बा ज्योतिबा
बा ज्योतिबा
कोल्हापूरचा एकला राजा तू..
सांभाळतो इथली सारी प्रजा तू..
लाखो भोळे भक्त येती ,
मनीचा नवस बोलूनीया जाती...
तरीही लहान लेकरासम त्यांचे सारे हट्ट पुरवितो ,
बा माझा ज्योतिबा तू!!!
दूर उंच डोंगरावरी देवा वास तुझा
तरी साऱ्यांच्या मनी एकच ध्यास तुझा
सगळी दारं बंद झाली की
देवा उघडती दार तुझं...
अन् आपसूकच ओठी येतं
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं !!!
निराशेच्या अंधारात
आशेची ज्योत लावी तू
चालायचा मार्ग अन्
बळही सारं देई तू
बेरंग या आयुष्यात
गुलालाची उधळण करी तू
पेढ्यापेक्षाही गोड हसू
केवळ तुझ्या दर्शनाने आणी तू
संकटांचा संहार करणारा
तारणहार माझा ज्योतिबा तू!!!
लळा तुझ्या भक्तीचा देवा
मनाला माझ्या लागला.
तुझ्या अन् माझ्यामध्ये
आपुलकीचा दुवा हा साधला
तुझ्या छत्रछायेखाली
हे जगत सारे निर्धास्त आहे
तुझ्यापासूनी सुरवात साऱ्याची
अन् तुझ्यापाशीच शेवट आहे
म्हणुनी दारी देवाच्या येता ......
अहंकार सारा गळूनी जातो
नतमस्तक होतात सगळे
बा ज्योतिबाच्या नामघोशषाने
मग दुमदुमते हे आसमंत सारे!!!!!
