Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Niranjan Niranjan

Drama Others

3  

Niranjan Niranjan

Drama Others

चांदणी रात्र

चांदणी रात्र

114 mins
1.5K



राजेशला सकाळी जाग आली तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटलं. कारण तो त्याच्या घरी बेडवर नव्हता तर स्वारगेट बसस्थानकाच्या एका बाकावर होता. ‘यावेळी आपण इथे कसे आणि का झोपलो होतो?’ राजेशला प्रश्ण पडला. तो बाकावरून उठला. त्याने खिशाला हात लावला पण खिशात पाकिट नव्हतं. मोबाईल सुद्धा नव्हता. खिशात फक्त एक शंभराची नोट होती. राजेश बसने घरी पोहोचला. त्याच्याकडे घराची चावीसुद्धा नव्हती. पण दारात झाडाच्या कुंडीखाली ठेवलेल्या जादाच्या चावीने राजेशने दरवाजा उघडला. राजेशचं डोकं फार दुखत होतं. त्यामुळे तो कॉलेजलाही गेला नाही. कीतीही विचार केला तरी कोडं सुटत नव्हतं. ‘आपल्याला कोणी किडनॅप तर केलं नसेल ना?’ राजेशच्या मनात विचार येऊन गेला. जेवढा जास्त विचार करेल तेवढा गुंता अजूनच वाढत होता. यावेळी रवी इथे असायला पाहिजे होता असं राजेशला वाटलं. रवीचे वडील आजरी असल्यामुळे तो नेमका एक महिन्यापासून गावी होता.

रात्री नेहमीच्या वेळी राजेश झोपला. सकाळी उठताच त्याने कॅलेंडर पाहिलं. आज रविवार होता, त्यामुळे कॉलेजला सुट्टी होती. राजेशने गावी जायचं ठरवलं. तो आवरून घराबाहेर पडला व स्वारगेटला पोहोचला. स्वारगेटला येताच त्याला कालचा विचित्र प्रसंग आठवला. पण त्याने फार विचार करायचा नाही असं ठरवलं. राजेश गाडीत बसला. गाडी निघाली. एक तासाचाच प्रवास होता. बसमध्ये बसताच राजेशच्या मनात गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या. आई-बाबा, संपत काका, गावातले मित्र, सर्वांना भेटून त्याला बरेच दिवस झाले होते. थोड्याच वेळात बस गावात पोहोचली. राजेश चालतच वाड्यापाशी आला. वाड्याबाहेरच्या अंगणात संपत झाडांना पाणी घालत होता. संपतने राजेशला पाहिलं व तो क्षणभर त्याच्याकडे पाहातच राहिला. राजेशला हे थोडं विचित्र वाटलं. राजेश पुढे गेला व संपतकडे पाहून म्हणाला, “बरे आहेत ना संपत काका? असे भूत पाहिल्यासारखे का पाहताय माझ्याकडे?” संपतने राजेशच्या प्रश्णाला काहीच उत्तर दिलं नाही व तो “मालकीण बाई, मालकीण बाई” असं ओरडत आत धावला. थोड्याच वेळात एक मध्यम वयीन स्त्री बाहेर आली. संपत देखील तिच्या मागून आला. ती स्त्री दारात उभं राहून बाहेर पाहू लागली व राजेश दिसताच “माझा राजू” असं ओरडून राजेश जवळ आली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहात होते. एखाद्याला अत्यंत प्रिय असलेली हरवलेली वस्तू परत मिळाल्यावर जसा आनंद होतो तसाच आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. ती नुसती राजेशकडे पहात होती. “आई, हे काय चाललंय? तू का रडतीयेस?” शेवटी राजेशनेच न राहवून विचारलं. आता राजेशची आई काही न बोलता त्याच्या चेहेऱ्यावरून हात फिरवू लागली. तिच्या डोळ्यातील आनंदाश्रू अजूनही थांबले नव्हते. राजेश मात्र पुरता गोंधळला होता. “हे काय चाललंय? मला कोणी सांगेल का?” राजेशने संपतकडे पाहुन विचारलं. “धाकलं धनी तुमी पयलं आत चला. सगळं सांगतो तुमास्नी.” असं बोलून संपत राजेशच्या आईला म्हणाला, “मालकीणबाई चला तुमीबी आत.” राजेश आत आला व त्याने पाठीवरची बॅग खाली ठेवली. राजेशची आई व संपत देखील आत आले. “संपतकाका, आता मला राहवत नाही. सांगा मला सगळं.” राजेश बोलला. “तुमास्नी आठवत असेल तुमी मागल्या आठवड्यात तुमच्या मित्रांसोबत कोकणात फिरायला गेलावता.” संपत म्हणाला. “कोकणात? पण मी तर कुठेच गेलो नाहीये मागच्या काही दिवसात.” राजेश म्हणाला. तो आता अजूनच गोंधळला होता. “संपत, राजेशला थोडा वेळ विश्रांती घेऊ दे. आपण या विषयावर नंतर बोलूयात.” राजेशची आई म्हणाली. ती आता थोडी भानावर आली होती. “राजेश, आत जा आणि आवर. मी तुझ्यासाठी चहा ठेवते.” थोड्यावेळाने राजेश बाहेर आला. त्याला संपतला खूप काही विचारायचं होतं. संपत हॉलमध्ये नव्हता म्हणून राजेश बाहेर गेला. पण बाहेरही संपत दिसला नाही म्हणून राजेश परत हॉलमध्ये आला. राजेशने टीव्ही सुरू केला. पण काहिकेल्या त्याचं लक्ष लागेना. 

थोड्यावेळाने राजेशची आई चहाचा कप घेऊन बाहेर आली. राजेश टीव्ही पाहतापाहता चहा पित होता. त्याच्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. राजेशची आई त्याच्याकडे कौतुकाने पहात होती. तिचं शरीर जरी अशक्त दिसत असलं तरी चेहऱ्यावर वेगळीच लकाकी आली होती. चहा पिऊन झाल्यावर राजेशने चहाचा कप समोरच्या टेबलवर ठेवला. त्याने टीव्ही बंद केला व खिडकीतून बाहेर पाहू लागला. काहीवेळाने त्याला संपत घराच्या दिशेने चालत येताना दिसला. संपतबरोबर राजेशचे गावातले मित्र गणेश, राकेश, श्रीकांत व हणमंत येताना राजेशला दिसले. ते सर्वजण घरात पोहोचताच राजेशकडे आश्चर्याने व तितक्याच आनंदाने पहात होते. बराच वेळ कोणी काहीच बोललं नाही. न राहवून शेवटू राजेश म्हणाला, “अरे असे का पाहताय माझ्याकडे? कोणी काही बोलत का नाहीये?” “सांगतो, सगळं काही सांगतो. पण खरं सांग तुला काहीच आठवत नाही?” गणेश म्हणाला. “गणेश अरे मला खरच काही आठवत नाहीये. तूच काय ते सांग.” राजेश म्हणाला. गणेश सांगू लागला, “मागच्या वेळी तू पुण्याहून घरी आलास तेव्हा आपण कोकणात फिरायला जायचा प्लॅन केला व दुसऱ्याच दिवशी आपण अलिबागला जायला निघालो. अलिबागला पोहोचताच आपण जेवण वगैरे आटोपुन थोडावेळ आराम केला व संध्याकाळी पाण्यात खेळायला सगळे बीचवर गेलो. अंगावरचे कपडे काढून आपण पाण्यात उतरलो. तुला पोहायला किती आवडतं हे मला माहित आहे व काकूंनी सुद्धा तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. बराच वेळ पाण्यात पोहल्यावर आम्ही सगळे बाहेर आलो पण तू काही बाहेर यायला तयार नव्हतास. सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. राकेश, श्रीकांत आणि हणमंत कपडे चढवून जवळच्या हॉटेलात गेले. मी मात्र तुझी वाट पहात थांबलो होतो. मी तुला हाका मारत होतो पण तू समुद्रात खूप पुढे गेला होतास. त्यामुळे तुला ऐकू येत नसावं. थोड्या वेळाने तू किनाऱ्याकडे येताना मला दिसलास पण अचानक समुद्राने रौद्र रूप धारण केलं. अचानक लाटांचा आकार प्रचंड वाढला. काही वेळानंतर समुद्र शांत झाला पण तू मात्र कुठेच दिसत नव्हतास. आम्ही सर्वांनी तुला बोटीतून खूप शोधलं पण तू काही सापडला नाहीस. अंधार झाल्यामुळे आम्ही परत किनाऱ्यावर आलो व पोलिसांना कळवलं. पोलीस सलग पाच दिवस तुला शोधत होते पण तू काही मिळाला नाहीस. शेवटी आम्ही हताश मनाने गावी परतलो. आम्ही सगळेच फार काळजीत होतो. काकूंनी तर जेवण सोडलं होतं. ज्या काकांचा पाय कधी घरात राहत नाही ते सुद्धा घराबाहेर पडले नव्हते.” एवढं बोलून गणेश थांबला. “खरंतर गणेश तू जे काही सांगितलंस त्यातलं मला काहीसुद्धा आठवत नाही. आपलं बोलणं झाल्याचं मला आठवतंय पण आपण अलिबागला गेल्याचं मला नाही आठवत.” राजेश म्हणाला. राजेश जे सांगत होता त्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता पण तो सहीसलामत परत आला यातच सर्वांना समाधान होतं. राजेश पुढे म्हणाला, “पण कालच एक विचित्र घटना घडली. मला सकाळी जाग आली तेव्हा आजूबाजूला माणसंच माणसं होती. समोर पाहिले तर बसेस उभ्या होत्या. मी स्वारगेटच्या बसस्टँडवर असल्याचं माझ्या लक्षात आलं. पण मी तिथे कसा पोहोचलो मला काहीच समजत नव्हतं. डोकं प्रचंड ठणकत होतं. ‘कोणी आपल्याला किडनॅप तर केले नाही ना?’ अशी शंका देखील मनात येऊन गेली. मग मी खिशाला हात लावला. खिशात पाकीट नव्हतं. फक्त शंभरची एक नोट होती. माझा मोबाईल देखील खिशात नव्हता. मला काहीच समजत नव्हतं. मी ऑटोने घरी आलो व ऑटोवाल्याला खिशातली शंभरची नोट दिली.” सगळेजण थक्क होऊन ऐकत होते. “तुझा मोबाईल आणि पाकीट तर माझ्याकडे आहे. तू ते किनाऱ्यावरच ठेवलं होतंस.” गणेश राजेशला म्हणाला. “आणि तुझे कपडे पण माझ्याकडे आहेत. मग तू जेव्हा स्वारगेटला झोपेतून उठलास तेव्हा तुझ्या अंगावर कोणते कपडे होते? आणि ती शंभराची नोट तुझ्या खिशात कशी आली?” गणेशने विचारलं. “मला काहीच कळत नाहीये. मला जेव्हा जाग आली तेव्हा माझ्या अंगावर थोडे मळलेले कपडे होते. पण ते माझेच होते का हेही मला आठवत नाही.” राजेश म्हणाला. 

 बराच वेळ विचार करून देखील कोडं सुटत नव्हतं. शेवटी सर्वांनी तो विषय थांबवला व त्यांच्या नेहमीच्या गप्पा चालू झाल्या. गप्पा झाल्यावर सर्वांनी राजेशचा निरोप घेतला व ते जायला निघाले. राजेशच्या आईने त्यांना थांबवलं व ती म्हणाली, “पोरांनो आता जेवण करूनच जावा. थोड्याच वेळात स्वयंपाक तयार होईल. संपत जरा बाजारात जाऊन काहीतरी गोड घेऊन ये.” राजेशच्या आईने संपतच्या हातात पैसे दिले व ती स्वयंपाकघरात गेली. थोडयावेळाने संपत आम्रखंड घेऊन आला. स्वयंपाकही तयार झाला होता. राजेशचे मित्र मनसोक्त जेवले व राजेशचा व त्याच्या आईचा निरोप घेऊन आपापल्या घरी जायला निघाले. 

राजेशच्या आईला एवढा आनंद झाला होता की इतक्या दिवसात झालेला मानसिक व शारीरिक त्रास ती आता विसरली होती. तिने राजेश घरी येताच त्याच्या वडिलांना फोन वरून ही सुखद बातमी सांगितली होती. राजेशचे वडील पुण्यात एका कामासाठी गेले होते. ते संध्याकाळपर्यंत घरी पोहोचणार होते. त्यांना इतका आनंद झाला होता की त्यांनी आख्या गावाला जेवण द्यायचं ठरवलं होतं. 

 राजेशला आईची फार काळजी वाटत होती. ती खूपच अशक्त दिसत होती व जागरणामुळे तिचे डोळे निस्तेज दिसत होते. जेवण झाल्यावर राजेश आईपाशी गेला. राजेश आईला म्हणाला, “गणेशने मला सगळं सांगितलं. पण अजूनही माझा विश्वास नाही बसत. त्याने सांगितलेलं मला काहीच आठवत नाहीये आणि तू स्वतःचे के हाल केले आहेस आई.” “आईचं मन काय असतं हे तुला नाही समजणार बाळा. तू परत आलास यातच मला समाधान आहे. काळजी करू नकोस आता माझी तब्येत सुधारेल.” राजेशची आई त्याला म्हणाली. दारावरची बेल वाजली. राजेशने दरवाजा उघडला. समोर राजेशचे वडील उभे होते. राजेश काही बोलायच्या आताच त्यांनी राजेशला मिठी मारली. मागे संपत उभा होता. तिघेही आत आले. राजेशला आपण एखादं स्वप्न पाहतोय असं वाटत होतं. तो घरात आल्यापासून त्याने जे काही ऐकलं होतं ते अकल्पनिय व स्वप्नवत वाटत होतं पण इथे तर त्याची स्वतःची माणसं होती मग याला स्वप्न तरी कसं म्हणणार. 

राजेशचे वडील आत गेले. त्यांच्यात आणि राजेशच्या आईमध्ये बराच वेळ बोलणं सुरू होतं. थोड्या वेळाने राजेशचे वडील बाहेर आले व राजेशच्या समोर बसले. ते बोलू लागले, “तू गेल्यापासून आम्ही एक एक दिवस नुस्ता पुढे ढकलत होतो. तुझ्या आईने तर जेवण देखील सोडलं होतं. खरं सांगायचं तर मी तू परत येण्याची आशाच सोडली होती. तुझी आई मात्र तू आता परत येणार नाहीस हे मानायलाच तयार नव्हती. तिने कोल्हापूरच्या आंबाबाईला नवस बोलला आहे. उद्या सकाळीच आपल्याला नवस फेडायला कोल्हापूरला जायचं आहे. तू परत आल्याच्या आनंदात मी परवा गावजेवण देणार आहे.” “बाबा, खरंतर मला काहीच आठवत नाहीये. मला जेवढं आठवतंय त्यानुसार मी अलिबागला गेलोच नव्हतो. मी इतके दिवस पुण्यातच होतो.” राजेश वडिलांना म्हणाला. “पोलिसांनी तुला पुण्यात देखील शोधला पण तू तुझ्या फ्लॅटवर नव्हतास आणि कॉलेजात सुद्धा नव्हतास. पण खरंतर तू सुखरूप परत आलास यातच आम्हाला समाधान आहे. आता दोन दिवस घरी विश्रांती घे. तसही तुझी आई तुला इतक्यात सोडणार नाही.” एवढं बोलून राजेशचे वडील थांबले. आपल्या आईवडिलांना खुश पाहून राजेशलाही आनंद झाला होता पण हा गुंता काहिकेल्या सुटत नव्हता.

सोमवारी सकाळी राजेश व त्याचे आईवडील कोल्हापूरला जायला निघाले. खूप वर्षांपूर्वी जेव्हा राजेश अगदी लहान होता तेव्हा तो आंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरला आला होता. त्यावेळचा एक प्रसंग राजेशला आठवला. राजेश तेव्हा जेमतेम सात आठ वर्षांचा होता. तो आई वडिलांबरोबर दर्शनाच्या रांगेत उभा होता. दर्शनासाठी भाविकांची फार गर्दी झाली होती. दर्शन छान झालं व देवीची आरतीसुद्धा मिळाली. लोक परत जायला निघाले. राजेशच्या वडिलांनी त्याचा हात धरला होता पण गर्दीमुळे त्यांचा हात सुटला व राजेश गर्दीत हरवला. आईवडील कुठे दिसत नाहीत हे पाहून राजेश कावराबावरा झाला. गर्दीमुळे तो पुढे ढकलला जात होता. आजूनही आईवडील दिसत नव्हते. राजेश रडू लागला तेवढ्यात कोणीतरी त्याचा हात पकडला. त्याने वर पाहिलं, आपल्या वडिलांचा चेहेरा पाहून राजेश रडायचा थांबला. वडिलांना पाहून राजेशला जो आनंद झाला होता तसाच आनंद आज तो त्याच्या आईवडिलांच्या चेहेऱ्यावर पाहात होता.

गाडी कोल्हापुरात पोहोचली. राजेश व त्याचे आईवडील थेट मंदिरात गेले. गर्दी तुरळक होती त्यामुळे दर्शन छान झालं. दुपारी जेवण आटोपून ते परत गावी यायला निघाले. रात्री ते घरी पोहोचले. पाटलांच्या पोराला भेटण्यासाठी गावातील लोक येत होते. गावातील सर्वांचाच राजेश खूप लाडका होता. प्रवासामुळे राजेशला खूप थकवा आला होता पण भेटायला येणाऱ्या लोकांचं प्रेम पाहून कोणालाच नाही म्हणत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळीच गावजेवणाची तयारी जोरदार चालू होती. गावात उत्साहाचं वातावरण होतं. गाव तसं छोटच असल्यामुळे प्रत्येकजण एकमेकाला ओळखत होता. पाटील त्यांच्या दानशूरपणासाठी गावात प्रसिद्ध होते. आता तर त्यांचा हरवलेला मुलगाच परत आल्यामुळे कसलीच हयगय नव्हती. गोडाधोडाचं जेवण जेवल्यावर गावातील लोक तृप्त झाले.

राजेशला मात्र आता पुण्याचे वेध लागले होते. पण आईवडिलांच्या आग्रहाखातर तो अजून दोन दिवस थांबणार होता. दोन दिवस मस्त आईच्या हातचं खाऊन एखाददुसरा किलो वजन वाढवूनच तो निघणार होता. शेवटी परत जायचा दिवस उजाडला. राजेशने बॅग भरली. त्याच्या आईने त्याचे आवडते बेसनाचे लाडू बनवले होते. राजेशने लाडवाचा डबा बागेत टाकला व सर्वांचा निरोप घेऊन तो पुण्याला जायला निघाला.


XXXXX


सकाळी आठ वाजता राजेश स्वारगेटला पोहोचला. ऑटोने तो घरी आला. दरवाजाला कुलूप नव्हतं म्हणजेच रवी परत आला होता. राजेशने बेल वाजवली पण दरवाजा उघडला नाही. त्याने पुन्हा बेल वाजवली पण पुन्हा तेच. तिसऱ्या बेलनंतर मात्र दरवाजा उघडला. समोर रवी डोळे चोळत उभा होता. त्याच्याकडे पाहूनच कळत होतं की त्याची झोपमोड झाली आहे. “अरे राजेश! काय माणूस आहेस राव तू. तुला एवढे फोन केले तर तुझा फोन स्वीच ऑफ. अन एक फोन करता येत नाही होयरे तुला. मला वाटलं काय गचकला की काय हा.” एवढे बोलून रवी मोठयाने हसू लागला. “मला आत तर येउदे पहिलं. सांगतो की सगळं.” राजेश रवीला म्हणाला व घरात गेला. थोड्यावेळाने फ्रेश होऊन राजेश हॉल मध्ये आला. रवी टीव्ही पहात होता. राजेश सोफ्यावर रवीच्या बाजूला बसला. “रवी, तुझ्या वडिलांची तब्येत कशी आहे आता?” राजेशने विचारलं. “तशी ठीक आहे तब्येत, परवाच डिस्चार्ग मिळाला. म्हणूनच मी काल निघालो. तू काय सांगणार होतास ते सांग आता.” रवी म्हणाला. राजेशने सर्व काही रवीला सांगितलं. स्वारगेटवरच्या प्रसंगापासून अलिबाग पर्यंत सर्व काही त्याने सांगितलं. “खरच एखादया सस्पेन्स स्टोरीसारखं वाटतंय. पण तुला खरच काही आठवत नाही?” रवीने राजेशला विचारलं. “नाहिरे आईशपथ मला काहीसुद्धा आठवत नाही.” राजेश म्हणाला. 

