ही वेदना असह्य होते
ही वेदना असह्य होते


ही वेदना असह्य होते
जेव्हा पाठीवरची झोळी सावरत
शोधत राहतात उकिरड्यावरचं प्लास्टिक
थरथरणारे, सुरकुतलेले हात
वीतभर पोटाच्या खळगीसाठी
ही वेदना असह्य होते
जेव्हा मुसळधार थंड पावसाच्या
किर्र काळोख्या रात्री
टाहो फोडत राहते कुणीतरी टाकलेली 'नकोशी'
ही वेदना असह्य होते
जेव्हा येतो कुठूनतरी एक माथेफिरू
विक्रूत प्रेमाचा भ्याडपणा घेऊन
जातो कितीतरी लक्ष्म्यांचा चेहरा विद्रूप करून
ही वेदना असह्य होते
जेव्हा वृद्धाश्रमातले डोळे
बघत राहतात थंड काचेसारखे
कारण पोटचे गोळेच सोडून देतात
आपल्या जन्मदात्यांना कस्पटासारखे
ही वेदना असह्य होते
ही वेदना असह्य होते
जेव्हा तुझ्या माझ्यासारखंच
हाडामासाचं माणूस; देहाबरोबर
आपल्या आत्म्याचीही हत्या करते,
तेव्हा खरंच ही वेदना असह्य होते
असह्य होते