चैतन्यपिसारा (बडोदा कविकट्टा)
चैतन्यपिसारा (बडोदा कविकट्टा)
आकाशाचा मुकूट ल्यावा
चंद्राचा वर हवाच तुरा
वाऱ्याचे पायी बांधून पैंजण
सृष्टीचा प्यावा सारा पसारा
गवती लाटांसंगे वहावे
कवेत घ्यावे डोंगर सारे
कातळांची भव्यता कोरून घ्यावी
उरात भरुनी सुसाट वारे
झाडांशी हितगुज करता
पक्ष्यानीही मैफिलीत असावे
रंगगंधाची सोडून भाषा
फुलांनीही खळखळून हसावे
कुतूहलाचे घालूनी चिलखत
गूढ तळ्यांचा तळ गाठावा
अरण्याच्या शिरून हृदयी
निबिडपणा अन मस्त लुटावा
घनघोर झाडांच्या गर्दीत
माझे मी पण जावे हरवून
कुबेरी शिबीसम छायेसाठी
मीही पांघरावे झाडांसम ऊन
सजवून नयनी चंद्रआभा
निर्झर दूडदूड ऐकावा
अनाघ्रात आनंद तो झाडांचा
फुलून असा मी संभोगावा
आकाशा चा मुकूट ल्यावा
चंद्राचा वर हवाच तुरा
वल्कले ल्यावी पुन्हा पानांची
अन फुलवावा मी चैत्यन्यपिसारा...