रात्री बराच वेळ रवी आणि राजेशच्या गप्पा झाल्या. राजेशला सकाळी कॉलेजला जायचं होतं त्यामुळे तो रात्री अकरा वाजताच झोपायला गेला. रवीला मात्र झोप येत नव्हती. त्याची नाइट ड्युटी असल्यामुळे त्याची झोपायची वेळच उशिराची होती. बेडवर पडल्यापडल्याच राजेशला गाढ झोप लागली. काही तासांनी अचानक राजेश दचकून जागा झाला. त्याने टॉर्च ऑन केला व भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. पहाटेचे चार वाजले होते. अजूनही राजेशला ते स्वप्न आठवत होतं. फारच विचित्र स्वप्न होतं ते. यापूर्वीही राजेशला बऱ्याच वेळा स्वप्न पडलं होतं पण हे स्वप्न काहीतरी वेगळं होतं. कारण हे स्वप्न राजेशच्या डोक्यातून जातच नव्हतं. असं पहिल्यांदाच होत होतं. आता काही आपल्याला परत झोप येणार नाही हे राजेशला जाणवलं. राजेश उठून बाथरूम मध्ये गेला व त्याने चेहेऱ्यावर पाणी मारलं. तरी देखील त्या स्वप्नात घडलेला प्रसंग अजूनही राजेशच्या मनात घर करून होता. आता शेवटचा पर्याय म्हणून राजेश स्वयंपाकघरात गेला व त्याने शेगडीवर दुधाचं पातेलं तापवायला ठेवलं. दोन मिनिटात चहा तयार झाला. चहाचा कप हातात घेऊन राजेश हॉलमध्ये आला व सोफ्यावर बसला. 

चहाचा घोट पोटात गेल्यावर राजेशला थोडा उत्साह वाटला. त्या स्वप्नामुळे का होईना बऱ्याच दिवसांनी राजेश आज पहाटे उठला होता. त्याने टीव्ही चालू केला व मराठी बातम्यांच चॅनेल लावलं. पण दहा मिनिटातच तो कंटाळला. खून, बलात्कार, दरोडा, अपघात, घोटाळा यासारख्या नकारात्मक बातम्या पाहून त्याने कंटाळून गाण्यांचे चॅनेल लावले. पण रवी अजूनही झोपला असल्यामुळे त्याला आवाज वाढवणं ठीक वाटलं नाही. राजेशने टीव्ही बंद केला व हॉलची खिडकी उघडली. बाहेर छान वारं सुटलं होतं. राजेशला बाहेर एक फेरफटका मारायची इच्छा झाली. कपडे बदलून राजेश घराबाहेर पडला. हवेतला गारवा चांगलाच जाणवत होता. रस्त्यावर चिठपाखरू देखील नव्हतं. त्याने घड्याळात पाहिले, आता पाच वाजले होते. काही क्षण त्याने कुठे जावं याचा विचार केला व तो कर्वे उद्यानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात तो कर्वे उद्यानात पोहोचला. उद्यानात सर्वत्र प्रसन्न वातावरण होतं. एका मंचकावर काही वृद्ध पुरुष व स्त्रिया योगासने करत होते. एकाबाजूला दोन शाळकरी मुलं बॅडमिंटन खेळत होती. जॉगिंग ट्रॅकवर अनेकजण जॉगिंग करत होते. त्यातील काही अतिशय फिट दिसत होते तर काही बऱ्यापैकी स्थूल होते. जवळच एका उंच झाडाखाली बसून एक वृद्ध मनुष्य रेडिओवरील भक्तीगीत अतिशय तल्लीन होऊन ऐकत होता. त्या गाण्याला जणू पार्श्वसंगीत दिल्याप्रमाणे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. हे सर्व पाहून राजेशच्या मनावरील मरगळ उतरली व तो जॉगिंग ट्रॅकवरून धावू लागला. पाचच मिनिटे धावल्यावर राजेशच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. कितीतरी वर्षांनी राजेश असा मनसोक्त धावला होता. शाळेत असताना धावण्याच्या शर्यतीत पुणे जिल्ह्यात पहिला आलेला राजेश आज पाचच मिनिटात दमला होता. राजेशला जुने दिवस आठवले व तीन वर्षात आपण एवढे कसे बदललो हा विचार त्याच्या मनात येऊन गेला. तसा आताही तो खूप स्थूल वगैरे झाला नव्हता. इंचभर चरबी मात्र त्याच्या शरीरावर चढली होती इतकच. गावात असताना त्याच्या वडिलांच्या धाकामुळे त्याला रोज व्यायाम करावा लागे. पण बी.इच्या पहिल्या वर्षाला राजेशने पुण्याच्या एका नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व तो गाव सोडून पुण्याला आला. गाव सोडल्यावर वडिलांचा धाकही संपला व व्यायामही थांबला. आभ्यास मात्र राजेश मनापासून करायचा. शाळेत असताना राजेशने कधी पहिला नंबर चुकवला नाहीच पण गावातल्या कॉलेजमध्ये व आता पुण्यातल्या कॉलेजमध्ये देखील पहिल्या पाच नंबरात राजेशचं नाव फिक्स होतं. पुण्यासारख्या शहरात राहून देखील राजेशला कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. त्याच्या आईवडिलांचे संस्कारच तसे होते. राजेशचे वडील जनार्दनराव पाटील गावातली मोठी असामी. सत्तर एकर बागायती शेती, एका साखर कारखान्याचे चेअरमन तसेच एका सहकारी संस्थेचे डायरेक्टर एवढं असूनदेखील जनार्दनरावांनी कधी एका पैशाची देखील फेरफार केली नाही. स्वतः जरी फारसे शिकले नसले तरी आपल्या एकुलत्या एक मुलाने खूप शिकावं ही त्यांची इच्छा होती. राजेशने देखील कधी आपल्या वडिलांच्या गावातील वजनाचा फायदा घेतला नाही की पैशाची मस्ती दाखवली नाही. राजेशची आई गृहिणी होती. पण तिच्याएवढी प्रेमळ आणि उदार बाई आख्या गावात सापडणार नाही. शेतात काम करणाऱ्या कामगारांना देखील ती स्वतःच्या हाताने जेऊ खाऊ घालायची तेही अगदी आग्रहाने. आपल्या आईवडीलांमधील सद्गुण राजेशमध्ये देखील आले होते.

राजेशने रुमालाने कपाळावरचा घाम पुसला व समोरच्या झाडाच्या शेंड्यावर आलेल्या सुर्यबिंबाकडे पाहिले. त्याला गावाकडची आठवण झाली. दिवसेंदिवस काँक्रीटचे जंगल बनत चाललेल्या पुणे शहरात उभ्या असलेल्या उंचच उंच इमारतींमुळे उगवत्या सूर्याचं दर्शनही आता दुर्लभ झालं आहे याची खंत राजेशला होती. त्याने घड्याळात पाहिलं, सहा वाजले होते. राजेशने जॉगिंग ट्रॅकवर चालत एक फेरी मारायचं ठरवलं व तो बाकावरून उठला. एक राऊंड झाल्यावर राजेश उद्यानाच्या बाहेर आला व घराच्या दिशेने चालू लागला. 

राजेश जेव्हा घरी पोहोचला तेव्हा रवी गाढ झोपला होता. श्वासोच्छ्वासामुळे त्याचं वाढलेलं पोट वरखाली होत होतं. तशी राजेशची आणि रवीची ओळख काही महिन्यांपूर्वीचीच. रवी येण्यापूर्वी राजेश एकटाच त्या फ्लॅटमध्ये रहात होता. रवी फ्लॅटच्या मालकाचा लांबचा नातेवाईक होता. रवी आल्यापासून राजेशचं भाडं निम्मं झालं पण त्याचा एकांत मात्र हरवला. तसा रवीचा राजेशला काही त्रास होत नव्हता पण मुळात राजेशला एकटं राहायला आवडायचं. रवी राजेशपेक्षा वयाने मोठा होता. तो एका कॉलसेन्टरमध्ये नोकरी करत होता. तो दुपारी दोन वाजता घरातून बाहेर पडायचा व रात्री बाराला घरी परतायचा. त्यामुळे राजेशची व रवीची भेट केवळ शनिवारी व रविवारीच व्हायची करण त्यादिवशी रवीला सुट्टी होती. राजेश रोज सकाळी नऊ वाजता कॉलेजला जायला घरातून निघायचा व तो गेल्यावर साधारण एक तासाने म्हणजेच दहा वाजता रवी जागा व्हायचा. तसा शनिवारी व रविवारी देखील रवी थोडाच वेळ घरी असायचा. बराचसा वेळ तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत घालवायचा. घरी असताना मात्र रवीची बडबड सतत सुरू असायची. राजेशला फारसं बोलायला आवडत नव्हतं पण तो रवीची बडबड सहन करायचा. बहुतांश वेळा रवीचा बोलण्याचा विषय त्याची गर्लफ्रेंडच असायचा. गर्लफ्रेंडबद्दल बोलून झाल्यावर रवी त्याच्या मित्रांचे एकेक किस्से राजेशला सांगायचा. राजेशसुद्धा अगदी मनापासून सर्वकाही ऐकून घ्यायचा पण अभ्यासाची वेळ झाल्यावर मात्र राजेश रवीला तसं स्पष्ट सांगायचा. बोलता बोलता मध्येच असं आडवल्यामुळे रवीचा मुड ऑफ व्हायचा व तो “काय नुसता आभ्यास करतो. एखादी मस्त पोरगी पटव. माझ्यासारखं लाईफ एन्जॉय करायला शिक.” असं म्हणायचा. हे ऐकून राजेश काही न बोलता नुसतं हसायचा व परत पुस्तकात डोकं खुपसून बसायचा. 

राजेशने झोपलेल्या रवीकडे एकदा पाहिले व रवीच्या तोंडावर एक पेला पाणी मारून याला उठवावं व व्यायामाचे महत्व सांगावे असा विचार राजेशच्या मनात आला पण तो विचार मनातच ठेवून राजेश अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. थोड्यावेळात आवरून झाल्यावर राजेश कॉलेजला जायला घरातून बाहेर पडला. त्याने पार्किंगमधून बाईक बाहेर काढली व अर्ध्या तासात तो संदीपच्या घरापाशी पोहोचला. संदीप देसाई हा राजेशचा सर्वात जवळचा मित्र. तो देखील राजेशसारखाच आभ्यासू व मेहनती होता. पण दोघांच्या परिस्थितीत मात्र जमीनआसमानाचं अंतर होतं. राजेश तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्मला होता तर संदीपची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. त्याच्या घरी वडील, आई व दोन बहिणी असा मोठा परिवार होता. संदीपचे वडील एका मोठ्या कंपनीत कारकून होते. त्याची आई चार घरात जाऊन स्वयंपाक बनवायची. संदीपच्या दोनही बहिणी त्याच्यापेक्षा लहान होत्या व दोघीही अजून शाळेत शिकत होत्या. आपल्या परिस्थितीमुळे संदीपला लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करून स्वतः च्या पायांवर उभं राहणं गरजेचं होतं. त्यामुळे डिग्री मिळवून एखादी चांगली नोकरी मिळवणं हेच त्याचं ध्येय होतं व त्यासाठी कितीही कष्ट करायची त्याची तयारी होती. राजेश व संदीपच्या परिस्थितीतील फरकामुळे त्यांच्या मैत्रीत कधीच बाधा आली नाही. उलट त्यांची मैत्री दोन वर्षात अजूनच दृढ झाली होती. 

राजेश जेव्हा संदीपच्या घरापाशी पोहोचला तेव्हा संदीप घराबाहेरच उभा होता. संदीपकडे स्वतःची गाडी नव्हती त्यामुळे तो राजेश बरोबरच कॉलेजला जायचा. थोड्याच वेळात ते कॉलेजात पोहोचले. तरुण तरुणींच्या स्वच्छंदी वावरामुळे कॉलेजचा परिसर तारुण्याने न्हाऊन निघाल्यासारखा भासत होता. राजेश व संदीप वर्गात पोहोचले. पहिला तास सुरू व्हायला अजून थोडा वेळ बाकी होता. प्राध्यापक अजून वर्गात यायचे होते. त्यामुळे बहूतांश मुलं आपापल्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यात दंग होते. राजेश-संदीप सारखी काही मोजकी मुलं मात्र सर आज काय शिकवणार याचा विचार करत पुस्तकात डोकी खुपसून बसली होती. थोड्याच वेळात पांढराशुभ्र सदरा व काळी पॅन्ट घातलेले सहस्त्रबुद्धे सर वर्गात आले. त्यांना पाहताच संपूर्ण वर्ग शांत झाला. त्यांचा दराराच तसा होता. सरांच्या पाठोपाठ एक मुलगी वर्गात आली व सर्व मुलांच्या नजरा त्या सुंदर मुलीकडे वळल्या. पण काही क्षणातच सहस्त्रबुद्धे सरांच्या आवाजाने सारे भानावर आले. सरांनी खूण करताच ती मुलगी समोर उभी राहिली. सर बोलू लागले, “ही वृषाली गंधे. वृषालीच्या वडिलांची नाशिकहून पुण्यात बदली झाली. त्यामुळे तिला तीचं आधीचं कॉलेज सोडावं लागलं. आजपासून ती या वर्गात बसेल. ती इथे नवीन असल्यामुळे तुम्ही तिला लागेल ते सहकार्य कराल अशी मी अपेक्षा करतो. वृषाली तू आता बसू शकतेस.” वृषाली पुढच्याच बेंचवर एका मुलीच्या बाजूला बसली. पाहता पाहता सहस्त्रबुद्धे सरांचा तास संपला व ते वर्गातून निघाले. पुढचे प्राध्यापक वर्गात येईपर्यंत मुलांची बडबड पुन्हा सुरू झाली. एकानंतरएक तास संपत गेले व पाहतापाहता कॉलेज सुटलं. इतकावेळ ताटकळलेली मुलं कॉलेजातून बाहेर पडली.


X X X X X X


राजेशला मात्र एका वेगळ्याच विचाराने ग्रासलं होतं. आज वर्गांत आलेल्या त्या नवीन मुलीबद्दल त्याला एक प्रकारचं कुतूहल वाटत होतं. अजून तो वृषालीला भेटलाही नव्हता पण तिला पाहताच त्याच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळी भावना जागी झाली होती. हे प्रेम होतं का? हे त्यालाही कळात नव्हतं. पण ज्या व्यक्तीला आज आपण पहिल्यांदाच पाहिलं, जिच्याशी आपली अजून साधी ओळख देखील नाही तिच्याबद्दल आपल्या मनात प्रेमभावना कशा निर्माण होतील? याविषयी संदीपशी बोलावं असही राजेशला वाटलं पण संदीपला प्रेमाबद्दल विचारणं म्हणजे एखाद्या भिकाऱ्याला श्रीमंतीविषयी विचारण्यासारखं होतं. आणि त्याने संदीपला विचारलं जरी असतं तरी त्याने “कशाला असल्या भानगडीत पडतोस अभ्यासात लक्ष दे” असा रुक्ष सल्ला दिला असता. पण राजेश तरी कुठे वेगळा होता. आत्तापर्यंत त्याला कुठली मुलगी आवडली नव्हती असं नाही पण ते केवळ शारीरिक आकर्षण म्हणून त्याने दुर्लक्ष केलं होतं. आताही आपल्याला वृषालीबद्दल जेकाही वाटतंय ते शारीरिक अकर्षणामुळेच आहे अशी स्वतः ची समजूत काढून तो कॉलेजमधून बाहेर पडला. संदीपला घरी सोडून राजेश फ्लॅटवर पोहोचला. घरी येताच राजेशने नेहमीप्रमाणे रवीच्या अंथरूण पांघरूणाची घडी घातली. दुपारी निघताना रवीने जमेल तेवढा पसारा ठेवायचा आणि घरी आल्यावर राजेशने तो आवरायचा असा जणू त्या दोघांमध्ये अलिखित करारच झाला होता. सुरुवातीचे काही दिवस राजेशने रवीला सांगण्याचा प्रयत्न केला पण आपल्या बोलण्याचा रवीवर काहीच परिणाम होत नाही हे समजल्यावर राजेशने माघार घेतली. घर आवरून झाल्यावर त्याने थोडावेळ टीव्ही पाहिला. रात्रीचं जेवण आटोपल्यावर राजेशने नेहमीप्रमाणे आज कॉलेजात जे जे शिकवलं त्याची रिविजन केली. आभ्यास करताना नकळत त्याच्या मनात वृषालीबद्दल विचार येत होते. सहस्रबुद्धे सरांनी करून दिलेली ओळख, तिचं एकेक पाऊल सावकाश टाकत चालणं, तिचा सुंदर चेहरा, आठवून राजेशच्या गालावर लाली आली. मात्र घड्याळाकडे लक्ष जाताच त्याने झोपायचं ठरवलं, कारण आजसारखंच उद्यादेखील पहाटे उठून कर्वे उद्यानात जायचा त्याने निर्धार केला होता. हा निर्धार केवळ निर्धारच राहू नये यासाठी राजेशने पहाटे पाचवाजताचा अलार्म लावला व अंथरुणावर अंग पसरलं.


X X X X X X


वृषाली कॉलेजमधून घरी आली. “कसा गेला कॉलेजचा पहिला दिवस?” घरात पाय टाकताच आईने वृषालीला विचारलं. “अगं आई मला घरात पाय तरी ठेऊदे. आधी मस्त चहा ठेव. चहा पिते आणि मग सांगते तुला सगळं.” वृषाली तिच्या आईला म्हणाली व बेडरूममध्ये गेली. 

वृषाली एकुलती एक असल्यामुळे चांगलीच लाडावली होती. तिची आई तर तिच्याशी मैत्रीण असल्याप्रमाणेच वागायची. वृषालीची आई गृहिणी होती व तिचे वडील एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मोठया पदावर कार्यरत होते. त्यांच्या कंपनीने पुण्यात नवीन प्लांट सुरू केला होता व त्यामुळे त्यांची बदली कंपनीने पुण्यात केली होती. तसे ते एक महिन्यापूर्वीच नाशिकहुन पुण्याला शिफ्ट झाले होते. पण वृषालीला पुण्यात कोणत्याच कॉलेजात प्रवेश मिळत नव्हता पण तिच्या वडिलांचे एक मित्र एका संस्थेत ट्रस्टी असल्यामुळे कसाबसा तिला प्रवेश मिळाला व वृषाली तिच्या आईबरोबर पुण्यात राहायला आली. 

वृषाली पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होती. ग्रॅज्युएशननंतर यूएसला जायची तिची इच्छा होती. तिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती देखील चांगली असल्यामुळे तीला हे शक्य होतं. खरंतर तिला नाशिक सोडायची बिलकुल इच्छा नव्हती. तिचं बालपण नाशिकमध्येच गेलं होतं. तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळे तिचे शाळेत असताना व आता कॉलेजमध्ये सुद्धा भरपूर मित्र-मैत्रिण होते. काही दिवसांपासून वृषालीला तिच्या कॉलेजमधला एक मुलगा आवडायला लागला होता. त्यांच्यात चांगली मैत्री सुद्धा झाली होती. त्याचं नाव सुमित होतं. रोज कॉलेजमधून घरी आल्यावर त्यांचं मोबाईलवर चॅटिंग चालायचं. पुण्याला आल्यावर आपल्याला सुमितला भेटता येणार नाही या विचारानेच तिला उदास वाटायचं. पण आता तिचा नाईलाज होता. 

