचं आभाळ..!!
त्याने गायलेला मारवा अन् रातराणी चा बहर..
त्यात तिच्या फुलत चाललेल्या मोगऱ्याचा कहर..
संपू नये कधीच हा खिळून राहिलेला प्रहर..
ती साक्षात उमा त्याची अन् तो तिचा हरिहर..
अवचित पावसाने पालवी फुटलय आज एक माळ..
एक तो.. एक ती.. आणि..
जांभळं होत चाललेलं त्याचं तिचं आभाळ..!!
ती वीज कडाडती, त्याचे स्मित शांत अबोल..
ती शहारती लतिका, तो भक्कम वट अनमोल..
त्याचा झंकारता पंचम, तिचा निषाद कोमल..
ती साक्षात राधा त्याची अन् तो तिचा श्यामल..
दिवस अन् रात्रीमध्ये पसरलेली सायंकाळ..
एक तो.. एक ती.. आणि..
जांभळं होत चाललेलं त्याचं तिचं आभाळ..!!

