आजी आणि अळी
आजी आणि अळी
एक होती आजीबाई,
सतत तिला कामाची घाई
चष्मा डोक्यावर लावायची
शोधत घरभर फिरायची,
दिसत होतं कमी
तरी खुश राहायची नेहमी
बाजारात जाऊन आजी,
आणायची ताजी भाजी
एकदा आणली भाजी
भाजीत होती अळी,
भाजी कापायला आजी
घेऊन बसली विळी
विळी लागली कापायला,
अळी लागली पळायला
पळता पळता अळीने
आजीला घेतला चावा,
आजी लागली ओरडायला
लागली अळीला शोधायला
चष्मा आला धावून
अळीला काढलं शोधून,
आजीने अळी उचलून
दिली कचऱ्यात टाकून
खुश झाली आजी
तिने केली मस्त भाजी,
भाजी खाल्ली भरपूर
झोपून गेली ढाराढूर
