वरूणराजा
वरूणराजा
पावसाच्या सरींनी
चिंब झाली धरणी
मृदगंध पावसाचा
फुलला मनोमनी ||१||
वरुणराजाच्या आगमनाने
मयुर नाचे वनी
इंद्रंधनूही डोकावे
आकाशीच्या कमानी ||२||
सुगंधी सडा प्राजक्ताचा
शिंपला ग अंगणी
बहरून आली सृष्टी
धुंद झाले फुलपाखरावाणी ||३||
पावसाला बघताच
बळीराजा सुखावला मनी
तृषार्त घेऊनी अंगावर
हिरवाईने नटली अवनी ||४||
डोलू लागली पिके छान
शिवाराने शाल पांघरली
डोंगर-दरीतून खळखळे
नदी-नाले तुडुंब भरली ||५||
वरुणराजाने निसर्गाला
सौंदर्याचा साज चढविला
हर्षभरीत झाले चराचर
आनंदोत्सव साजरा केला ||६||