कपडे बदलून झाल्यावर वृषालीने बॅगेतून मोबाईल काढला. व्हाट्सऍपवर आलेला सुमितचा मेसेज पाहताच वृषालीचा चेहेरा खुलला. “कसा गेला कॉलेजचा पहिला दिवस.” “आम्हाला आता विसरणार तर नाही ना?” सुमितने मस्करीत विचारलं होतं. “मी नाही विसरणार पण मला वाटलं होतं तू विसरला असशील मला.” वृषालीनेही चेष्टेतच रिप्लाय केला. ती अजून काहीतरी लिहिणार होती तेवढ्यात, “चहा तयार आहे” अशी आईची हाक ऐकून “आईने चहा केलाय, आपण नंतर बोलू, बाय.” असा मेसेज करून वृषाली हॉलमध्ये आली. तिने टेबलवरचा चहाचा कप उचलला व ती सोफ्यावर बसली. तिने टीव्ही चालू केला इतक्यात तिची आईदेखिल तिच्या बाजूला येऊन बसली. तिच्या आनंदी चेहेऱ्याकडे पाहून आई लाडाने म्हणाली, “फार खुश दिसतेय आमची पिंकी आज.” “आई तुला कितीवेळा सांगितलं मला पिंकी नाही म्हणायचं, मी काय आता लहान आहे का?” वृषाली चिडून म्हणाली. “ बर, नाही म्हणणार. पण तुझ्या नवीन कॉलेजबद्दल सांगशील की नाही मला.” वृषालीने सकाळी सहस्रबुद्धे सरांनी करून दिलेल्या ओळखीपासून पहिल्याच दिवशी तिची जिच्याशी चांगली मैत्री जमली त्या मनालीबद्दल सर्वकाही आईला सांगितलं. अर्थात वर्गात प्रवेश करताच वर्गातील मुलांकडून मिळालेलं अटेंशन सोडून. तो विचार मनात येताच तिला स्वतः च्या सौंदर्याबद्दल असलेला अभिमान जागा झाला व वृषाली मनोमन सुखावली. चहा पिउन झाल्यावर वृषालीने थोडावेळ आभ्यास केला. आईने जेवणासाठी बोलावल्यावर वृषाली बाहेर आली. ऑफिसच्या कामासाठी वृषालीचे वडील बाहेरगावी गेले होते व ते आता दोन दिवसांनीच परत येणार होते. त्यामुळे वृषालीच्या आईने त्या दोघींसाठीच स्वयंपाक केला होता. जेवण झाल्यावर वृषाली तिच्या बेडरूममधे आली व तिने तिच्या नाशिकच्या एका मैत्रिणीने भेट दिलेली सुदीप नगरकरची एक रोमँटिक कादंबरी वाचण्यासाठी कपाटातून काढली. पण थोड्याच वेळात सुमितचा मेसेज आला व वृषाली परत चॅटिंगमध्ये मग्न झाली. 


X X X X X X


आजदेखील राजेश पहाटे लवकर उठला व बर्वे उद्यानात व्यायामासाठी आला. धावून झाल्यावर तो एका बाकावर बसला. राजेशने ट्रॅकपॅन्टच्या खिशातून इअरफोन काढले व मोबाईलला जोडले. तो गाणी ऐकण्यात मग्न झाला. थोड्या वेळाने त्याने घड्याळात पाहिले व तो उद्यानातून बाहेर पडला. राजेशने समोर पाहिले व त्याच्या हृदयाची धडधड अचानक वाढली व चेहेऱ्यावर हास्य उमटले. ती समोरून येत होती. राजेशने तिला ओळखले. ती काल त्याच्या वर्गात नवीन आलेली मुलगीच होती. त्याच्या कानात मेटॅलिकाचं ‘एंटर सँडमॅन’ हे गाणं वाजत होतं पण तिला पाहताच हृदयात मात्र वेगळंच गाणं वाजू लागलं. पण ज्या क्षणी राजेशला हे समजलं की ती आपल्याकडे पाहून हसतेय तेव्हा गाणं वाजयचं थांबलं. ती हसत हसतच पुढे गेली व तिने उद्यानात प्रवेश केला. राजेशने समोर उभ्या असलेल्या गाडीच्या आरशात पाहिले तेव्हा त्याला वृषालीच्या हसण्याचं कारण समजलं. पक्ष्याची विष्टा राजेशच्या डोक्यावर पडली होती. ते पाहून राजेश देखील हसला. त्या पक्ष्याच्या विष्टेमुळे वृषालीचं लक्ष आपल्याकडे गेलं याचा उलट त्याला आनंद झाला व त्या नादात तो डोक्यावरची घाण न पुसताच तसाच घरी आला. घरी पोहोचल्यावर राजेशने आंघोळ केली व तो वर्तमानपत्र वाचू लागला. पण आज काहिकेल्या त्याचं लक्ष लागत नव्हतं. त्याचं मन वृषालीच्या विचारांनी व्यापलं होतं. ती चालताना वाऱ्यावर उडणारे तिचे लांब केस, तिचं निर्मळ, निरागस हास्य, किती मोकळेपणाने, निरागसपणे ती आपल्याकडे पाहून हसत होती. खरंतर दुसरं कोण आपल्याकडे पाहून असं हसलं असतं तर मला कीती राग आला असता, मग वृषालीच्या हसण्याचा मला राग का नाही आला? उलट तिचं एवढं कौतुक का वाटतंय मला? आणि मी तिच्याबद्दल एवढा का विचार करतोय? “काय प्रेमात बिमात पडलात की काय राजे?” रवीच्या प्रश्नाने राजेशची विचारसमाधी भंग पावली. पाठीमागे उभा असलेल्या रवीकडे पाहून राजेशने विचारलं, “अरे रवी तू केव्हा उठलास?” “मगाशीच तुझ्या समोरतर उठलो. वर्तमानपत्र वाचण्यात तू एवढा मग्न होतास की मी गुडमॉर्निंग बोललेलं तुला ऐकू गेलं नाही. आणि आज पेपरात असा कोणता जोक आलाय, मला पण सांगना.” रवी म्हणाला. “नाहिरे कोणताही जोक नाही आला. असं का विचारतोयस?” राजेश निरागसपणे म्हणाला. “अच्छा जोक नाही आला तर मग या अजय देवगणचा अक्षय कुमार कधीपासून झाला?” रवी मिश्कीलपणे म्हणाला. “अरे असं कोड्यात का बोलतोयस? काय ते स्पष्ट सांग ना!” रवीच्या बोलण्याचा रोख न समजून राजेश वैतागून म्हणाला. “कधीही न हसणारा तू आज खळखळून हसतोयस. म्हणूनच विचारलं कुणाच्या प्रेमात पडला नाहीस ना?” रवी हसत म्हणाला. राजेशला काय बोलावं तेच कळेना. त्याची आवस्था पाहून शेवटी रवीच बोलला, “मी चहा करतोय, तू घेशील ना थोडा?” “घेईन अर्धा कप. तुझ्या हातचा चहा पिण्याचा योग परत येईलच असं नाही.” एवढं बोलून राजेश पुन्हा स्वतः च्या विचारसमाधीत बुडाला. आज रवी एवढ्या लवकर कसा उठला हा विचार देखील त्याच्या मनात आला नाही.

बरोबर नऊ वाजता राजेश घरातून बाहेर पडला. थोड्याच वेळात तो संदीपच्या घरापाशी पोहोचला. आज मात्र राजेशला थोडा वेळ थांबायला लागलं. काही वेळाने संदीप घाईघाईतच घरातून बाहेर आला व गाडीवर बसला. गाडी चालवत असताना आज कॉलेजात वृषाली परत दिसेल या विचाराने राजेश सुखावला. “सहस्त्रबुद्धे सरांनी दिलेला होमवर्क झाला का?” संदीपच्या प्रश्नाने राजेश भानावर आला. वृषालीच्या नादात आज पहिल्यांदा राजेश होमवर्क करायला विसरला होता. राजेशच्या उत्तराची वाट न पाहताच संदीप सांगू लागला, “अरे काल आईची तब्येत अचानक बिघडली. बाबा पण घरात नव्हते. त्यांना ऑफिसमध्ये काम होतं. त्यामुळे मलाच तिच्याबरोबर दवाखान्यात जावं लागलं. काल काहीच आभ्यास झाला नाही. मग सकाळी उठुनच सगळा होमवर्क केला. त्यामुळेच आवरायला उशीर झाला.” राजेशने यावर नुसती मान डोलावली. 

नेहमी प्रमाणेच आज देखील कॉलेजमध्ये तारुण्याचा उत्साह ओसंडून वाहात होता. मुलामुलींच्या गजबजाटामुळे कॉलेजचा परिसर जिवंत भासत होता. राजेश व संदीप वर्गात पोहोचले व त्यांच्या नेहमीच्या बेंचवर बसले. पहिला तास जगदाळे सरांचा होता. जगदाळे सर वर्गात आले. राजेशने पूर्ण वर्गावर नजर फिरवली पण वृषाली त्याला कुठेच दिसली नाही. जगदाळे सरांनी हजेरी घ्यायला सुरुवात केली. त्यांनी नाव पुकारताच जो तो विद्यार्थी “प्रेसेंट” असं म्हणून स्वतः ची हजेरी लावत होता. ‘वृषाली गंधे’ सरांनी नाव पुकारलं व समोर पाहिलं. पण उत्तर नाही आलं. सरांनी वृषालीच्या नावासमोर अबसेंटीची खूण केली व पुढ्च्या मुलीचं नाव पुकारलं. राजेश मात्र थोडा उदास झाला. “का नाही आली अजून वृषाली?” हा विचार सारखा राजेशच्या मनात येत होता. 

जेवणाच्या सुट्टीची बेल झाली व सर्व मुलं-मुली आपापल्या ग्रुपबरोबर टिफिन घेऊन कॅन्टीनमध्ये जेवायला गेले. सुट्टीनंतरचा तास सहस्त्रबुद्धे सरांचा होता. सहस्त्रबुद्धे सरांना थोडादेखील उशीर खपायचा नाही. त्यामुळे जेवणाची सुट्टी संपायच्या पाच मिनिटे आधीच सर्व मुलं-मुली वर्गात येऊन बसली, अर्थात काही टारगट मुलं सोडून. सहस्त्रबुद्धे सर वर्गात आले व पहिली दहा मिनिटे त्यांनी काल दिलेल्या होमवर्कबद्दल मुलांना विचारलं व कुणाला काही प्रश्न असल्यास विचारायला सांगितलं. नेहमीप्रमाणे संदीपने त्याच्या दोन शंका विचारल्या. सरांनी देखील न कंटाळता अतिशय उत्साहात त्याच्या शंकांचं निरसन केलं व आता नेहमीप्रमाणे राजेशही काहीतरी विचारेल या आशेने सरांनी राजेशकडे पाहिलं. पण राजेशने नकारार्थी मान डोलावली. आज त्याने होमवर्कच केला नव्हता मग त्याला प्रश्न पडतीलच कसे! सरांनी शिकवायला सुरुवात केली व पाहता पाहता त्यांचा तास संपला. सहस्त्रबुद्धे सर वर्गातून निघणार तेवढ्यात वृषाली धापा टाकतच वर्गात आली. “ही काय वेळ झाली का यायची? तुम्हा आजकालच्या मुलांना कसली शिस्तच नाही.” वृषाली काही बोलायच्या आत सहस्त्रबुद्धे सर कडाडले. “गाडीचं टायर पंक्चर झालं होतं सर.” वृषाली कसंबसं म्हणाली. अजूनही तिचा श्वास स्थिर झाला नव्हता. “असली कारणं पुन्हा चालणार नाहीत.” सहस्त्रबुद्धे सर पुन्हा कडाडले व तिथून निघून गेले. वृषाली वर्गात आली व कालच्याच बेंचवर बसली. पर्समधून तिने रुमाल काढला व चेहेरा रुमालाने पुसला. 

तिला पाहताच राजेशची उदासी मात्र कुठल्याकुठे पळाली होती व त्याच्या चेहेऱ्यावर पुन्हा एकदा लाली खुलली होती. त्याने बाजूला बसलेल्या संदीपकडे पाहिलं. कधी नव्हेते संदीपच्या चेहेऱ्यावरसुद्धा स्मितहास्य दिसत होतं. ‘हा वृषालीचा परिणाम तर नसेल ना?’ राजेशच्या मनात शंका आली. पण तो काही बोलला नाही. 

घरी आल्यावर आपण होमवर्क करायला कसेकाय विसरलो या प्रश्नाने राजेशला ग्रासलं. त्यामुळे त्याने सलग दोन तास बसून होमवर्क संपवला. राजेश मेसमध्ये जाऊन जेवण करून आला व नेहमीप्रमाणे त्याने कपाटातून एक पुस्तक उचललं व बेडवर आडवा पडून तो वाचू लागला. राजेशला सर्वच प्रकारची पुस्तकं आवडायची पण विज्ञान कथा आणि गूढकथा जास्त आवडायच्या. आता राजेश “द टाइम मशीन” नावाची इंग्रजी कादंबरी वाचत होता. त्यातला नायक एक शास्त्रज्ञ असतो जो एका मशीनचा शोध लावतो. त्या मशीनच्या साहाय्याने तो भविष्यात व भूतकाळात जाऊ शकत असतो. राजेशने आज ती कादंबरी वाचून संपवायचं ठरवलं. कथा शेवटच्या टप्प्यात आली होती. ती कथा वाचताना राजेशला त्याच्या काकांची आठवण येत होती. त्याचे काका इसरोमध्ये शास्त्रज्ञ होते. ते जेव्हा भेटत तेव्हा राजेशबरोबर अंतराळातील विविध गोष्टींबद्दल चर्चा करायचे. त्यांच्या रंजक आणि अकल्पनिय गोष्टी ऐकून राजेशच्या मनात टाइम ट्रॅव्हल, पॅरलल युनिव्हर्स, ब्लॅक होल्स यासारख्या गोष्टींबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं.

पुस्तक वाचून संपलं व राजेशने झोपण्यासाठी दिवा मालवला. रोज झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या घटनांची उजळणी करण्याची राजेशला सवय होती. सकाळी बागेजवळ घडलेला प्रसंग आठवून राजेशला हसू आलं. वृषालीपण माझ्याबद्दल विचार करत असेल का? राजेशच्या मनात विचार आला. पण का करेल ती माझ्याबद्दल विचार? ती मला अजून ओळखत देखील नाही. तिच्याशी ओळख वाढवायला हवी. पण कशी? आज सकाळी ती व्यायामासाठी बागेत आली, म्हणजे उद्यासुद्धा येईल. आज ती सकाळी सहाच्या दरम्यान आली होती, मग मला उद्या थोडं उशिरा जावं लागेल. राजेशने त्याची विचारशृंखला तिथेच थांबवली व झोपण्यासाठी डोळे मिटले. 

राजेश सकाळी सहा वाजता बर्वे उद्यानात आला. त्याने जॉगिंग ट्रॅकला एक राऊंड मारला व आजूबाजूला पाहिलं. पण वृषाली अजून आली नव्हती. राजेशने दुसऱ्या राऊंडला सुरुवात केली. त्याने निम्मं अंतर पार केलं व त्याची नजर उद्यानाच्या गेटकडे गेली. वृषाली गेटमधून आत येत होती. आत येताच तीने हातातील पाण्याची बाटली व रुमाल एका बाकावर ठेवला व ट्रॅकवरून जॉगिंगला सुरुवात केली. राजेशने दुसरा राऊंड पूर्ण केला व पुढच्या राउंडला सुरुवात केली. थोड्या वेळाने राजेशला समोरून वृषाली येताना दिसली. तिने कानात इअरफोन घातले होते. ती जवळ येताच राजेशने तिच्याकडे पाहिले. वृषालीनेही राजेशकडे पाहिले पण तिच्या नजरेत ओळखीची कोणतीच खूण नव्हती. राजेशने पुढचे दोन राऊंड संपवले व तो बाकावर बसला. राजेशने रुमालाने चेहेऱ्यावरचा घाम पुसला. वृषालीने त्याला साधी ओळख देखील दाखवली नाही त्यामुळे तो थोडा नाराज झाला. पण कदाचित तिने आपल्याला वर्गात पाहिलेदेखील नसेल अशी त्याने स्वतः ची समजूत काढली. तसाही पाहताच क्षणी ती आपल्याकडे आकर्षित व्हावी इतके काही आपण आकर्षक दिसत नाही याची राजेशला जाणीव होती. राजेशने मोबाईलवरचं गाणं बदललं व ते गाणं ऐकण्यात तो मग्न झाला. थोड्यावेळाने राजेशने वृषालीला उद्यानाच्या गेटमधून बाहेर जाताना पाहिलं व तो बाकावरून उठला. वृषाली कुठे राहते ते पाहिलं पाहिजे, राजेशने ठरवलं. पण अशा एकट्या मुलीच्या मागे जाणं बरोबर आहे का? राजेशच्या मनात विचार आला. पण ‘प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं’ या बहुश्रुत ओळीला अनुसरून राजेश उद्यानाच्या गेटमधून बाहेर आला व वृषालीच्या मागे चालू लागला. वृषाली ज्या रस्त्यावरून जात होती तो राजेशच्या घराचा रस्ता होता. काही वेळाने वृषाली एका घरापाशी थांबली. तीने गेट उघडलं व पुढे जाऊन दारावरची बेल वाजवली. एका मध्यमवयीन स्त्रीने दार उघडलं. ती स्त्री वृषालीची आई असणार, राजेशने विचार केला. वृषाली आत जाताच राजेश दोनच घरं सोडून पुढे असलेल्या अपार्टमेंटमधल्या तिसऱ्या मजल्यावरील आपल्या घरात आला. ज्या अर्थी वृषाली रोज सकाळी बर्वे उद्यानात व्यायामासाठी येते त्याअर्थी ती जवळच कुठेतरी राहात असणार याचा अंदाज राजेशला आला होता पण ती आपल्या घराच्या इतक्या जवळ राहते हे राजेशला आत्ताच कळालं.


                   X X X X X X


रविवार होता. राजेशचा गावातला मित्र गणेश आज पुण्यात आला होता. त्याला कपडे खरेदी करायचे होते. त्यामुळे राजे आज शचा पूर्ण दिवस गणेशबरोबर फिरण्यातच गेला. गणेश रात्री राजेशच्याच फ्लॅटवर राहिला व सकाळी लवकर घराबाहेर पडला. राजेशनेच त्याला स्वारगेटला सोडलं. पण त्यामुळे आज त्याला बर्वे उद्यानात जाता नाही आलं. त्यामुळे राजेशला आज फार चुकल्यासारखं वाटत होतं. व्यायाम करायचा राहिल्यामुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे तो थोडा मलूल झाला होता. 

घरी परत येताच राजेशने झटपट आवरलं व नेहमीप्रमाणे तो संदीपच्या घरासमोर येऊन थांबला. संदीप व राजेश कॉलेजला पोहोचले. पहिल्या तासाची बेल वाजली व जाधव सर वर्गात आले. राजेशने आजूबाजूला पाहिलं. वृषाली कुठेच दिसत नव्हती. मुलांची कलकल चालू होती. जाधव सरांनी मुलांना शांत बसण्यास सांगितलं व मुलं शांत होताच शिकवायला सुरुवात केली. दुसऱ्या तासाची बेल वाजली व जाधव सर वर्गातून बाहेर गेले. वर्गात सदावर्ते सर आले. अजूनही वृषालीचा पत्ता नव्हता. ‘आज पण हिच्या गाडीचं टायर पंक्चर झालं की काय?’ राजेशच्या मनात विचार आला. पाहता पाहता जेवणाची सुट्टी झाली. “अरे संदीप, ती नवीन आलेली मुलगी कुठे दिसली का तुला?” राजेशने संदीपला विचारलं. संदीपसाठी हा प्रश्न अनपेक्षित होता. “वृषालीबद्दल विचारतोयस का तू?” संदीपने विचारलं. राजेशने नुसती मान डोलावली. “नाही दिसली. पण तू अचानक वृषालीबद्दल कसं काय विचारलस? प्रेमात बिमात पडलास की काय तिच्या?” संदीप मिश्कीलपणे म्हणाला. “नाहिरे तसं काही. ती कुठे दिसली नाही म्हणून सहजच विचारलं.” राजेश कसाबसा बोलला. पण त्याच्या गालावरची लाली पाहून संदीपला समजायचं ते समजलं. 

घरी येताच राजेशला मनालीची आठवण आली. मनाली राजेशची अगदी जवळची मैत्रीण. मैत्रीण म्हणजे अगदी बहिणीसारखीच. राजेशचे वडील आणि मनालीचे वडील खूप जुने मित्र होते. राजेश आणि मनालीच्या गप्पा बराचवेळ चालत. एकमेकांना चिडवायला त्यांना फार आवडायचं. आताही त्यांच्या गप्पा बराचवेळ रंगल्या होत्या. राजेश चांगलाच मूडमध्ये आला होता. “आज फार एकटं एकटं वाटलं असेल ना कॉलेजमध्ये. तुझी मैत्रीण नाही आली म्हणून!” राजेश सहज म्हणाला. “अरे तिचा एकसिडेंट झाला.” मनाली गंभीर आवाजात म्हणाली. हे ऐकून राजेशच्या चेहेऱ्यावरचे भाव अचानक बदलले. “ काय???” राजेश जवळजवळ ओरडलाच. “हो. ती आज कॉलेजात आली नाही म्हणून मी तिला कॉल केला. तिच्या एका मैत्रिणीने फोन उचलला व एकसिडेंटबद्दल सांगितलं.” मनाली म्हणाली. “बर मी फोन ठेवतो. मला जेवायला जायचंय.” एवढं बोलून राजेशने फोन ठेवला. त्याची बोलायची इच्छाच राहिली नव्हती. 


