दुष्काळ (अष्टाक्षरी)
दुष्काळ (अष्टाक्षरी)
मन जाहले व्याकुळ
रात्र झाली सुनी-सुनी
एक-एक थेंबापायी
माय फिरे अनवाणी...
सूर्यदेव तप्त झाला
होता ओसाड जंगले
धान्य आता पेरू कसे
चक्र उलटे फिरले...
काळी आई सोसतेय
उष्णतेची ओली लाट
पाण्यासाठी फिरू किती
माथी घागर रहाट...
सृष्टी गेली बदलूनी
गळा बळीराजा फास
प्रेतं सडत राहिली
पाण्याविना आसपास...
दोष असे तुझा-माझा
पाणी कसे पडणार
सूत्र चुके जगण्याचा
भेगा कशा भरणार...
कशी मिटवावी चिंता
अश्रू नयनी दाटला
सांगू किती ओरडूनी
परतूनी जा दुष्काळा...
खेळ खेळे सृष्टी इथे
नित्य परीक्षा जीवनी
पाण्याविना जीव जाई
राव-रंकांच्या अंगणी...
