उत्तर दे
उत्तर दे
तुलाच हौस भारी
मला पाण्यात ढकलायची.
खरे तर भिजायचे तुला असते.
खरे ना? उत्तर दे...।।1।।
प्रेमाचे बहाणे मला कुठे जमतात?
नजरेचे बाण माझ्या भात्यात नसतात.
कुणास ठाऊक मन कुणाचे भुलते?
खरे काय ? उत्तर दे...।।2।।
तसे तर सारे जग आपलेच आहे,
मी तुझा नि तू माझी खास आहे.
हे अनोखे नाते कसे जुळते ?
खरे काय ? उत्तर दे...।।3।।
जगात कोडी काय कमी आहेत?
आपल्या जोडीची हमी आहे ?
उगाच आतमध्ये काय तुटते?
खरे काय ? उत्तर दे...।।4।।
गालावर उगाच का लाली चढते ?
डोळ्यांत उगाच का पाणी दाटते ?
भीती आणि प्रीती एकदमच येते,
खरे काय ? उत्तर दे...।।5।।