X X X X X X


कॉलेज संपवून वृषाली घरी आली. उद्या रविवार असल्यामुळे तीला तिच्या मित्र मैत्रिणींना भेटण्यासाठी नाशिकला जायचं होतं. पण रविवारी निघून रात्री परत यायला खूप गडबड होईल म्हणून ती आजच गाडीत बसली. तिचा मावस भाऊ तिला घ्यायला येणार होता. वृषाली बसमध्ये बसली. कधी एकदा आपण सुमितला भेटतो असं तिला झालं होतं. दोघांच्यात आता खूप घट्ट मैत्री झाली होती. दोघांचं एकमेकांवर फार प्रेम होतं. प्रेमाची कबुली देणच आता बाकी होतं. रोज रात्री त्यांचं तासन्तास चॅटिंग चालायचं. एक दिवस जरी त्याचा मेसेज नाही आला तरी वृषाली बैचेन व्हायची. रात्री साधारण साडेआठ ते नऊपर्यंत सुमितचा मेसेज हमखास यायचा. वृषालीने घड्याळात पाहिले. नऊ वाजून गेले होते. अजूनही सुमितचा मेसेज आला नव्हता. शेवटी न राहवून वृषालीनेच मेसेज केला, “कुठे आहेस?” थोड्यावेळाने वृषालीचा फोन वाजला. सुमितचाच कॉल होता. वृषाली काही बोलायच्या आतच सुमित म्हणाला, “अगं डोकं फार दुखत होतं त्यामुळे झोपलो होतो.” “बर, काळजी घे.” वृषाली म्हणाली. “मिळाली का बस?” सुमितने विचारलं. वृषालीने बस मिळाली व मावशीचा मुलगा आपल्याला नेण्यासाठी येणार असल्याचं सांगितलं. बराच वेळ बोलल्यावर वृषाली म्हणाली, “आता विश्रांती घे आपण उद्या बोलूयात.” एवढं बोलून तिने फोन ठेवला. रात्री बारा वाजता वृषाली नाशिकच्या बसस्टँडवर पोहोचली. तिचा भाऊ आधीच पोहोचला होता. सकाळी उठताच पटापट आवरून वृषाली मावशीच्या घरातून बाहेर पडली. तीला तिच्या एका मैत्रिणीकडे जागृतीकडे जायचं होतं. तिच्या भावाचा सकाळी क्लास असल्यामुळे तिला बस किंवा ऑटोने जावं लागणार होतं. जागृतीचं घर शहरापासून बरच लांब होतं. वृषाली बसस्टॉप बराच वेळ उभी होती. आजुनही बस आली नव्हती. शेवटी कंटाळून तिने ऑटोने जायचं ठरवलं. पण अंतर जास्त असल्यामुळे ऑटोवाले यायला तयार होत नव्हते व एखादा तयार झालाच तर तो फार जास्त रेट सांगायचा. शेवटी वैतागून तिने सुमितला फोन लावला. तिने सुमितला आपल्याला नेण्यासाठी येण्यास सांगितले व व्हाट्सऍपवरून लोकेशन शेअर केलं. “दोनच मिनिटात येतो.” असे म्हणून सुमितने फोन ठेवला. सुमित पाच मिनिटाच्या आत तिथे हजर होता. खांद्यावर रुळणारे लांब केस, जिममध्ये तासन्तास घाम गाळून कमावलेलं शरीर व एखाद्या हिरोसारखा सुरेख चेहेरा. सुमित फारच हँडसम दिसत होता. या सगळ्यात भर म्हणजे त्याची स्माईल. सुमितची स्माईल पाहूनच वृषाली त्याच्या प्रेमात पडली होती. आतातर सुमितवरून तिची नजरच हटत नव्हती. “बस मागे.” सुमितच्या आवाजाने वृषाली भानावर आली व त्याच्या मागे बसली. थोड्याच वेळात ते जागृतीच्या घरी पोहोचले. सुमित बाईक फार फास्ट चालवत होता. वृषालीने त्याला वेग कमी करायला दोन-तीन वेळा सांगितलं पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. सुमित आणि वृषाली जेव्हा जागृतीच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांचे बाकीचे मित्र-मैत्रिण आधीच पोहोचले होते. ते दोघे तिथे येताच सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. दोघांची जोडी फार सुंदर दिसत होती. “कसं वाटतंय सुमितला भेटून?” जयाने आगाऊपणे विचारलं. वृषाली लाजली पण काहीच बोलली नाही. 

मित्र-मैत्रिणींच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. सुमित आणि वृषालीचं लक्ष मात्र भलतीकडेच होतं. त्यांच्या नजरा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होत्या. हे लक्षात येताच कोणीतरी त्यांच्यावर कमेंट करायचं व सगळे हसायचे. 

आता जेवायची वेळ झाली होती. सर्वांना खूप भूक लागली होती. जागृतीने मोबाईलवरून पिझ्झा ऑर्डर केला होता. आता सगळे दमशेराज खेळण्यात गुंतले होते. मुलांची एक व मुलींची एक आशा टीम पडल्या होत्या. एका टीमने दुसऱ्या टीममधल्या एका मेम्बरला एका फिल्मचं नाव सांगायचं. त्या मेम्बरने त्याच्या टीमला केवळ हातवारे करून त्या फिल्मचं नाव सांगायचा प्रयत्न करायचा व त्याच्या किंवा तिच्या टीमने ते नाव ओळखायचं असा तो गेम होता. पहिली वेळ मुलांच्या टीमची होती. मुलांकडून पहिला सुमित खेळणार होता. जयाने सुमितच्या कानात एका फिल्मचं नाव सांगितलं. सुमित त्याच्या टीमसमोर उभा राहिला. त्याने वृषालीकडे वळून पाहिले व हाताने हृदयाचा आकार केला. सर्वजण वृषालीकडे पाहू लागले. वृषाली लाजली. सुमितने पुन्हा एकदा तशीच खूण केली. “दिल” रंजित बोलला. सुमितने मानेनेच होकार दिला. पहिला राउंड जिंकला म्हणून मुलांनी नुसता कल्ला केला. पुढचा राऊंड मुली जिंकल्या. थोड्याच वेळात डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन आला. पिझ्झा खाऊन झाल्यावर थोडावेळ पुन्हा गप्पा झाल्या. आता त्यांनी ट्रूथ अँड डेअर हा खेळ चालू केला. सर्वजण गोल करून बसले. मध्यभागी एक काचेची बाटली ठेवली होती. बाटली फिरवल्यावर ज्याच्या किंवा जिच्या दिशेला थांबेल त्याने ट्रूथ किंवा डेअर निवडायचं. ट्रूथ निवडलं तर त्याने किंवा तिने विचारलेल्या प्रश्नाचं खरं उत्तर द्यायचं. आणि जर डेअर निवडलं तर सर्वांनी मिळून त्याला एखादी कृती करायला सांगायची. रंजीतने पहिल्यांदा बाटली फिरवली. बाटलीचं तोंड भूषणसमोर थांबलं. सर्व मुलांनी चर्चा करून भूषणला त्याची गर्लफ्रेंड मीनाच्या गालावर किस करायला सांगितलं, पण भीषणने नकार दिला व ट्रूथ निवडलं. त्यांच्यातला सर्वात चावट मुलगा रॉकीने लगेच भूषणला प्रश्न विचारला, “आजपर्यंत तू मीनाला कितीवेळा किस केलं आहेस?” “एकदाही नाही.” भूषणने प्रांजळपणे कबुली दिली. मिनातर लाजून लाल झाली होती. आता भूषणने बाटली फिरवली. बाटलीचं तोंड सुमितसमोर स्थिर झालं. सुमिततर वाटच पहात होता. सुमितने डेअर निवडलं. सर्व मुलांनी काय डेअर सांगायचं ते आधीच ठरवलं होतं. त्यांनी सुमितला वृषालीला प्रपोज करायला सांगितलं. सुमित जागचा उठला व आतून एक लाल गुलाबाचं फुल घेऊल आला. तो वृषालीसमोर गेला व एका गुढग्यावर बसून तो वृषालीला म्हणाला, “विल यु मॅरी मी?” “विथ प्लेजर.” वृषाली एका क्षणात म्हणाली. वृषालीला हे सगळं खरं घडतंय यावर विश्वासच बसत नव्हता. आपण स्वप्नात तर नाही ना हे तपासायला तिने हळूच स्वतःला चिमटा काढला. 

त्यानंतर जवळपास अर्धा तास त्यांचा खेळ चालू होता. वृषालीचं मात्र या सगळ्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. तिला आता सगळीकडे सुमितच दिसत होता. सुमितच्या बाबतीत सुद्धा तेच झालं होतं. थोड्याच वेळात खेळ आटोपला व सगळे आपापल्या घरी जायला निघाले. सुमित व वृषाली बाहेर आले. वृषालीने दुपारी दोनच्या गाडीचं रीजर्वेशन केलं होतं. दीड वाजला होता. त्यामुळे अर्ध्या तासाच्या आत त्यांना स्टँडला पोहोचणं भाग होतं. सुमित गाडी फार जोरात चालवत होता. पण ट्राफिक मुळे त्याला बराच वेळ एकाच ठिकाणी थांबायला लागलं. गाडी सिग्नलला थांबली होती. राजेशने घड्याळात पाहिले, दोन वाजायला दहा मिनिटे बाकी होती. अजून निम्मं अंतर बाकी होतं. सिग्नल सुटताच सुमित सुसाट सुटला. वृषालीने घड्याळात पाहिले आता पाचच मिनिटे बाकी होती. वेळेत पोहोचलं नाही तर तीची बस चुकणार होती. वृषालीने सुमितला आजून स्पीड वाढवायला सांगितला. पडत्या फळाची आज्ञा मानून सुमितने अजून स्पीड वाढवला. उजव्या बाजूने एक ट्रक धावत होता. ट्रकने इंडिकेटर दिला व डाव्या बाजूला वळला. सुमितने स्पीड कमी केला पण तोपर्यंत उशीर झाला होता. सुमितला काही कळायच्या आतच त्याची बाईक ट्रकवर आदळली. स्पीडमुळे सुमितचं डोकं ट्रकच्या चाकावर आपटलं. वृषालीसुद्धा धक्क्यामुळे खाली पडली. तिच्या उजव्या हाताला व पायाला जखम झाली होती. सुमितच्या शरीरातून प्राण केव्हाच गेला होता. वृषालीची नजर सुमितच्या छिन्नविच्छिन्न झालेल्या डोक्याकडे गेली व तिची शुद्ध हरपली. 

वृषाली जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. तिच्या डोक्यातून प्रचंड कळा येत होत्या. तिचा उजवा हातसुदधा खूप दुखत होता. थोडीजरी हालचाल झाली तरी कळा येत होत्या. थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्यांच्या पाठोपाठ तिचे आईवडील देखील आत आले. तिच्या आईचा चेहेरातर काळजीने पूर्णपणे उतरला होता. वडिलांच्या चेहेऱ्यावर पण दडपण दिसत होतं. वृषालीची आई तिच्याजवळ आली व तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. वृषालीची ही अवस्था पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. काय झालं? कसं झालं? हे जाणून घेण्यात सध्यातरी तिला रस नव्हता. आपली मुलगी सुरक्षित आहे याचच तिला समाधान होतं. ज्या माणसाने वृषालीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं त्यानेच तिच्या मोबाईलवरून तिच्या वडिलांना फोन करून एकसिडेंटबद्दल सांगितलं होतं. हे ऐकून पहिल्यांदा त्यांना धक्काच बसला होता पण त्यांनी स्वतःला सावरलं व ते तात्काळ तिच्या आईबरोबर नाशिकला निघाले. 

वृषालीच्या उजव्या हाताचं हाड मोडलं होतं. तिच्या पायाला देखील मोठी जखम झाली होती. वृषालीच्या वडिलांनी ऑफिसला रजा घेतली. पुढचे दोन-तीन दिवस तरी ते वृषालीजवळच थांबणार होते. डॉक्टरांनी पुढचे काही दिवस वृषलीला हॉस्पिटलमध्येच थांबायला सांगितलं होतं. थोड्यादिवसांनी ते तिच्या पायाची जखम पाहून पुढचं सांगणार होते. पहिले पाच दिवस वृषाली कुणाशी काहीच बोलली नाही. सुमितच्या मृत्यूचा तिच्या मनावर परिणाम झाला होता. आत्ताकुठे त्यांच्यातलं प्रेम बहरून आलं होतं आणि अचानक तिचा लाडका सुमित हे जगच सोडून गेला होता. 

शेवटी सहाव्या दिवशी वृषालीच्या आईला तिला बोलतं करण्यात यश आलं होतं. तिने नाशिकला आल्यापासून घडलेलं सर्वकाही आईला सांगितलं. सुमितने केलेल्या प्रपोजबद्दल सुद्धा. वृषालीचे मित्रमैत्रिण रोज हॉस्पिटलमध्ये येउन तिची विचारपूस करत होते. सुमित गेल्याचं दुःख सर्वानाच झालं होतं. जो येईल तो वृषालीचं सांत्वन करत होता. वृषाली मात्र फारसं कुणाशी बोलत नव्हती. शरीराला झालेली जखम भरत होती. मनाला झालेली जखम भरायला बराच वेळ लागणार होता.


X X X X X X

 

राजेशने चहा बनवण्यासाठी दुधाचं पातेलं गॅसवर ठेवलं व तो दात घासण्यासाठी बाथरूममध्ये गेला. दात घासुन झाल्यावर राजेश परत स्वयंपाकघरात गेला व चहा बनवून चहाचा कप घेऊन तो हॉलमध्ये आला. रवी नेहमीप्रमाणे झोपला होता. राजेशने टीव्ही चालू केला व टीव्ही पाहतच चहा संपवला. आज रविवार असल्यामुळे कॉलेजला सुट्टी होती. आजचा दिवस कसा घालवायचा याचाच राजेश विचार करत होता, तेवढ्यात त्याचा फोन वाजला. फोन वृषालीचा होता. एका क्षणाचाही विलंब न करता त्याने फोन उचलला. “खूप बोर होतंय. ये ना घरी. आई-बाबा पण गावाला गेलेत. मी तुझ्यासाठी सँडविच बनवते मग आपण एखादी मुव्ही पाहुयात.” वृषाली झोपाळलेल्या, आळसावलेल्या आवाजात म्हणाली. 

“हो येतोच, मला फक्त अर्धा तास दे. आणि चीझ आहे ना घरात? का आणू येताना?” राजेश उत्साहात म्हणाला. 

“काही नको आणू. सगळं आहे घरात. आणि गाडी हाळू चालवं. बाय, चल मी फोन ठेवते.” एवढं बोलुन वृषालीने फोन ठेवला. वृषालीला भेटायच्या विचारानेच राजेश खुश झाला. त्याने पटापट आवरलं व विसाव्या मिनिटाला तो घरातून बाहेर पडला. एकोणतीसाव्या मिनिटाला राजेश वृषालीच्या घराच्या दारात उभा होता. त्याने बेल वाजवली. बराच वेळ दरवाजा बंद होतं. राजेशने पुन्हा बेल वाजवतात वृषालीने दरवाजा उघडला. समोर नाईट गाऊन मधल्या वृषालीला पाहून तिला मिठीत घ्यायची तीव्र इच्छा राजेशला झाली पण त्याने स्वतः ला आवरलं. ती नुकतीच झोपेतून उठून आल्यासारखी वाटत होती पण तरीसुद्धा फार सुंदर आणि मोहक दिसत होती. 

राजेशची प्रश्नार्थक नजर पाहून वृषाली म्हणाली, “अरे मी आत्ताच उठले. तुला फोन लावला आणि फोन झाल्यावर अजून थोडा वेळ आराम करावा म्हणून बेडवर पडले तर गाढ झोप लागली. आता बेलच्या आवाजाने जाग आली. तू थोडा वेळ टीव्ही पहात बस, मी जरा आवरते.” एवढं बोलून ती आत जाणार तेवढ्यात राजेश तिला म्हणाला, “कशाला आवरतेस अशीच खूप छान दिसतेस!” हे ऐकून वृषाली चक्क लाजली व “काहीतरीच काय” असं म्हणून आत गेली. 

थोड्यावेळाने अंघोळ वगैरे आटोपून वृषाली हॉलमध्ये आली. तिच्या एका हातात फोन तर दुसऱ्या हातात टॉवेल होता. ती तिच्या आईशी फोनवर बोलत होती व दुसऱ्या हातातल्या टॉवेलने ओले केस पुसत होती. राजेशने तिच्याकडे पाहिले व बोटानेच “छान” अशी खूण केली. वृषाली राजेशकडे पाहून हसली. थोड्यावेळाने तिने फोन ठेवला व ती राजेशला म्हणाली, “ही आई पण ना, इतक्या सूचना देते. हे कर ते करू नकोस. बाहेर जास्त फिरू नकोस. मी काय आता लहान आहे का?” “इतकी सुंदर मुलगी असल्यावर कोणत्याही आईला काळजी वाटणारच.” राजेश मिश्कीलपणे म्हणाला. राजेशच्या शब्दांनी वृषाली खुश झाली पण तसे दाखवू न देता ती म्हणाली, “शाहरुखची नवीन मुव्ही आली आहे. खूप छान आहे असं माझी मैत्रीण म्हणाली. मी आपल्यासाठी सँडविच बनवते, ते खाऊन आपण लगेच निघुयात.” खरंतर राजेशला शाहरुखच्या मुव्हीज फारश्या आवडत नव्हत्या पण वृषालीला नाही म्हणायचं त्याचं धाडस नव्हतं. आणि तसही वृषालीच्या सानिध्यात वेळ घालवायला मिळतोय यातच त्याला आनंद होता. “जशी तुमची आज्ञा रणीसरकार.” राजेश चेष्टेत म्हणाला.

वृषाली एका प्लेटमध्ये सँडविच घेऊन आली. काही क्षणातच त्यांनी ती संपवली. ते दोघे घराबाहेर पडले. काही वेळात ते मुव्ही थिएटरपाशी पोहोचले. राजेशने दोन तिकिटे खरेदी केली व ते आत गेले. मुव्ही सुरू झाली. वृषाली अतिशय मनापासून मुव्ही पहात होती. राजेशचं लक्ष मुव्हीपेक्षा वृषालीकडेच जास्त होतं. एकदाची मुव्ही संपली. तिथून ते थेट वृषालीच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये गेले. “पुढचा काय प्लॅन आहे?” जेवण आटोपताच राजेशने वृषालीला विचारलं. “तुला कंटाळा नसेल आला तर मला थोडं शॉपिंग करायचंय. इथून जवळच एक नवीन मॉल झालंय. तिथे फार छान ड्रेस मिळतात असं मी ऐकलंय.” “ठीक आहे.” राजेश वृषालीला म्हणाला. पण त्याच्या आवाजात नेहमीसारखा उत्साह नव्हता. हे वृषालीला देखील जाणवलं. “काळजी करू नकोस. इतर मुलींप्रमाणे बॉयफ्रेंडच्या पैशांवर शॉपिंग करणारीतली मी नाही.” वृषाली म्हणाली. खरंतर राजेशला पैशांचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्याला शॉपिंगचा कंटाळा होता. तो थोडा चिडून वृषालीला म्हणाला, “पैशांवरून मी तुला कधी बोललोय का?” “अरे मला तसं नव्हतं म्हणायचं.” वृषाली म्हणाली. यावर राजेश काहीच बोलला नाही. तो बाईकवर बसला व बाईक स्टार्ट केली. “तुला कंटाळा आला असेल तर आपण नंतर कधीतरी जाऊ.” वृषाली समजावणीच्या सुरात म्हणाली. “बस बाईकवर” राजेश म्हणाला. त्याचा राग केव्हाच निवळला होता. 

