आठवणींचं घर
आठवणींचं घर
हृदयाच्या " त्या " कोपऱ्यात जुन्या आठवणींचं घर आहे. करकर आवाज करत पहारा देणारं त्याला एक दार आहे. आतला मिठ्ठ काळोख चिरत सुखावणाऱ्या क्षणांचं कवडंसंआणि भेगाळलेल्या कोपऱ्याला सहानुभूतींची किनार आहे. हृदयाच्या त्या कोपऱ्यात जुन्या आठवणींचं घर आहे...
धुळीने माखलेल्या क्षणांचा स्वच्छ निर्मळ प्रकाश आहे. संमिश्र भावनांनी बहरलेलं विस्तीर्ण असं छत आहे. एकुलत्या एका खुंटीला टांगलेली तिची आठवण आणितुटलेल्या हृदयाला आसवांचा बांध आहे. हृदयाच्या त्या कोपऱ्यात जुन्या आठवणींचं घर आहे...
साठवणीतल्या काही आठवणी उगाच स्वस्थ पडून आहेत. टाकाव्या पुसून की कवटाळून बसावं त्यांना यात सगळं अडून आहे. पराभवाच्या असह्य वेदना आणि विजयाला आनंदाची हळुवार फुंकर आहे. हृदयाच्या त्या कोपऱ्यात जुन्या आठवणींचं घर आहे.
ठरवून मग एकदाचं....
जुन्या आठवणींचं ते घर आज रिक्त करत आहे. असंख्य भावनांचे रंग चौफेर उधळत आहे. सरते शेवटी मग.... भूतकाळातील ते क्षण आणि हृदयाचा "तो " कोपरा मोकळा झाल्याचं समाधान आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी किनाऱ्यावर सोनेरी क्षणांची चाहूल आहे...
