एकटाच
एकटाच
मला राहूदे एकटाच स्वतःशीच बोलत,
येऊ नका बोलायला कोणीच.
मला नकोशी वाटतात गरजेपूरती बोलणारी माणसं,
आपलीशी वाटतात मला निःस्वार्थी संवाद साधणारी पुस्तकं.
मला नकोत स्वतःची मते लादणारी वडीलधारी मंडळी,
मला पाहिजेत अनुभव आत्मनिर्भर होण्यासाठी.
मला पाहिजेत यमक शब्दांच्या मैफिली.
नकोत मला फुकटचे सल्ले बिनकामी.
मला राहूदे वेंधळाच,
स्वभाव क्षणभंगुर अळवावरचं पाणी,
आवडतं मला जगणं मोकळं अन स्वच्छंदी.
मला आपलासा वाटतो नयनरम्य निसर्ग,
नकोशी वाटते ती गजबज शहरांची.
काँक्रीटच्या त्या चार भिंती
वा
टतात मला जणू काही कैदखाना,
घुटमळतं शरीर मोकळ्या वाऱ्याची एक झुळुक कवटाळण्यासाठी,
टोलेजंग इमारतीच्या सावल्या पडतात,
चारी बाजूंनी कोंडलेल्या त्या बागेत,
अन कोवळ्या उन्हाचे चार किरणही
नीट अनुभवायला मिळत नाही.
मुखवटे घालून फिरणारी माणसे चहूबाजुंनी,
त्यात अशी ही विनाशकारी प्रगती मानवाची.
विकासाच्या नावावर भकास भविष्य बनविण्याची पूर्वतयारी.
मला राहूदे वेगळाच,
तुमच्या असंवेदनशील गर्दीत मला जमायचं नाही.
मला हवा एक कोपरा जिथे मी स्वतःशीच बोलत राहीन,
कोऱ्या कागदावर शब्द उमटवून मी व्यक्त होत राहीन.