थोड्याच वेळात ते मॉलपाशी पोहोचले. मॉलमध्ये जाताच वृषाली वेगवेगळे ड्रेस पाहण्यात मग्न झाली. तिने एक ड्रेस उचलला व ती चेंजिंग रूममध्ये गेली. “हा कसा दिसतोय?” चेंजिंग रूममधून बाहेर येताच तिने राजेशला विचारलं. “छान” राजेश म्हणाला. तिने तो ड्रेस बास्केटमध्ये ठेवला. तिने दुसरा ड्रेस उचलला व चेंज करून आली. “हा कसा दिसतोय?” वृषालीने पुन्हा राजेशला विचारलं. राजेशचं पुन्हा तेच “छान”. वृषालीने अजून दोन ड्रेस ट्राय केले. तिने राजेशला विचारलं पण राजेशची प्रतिक्रिया एकच-छान. “प्रत्येक ड्रेसला छान काय म्हणतोयस. यातला कोणता घेऊ सांगना.” वृषाली वैतागून म्हणाली. “तुझ्यावर कोणताही ड्रेस छानच दिसतो.” राजेश म्हणाला. “तरीपण यातला कोणता घेऊ सांग ना.” वृषाली म्हणाली. “सगळे घे.” राजेश सहज बोलून गेला व तिनेही आज्ञाधारकपणे चारही ड्रेस बास्केटमध्ये ठेवले व ती बिल पे करण्यासाठी काउंटरपाशी गेली. राजेशही तीच्या मागे गेला. पैसे देण्यासाठी तिने बॅगेतून तिची पर्स काढली. तेवढ्यात राजेशकडे त्याचं कार्ड परत देत काउंटरवरची मुलगी म्हणाली, “सरांनी पेमेंट केलय मॅम.” वृषाली राजेशकडे पाहातच राहिली. राजेश काहीच न बोलता तिथून बाहेर आला. मॉल मधून बाहेर येताच तो वृषालीला म्हणाला, “जवळच माझ्या एका मित्राचं कॉफीशॉप आहे. आपण तिथे जाऊन मस्त कॉफी पिऊयात.” “अरे तू अजून मी बनवलेली कॉफी नाही प्यायल्यास. एकदा पिऊन तर बघ. परत बाहेरची कॉफी पिणार नाहीस.” वृषाली उत्साहात म्हणाली. “जशी आपली आज्ञा राणीसरकार.” राजेश म्हणाला व ते दोघे बाईकवर बसले. थोड्याच वेळात ते वृषालीच्या घरी पोहोचले. घरी पोहोचताच फ्रेश होऊन वृषाली कॉफी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. राजेश वरच्या मजल्यावर वृषालीच्या बेडरूममध्ये गेला. त्याने वृषालीचा हेडफोन मोबाईलला जोडला व गाणी ऐकू लागला. बऱ्याच वेळानंतर त्याने वृषालीला आवाज दिला पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. ‘कॉफी बनवायला एवढा वेळ का लागतोय?’ राजेशच्या मनात विचार आला. तसेच गॅसचा उग्र वास येत होता. राजेशने कानावरून हेडफोन उतरवले व तो खोलीबाहेर आला. राजेश जिना उतरत होता तेवढ्यात एखादा बॉम्बस्फोट व्हावा तसा प्रचंड आवाज झाला.

राजेश दचकून जागा झाला. किती भयानक होतं हे स्वप्न. राजेशने घड्याळात पाहीलं. रात्रीचे तीन वाजले होते. घामाने डबडबलेला चेहेरा धुण्यासाठी तो बाथरूममध्ये गेला. तो बराच वेळ स्वप्नाबद्दल विचार करत होता. कदाचित वृषालीला झालेल्या एक्सिडेंटमुळे आपल्याला तिच्याबद्दल जी काळजी वाटतेय, त्यामुळे आपल्याला हे स्वप्न पडलं असावं असा विचार राजेशच्या मनात आला. पण आपली अजून वृषालीशी साधी ओळख देखील नाही तरीसुद्धा आपल्याला तिच्याबद्दल एवढी आपुलकी, एवढी काळजी का वाटतेय हेच राजेशला समजत नव्हतं. स्वप्न संपलं होतं व राजेश झोपेतून पूर्णपणे जागा झाला होता. पण तरीही त्याचं मन अजून स्थिर झालं नव्हतं. त्याचं अंग तापलं होत. अंगात बारीक कसर होती. राजेश अंथरुणातून उठला व पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेला. पाणी पिऊन तो झोपण्यासाठी अंथरुणावर आडवा झाला. पण काहिकेल्या त्याला झोप लागेना. सारखे वृषालीचेच विचार त्याच्या मनात येत होते. तिला भेटण्याची तीव्र इच्छा राजेशला झाली होती पण ती नाशिकला हॉस्पिटलमध्ये होती. त्यामुळे हे शक्य नव्हतं. आणि ती पुण्यात जरी असती तर तो भेटू शकला नसता. 

काही केल्या झोप लागेना म्हणून राजेशने टीव्ही चालू केला व त्याचं आवडतं इंग्रजी गाण्यांचं चॅनेल लावलं. रवी झोपलाय हे तो विसरला होता. त्याने मनातील विचार थांबवण्यासाठी टिव्हीचा आवाज एकदम वाढवला. आवाजामुळे रवी जागा झाला. त्याने त्रासिक चेहऱ्याने राजेशकडे पाहिले व म्हणाला, “&#$%^ ही काय वेळ आहे का गाणी ऐकायची! गप गुमान टीव्ही बंद कर अन झोप.” रवीला पाहताच राजेशने टीव्ही बंद केला व तो रवीला म्हणाला, “बरं झालं तू उठलास. तुझ्याशी जरा बोलायचंय. झोपू नकोस लगेच.” “इथे माझी झोपमोड झालीये अन तुला काय बोलायला सुचतय. गप झोप.” रवी वैतागून म्हणाला. पण राजेश काही माघार घ्यायला तयार नव्हता. तो म्हणाला, “एकतर तू कधी भेटत नाहीस. मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. मला फक्त पाचच मिनिटं दे.” “बर बोल.” रवी म्हणाला. राजेशने स्वप्नात घडलेलं सगळं काही रवीला सांगितलं. वृषालीला झालेल्या एक्सिडेंटबद्दलही त्याने रवीला सांगितलं. सर्वकाही ऐकून घेतल्यावर रवी त्याला म्हणाला, “तू त्या मुलीच्या प्रेमत पडलायस अन त्यामुळेच तू तिच्याबद्दल इतका पझेसिव्ह झालायस. बाकी काही नाही.” राजेशच्या मनातलं रवी बोलला होता त्यामुळे त्याला ते पटलं. “पण माझ्या मनातून तिच्याबद्दलचे विचारच जात नाहीयेत, मग मी काय करू?” राजेशने रवीला विचारलं. “हे बघ मी काय यातला तज्ञ नाही. पण एक करून बघ. स्वप्न कागदावर लिहून काढ. कदाचित तुझं मन थोडं हलकं होईल.” एवढं बोलून झाल्यावर राजेश अजून काही बोलायच्या आधीच रवीने पांघरूण ओढून घेतलं व काही क्षणात तो घोरायला लागला. राजेशने रवीने सांगितल्याप्रमाणे स्वप्नात घडलेल्या घटना एका वहीत लिहिल्या व तो पुन्हा अंथरुणावर आडवा झाला. थोड्याच वेळात त्याला गाढ झोप लागली.


X X X X X X


राजेश नेहमीच्या वेळेला संदीपच्या घरापाशी पोहोचला. संदीपने नेहमीप्रमाणे कालच्या होमवर्कबददल विचारलं. ‘या संदीपला आभ्यास सोडून इतर गोष्टीसुद्धा असतात हे माहीतच नाही. नेहमी हा आभ्यास, होमवर्क एवढंच बोलतो. त्यामुळेच याचे आपण सोडलं तर फारसे मित्र नाहीत.’ राजेशच्या मनात विचार आला. एक दिवस संदीपला माणसात आणायचा त्याने मनोमन संकल्प केला. 

राजेश आणि संदीप कॉलेजात पोहोचले. ते मेनगेट मधून आत आले. कॉलेजचे शिपाई गण्याकाका नोटिसबोर्डवर नोटिस लावत होते. “कसली नोटिस आहे काका?” राजेशने त्यांना विचारलं. त्यावर ते नेहमीच्या खोचकपणे म्हणाले, “मला काय ईचारतो, बोर्डावर लिव्हलय ते वाच.” राजेशने गण्याकाकांकडे दुर्लक्ष केलं व तो नोटिस वाचू लागला. नेहमीप्रमाणे कॉलेजने यावर्षी सुद्धा मुलामुलींसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. गायन, धावणे, चित्रकला, नृत्य, मुलींसाठी रांगोळी स्पर्धा वगैरे. राजेशने धावण्याच्या स्पर्धेसाठी नाव नोंदवायचं ठरवलं. संदीपला तर विचारण्यात देखील अर्थ नव्हता. राजेश आणि संदीप वर्गात आले. राजेशने वृषालीच्या बेंचकडे पाहिलं. मनाली एकटीच बेंचवर बसली होती. पुढचा महिना वृषालीशी जागा रिकामीच राहणार होती. राजेशला काल रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण झाली व तो थोडा आस्वस्थ झाला. 

कॉलेज संपवून राजेश घरी आला. अजून दोन महिन्यांनी कॉलेजात स्पर्धा होणार होत्या. त्यामुळे सरावासाठी राजेशकडे बऱ्यापैकी वेळ होता. पण आता त्याला कर्वे उद्यानात धावून भागणार नव्हतं. सरावासाठी मोठ्या मैदानाची आवश्यकता होती. उद्यापासून राजेश पहाटे उठून जवळच्याच संभाजी स्टेडियममध्ये जाणार होता. संदीपबद्दलचा विचार देखील राजेशच्या मनात येऊन गेला. इतकं बोरिंग आयुष्य कोणी कसं काय जगू शकतं? असं राजेशला वाटत होतं. संदीपची सरळ ट्रॅकवरून जाणारी गाडी वाकड्या ट्रॅकवर कशी आणावी याचाच राजेश विचार करत होता. त्याला अचानक आठवलं, त्याने मनालीला संदीपकडे पाहताना एकदोनदा पकडलं होतं. पण तो त्याबद्दल संदीपशी कधीच बोलला नव्हता. संदीपला ती आपल्याकडे पाहतेय याची जाणीवच नव्हती. मनालीने फोनवरून राजेशला संदीपबद्दल एकदा विचारलं सुद्धा होतं. राजेशने एक प्लॅन केला. 

ठरल्याप्रमाणे राजेश पहाटे लवकर उठून संभाजी स्टेडियमवर धावून आला. आवरून झाल्यावर त्याने होमवर्क पूर्ण केला व नेहमीच्या वेळेला तो घरातून बाहेर पडला. संदीपच्या घरापाशी पोहोचताच त्याने संदीपला कॉल केला. संदीप घरातून बाहेर आला. राजेश त्याला म्हणाला, “काय यार संदीप तुझा फोन. दहा वेळा कॉल केल्यावर कुठे एकदा रिंग वाजली.” “अरे पण माझा फोन तर रेंजमध्येच होता.” संदीप निरागसपणे म्हणाला. “बर, ते जाऊदे. तुझ्या बाबांचा नंबर दे. तूझा नाही लागला तर मी त्यांना कॉल करेन.” राजेश म्हणाला. “ठीक आहे.” म्हणून संदीपने त्याच्या वडिलांचा नंबर राजेशला सांगितला. 

दोघे वर्गात पोहोचले. वर्गात नेहमीप्रमाणे मुलांची बडबड सुरू होती. करंदीकर मॅडमचा पहिला तास होता. मॅडम वर्गात आल्या व त्यांनी मुलांना शांत बसण्यास सांगितलं. नेहमीप्रमाणे मॅडमनी काल शिकवलेल्या टॉपिकची उजळणी घ्यायला सुरू केली. मॅडमनी काही प्रश्न देखील विचारले. नेहमीप्रमाणे संदीप उठला व उत्तर सांगू लागला. राजेशचं लक्ष मात्र मनालीकडे होतं. संदीप जेव्हा उत्तर सांगायला उठला तेव्हा ती त्याच्याकडे कौतुकाने पहात होती. राजेशच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. ही संधी साधुन संदीप खाली बसताच तो संदीपला म्हणाला, “संदीप, तू जेव्हा उत्तर सांगत होतास तेव्हा मनाली तुझ्याकडे एकटक पहात होती.” “उगाच चेष्टा करू नकोस. ती कशाला माझ्याकडे पाहिल.” संदीप कावराबावरा होत म्हणाला. राजेशला हेच अपेक्षित होतं, पण तो संदीपला इतक्या सहजासहजी सोडणार नव्हता. तो संदीपला म्हणाला, “तुझा विश्वास बसत नसेल तर तूच बघ.” “जाऊदे रे.” संदीप म्हणाला. “लाजतोस काय मुलींसारखा. बघ तिच्याकडे. तू कधी पाहशील याची वाटच पाहतीये ती.” शेवटी वैतागून संदीपने मनालीकडे पाहिलं. मनालीने संदीपला एक गोड स्माईल दिली. संदीप मनोमन सुखावला होता पण तसं दाखवू न देता तो म्हणाला, “किती चावट असतात ना एकेक मुली!” त्यावर राजेश म्हणाला, “अरे, चावट काय त्यात. तुला एवढं सुद्धा समजत नाही का की तिला तू आवडतोस.” “काहीका असेना, असल्या गोष्टीत मला पडायचं नाहीये.” यावर राजेश काहीच बोलला नाही. आज एवढंच बास होतं. 

राजेश कॉलेजातून घरी आला. आता त्याला एक महत्त्वाचं काम करायचं होतं. त्याने संदीपच्या वडिलांना फोन लावला. राजेशने कॉलेजातील स्पर्धांबद्दल संदीपच्या वडिलांना सांगितलं व संदीपला कशाची आवड आहे का विचारलं. संदीप फार छान गातो हे त्याला संदीपच्या वडिलांकडून समजलं. शाळेत असताना संदीपने गायनाच्या परीक्षा दिल्याचंही त्यांनी सांगितलं. शेवटी आपल्यात झालेलं बोलणं संदीपला सांगू नका एवढं सांगून राजेशने फोन ठेवला. आता पुढचा प्लॅन तयारच होता. 

राजेश आणि संदीप कॉलेजात पोहोचले. संदीपच्या चेहेऱ्यावर आज एक वेगळीच चमक दिसत होती. मनाली आपल्याकडे पाहते हे समजल्यावर खरंतर तो सुखावला होता. आज पण ती आपल्याकडे पाहतेय का हे पाहण्यासाठी तो वारंवार मनालीकडे पहात होता. हे राजेशला समजलं होतं पण तो मुद्दामच काही बोलत नव्हता. संदीप आपल्याकडे पाहतोय हे पाहून मनालीसुद्धा खुश झाली. आजचा पूर्ण दिवस त्या दोघांचा नजरांचा खेळ सुरू होता. 

राजेश आणि मनालीची पूर्वीपासूनची ओळख आहे हे संदीपला माहिती नव्हतं. राजेशने काल रात्री फोनवरून संदीपला तू आवडतेस व त्याच्या तोंडात सारखं तुझच नाव असतं असं सांगितलं होतं. मला महितीये तुलाही संदीप आवडतो असही तो मनालीला म्हणाला. सुरुवातीला मनालीने “माझ्या मनात तसं काही नाही” वगैरे सांगून विषय टाळायचा प्रयत्न केला, पण शेवटी राजेशने तिच्या मुखातून सत्य वदवून घेतलच. संदीप प्रचंड लाजरा मुलगा आहे त्यामुळे तुलाच पुढाकार घ्यावा लागेल असंही त्याने मनालीला सांगितलं होतं. 

आता राजेश पूढे काय करायचं याचाच विचार करत होता. त्याला आठवलं, पुढच्याच आठवड्यात मनालीचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला काहीही करून संदीप येणं आवश्यक होतं. त्याने मनालीला तसं सांगितलं. त्याने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी कॉलेज संपताच मनाली राजेशला पार्किंगमध्ये भेटली. संदीपपण राजेशबरोबर होता. मनालीने राजेशला बर्थडे पार्टीबद्दल सांगितलं व जाताजाता ती संदीपला म्हणाली, “संदीप, तू पण नक्की ये पार्टीला.” “तुमची आधीपासून ओळख आहे?” मनाली जाताच संदीपने राजेशला विचारलं. राजेश म्हणाला, “अरे फार पूर्वीपासूनच आमच्यात खूप चांगली मैत्री आहे.” हे ऐकून संदीपच्या कपाळावर चढलेल्या आठ्या पाहून राजेश म्हणाला, “काळजी करू नकोस. मनाली मला बहिणीसारखी आहे.” संदीपने निश्वास सोडला पण तो काही बोलला नाही. दोघे बाईकवर बसले. मनालीच्या पार्टीला जायला आपल्याला संकोच वाटतोय असं दाखवण्यासाठी संदीप राजेशला म्हणाला, “राजेश, अजून माझी आणि मनालीची काहीच ओळख नाही मग मी कसा येऊ पार्टीला?” “अरे, ओळख वाढवण्यासाठीच तर जायचं पार्टीला.” राजेश त्याला म्हणाला. संदीपने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो मनातून सुखावला होता व हे लपवायचा तो कितीही प्रयत्न करत असला तरी राजेशला समजायचं ते समजलं होतं.


X X X X X X


वृषालीला झालेल्या एक्सिडेंटनंतर जवळ जवळ दहा दिवस लोटले होते. तिला भेटायची तीव्र इच्छा राजेशला होती पण ते शक्य नव्हतं. ती आजून कमीतकमी एक महिना तरी कॉलेजला येणार नाही हे त्याला मनालीकडून समजलं होतं. आज मनालीचा वाढदिवस होता. कॉलेज सुटल्यावर तो आणि संदीप मनालीच्या घरी पार्टीला जाणार होते. आज कॉलेजमध्ये राजेश रात्री पार्टीत मनाली आणि संदीपला कसं जवळ आणता येईल याचाच विचार करत होता. मनालीच्या बाजूने काहीच प्रॉब्लेम नव्हता. संदीपचा भिडस्तपणा घालवण्याची गरज होती. 

कॉलेज संपताच राजेश आणि संदीप फ्रेश होण्यासाठी राजेशच्या घरी पोहोचले. संदीपने सकाळीच पार्टीला घालायचे कपडे बरोबर घेतले होते. दोघेही आवरून घरातून बाहेर पडले. तासाभरात ते मनालीच्या घरी पोहोचले. मनालीचा बंगला एखाद्या पॅलेसपेक्षा कमी नव्हता. मनालीचे वडील एका नावाजलेल्या कंपनीचे मालक होते. बंगल्यासमोर मोठं लॉन होतं. तिथे टेबल खुर्च्या मांडल्या होत्या. 

राजेश आणि संदीप जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्या वयाची पंधरा वीस मुलं-मुली तिथे होती. त्यांच्या वर्गातल्या काही मुलीदेखील आल्या होत्या. थोड्या वेळाने मनाली तिथे आली. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती फार सुंदर दिसत होती. संदीपची नजर तर तिच्यावरून हाटतच नव्हती. एवढी गर्दी आणि झगमगाट पाहुन तो थोडा बुजला होता. या सगळ्याची त्याला बिलकुल सवय नव्हती. पण मनालीला पाहताच तो सर्वकाही विसरला होता. त्याला आता फक्त मनालीच दिसत होती. 

एक नोकर आतून केक घेऊन आला. सर्व मुलं मुली टेबलाजवळ उभे होते. मनालीने बाजूच्या प्लेटमधली सूरी उचलली व केक कापला. “हॅप्पी बर्थडे टू यु” च्या गजरात मनालीचा वाढदिवस साजरा झाला. आता एकेकजण येऊन मनालीला केक भरवू लागले. पहिल्यांदा मनालीची बेस्ट फ्रेंड रसिकाने तिच्या तोंडात केकचा एक तुकडा कोंबला. मग राजेशने पण तेच केलं. पण मनालीचं लक्ष मात्र दुसरीकडेच होतं. तिने संदीपकडे आपेक्षेने पाहिलं पण संदीपला संकोच वाटत होता, हे तिला जाणवलं. 

जेवणासाठी पावभाजी ऑर्डर केली होती तसेच मनालीच्या आईने स्वतः बिर्याणी बनवली होती. पावभाजी यायला अजून बराच वेळ होता. मुलांनी दमशेराज सुरू केला. दमशेराज झाल्यावर गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या. मुलांची टीम विरुद्ध मुलींची टीम. संदीप सोडून सर्व मुलं-मुली अगदी उत्साहाने सहभाग घेत होते. प्रत्येकजण आपल्याला जमेल तसं कधी सुरात तर कधी बेसूर गायनाचा आनंद घेत होते. संदीपला शांत बसलेला पाहून राजेश त्याला म्हणाला, “तुला काय वेगळं आमंत्रण द्यायला हवं का? एवढा छान आवाज आहे तुझा.” यावर संदीप नुसता हसला. “संदीप, म्हण ना एखादं गाणं.” मनाली संदीपला म्हणाली. तसा संदीपच्या अंगात एखाद्या शक्तीचा संचार झाल्याप्रमाणे तो गाऊ लागला. तो अरिजित सिंगचं ‘फिर ले आया दिल’ हे गाणं गाऊ लागला. त्याची नजर मनालीवर होती. मनालीसुद्धा अगदी तल्लीन होऊन गाणं ऐकत होती. त्याच्या सुरेल आवाजावर ती फिदा झाली होती. संदीपचं गाणं संपलं. सगळेजण तब्बल एक मिनिट टाळ्या वाजवत होते. एवढं संदीपचं गाणं त्यांना आवडलं होतं. मनाली तर त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडली होती. गाणं जरी संपलं असलं तरी तिच्या कानात अजूनही संदीपचा आवाज घुटमळत होता. सर्वात जास्त आश्चर्य राजेशला वाटत होतं. त्याला संदीपनं गाणं गायलं यावर विश्वासच बसत नव्हता. पण संदीपच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे संदीप खरच खूप छान गायला होता. 

