गझल जगाप्रमाणे
गझल जगाप्रमाणे
आता जरा जरा मी बनलो जगाप्रमाणे
खोटे जरा जरा मी शिकलो जगाप्रमाणे
रस्त्यात फार मोठा अपघात काल झाला
वेगात मीच मागे फिरलो जगाप्रमाणे
लाचेस देत जावे साहेब सांगतो हा
देऊन चार नोटा झुकलो जगाप्रमाणे
लाटेविरुद्ध नाही पोहून पाहिले मी
पाणी मुखात जाता चिडलो जगाप्रमाणे
संसार काय आहे शिकवून लोक गेले
सेवेत बायकोच्या दमलो जगाप्रमाणे
शेतात वाटणीने भावास दूर केले
युद्धात भावकीच्या लढलो जगाप्रमाणे
दारूत दु:ख माझी बुडवून काल आलो
पार्टीत आसवांच्या हसलो जगाप्रमाणे
कैदेत ठार केले डांबून जीवनाला
आयुष्य संपल्यावर रडलो जगाप्रमाणे