अमरण..!!
अमरण..!!
छातीवरती हात बडवत
एका माउलीने आज हंबरडा फोडला
मायबापाचा आधार गेला
एका वीरांने आज प्राण सोडला...
अर्धांगिनीचे कुंकू पुसलं
अन लेकरू पोरकं झालं
देशासाठी लढून मात्र
जवानाचं घर उध्वस्त झालं..
लढला शेवटच्या श्वासापर्यंत
पण काळाने घातला हा घाव
बंदुकीच्या गोळ्या झेलून
अर्ध्यावरती सोडला संसाराचा डाव..
कधी नव्हे तू आज
शांत निपचित झोपी गेलास
सरणावरचा देह पाहून
पूर्ण जगाला रडवून गेलास..
स्वप्नं तुझं पूरं झालं
भारतमातेसाठी तू लढलास
इतिहासात अमर होता होता
आमच्यासाठी शहीद तू झालास..
देशासाठी ओढ तुझी इतकी
तुझ्या देहाला तिरंग्याने लपेटलं
चितेला अग्नी देताना मात्र
बापाचं काळीज तटतट तुटलं...