गाणं संपल्यावर संदीप भानावर आला. आपण एवढ्या लोकांसमोर गाणं गायलो यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. गाण्यांच्या भेंड्याची सांगता संदीपच्या सुरेल गाण्याने झाली होती. थोड्याच वेळात गरमागरम पावभाजी आली. मुलांनी पावभाजी व बिर्याणीवर जोरदार ताव मारला. मनाली व तिच्या आईचा निरोप घेऊन सर्व मुलं-मुली आपापल्या घरी निघाले. वाटेत असताना राजेश संदीपला म्हणाला, “काय सुंदर गातोस तू मित्रा. अरे ती मानालीतर इतकी फिदा झालीय तुझ्यावर. मी तर म्हणतो उद्याच तिला प्रपोज करून टाक.” “गपरे.” एवढं बोलून संदीपने विषय थांबवला. राजेश पुढे काहीच बोलला नाही. आता त्याचं काम संपलं होतं. 


X X X X X X


वृषालीचा चेहेरा पाहून राजेशला आता जवळजवळ पंधरा दिवस झाले होते. पण तीची तब्येय ठीक असल्याचं व अजून थोड्या दिवसांनी ती कॉलेजला परत येणार असल्याचं राजेशला मनालीकडून समजलं होतं. मनाली आणि संदीपमधलं प्रेम आता चांगलंच बहरलं होतं. कॉलेजमधून घरी येताच त्यांचं मोबाईलवर तासनतास चॅटिंग चालायचं. मनालीच्या आग्रहाखातर संदीपने कॉलेजच्या कार्यक्रमात गायनाच्या स्पर्धेसाठी नावसुद्धा नोंदवलं होतं. त्याचं प्रॅक्टिस पण जोरदार सुरू होतं. राजेशचा धावण्याचा सराव सुद्धा छान चालला होता. सरावासाठी संभाजी उद्यान योग्य जागा होती. पण तिथे राजेशला जरा एकटं एकटं वाटायचं. कारण कर्वे उद्यानात वृषाली दिसायची. 

राजेश आता वृषाली परत आल्यावर तिच्याशी ओळख कशी वाढवायची याचाच विचार करत होता. त्याला एक कल्पना सुचली व दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताच त्याने ती मनालीला सांगितली. वृषाली आणि मनालीमध्ये चांगली मैत्री झाली होती. त्यांच्या मैत्रीचा उपयोग राजेशला नक्कीच होणार होता. आता राजेशसमोर रविवारी काय करावं हा प्रश्न होता. खरंतर मागच्या काही दिवसात राजेशचं आभ्यासाकडे जरा दुर्लक्षच झालं होतं. म्हणून राजेशने रविवारचा दिवस घरी आभ्यासातच घालवायचा ठरवलं. त्यानिमित्ताने रावीचीही भेट होणार होती. अर्थात रवी घरी थांबला तर. 

पाहता पाहता आठवडा संपला व रविवारचा दिवस उजाडला. राजेश सकाळी लवकरच धावण्याचा सराव करून आला व अंघोळ, नाष्टा वगैरे आटोपून तो अभ्यासाला बसला. सकाळचे दहा वाजले होते. अजूनही रवी झोपेतून उठला नव्हता. शेवटी दुपारी बारा वाजता जेव्हा राजेश जेवण करायला घरातून बाहेर निघाला तेव्हा रवी जागा झाला. जेव्हा राजेश जेवण आटोपून परत घरी आला तेव्हा रवी चहा पित टीव्ही पाहात बसला होता. राजेशला पाहताच रवीने त्याला विचारलं, “आज काय प्लॅन आहे तुझा?” राजेशने दिवसभर आभ्यास करणार असल्याचं रवीला सांगितलं. रवी त्याला म्हणाला, “तू अन तुझा तो मित्र आयुष्यभर नुसता आभ्यासच करा. आयुष्य एन्जॉय कधी करणार लेकानो तूम्ही.” राजेशला हसू आलं. त्याला मनालीकडे पाहात बिंदास्तपणे गाणं गाणारा संदीप आठवला. त्याचा अभ्यासू मित्र त्याच क्षणी बदलला होता. पूर्वी भेटल्यावर नुसता आभ्यासाबद्दल बोलणारा संदीप आता मनालीशिवाय दुसरं काहीच बोलत नव्हता. राजेशने रवीला मनालीच्या बर्थडे पार्टीत घडलेला किस्सा सांगितला. रवीचा तर विश्वासच बसत नव्हता. तो संदीपला एकदोनदा भेटला होता. संदीपसारखा लाजरा-बुजरा मुलगा असं काही करू शकतो हे रवीला खरं वाटत नव्हतं. त्याने राजेशला विचारलं, “राजे, तुमच्या राणीसाहेब आल्या की नाही परत?” राजेशने नुसती मान हलवली. 

दुसऱ्या दिवशी राजेश आणि संदीप कॉलेजात पोहोचले. ते त्यांच्या नेहमीच्या बेंचवर बसले. थोड्याच वेळात मनाली वर्गात आली व तिच्या पाठोपाठ वृषाली सुद्धा आली. वृषालीला पाहताच राजेश खुश झाला. पण त्याचा आनंद थोडाचवेळ टिकला. वृषालीच्या चेहेऱ्यावरची कळाच गेली होती. ती अतिशय निस्तेज आणि अशक्त दिसत होती. वृषालीची ही अवस्था राजेशला पाहवत नव्हती. 

रात्री घरी आल्यावर राजेशने मनालीला फोन लावला व वृषालीबद्दल चौकशी केली. तिच्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूमुळे ती मनातून खचली होती. तसेच ती कॉलेजला गेल्यावर चारचौघांमध्ये मिसळली की तिला जरा बरं वाटेल या आशेने तिच्या इच्छेविरुद्ध घरच्यांनी तिला कॉलेजला पाठवलं होतं. मनालीची एक मैत्रीण वृषालीच्या घराच्या जवळच राहात होती. तिच्याकडूनच मनालीला हेसगळ समजलं होतं. वृषालीबद्दल हे सर्व ऐकून राजेशला फार वाईट वाटत होतं. खरंतर त्यांच्यात आजून साधी ओळखसुद्धा झाली नव्हती. तरीसुद्धा तिच्याबद्दल आपल्याला एवढी आपुलकी का वाटावी हे त्याला समजत नव्हतं. 


X X X X X X


वृषालीला झालेल्या एक्सिडेंटला आता बरेच दिवस लोटले होते. पण अजूनसुद्धा वृषाली त्यातून पूर्णपणे बाहेर आली नव्हती. मध्येच केव्हातरी तिच्या मनात त्या दिवशीच्या कटू आठवणी जाग्या व्हायच्या व नुसत्या विचारानेच तिच्या अंगावर काटा यायचा. सुमितवर वृषालीचं खरच खूप प्रेम होतं. माझा सुमित आता परत कधीच दिसणार नाही या विचारानेच तिला गहिवरून यायचं. 

कॉलेजला जायची तिची खरंतर इच्छा नव्हती पण इतके दिवस हॉस्पिटलमध्ये असताना व आता घरीसुद्धा तिला बिलकुल करमत नव्हतं. आपल्या एकुलत्याएक मुलीला अशा अवस्थेत पाहून तिच्या आई-वडिलांच्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं. डॉक्टरांनी देखील त्यांना वृषालीला लवकरातलवकर कॉलेजला पाठवण्याचा सल्ला दिला होता. चार मुलामुलींच्यात मिसळल्यावर आपोआपच तिच्या मनाची गाडी रुळावर येईल याची त्यांना खात्री वाटत होती. आईवडिलांनी आज तिला तिच्या इच्छेविरुद्ध कॉलेजला पाठवलं होतं. तिच्या बाबांनी स्वतः तिला गाडीतून कॉलेजला सोडलं होतं. आज कॉलेजमध्ये वृषाली तशी गप्पगप्पच होती. कोणी काही विचारलं तरी अगदी तोडकंमोडकं उत्तर देत होती. पण घरच्यापेक्षा इथे तिला जरा बरं वाटत होतं. घडलेली दुर्दैवी घटना विसरण्याचा ती प्रयत्न करत होती, शिवाय सायकॅट्रिस्टने दिलेली औषधे अजून ती घेत होती.

सलग पाच दिवस वृषाली कॉलेजात आली होती. तिची तब्येत आधीपेक्षा बरी वाटत होती. कॉलेजच्या आभ्यासात स्वतः चं मन जास्तीतजास्त गुंतवायचा ती प्रयत्न करत होती. गेल्या विसबावीस दिवसातला आभ्यास तिला भरून काढायचा होता. इतर कोणत्याही विषयापेक्षा तिला मॅथसचं जास्त टेन्शन होतं. “कोणत्या मुलीला मी मॅथसच्या क्वेरीज विचारू?” वृषालीने मनालीला विचारलं. मनालीला आयती संधी मिळाली. ती म्हणाली, “मुलीला कशाला, माझा एक चांगला मित्र आहे. तो आपल्या वर्गातला मॅथस एक्सपर्ट आहे. तो सांगेल तुला सगळं.” “कोण आहे तो?” वृषालीने मनालीला विचारलं. मनालीने राजेशकडे बोट दाखवलं. “तुझी हरकत नसेल तर मधल्या सुट्टीत आपण त्याच्याशी बोलू.” मनाली म्हणाली. वृषाली “चालेल” म्हणाली व हसली. तिने राजेशला ओळखलं. त्या दिवशी जॉगिंगसाठी जात असताना आपण ज्याच्यावर हसलो होतो तोच हा मुलगा आहे हे तिच्या लक्षात आलं व त्या दिवशीचा प्रसंग आठवून तिला पुन्हा एकदा हसू आलं. कितीतरी दिवसांनी वृषाली अशी मनसोक्त हसली होती. 

दुपारच्या सुट्टीत मनालीने वृषाली व राजेशची ओळख करून दिली. येत्या रविवारी तिघांचं मनालीच्या घरी भेटायचं ठरलं. सर्वकाही राजेशच्या प्लॅनप्रमाणेच होत होतं. राजेश अर्थातच खूप खुश होता. त्याचा धावण्याचा सरावही खूप छान चालू होता. वृषालीसुद्धा खूप छान गाते व तीही मनालीच्या आग्रहाखातर गायन स्पर्धेत सहभागी घेणार असल्याचं त्याला मनालीकडून समजलं होतं. 

ठरल्याप्रमाणे रविवारी राजेश मनालीच्या घरी पोहोचला. वृषाली तिथे आधीच पोहोचली होती. राजेशने पाठीवरची बॅग बाजूला ठेवली व तो सोफ्यावर बसला. मनाली व वृषालीच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या व ती कॉफी बनवण्यासाठी आत गेली. आता त्या भव्य हॉलमध्ये राजेश आणि वृषाली दोघेच होते. बराचवेळ कोणीच काही बोललं नाही. “तुझ्या एकसिडेंटबद्दल मनालीकडून समजलं. कशी आहे आता तब्येत?” राजेशने सुरुवात केली. “बरी आहे आता.” आशा मोजक्याच शब्दात वृषालीने उत्तर दिलं. तिला बोलतं कसं करायचं याचा राजेश विचार करत होता. पण वृषालीशी काय बोलावं हेच त्याला सुचत नव्हतं. खरंतर वृषालीशी एकांतात बोलता यावं यासाठीच त्याने मनालीला कॉफी बनवण्यासाठी आत पाठवलं होतं. पण बोलायला काहीच सुचत नव्हतं व वृषालीसुद्धा काहीच बोलत नव्हती. त्यामुळे राजेशला खूप अवघडल्यासारखं झालं होतं. मनाली कधी एकदाची कॉफी आणते असं राजेशला वाटत होती. “तुझं मॅथस खूप चांगलं आहे असं मनाली सांगत होती.” एवढं बोलून वृषालीने शांततेचा भंग केला आणि राजेशचं मन परत उत्साहित झालं. तो फक्त हसला. “खरंतर ज्यांना मॅथस जमतं त्यांचं मला फार कौतुक वाटतं. मला तर मॅथसची भीतीच वाटते.” वृषाली पुढे म्हणाली. “त्यात काय घाबरायचं! आणि आता तर मी आहेच की!” राजेश बोलून गेला. त्याच्या बोलण्याचं वृषालीला हसू आलं, ती काहीतर बोलणार होती तेवढ्यात मनाली कॉफी घेऊन आली. 

कॉफी पिउन झाल्यावर वृषालीने बॅगेतून वही काढली व क्वेरीज विचारायला सुरुवात केली. राजेश वृषालीला समजेल अशा पद्धतीने अतिशय सोप्या सरळ भाषेत समजावून सांगत होता. वृषालीला अशा पद्धतीने मॅथस यापूर्वी कोणीच शिकवलं नव्हतं. अगदी कॉलेजमधल्या गद्रे सरांपेक्षा पण सोप्या भाषेत राजेश सांगत होता. वृषालीने विचारलेल्या सगळ्या शंकांचं निरसन राजेशने केलं होतं व मध्येच एखादा जोक मारून तो तिला हसवत सुद्धा होता. 

वृषालीच्या अजूनही काही क्वेरीज बाकी होत्या पण आता बराच वेळ झाला होता. त्यांनी पुढच्या रविवारी पुन्हा भेटण्याचं ठरवलं व एकमेकांचा मोबाईल नंबर शेअर करून ते दोघे मनालीचा निरोप घेऊन निघाले. आज राजेश फार खुश होता. मैत्री ही प्रेमाची पहिली पायरी असते व तो ही पायरी चढला होता. 

वृषाली घरी पोहोचली. तिच्या चेहेऱ्यावर आज एक वेगळीच लाली चढली होती. तिला बऱ्याच दिवसांनी एवढी खुश पाहून तिच्या आईलापण बरं वाटलं. “स्वारी खुशीत दिसतीये आज.” वृषालीची आई तिला म्हणाली. “मग काय खुश पण नाही व्हायचं का मी?” वृषाली लाडात येऊन म्हणाली. “मग काय? जमलं का मॅथस?” तिच्या आईने विचारलं. “एका दिवसात कसं जमेल? एवढ्या दिवसांचा गॅप आहे.” वृषाली म्हणाली. “आणि शिकवणारा कसा होता?” वृषालीला चिडवण्यासाठी तिची आई म्हणाली. वृषाली यावर चिडून काहीतरी म्हणेल असं तिच्या आईला वाटलं होतं. पण वृषाली अगदी प्रांजळपणे म्हणाली, “खूप छान समजावतो राजेश आणि खूप फनी बोलतो तो. फार हुशार मुलगा वाटला मला.” “आच्छा, म्हणूनच एवढी खुश आहे आमची पिंकी!” पुन्हा चिडवण्याच्या उद्देशाने वृषालीची आई म्हणाली. आता मात्र वृषाली चिडली व “गप्प बस ग आई!” असं म्हणून ती तिच्या रूममध्ये गेली. वृषालीच्या आईने तिच्या मनात काय चालू आहे ते बरोबर ओळखलं होतं.


X X X X X X


दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश कॉलेजला जायला निघाला. राजेश वृषालीच्या घरापाशी पोहोचला. वृषाली गाडीला किक मारत होती पण तिची गाडी स्टार्ट होत नव्हती त्यामुळे ती फार वैतागली होती. राजेशने गाडी थांबवली. वृषाली राजेशकडे पाहून हसली व “हाय” म्हणाली. “तुझी हरकत नसेल तर मी प्रयत्न करून पाहतो.” राजेश वृषालीला म्हणाला. जणू याचीच वाट पाहत असल्याप्रमाणे वृषाली बाजूला झाली व तिने गाडी राजेशच्या ताब्यात दिली. राजेशने दोन वेळा किक मारली पण गाडी स्टार्ट नाही झाली. राजेशने कॉक ओढला व पुन्हा एकदा किक मारली पण तरीही गाडी स्टार्ट झाली नाही. शेवटी राजेशने गाडी डाव्या उजव्या बाजूला हलवून गाडीतलं पेट्रोल ढवळलं. आता मात्र गाडी एका किकमध्ये स्टार्ट झाली. राजेशने गाडी परत वृषालीच्या ताब्यात दिली. वृषाली गाडीवर बसली व राजेशकडे पाहून गोड हसली व “थँक यु” म्हणून निघून गेली. तिची पाठमोरी आकृती दिसेपर्यंत राजेश तिच्याकडे पहात होता. राजेशने घड्याळात पाहिलं. बराच उशीर झाला होता. ‘संदीप जाम चिडला असणार’ राजेशच्या मनात विचार आला. तेवढ्यात राजेशचा फोन वाजला. संदीपचाच कॉल होता. “आज काय दांडी मारायचा विचार आहे का?” संदीपने राजेशला विचारलं. “नाहिरे, पाचच मिनिटात पोहोचतो.” असे म्हणून राजेशने फोन ठेवला. 

राजेश आणि संदीप एकदाचे कॉलेजात पोहोचले. पहिला तास सहस्रबुद्धे सरांचा होता व राजेश आणि संदीप आज जवळजवळ वीस मिनिट उशिरा पोहोचले होते. त्यामुळे आता वर्गात जाणं म्हणजे सिंहाच्या गुहेत जाण्यासारखं होतं. त्यांनी सहस्त्रबुद्धे सरांचा तास संपल्यावरच वर्गात जायचं ठरवलं. 

वृषालीने पुन्हा एकदा राजेश आणि संदीपच्या बेंचकडे पाहिलं. त्यांचा बेंच अजूनही रिकामाच होता. आपल्यामुळे तर राजेशला उशीर नाहीना झाला? तिच्या मनात विचार आला. राजेशने आपल्याला एवढी मदत केली आणि आपण त्याच्यासाठी थांबलो देखील नाही या विचाराने तिचं तिलाच चुकल्यासारखं वाट होतं. 

शेवटी एकदाचा सहस्त्रबुद्धे सरांचा तास संपला. सर वर्गातून बाहेर जाताच राजेश आणि संदीप वर्गात आले. राजेशला पाहताच वृषालीचा जीव भांड्यात पडला. का कोण जाणे पण तिला राजेश येईपर्यंत त्याच्याबद्दल काळजी वाटत होती. राजेशचा एक्सिडेंट तर झाला नसेल ना असा विचार सुद्धा तिच्या मनात येऊन गेला व त्याबरोबरच तिला तिचा व सुमितचा एक्सिडेंट आठवला. नुसत्या विचारानेच तिच्या अंगावर काटा आला. 

संदीपने राजेशला उशीर झाल्याचं कारण विचारलं पण राजेशने त्याला “गॅस संपला होता त्यामुळे नवीन सिलेंडर आणायला गेलो होतो.” अस काहीतरी थातूरमातूर उत्तर दिलं. कॉलेज संपल्यावर राजेश आणि संदीप ठरल्याप्रमाणे मनालीच्या घरी पोहोचले. कॉलेजच्या स्पर्धांना आता केवळ आठवडा बाकी होता. त्यामुळे आज संदीप राजेश आणि मनालीसमोर त्याचं गाणं सादर करणार होता. त्याचं प्रॅक्टिस चांगलं झालं होतं, पण तरीही स्टेजवर गाण्याआधी एक रंगीत तालीम घेणं आवश्यक होतं. मनालीने वृषालीलासुद्धा बोलावलं होतं पण तिने मुद्दामच राजेशला सांगितलं नव्हतं आणि राजेश तिथे येणार आहे हे वृषालीला माहिती नव्हतं.

संदीपने स्पर्धेसाठी अरिजित सिंगचं “खामोशिया” हे गाणं निवडलं होतं. या गाण्यातल्या काही नोट्स खूप वरच्या पट्टीतल्या असल्यामुळे संदीपला स्टेजवर गाणं नक्कीच चॅलेंजिंग असणार होतं. संदीपचं गाणं झालं. काही ओळी गाताना सूर थोडा हलला होता. खासकरून वरच्या पट्टीतल्या ओळी गाताना त्याचा श्वास फुलत होता. राजेशने त्याला कोणत्या ओळींवर अजून सराव करायला हवा ते सांगितलं. राजेशला स्वतःला जरी फार चांगलं गाता येत नसलं तरी तो उत्तम कानसेन होता. मनाली मात्र संदीपच्या रोमँटिक आवाजात एवढी हरवून जायची की तिला त्याच्या गण्यातल्या चुकाच दिसायच्या नाहीत. 

