अपेक्षांचा चातक
अपेक्षांचा चातक
परवाच कोणाएकाचे
अपेक्षांचे ओझे हलके केले..
त्यांच्या "कोणी कसे वागले पाहिजेच्या"
यादीत मी पण होते..
म्हणून सरळ वगळले आणि मुक्त केले... !!
पण काय गंमत नं...,
मीच 'अपेक्षांच्या' ढिगाऱ्यात सापडले..,
आणि 'उपेक्षांची' भागीदार होऊन बसले..!!
पाया पडले की, फक्त 'आशीर्वादच' घ्यावा
हे कोणी कोणाला शिकवावे लागत नाही..,
पण प्रेम व्यक्त करण्याच्या परिभाषेचे मन जपावे,
हे मात्र शिकण्याची सवय हवी..
कैकपटीतला आशीर्वाद किंवा प्रेम देण्याची 'सवय',
आपली कधी 'गरज' बनते हे कळतंच नाही..!!
आणि अलीकडच्या कुंपणातली श्वास देणारी तुळस वाळली की,
मात्र फक्त मनात अपेक्षांचेच पोषण होतंय यांचा 'मागमूसच' लागत नाही..!!
अलीकडच्या कुंपणात असेपर्यंत सगळं छान वाटतं..
कारण त्यात कुठेतरी 'परिशुध्दप्रेम' खत असते,
पण पलीकडच्या कुंपणात पडल्यावर ते कैकपटीतलं प्रेम नकोसं वाटायला लागतं..
कारण ते 'कर्तव्य प्रेम' झालेलं असतं.
खरंतर निसर्ग नियमंच तो.. तरीही जड जातो.
त्यात भर म्हणजे..
पलीकडच्या कुंपणात आधीच काही 'ग्रह' राज्य करीत असतात..,
कैकपटीतल्या प्रेमाने वेढलेल्या 'तीला'
फक्त 'कर्तव्याचा' साज चढवतात.
या 'परंपरेच्या' श्रृंगाररसात पार डूबलेल्या
'ती'ला अलीकडच्या कुंपणातल्या विचित्र 'नजरां'चा सामना करावा लागतो.
प्रपंचाचा पहिला अध्याय पलीकडच्या कुंपणाचा 'स्वाभिमान' जपण्यास शिकवतो..
तर दुसरा अध्याय अलीकडच्या कुंपणाचा 'आदर' राखणे शिकवतो..
घमासान युध्दात
कुचंबणा फक्त कुठल्यातरी एका
'तुळशीचीच' होते ..
आधी तारेचे कुंपण असते.
आणि आता 'सुवर्णमध्य' म्हणून तिनेच..
भिंतीचे कुंपण घातलेले असते.
मग येते परमार्थाचे चक्रीवादळ..,
इथे सगळेच प्रश्न सुटतात...
कारण डोळ्याला जे जे दिसतंय
मनाला जे जे अनुभवास येतंय
ते ते सगळंच मिथ्या आहे...
याचा मनावर लेप बसत जातो..
कोण,कुठले कुंपण...
कोण अलीकडचे, कोण पलीकडचे
असे काही नसते...
फक्त अडकलेली थकबाकी चुकती
करण्यासाठीचा हा जन्म..!
मिथ्या का असेना पण...
'तिने' पण आता पलीकडच्या कुंपणातल्या
तुळशीचे रुप परिधान केलेले असते.
त्यामुळे..,
भौतिकातल्या नव्या ऋतूची, नवी पहाट
कधी होणार...
या प्रतीक्षेत जीवन
व्यतीत करणारा माणूस..
'अपेक्षांचा चातक' होऊन बसतो..!
