गझल तुझ्यासाठी
गझल तुझ्यासाठी
झेलून सखी आलो अंगार तुझ्यासाठी
मृत्यूस असे माझा होकार तुझ्यासाठी
संगीत तुझी वाणी ओठात तुझ्या गाणी
हृदयात सखी वाजे झंकार तुझ्यासाठी
सूर्योदय झाला हा आडून पहाडाच्या
मनमोहक सृष्टीचा शृंगार तुझ्यासाठी
ग्रीष्मात वसंताची चाहूल मला लागे
घेऊन ऋतू गेला माघार तुझ्यासाठी
श्रीमंत निसर्गाला मागून हवे ते घे
साक्षात उभा आहे मंदार तुझ्यासाठी
दैवात नसे प्रीती हृदयात असे ज्योती
प्रेमात पतंगाचा जोहार तुझ्यासाठी
होता सपनामध्ये संसार तुझा माझा
ते स्वप्न पहा झाले साकार तुझ्यासाठी
तो *पंकज* प्रेमाचा वेडा असतो भुंगा
बंदिस्त फुलामध्ये होणार तुझ्यासाठी

