गाणे माझे महिन्यांचे
गाणे माझे महिन्यांचे


चैत्र गुढी उभारतो
नववर्ष सजवतो
मग वैशाखवणवा
धरा सारी भाजवितो
भाजलेली भुई मग
ज्येष्ठ येऊन भिजवी
झड आषाढ लावतो
राना-पिकांना तोषवी
रिमझिमत मागून
येतो श्रावणी श्रावण
होई भाद्रपदामध्ये
गणेशाचे आगमन
अंबा येई अश्विनात
सवे दिवाळी-दसरा
कार्तिकी एकादशीला
उठे विठू हा साजरा
मार्गशीर्ष धार्मिक हा
गीता-दत्त जयंतीचा
देई गोडवा पौषात
तिळगुळ संक्रांतीचा
माघी महाशिवरात्री
थंडी लावी फार जोर
मग फाल्गुनी होळीचा
रंगपंचमी कहर!