संदीपने पुन्हा एकदा गाणं गायलं. त्याचं गाणं संपलं आणि मागून टाळ्यांचा आवाज आला. राजेश आणि मनालीने मागे वळून पाहिलं. मागे वृषाली उभी होती. वृषालीला पाहताच राजेशच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. यावेळी संदीपचं गाणं आधीपेक्षा चांगलं झालं होतं. “वृषाली पण फार छान गाते बरका. आणि तीसुद्धा स्पर्धेत भाग घेणार आहे.” मनालीने राजेश आणि संदीपला सांगितलं. वृषालीने स्पर्धेसाठी लतादीदींच “मेहेंदीच्या पानावर” हे गाणं निवडलं होतं. तिने गायला सुरुवात केली. एखाद्या सराईत गायिकेसारखी वृषाली गात होती. गाता गाता तिचं लक्ष राजेशकडे गेलं. राजेश अगदी एकाग्रनेते आपल्याकडे पाहतोय हे तिच्या लक्षात आलं. राजेश तल्लीन होऊन वृषालीचं गाणं ऐकत होता. गाणं ऐकता ऐकता तो एका वेगळ्याच विश्वात पोहोचला होता. जिथे फक्त तो आणि वृषाली दोघेच होते. या विश्वात वृषाली फक्त राजेशसाठीच गात होती आणि हे गाणं संपूच नये असं राजेशला वाटत होतं. त्याची ही विचारसमाधी टाळ्यांच्या आवाजाने भंगली. वृषालीचं गाणं अतिशय उत्कृष्ट झालं होतं. संदीपला मात्र अजून थोडी तयारी करावी लागणार होती. 

राजेश, संदीप आणि वृषालीने मनालीचा निरोप घेतला व ते तिथून निघाले. राजेशने गाडी स्टार्ट केली. वृषालीनेही गाडी स्टार्ट केली व तिने गाडी राजेशच्या गाडीजवळ न्हेली व राजेशला म्हणाली, “राजेश, मला तुला काही सांगायचंय.” राजेशच्या हृदयाची धडधड वाढली. “बोल ना” तो म्हणाला. “आज सकाळी खरंतर माझ्यामुळे तुला कॉलेजला पोहोचायला उशीर झाला. तू मला एवढी मदत केलीस आणि मी तुझ्यासाठी थांबले सुद्धा नाही.” राजेशला वृषाली वेगळच काहीतरी बोलेल असं वाटलं होतं पण स्वतःला सावरून घेत तो म्हणाला, “अगं त्यात काय एवढं! एखादा दिवस कॉलेजला पोहोचायला उशीर झाला म्हणून काही जग कोसळणार नाही. उलट गाडीचा कधी काही प्रॉब्लेम झाला तर मला सांगायचं. माझा नंबर तर तुझ्याकडे आहेच. एक कॉल केला की हा गडी हजर!” राजेशच्या शेवटच्या वाक्यावर वृषाली हसली व त्या दोघांचा निरोप घेऊन तिथून निघाली. 

राजेश आणि संदीपसुद्धा निघाले. “अच्छा, आता कळलं तुला सकाळी यायला उशीर का झाला ते.” संदीप चिडवण्याच्या सुरात राजेशला म्हणाला. राजेश नुसता हसला. “बर, मला सांग, तुमच्यात हे केव्हापासून सुरु आहे?” संदीपने राजेशला विचारलं. “काय सुरु आहे?” राजेश अगदी निरागसपणे म्हणाला. “जास्त भोळा बनू नकोस. मनालीने मला सगळं सांगितलय.” संदीप राजेशला म्हणाला. “अजून फक्त सुरुवात आहेरे. पण तिच्या मनात काय चाललंय तेच कळत नाही.” राजेशने कबुली दिली. “काळजी नको करू रे. या मुली अशाच असतात. पण मुलीच मुलींना ओळखतात. आणि मनालीकडून मला समजलंय की वृषाली तुझं खूप कौतुक करत होती. त्यामुळे आय थिंक यु आर ऑन द राईट ट्रॅक.” संदीप राजेशला म्हणाला. पण संदीपच्या या शेवटच्या वाक्यामुळे राजेशच्या मनात एक आशेचा किरण जागा झाला होता. 


X X X X X X


अखेर ज्या दिवसाची सर्वजण उत्सुकतेने वाट पहात होते तो दिवस उजाडला. स्पर्धेचा पहिला दिवस. सकाळी सहा वाजता धावण्याची स्पर्धा होती. स्पर्धा तीन दिवस चालणार होती. एकूण तीन राउंड होणार होते. चार मुलांचा एक गट असे चार गट केले होते. पहिल्या राउंडला प्रत्येक गटातील दोन जण निवडणार होते. दुसऱ्या राउंडला निवडलेल्या आठ जणांमध्ये परत चार जणांचे दोन गट पडणार होते. यातील टॉप फोर शेवटच्या राउंडमध्ये धावणार होते. स्पर्धेमध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल सारखे इतर खेळही खेळले जाणार होते. दुसऱ्या दिवशी रात्री नृत्य स्पर्धा होणार होती तर गायन स्पर्धेने तिसऱ्या दिवशी रात्री कार्यक्रमाची सांगता होणार होती. सलग तीन दिवस सुट्टी मिळाल्याने सर्व मुलं-मुली खुश होते. 

राजेशची तयारी चांगली झाली होती. तो व संदीप पहाटे साडेपाचलाच मैदानावर पोहोचले. पहाटेची वेळ असल्यामुळे स्पर्धा पाहायला खूप कमी मुलं आली होती. मुलीतर हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच होत्या. स्पर्धा सुरू होण्यास पाचच मिनिटे बाकी होती. राजेशने वृषाली कुठे दिसते का हे पाहण्यासाठी आजूबाजूला पाहिले व त्याला मनाली व वृषाली मेनगेटमधून आत येताना दिसल्या. वृषालीला पाहताच राजेशचा आनंद द्विगुणित झाला. आता त्याला जिंकायलाच हवं होतं. रेफरीने शिट्टी वाजवताच सर्व धावपटूंनी पोजिशन घेतली. दुसरी शिट्टी वाजताच धावण्यास सुरुवात केली. सुरुवातीला राजेश चौथ्या क्रमांकावर होता. पण काही सेकंदातच तो एकेकाला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचला व त्याने शंभर मिटरची रेषा ओलांडली. धापा टाकतच त्याने बाजूला पाहिलं. संदीप, मनाली व वृषाली टाळ्या वाजवत होते. वृषालीला पाहताच राजेशचा थकवा कुठल्याकुठे पळाला. स्पर्धा जिंकल्यापेक्षा पण वृषाली खुश झालेली पाहून त्याला जास्त आनंद झाला होता. राजेश काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण दम लागल्यामुळे त्याला नीट बोलता येत नव्हतं. “आधी जरा विश्रांती घे, थोडं पाणी पी.” संदीप म्हणाला व त्याने पाण्याची बाटली राजेशच्या हातात दिली. पाणी प्यायल्यावर राजेशला थोडं बरं वाटलं. “आता सँडविच खाऊन घे. वृषालीने खास तुझ्यासाठी बनवलंय.” मनाली चिडवण्याच्या सुरत म्हणाली व तिने डबा राजेशच्या हातात दिला. “एवढ्या सकाळी?” राजेशने आश्चर्याने विचारलं. वृषाली नुसतं हसली. राजेश सँडविच खाऊन झाल्यावर म्हणाला, “असं सँडविच मला रोज मिळणार असेल तर मी रोज धावायला सुद्धा तयार आहे!” हे ऐकून वृषाली लाजली व तिच्या गालावर लाली चढली. “तुझ्यासाठी सँडविचच काय अख्ख जेवण सुद्धा बनवेल वृषाली.” मनाली वृषालीला चिडवत म्हणाली. वृषाली पुन्हा लाजली व तिने लटक्या रागाने मनालीकडे पाहिलं. राजेश मात्र मनोमन खुश झाला होता. 

स्पर्धेचा दुसरा दिवस उजाडला. संदीप व राजेश मैदानावर पोहोचले. थोड्याच वेळात मनाली आणि वृषाली सुद्धा तिथे आल्या. स्पर्धेची वेळ झाली. सर्व स्पर्धक आपापल्या जागी उभे होते. रेफरीने शिट्टी वाजवताच सर्वांनी पोजिशन घेतली. राजेशने वृषालीकडे पाहिले. दोघांची नजरानजर झाली व राजेशमध्ये एक वेगळीच शक्ती संचारली. रेफरीने दुसरी शिट्टी दिली व सर्व स्पर्धकांनी धावायला सुरुवात केली. राजेश वाऱ्याच्या वेगाने धावत होता व एकेकाला मागे टाकत होता. आता अगदी थोडं अंतर बाकी होतं. राजेशच्या पुढे एकच मुलगा होता. राजेशचे पाय आता घाईला आले होते पण तरीही तो पूर्ण ताकदीनिशी धावत होता. आता राजेश आणि तो मुलगा एका रेषेत धावत होते. अखेरीस राजेशने फिनिश लाईन ओलांडली. राजेश केवळ एका सेकंदाच्या फरकाने जिंकला होता. संदीप, वृषाली आणि मनालीने एकच जल्लोष केला. राजेश खूपच दमला होता. कालसारखं आजदेखील वृषालीने सँडविच आणलं होतं. थोडावेळ विश्रांती घेतल्यावर राजेशने सँडवीचवर ताव मारला. राजेशचं लक्ष वृषालीकडे गेलं. ती आपल्याकडे कौतुकाने पहात आहे हे राजेशला जाणवलं. त्याने वृषालीला विचारलं, “गाण्याची तयारी झाली का?” “सुरू आहे. पण जरा टेन्शन आलंय.” वृषाली काळजीच्या सुरात म्हणाली. “अगं टेन्शन कशाला घेतेस. मी आहे ना!” राजेश उत्साहात बोलून गेला. मनाली आणि संदीप एकमेकांकडे पाहून हसले. राजेश आणि वृषालीतलं प्रेम फुलताना पाहून त्यांनाही बरं वाटलं. “मला खात्री आहे, तूच जिंकशील. तू गातेसच तशी.” राजेश पुढे म्हणाला. राजेशच्या बोलण्यामुळे वृषालीच्या मनातील स्वतः बद्दल वाटणारी शंका दूर झाली. 

आज स्पर्धेचा शेवटचा दिवस होता. राजेश आणि संदीप नेहमीप्रमाणे आज देखील मैदानावर जरा लवकरच पोहोचले. राजेशने वार्मअप केला. स्पर्धा सुरू व्हायला केवळ पाचच मिनिटे बाकी होती. मनाली आणि वृषाली आजून पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे राजेश थोडा अस्वस्थ झाला. रेफरीने पहिली शिट्टी वाजवली व सर्व धावपटूंनी पोजिशन घेतली. राजेशने संपूर्ण मैदानावर एकदा नजर फिरवली. त्याला वृषाली आणि मनाली कुठेच दिसल्या नाहीत. रेफरीने दुसरी शिट्टी वाजवली. राजेशने धावायला सुरुवात केली, पण नेहमीसारखा आज त्याला उत्साह वाटत नव्हता. मनात वारंवार वृषालीचेच विचार येत होते. सुरुवातीला राजेश पहिल्या स्थानावर होता. पण जणू पायातील ताकदच नष्ट झाल्याप्रमाणे हळूहळू मागे पडत होता. निम्मं अंतर पार करेपर्यन्त तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला होता. त्याचं आज धावण्यात लक्षच नव्हतं. त्याच्या मनात नुसता वृषालीच्या नावाचा जप सुरू होता. त्याने धावताधावताच गेटकडे वळून पाहिलं आणि त्याच्या जीवात जीव आला. वृषाली आणि मनाली गेटमधून आत येताना त्याला दिसल्या. आता त्याच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारली आणि त्याच्या पायांची गती वाढली. पाहता पाहता तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्याच्या पुढे आता एकच मुलगा होता. पण अंतर फारच कमी बाकी होती. त्याने पायांवर आजून जोर दिला व पूर्ण ताकदीने तो धावू लागला. आता शेवटचा टप्पा बाकी होता. राजेश त्या मुलाच्या बरोबरीने धावत होता. पाय प्रचंड दुखत होते पण दुखण्याकडे लक्ष द्यायला आता राजेशकडे वेळ नव्हता. तो फिनिश लाईन क्रॉस करणार इतक्यात त्याचा डावा पाय मुडपला व राजेश खाली कोसळला. त्याच्या पायातून प्रचंड कळा येत होत्या. वृषाली धावतच राजेशजवळ आली. त्याच्या गुढग्याची वाटी सरकली होती. त्याला प्रचंड वेदना होत होत्या. त्याला असं तडफडताना पाहून वृषालीचं काळीज कळवळलं. तिचे डोळे देखील पाणावले. ती राजेशच्या पाठीवरून हात फिरवत होती. मनाली, संदीप व इतर मुलं, रेफरी सगळे पाहतायत याचंदेखील तिला भान राहीलं नाही. वृषालीचा स्पर्श होताच थोड्यावेळासाठी राजेश सुखावला. 

कॉलेजचे डॉक्टर काहीवेळातच तिथे पोहोचले. त्यांच्या बरोबर आलेल्या माणसांनी राजेशला उचललं व स्ट्रेचरवर ठेवलं. ते त्याला डॉक्टरांच्या रूममध्ये घेऊन गेले. तिथे प्राथमिक उपचार करून ते राजेशला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणार होते. संदीप, मनाली आणि वृषाली निराश मनाने आपापल्या घरी गेले. वाटेत कोणच काही बोललं नाही. संदीपने जाण्याआधी राजेशच्या वडिलांना फोन करुन त्याला झालेल्या अपघाताबद्दल कळवलं होतं. ते दुपारपर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचणार होते.

वृषाली घरी पोहोचली. तिला फार थकल्यासारखं वाटत होतं. राजेशच्या काळजीने तिचं मन मलूल झालं होतं. तिच्या आईने नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. पण ते खायची देखील इच्छा तिला होत नव्हती. वृषालीचं काहीतरी बिनसलय हे तिच्या आईलाही जाणवलं. तिने वृषालीला तसं विचारलं पण वृषाली काहीच न बोलता तिच्या खोलीत गेली आणि तिने दरवाजाला आतून कडी लावली. वृषालीच्या आईला तिची काळजी वाटत होती. सुमितच्या मृत्यूनंतर आज ती पहिल्यांदाच असं विचित्र वागत होती. 

काही केल्या वृषालीच्या मनाचा अस्वस्थपणा कमी होत नव्हता. तिने मनालीला फोन लावला व घरी बोलावलं. थोड्याच वेळात मनाली पोहोचली. राजेशला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं तिला मनालीकडून समजलं. तसेच संदीपसुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचं मनालीने वृषालीला सांगितलं. “आपण आता लगेच निघू आणि हॉस्पिटलला जाऊ. मला राजेशची फार काळजी वाटतेय.” वृषाली मनालीला म्हणाली. “अगं तुला राजेशची अवस्था पाहवणार नाही आणि तसही संदीप तिथे आहेच. राजेशचे आईवडील सुद्धा दुपारी तिथे पोहोचतील.” मनाली वृषालीला म्हणाली. “राजेशला आत्ताच माझी सर्वात जास्त गरज आहे. मला त्याला भेटायलाच हवं. तू नाही आलीस तर मी एकटी जाईन.” वृषाली म्हणाली. ती आता कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने राजेशच्या पाठिवरून हात फिरवताच काही क्षणांसाठी राजेश वेदना विसरला होता आणि हे वृषालीलाही जाणवलं होतं. ती आता कोणाचच ऐकणार नव्हती. वृषाली तिच्या खोलीतून बाहेर आली. तिने गाडीची चावी घेतली व घराबाहेर आली. मनालीसुद्धा तिच्या पाठोपाठ बाहेर आली. वृषालीच्या आईला काही समजायच्या आत त्या गाडीवरून हॉस्पिटलच्या दिशेने निघाल्या. 

हॉस्पिटलमध्ये राजेश बेडवर झोपला होता. संदीप त्याच्या बाजूला बसला होता. डॉक्टरांनी दिलेल्या स्टेरॉईडमुळे वेदना कमी झाली होती पण त्यामुळे राजेशला चांगलीच गुंगी आली होती. त्याला सारखा तो स्पर्धेचा क्षण आठवत होता. अंतिम क्षणी झालेल्या अपघातामुळे राजेशला ती स्पर्धा जिंकता आली नव्हती. त्यामुळे राजेश नाराज झाला होता. पण वृषालीचा स्पर्श आठवतच त्याच्या मनातील नाराजी कुठल्या कुठे पाळली होती. ‘आपलं वृषालीवर जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम वृषालीचं आपल्यावर असेल का?’ हा प्रश्न कायम राजेशच्या मनात यायचा. पण आता या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं होतं. ते प्रेम राजेशला वृषालीच्या नजरेत दिसलं होत तिच्या स्पर्शात जाणवलं होतं. 

राजेशला आता चांगलीच भूक लागली होती. त्याने डोळे उघडले. समोर संदीप उभा होता. सकाळपासून तो तिथून हलला नव्हता. राजेशने संदीपला बाहेरून खाण्यासाठी काहीतरी आणायला सांगितलं. संदीप बाहेर निघणार तितक्यात वृषाली आणि मनाली तिथे पोहचल्या. वृषालीने राजेशकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. पण दोघेही काहीच बोलले नाहीत. वृषालीला खूप काही बोलायचं होतं पण तोंडातून शब्दच निघत नव्हते. राजेशचीही तीच अवस्था झाली होती. त्यांचा नजरांचा खेळ मात्र अजूनही सुरूच होता. जणू ते नजरेनेच संवाद साधत होते. शेवटी मनालीनेच या चमत्कारिक शांततेचा भंग केला. “तुझं सँडविच देणार आहेस की नाही त्याला का मी खाऊ?” मनाली वृषालीला म्हणाली आणि सगळेच हसले. वृषालीने तिच्या हातातील पिशवीतून एक डबा काढला व राजेशच्या हातात दिला. राजेशने डबा उघडला व तो वृषालीला म्हणाला, “तू पण घे ना थोडंसं. सकाळपासून तू पण काही खाल्लं नसशील ना!” वृषाली काही बोलायच्या आतच मनाली चेष्टेत म्हणाली, “अच्छा! फक्त वृषालीलाच! आम्हाला नाही देणार का?” आणि पुन्हा एकदा सगळे हसले. 

खाऊन झाल्यावर राजेशला जरा बरं वाटलं. तो वृषालीला म्हणाला, “गाण्याचं प्रॅक्टिस चांगलं कर. तू जिंकल्यावर आम्हाला पार्टी पाहिजे.” वृषालीचा चेहेरा गंभीर झाला. “मी स्पर्धेत गाणं नाही गाणार.” ती म्हणाली. तिच्या या घोषणेमुळे सर्वांनाच धक्का बसला. वृषाली पुढे म्हणाली, “गाणं गायची मला इच्छाच राहिली नाही.” आपल्याला झालेल्या अपघाताचा वृषालीवर एवढा परिणाम होईल असं राजेशला वाटलं नव्हतं. “मूर्खपणा करू नकोस वृषाली, तू एवढं छान गातेस. मी लवकर बरं व्हावं असं जर तुला वाटत असेल तर तू आज स्पर्धेत नक्की गाशील.” राजेश वृषालीला म्हणाला. आज पहील्यांदाच तो एवढ्या अधिकाराने वृषालीशी बोलला होता. आता वृषालीचा नाईलाज होता, ती काहीतरी बोलणार तेवढ्यात डॉक्टर आत आले व त्यांनी सर्वांना बाहेर जायला सांगितलं. मनाली, वृषाली आणि संदीप बाहेर आले. बाहेर येताच मनाली म्हणाली, “थोड्या वेळात राजेशचे आई-बाबा पोहोचतील. तोपर्यंत मी इथे थांबते. तुम्हाला दोघांना आज रात्री स्पर्धेत गायचय. तुम्ही घरी जाऊन तयारी करा.” मनालीचा निरोप घेऊन वृषाली आणि संदीप आपापल्या घरी निघाले. घरी पोहोचल्यावर वृषालीने तिच्या आईला राजेशला झालेल्या अपघाताबद्दल सांगितलं. तिच्या बोलण्यावरूनच वृषाली राजेशच्या प्रेमात आहे हे तिच्या आईला समजलं पण ती काही बोलली नाही.


