आठवणींच्या लहरी
आठवणींच्या लहरी
पुन्हा पावसाने बरसून यावे,
पुन्हा मेघ सारे दिशांना भरावे,
पुन्हा गार वारा हळूच हा वहावा,
रस्ते आणि फिरस्ते भिजून चिंब व्हावे...
अशा सांजवेळी कितीदा तूला आठवावे,
निमीषात पापणीने भिजूनही जावे,
तू यायचा चिंब होऊन सरीतून,
मी मुग्ध व्हायचे तूला चिंब पाहून..
कितीदा दिला तू वाफाळता चहा माझ्या हाती,
कितीदा मी प्यायले ते तृप्त क्षण त्यातुनी,
तुझ्या पाणीदार नेत्रात मी पाहिले सारे,
तारूण्य ते अवखळ बेधूंद सप्तरंगी..
मी नेहमीच स्मरते ऋतू पावसाचा,
तू आजही मनी ताजा, वेडा भाबडासा,
तूझी नी माझी मैत्री पावसाळी,
करते आकाश नी धरा तृप्त सारी...
ये बरसत,बेधूंद आता पावसा रे,
सखा माझा यावा फिरूनी माझ्या घरी रे,
मी होऊदे पुन्हा चिंब त्याच्या कटाक्षाने,
नको अंत पाहू पुन्हा ये सख्या रे...

