घालमेल
घालमेल
शहरातून गावी आलेल्या मुलाला पाहून
आई-बापाला फार आनंद झाला
नातवंडांना विहीर, तलाव, शेत, मळा
सगळा फिरवून आणला
त्याच्या आवडीची भाजी,
त्याच्या आवडीचे सगळे बनवले
जेवता जेवता मुलगा बोलला,
तिकडे नवीन रेशनकार्ड घ्यायचे आहे
इकडचे नाव कमी करायला आलोय
आई काहीच बोलली नाही,
पापण्यांच्या आड दडलेली आसवं
अलगद पुसली
बाप फक्त एवढेच बोलला-
निदान रेशनकार्ड वर तरी आमच्या सोबत रहा
हातातले घास तसेच राहिले
ताटात दोन अश्रू मात्र सांडले
भावनांचे पोट रिकामेच राहिले
