घरकुल
घरकुल
डोंगराच्या पायथ्याला पाण्यातून चाले नाव
सागर किनाऱ्यावर कोकणातलं ग गाव
डोंगराच्या पायथ्याला,काजूफणसांचा फेर
मधोमध सावलीत, माझं चिमुकलं घर
डोंगराच्या पायथ्याला,फुले तगर अबोली
जास्वंदीचे रंग किती,देवघरात शोभली
डोंगराच्या पायथ्याला, कोकीळेचे गीत गोड
मोहरला आम्रतरू, देई सुगंधाची जोड
डोंगराच्या पायथ्याला,नारळीपोफळी झुलती
मिरीचा वेल चढे, बिलगे बुंध्याभवती
डोंगराच्या पायथ्याला, उंच सागांचे ग बन
चंद्र डोकावतो घरी, किरणांच्या रुपातून
डोंगराच्या पायथ्याला , कपिला ती हंबरते
कृष्णतुळस साजिरी, वृंदावनात डोलते
डोंगराच्या पायथ्याला , दारी झोपाळा झुलतो
जिव्हाळ्याचा झरा जणू, झुळूझुळू ग वाहतो