एकाकी
एकाकी
चाललो मी एकाकी, एकटाच माझा प्रवास,
सोबतीला माझ्या माझाच श्वास...
दररोज निघतो स्वप्नांच्या वाटे, बांधुनी स्वप्नांची शिदोरी,
ओझे अपेक्षांचे पाठीशी, तरीही ओढ ध्येयप्राप्तीची...
ठाव न लागे मला माझ्या मनाचा, तरीही चालतो निरंतर मी,
मनाचा एक कोपरा म्हणतो, थांब तू स्वतःसाठी कधीतरी...
इतरांच्या अपेक्षा सांभाळण्यासाठी, स्वतःला रोज झिजवतो मी,
स्वप्न माझे विचारतात मला, "आम्ही नाही का तुझे कोणी?"
स्वप्न माझे खूपच साधे, स्वच्छंद आयुष्य जगण्याचे,
अपेक्षांच्या ओझ्याखाली भरडून गेले सारे ते...
दप्तरातील ओझे कमी करूनी, दिलासा दिला मला सर्वांनी,
भार हा माझ्या मनावरचा करेल का कोणी कमी?
पाठीवरती ओझे लादूनी, दररोज लढतो मी स्वतःशी,
डोळ्यांत स्वप्नांची मांदियाळी, पावलांवर अपेक्षांची साखळी...
शर्यत आहे ही माझ्या इच्छांची, की इतरांच्या अपेक्षांची,
जिंकतो मी स्वतःसाठी, की हरतो इतरांच्या स्वार्थासाठी...
कधी वाटतं थांबावं क्षणभर, श्वास घ्यावा स्वतःसाठी,
पण घड्याळ सांगतं, "तुझं जगणं आहे इतरांसाठी."
म्हणूनच उरात ठेवतो सगळं, न सांगता कोणालाही,
ही झुंज आहे माझ्या मनाची, उमजणार नाही जगालाही...
तरीही चालतो मी एकाकी, पाठीवरचे ओझे सारुनी,
स्वप्नांचा साथी, श्वास माझा, ही झुंज आहे माझ्या मनाची…!!!
