गाव सोडला अनं दुरावलो
गाव सोडला अनं दुरावलो
गाव सोडला अन् दुरावलो
शांत शीतल निवाऱ्याला
आठवणींनी भरलेल्या
माझ्या कौलारू घराला.... !!१!!
गाव सोडला अन् दुरावलो
मायेच्या उबदार स्पर्शाला
आईने भरवलेल्या रुचकर
चटणी अनं भाकरीला....!!२!!
गाव सोडला अन् दुरावलो
आभाळा एव्हड्या बापाला
दहा हत्तींचं बळ देणाऱ्या
पाठीवरल्या थापेला....!!३!!
गाव सोडला अन् दुरावलो
नागमोडी पाय वाटेला
वाऱ्यावर हळुवार डोलणाऱ्या
हिरव्यागार शिवाराला....!!४!!
गाव सोडला अन् दुरावलो
रानातल्या रानमेव्याला
आंबा,काजू,जांभूळ,करवंद अनं
गोड गराच्या फणसाला....!!५!!
गाव सोडला अन् दुरावलो
मित्रांसोबतच्या खेळाला
सुरकाटी,चेंडूफळी,लगोरी,लपंडाव अनं
तळ्यातल्या पाठशीवणीला...!!६!!
गाव सोडला अन् दुरावलो
निर्मळ,पवित्र गाभाऱ्याला
कटीवर कर ठेवून उभ्या
माझ्या पांडुरंगाला....!!७!!
