हरवलेला आनंद
हरवलेला आनंद


पाडगावकरांची कविता ऐकता ऐकता मन झटकन मागे गेलं…
मनावरची काजळी काढली आणि सारं कसं लख्ख झालं…
हरवलेल्या आनंदाचं गाठोड, अलगदपणे उघडू लागलं...
दडलेले छोटे-छोटे आनंद, पटापटा शोधू लागलं..
मनसोक्त पावसात भिजण्याचा आनंद
गावाकडच्या नदीमध्ये डुंबण्याचा आनंद
वडाच्या पारंब्याना लटकण्याचा आनंद
बागेमधले पेरू, हळूच चोरायचा आनंद
आजीने हळूच दिलेल्या तूपगुळ पोळीचा आनंद
रस्त्यावरती क्रिकेट खेळताना, काचा फोडण्याचा आनंद
मारलेली विटी, एखाद्याच्या डोक्यात पडल्याचा आनंद
मित्रांशी खेळताना, चार गोट्या जिंकल्याचा आनंद
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, मनसोक्त फिरण्याचा आनंद
जंगलातील पक्षांच्या, शिट्या ऐकण्य
ाचा आनंद
डोंगर माथ्यावरील झोपडीत खाल्लेल्या, चटणी-भाकरीचा आनंद
माळावरल्या गवतफुलांचा, झुलण्याचा आनंद
कोसळत्या धबधब्याखाली, भिजण्याचा आनंद
घाटामधल्या दाट धुक्यात, हरवण्याचा आनंद
चांगलं काही झाल्यानंतर दिसणारा, आईच्या डोळ्यातला आनंद
आयुष्याच्या चढाओढीत कुठेतरी विरून गेले हे आनंद….
मी पणाच्या स्पर्धेमध्ये, आता परत मिळतील का हे आनंद?
या आनंदाची किंमत कोण- कधी- किती आणि कशी ठरवणार?
आहे का हो कोणाकडे याचे उत्तर ?
नक्कीच नाही ! नक्कीच नाही !
अशा या आनंदांना मुकण्याचा कोणी हो दिला शाप ?
झुगारून द्या साऱ्या दिखाऊ गोष्टी, हाच खरा ऊ:शाप ..