चिमणाबाई
चिमणाबाई
वाटतं मला बरेचदा
एक मोठं झाडच लावावं...
माझ्या गोड चिमणाबाईचं
तिथे इवलंसं घरटं असावं...
आता बघितले अलिकडे तिला
छताच्या आडोश्याला घरटं बांधलं
काय करणार बिचारा
माणसाने सगळीकडे काॅन्क्रिटचं जंगल बांधलं
पूर्वी समोरच एक झाड होतं
त्यावर चिमणाबाईचे घरटे असायचे..
तिच्यासावे कावळोबा, खारूताई
सगळे विसावा घ्यायचे...
एक रोप पुन्हा रूजवून
त्याचं मोठं झाड करायला हवं
काॅन्क्रिटच्या जंगलात विसावा घेण्यासाठी
एकतरी सावलीचं ठिकाण हवं
दिसता पुन्हा एक झाड
आपली चिमणाबाई परत येईल
ऐकून पुन्हा तिची किलबिल
मन खूप प्रसन्न होईल