X X X X X X


रात्री सात वाजता संदीप, मनाली आणि वृषाली कॉलेजात पोहोचले. वृषालीने मनालीला राजेशबद्दल विचारलं. तो ठीक असल्याचं मनालीने सांगितलं. तसेच आता फक्त तुझ्या गाण्यावर लक्ष दे असा सल्लाही तिने वृषालीला दिला. 

एकूण चार मुलं आणि चार मुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. होस्टने घोषणा करताच पहिला स्पर्धक विक्रांत स्टेजवर आला. तो किशोर कुमारचं ‘पल पल दिल के पास’ हे गाणं गाणार होता. त्याने हातात माईक धरला व गाणं गायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याचे सूर चुकत होते. त्याची देहबोली पाहून त्याला स्टेजवर गायची फारशी सवय नसावी असं वाटत होतं. गाण्याच्या उत्तरार्धात त्याने स्वतःला सावरलं. गाणं संपलं. सर्वांनी टाळ्यांचा कडकडात केला. सुरुवातीला त्याचा सूर जरी हलला असला तरी पुढे त्याने जो सूर पकडला तो शेवटपर्यंत सोडला नाही. 

पुढचं गाणं अफसाना नावाच्या मुलीने गायलं. तिने लुटेरा चित्रपटातलं “सवार लू” हे गाणं गायलं. अफसानाचा आवाज अतिशय गोड होता व तिची तयारी सुद्धा चांगली होती. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटाने तिच्या गाण्याला दाद दिली. आता संदीपची वेळ होती. तणाव त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मनालीने नजरेनेच त्याला धीर दिला. संदीप स्टेजवर गेला. त्याने “खमोशिया” गाणं गायला सुरुवात केली. स्टेजवर जाऊन एवढ्या लोकांसमोर गाणं गायची संदीपची ही पहिलीच वेळ होतं. त्याने आज बराच वेळ प्रॅक्टिस केलं होतं. गाणं वरच्या पट्टीत असल्यामुळे गाताना त्याला दम लागत होता. त्यामुळे त्याचे सूर वारंवार हलत होते. गाणं संपलं. मनालीच्या चेहेऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती पण ती संदीपला काही बोलली नाही. वृषालीचं मात्र कशाकडेच लक्ष नव्हतं. ती स्वतःच्याच विचारात हरवली होती. संदीपचं गाणं संपताच होस्टने वृषालीच्या नावाची घोषणा केली आणि ती स्टेजवर गेली. तिने डोळे मिटले. राजेशचे शब्द तिला आठवले व तिने पूर्ण लक्ष गाण्यावरच केंद्रित करायचं ठरवलं. वृषालीने “मेहेंदीच्या पानावर” हे गाणं गायला सुरुवात केली. तिचा आवाज तर सुंदर होताच पण ती एखाद्या सराईत गायिकेसारखं गात होती व सर्वजण मंत्रमुग्ध होऊन तिच्या गायनाचा आस्वाद घेत होते. गाणं संपताच वृषालीने डोळे उघडले व समोरचं दृश्य पाहून ती भारावून गेली. सर्व श्रोते उभे होते व टाळ्यांच्या कडकडाटाने पूर्ण सभागृह दुमदुमलं होतं. 

वृषालीनंतर पुढच्या स्पर्धकांनी आपापली गाणी सादर केली व स्पर्धेची सांगता झाली. रात्रीचे नऊ वाजले होते. वृषाली, मनाली व संदीपने घरी जाण्याआधी हॉस्पिटलमध्ये जाऊन राजेशला भेटण्याचं ठरवलं. ते राजेशच्या वॉर्डमध्ये पोहोचले. अजूनही राजेश बेडवर आडवा पडला होता. त्याच्या गुढग्याभोवती एक कापडी पट्टी बांधली होती. फाटलेले लिगामेंट बदलण्यासाठी सर्जरी करावी लागणार होती. राजेशचे आईबाबा बाजूलाच खुर्चीवर बसले होते. राजेशने सर्वांची ओळख करून दिली. वृषालीचं गाणं फार छान झाल्याचं मनालीने राजेशला सांगितलं. “वृषाली जिंकणार यात काहीच शंका नाही. तुझ्या घरी जेव्हा पहिल्यांदा मी तिचं गाणं ऐकलं होतं तेव्हाच मला तिची तयारी समजली होती.” राजेश मनालीला म्हणाला. वृषाली नुसतं हसली. थोडावेळ गप्पा मारून मनाली, संदीप आणि वृषाली तिथून निघाले. 


X X X X X X


स्पर्धा संपून आता बरेच दिवस झाले होते. राजेशच्या पायाची सर्जरीसुद्धा झाली होती. तो आता त्याच्या गावी होता. आजून त्याला आधाराशिवाय चालायला डॉक्टरांनी परवानगी दिली नव्हती. आईकडून लाड करून घ्यायची आयती संधी मात्र त्याला मिळाली होती. घरात सध्या फक्त राजेशच्याच आवडीचे पदार्थ बनत होते. इतके दिवस कॉलेज बुडाल्याने राजेशला परीक्षेची काळजी वाटत होती. वार्षिक परीक्षा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली होती. घरी राजेशचा आभ्यास सुरू होता. पण मनासारखा आभ्यास होत नव्हता. 

मागच्याच आठवड्यात मनाली, वृषाली आणि संदीप राजेशच्या गावी येऊन त्याला भेटले होते. अपेक्षेप्रमाणे गायनाच्या स्पर्धेत वृषालीला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. राजेशला वृषालीला खूप काही सांगायचं होतं. पण का कोणजाणे त्याला शब्दच सुचत नव्हते. वृषाली मात्र फार खुश दिसत होती. जाता जाता ती राजेशला म्हणाली होती, “केवळ तुझ्यामुळेच मी ही स्पर्धा जिंकू शकले.” तिला आपल्याला अजूनही काही सांगायचंय पण ती सांगत नाहीये हे राजेशला जाणवलं. कदाचित संदीप आणि मनालीसमोर तिला बोलता येत नसेल हा विचार राजेशच्या मनात आला होता. 

एकाच जागी बसून राजेश आता कंटाळला होता. अजून एक महिना त्याला हे सहन करायचं होतं. त्याला आपण कधीएकदा परत कॉलेजला जातोय असं वाटत होतं.

संदीपचा आभ्यास जोरात सुरू होता. प्रेमाच्या आघाडीवर देखील तो बराच पुढे गेला होता. काही दिवसांपूर्वी त्याने मनालीला आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या होत्या व मनालीने देखील क्षणाचाही विलंब न करता त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. ते दोघेही राजेश परत यायची वाट पहात होते. वृषालीचं तर राजेशशी फोनवरून रोज बोलणं व्हायचं. राजेशच्या गावी बऱ्याच वेळा फोनला रेंज नसायची. त्यामुळे एखादा दिवस जर फोन करता नाही आला तर राजेश अस्वस्थ व्हायचा. 

दिवसांमागून दिवस जात होते. परीक्षा अवघ्या महिन्यावर आली होती. आता राजेशला आधाराशिवाय चालता येत होतं पण अजून काही दिवस डॉक्टरांनी थोडंच चालायला सांगितलं होतं. तसेच डॉक्टरांनी दिलेले व्यायाम देखील राजेशला करावे लागत होते. आपण कधीएकदा पुण्याला जातो असं राजेशला झालं होतं. त्याच्या आईवडिलांना मात्र त्याची काळजी वाटत होती. पण एवढे दिवस कॉलेज बुडालं होतं त्यामुळे आता अजून जास्त उशीर करून चालणार नव्हतं. खरंतर परिक्षेपेक्षा त्याला अजून एका गोष्टीची जास्त काळजी वाटत होती. काही दिवसांपासून वृषालीने त्याचा फोन घेणंच बंद केलं होतं. तिला नक्की काय झालय हेच त्याला कळत नव्हतं. त्याच्या मेसेजनासुद्धा तिने रिप्लाय दिला नव्हता. याबद्दल त्याने मनालीला विचारलं. पण तिला देखील तसाच अनुभव आला होता. वृषाली मनालीचे कॉल्स देखील घेत नव्हती. आज ती कॉलेजला सुद्धा आली नव्हती. 


X X X X X X


राजेशला भेटून वृषाली पुण्यात आली व घरी पोहोचली. अचानक तिला सुमितची आठवण झाली. सुमितला झालेला अपघात व आता राजेशचा अपघात या दोन घटनांची तुलना तीचं मन तिच्या नकळत करत होतं. आता ती जुन्या कटू आठवणींमध्ये पूर्णपणे हरवून गेली होती. तो दुर्दैवी प्रसंग जसाच्या तसा तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला……..वृषाली आणि सुमित जागृतीच्या घरातून बाहेर पडले. दोनच्या आत त्यांना स्टँडला पोहोचायचं होतं. सुमित गाडी खूप वेगात पळवत होता. पण मधेच एका रस्त्याला बरच ट्राफिक होतं. तिथेच त्यांची पंधरा मिनिटं गेली. वृषालीने घड्याळात पाहिलं. थोडाच वेळ बाकी होता. तिने सुमितला गाडीचा वेग अजून वाढवायला सांगितलं. त्यांच्या उजव्या बाजूने एक ट्रक जात होता. ट्रकवाल्याने डाव्या बाजूच्या इंडिकेटर दिला व ट्रक अचानक वळला. सुमितची गाडी ट्रकवर आदळली. एका क्षणात सुमित गतप्राण झाला. त्याचं डोकं ट्रकवर आदळून फुटलं होतं…………वृषालीला नुसत्या आठवणीनेच अंगावर काटा आला. तिच्या मनातील अपराधीपणाची भावना पुन्हा जागी झाली. ‘माझ्यामुळेच सुमित मेला. मी सांगितल्यामुळेच सुमितने गाडीचा वेग वाढवला.’ हे विचार वारंवार तिचं मन कुरतडू लागले. तिने किती जरी प्रयत्न केला तरी हे विचार तिच्या मनातून जातच नव्हते. ती जेव्हा राजेशशी फोनवर बोलायची तेव्हा थोड्या वेळासाठी का होईना तिचं मन रूळावर यायचं. एरवी मात्र तिची अवस्था बिकट असायची. कॉलेजमध्ये सुद्धा तिचं लक्ष कशातच लागत नव्हतं. तिथे देखिल हेच विचार तिच्या मनावर कब्जा करायचे. 

वृषालीच्या आईला देखील समजत होतं की आपली मुलगी उदास असते, स्वतःच्याच विचारात हरावल्यासारखी वाटते. खूप वेळ विचारल्यानंतर वृषालीने तिचं मन आईसमोर मोकळं केलं. “आता मला जगावसच वाटत नाही.” या तिच्या शेवटच्या वाक्यानंतर तिच्या आईला धक्काच बसला. आता तर वृषालीने कॉलेजला जायचंपण सोडलं होतं. तिच्या खोलीत ती कुठेतरी शून्यात पाहत असल्यासारखी एकटक पाहत बसायची. मध्येच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायचे. तिच्या आईवडिलांना तिची ही अवस्था पाहवत नव्हती. मानसोपचार तज्ञाचे उपचार सुरू होते. पण त्याचा फारसा परिणाम होत नव्हता. 


X X X X X X


राजेश इतक्या दिवसांनंतर आज कॉलेजला आला होता. कॉलेजमध्ये वृषाली कुठेच दिसत नव्हती. कॉलेज सुटल्यानंतर राजेशने मनालीला वृषालीबद्दल विचारलं. दोन दिवसांपासून वृषाली कॉलेजला आली नसल्याचं मनालीने त्याला सांगितलं. तसेच तिचा फोन बंद असल्याचंही तिने राजेशला सांगितलं. राजेशला तिची फार काळजी वाटत होती. वृषालीला नक्की काय झालंय ते समजण्याचा आता एकच मार्ग होता. 

राजेश, मनाली आणि संदीप वृषालीच्या घरी पोहोचले. वृषालीच्या आईने दरवाजा उघडला. तिच्या चेहेऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. वृषालीच्या आईने त्या तिघांना सर्वकाही सांगितलं. आता त्यांना तिच्या नैराश्यामागचं कारण समजलं होतं. आता तिघे वृषालीला भेटण्यासाठी तिच्या खोलीत आले. वृषाली बेडवर बसली होती. ती फारच अशक्त दिसत होती. ती समोरच्या भिंतीकडे एकटक पहात होती. तिच्या चेहेऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. तिने मनाली, संदीप आणि राजेशकडे पाहिले पण काहीच संबंध नसल्याप्रमाणे तिने नजर पुन्हा भिंतीकडे वळवली. राजेशसाठी हा धक्का होता. “वृषाली” राजेशने वृषालीला हाक दिली. पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. राजेशला काय करावं तेच कळत नव्हतं. त्याने पुन्हा वृषालीला हाक मारली पण पुन्हा तेच. आता मात्र राजेशचा संयम सुटला. तो पुढे गेला व वृषालीच्या खांद्यावर हात ठेवून तिला हलवू लागला. वृषालीने एकदा राजेशकडे पाहिलं पण तिच्या नजरेत ओळखीची कोणतीच खूण नव्हती. संदीप पुढे गेला व त्याने राजेशला मागे ओढला. राजेशच्या डोळ्यातून निघालेला अश्रूचा थेंब त्याच्या गालावर विसावला. संदीप आणि मनालीने ओढतच राजेशला त्या खोलीबाहेर आणलं. थोड्यावेळाने राजेश भानावर आला. काहीही करून वृषालीला या अवस्थेतून बाहेर काढायचं त्या तिघांनी ठरवलं होतं. 

काही जुन्या आठवणींमुळे वृषालीचं मन विस्कळीत झालं होतं. ते पूर्वपदावर आणण्यासाठी कटू आठवणींच्या जागी सुखद आठवणी पेरणं गरजेचं होतं. पण जोपर्यंत वृषालीच्या मनाचे दरवाजे बंद होते तोपर्यंत हे शक्य नव्हतं. तसेच तिच्या घराण्यात मनोविकाराने ग्रासलेली ती काही पहिली व्यक्ती नव्हती. तिच्या आज्जीला देखील नैराश्याचे झटके बऱ्याचदा येऊन गेले होते. पण तरीदेखील काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे वृषालीच्या मनावर झालेली जखम इतक्या दिवसांनंतर पुन्हा एकदा ओली व्हावी याचं उत्तर मात्र खुद्द डॉक्टरांकडे देखील नव्हतं. विज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी मनुष्याचं मन इतकं गूढ आहे की ते पूर्णपणे ओळखणं विज्ञानाला सुद्धा अजून शक्य झालेलं नाही. 

राजेश, मनाली आणि संदीपने वृषालीच्या डॉक्टरांची भेट घेतली. राजेशने त्यांना त्यांच्या आणि वृषालीमध्ये फुलत गेलेल्या नात्याबद्दल सर्वकाही सांगितलं. हे ऐकून डॉक्टरांनी राजेशला एक कल्पना सांगितली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजेश एकटाच वृषालीच्या घरी गेला. त्याने वृषालीच्या आईवडिलांना सर्वकाही सांगितलं नाही. तिला सहज भेटायला आलोय असं सांगितलं व तो वृषालीच्या खोलीत गेला. बेडच्या कोपऱ्यात वृषाली गुढग्यात पाय दुमडून बसली होती. आपण आलोय हे वृषालीला समजावं म्हणून राजेशने घसा खाकरला. पण वृषालीने मान देखील वळवली नाही. तिची नजर कालप्रमाणेच कुठेतरी शून्यात पहात होती. चेहेऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. जागरणामुळे डोळे सुजल्यासारखे वाटत होते. राजेशला तिची ही अवस्था पाहवत नव्हती. तो तिच्या समोर बसला. “वृषाली” राजेशने वृषालीला हाक मारली. समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. तिची निर्विकार नजर पाहून राजेश अस्वस्थ झाला होता. पण त्याने चेहऱ्यावरचं हसू ढळू दिलं नाही. तो पुढे बोलू लागला, “वृषाली, तुला आठवतो का तो दिवस! मी कर्वे उद्यानातून बाहेर पडलो. समोरून तू येत होतीस. अचानक तू माझ्याकडे पाहून हसू लागलीस. मला कळेना तू का हसतीयेस म्हणून मी समोरच्या गाडीच्या आरशात पाहिलं तर माझ्या डोक्यावर पडलेली पक्ष्याची विष्टा मला दिसली व मीही हसू लागलो. तुला माहितीये का की हसताना तू किती छान दिसतेस! माझ्यासाठी फक्त एकदा हास!” असे बोलून राजेशने वृषालीचा हात आपल्या हातात घेतला. त्या थंड पडलेल्या हातात जिवंतपणाची कोणतीच जाणीव नव्हती. राजेश अजूनच अस्वस्थ झाला व तिच्या खोलीतून बाहेर आला. वृषालीची आई राजेशला काहीतरी विचारणार होती पण राजेशचा चेहरा पाहूनच तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. राजेशही काही न बोलता तिथून निघाला. 

पुढचे तीन दिवस राजेश वृषालीच्या घरी जात होता, तिला बोलतं करायचा प्रयत्न करत होता. पण वृषालीवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. तिसऱ्या दिवशी मात्र काही वेळासाठी का होईना वृषालीने राजेशच्या नजरेला नजर दिली. काही क्षणांसाठी राजेशला तिच्या नजरेत जिवंतपणा जाणवला. त्यामुळेच त्याच्या मनात आशेचा किरण जागा झाला व नैराश्याने ग्रासलेल्या त्याच्या मनात उत्साहाची पालवी फुटली. चौथ्या दिवशी राजेश पुन्हा वृषालीच्या घरी गेला. त्याने वृषालीच्या आईला तिच्याबद्दल विचारलं. फारसा काही बदल नाही पण थोड्या वेळासाठी तिचा चेहेरा हसरा दिसत होता हे सांगताना वृषालीच्या आईच्या चेहेऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता. हे ऐकून राजेशला बरं वाटलं. तो वृषालीसमोर बसला. नेहमीप्रमाणे आजदेखील त्याने वृषालीसमोर सर्व सुखद आठवणींचा पाढा वाचला. पण काहीच परिणाम झाला नाही. आता मात्र राजेशचा संयम सुटला. तो उद्वेगाने बोलू लागला, “का छळतीयेस मला वृषाली. का माझ्या सहनशक्तीचा अंत पाहतेस. तुला मी नाही पाहू शकत असा. काहीतरी बोल. नाहीतर मला थोबाडीत मार पण अशी शांत बसू नकोस. मला तू हवियेस वृषाली, मला तू हवियेस.” एवढे बोलून राजेशने अश्रूंना वाट मोकळी केली. बऱ्याच वेळानंतर त्याच्या डोळ्यातील अश्रूंचा सागर आटल्यावर त्याने डोळे पुसले व वृषालीकडे पाहिले. वृषालीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काही क्षणात तिच्या चेहेऱ्यावरील भाव बदलले व ती हुंदके देऊ लागली. राजेशने तिचं डोकं त्याच्या छातीला टेकवलं व तिच्या डोक्यावरून तो हात फिरवू लागला. 

इतक्या दिवसात आज पहिल्यांदाच वृषाली जिवंत असल्याची जाणीव राजेशला झाली होती. बराच वेळ वृषाली मनसोक्त रडत होती. इतक्या दिवसांचं नैराश्यच जणू अश्रूंनी धुतलं गेलं होतं. राजेशचा जीव भांड्यात पडला. वृषाली आपल्यापासून कायमची दुरावणार ही भीती त्याच्या मनातून नाहीशी झाली होती. 


X X X X X X


आता वृषाली पूर्णपणे बरी झाली होती. इतक्या दिवसांनंतर ती आज पहिल्यांदाच कॉलेजला जाणार होती. राजेशचं वृषालीच्या घरी येणं जाणं चालूच होतं. मागील काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे त्यांच्यातलं नातं आणखीनच घट्ट झालं होतं. वृषालीच्या घरी तर सर्व समजलं होतं व तिच्या आईवडिलांची त्यांच्या नात्याला मूक संमती सुद्धा होती. राजेश मात्र वृषालीबद्दल त्याच्या घरी अजून काहीच बोलला नव्हता. तसही लग्न, संसार आशा गोष्टींसाठी त्याला अजून बराच वेळ होता. आणि अजून त्याने वृषालीला प्रपोज देखील केलं नव्हतं. अर्थात तिचं उत्तर काय असेल हे राजेशला माहिती होतं. त्याला फक्त एकच चिंता होती. राजेशचे आईवडील तसे पारंपरिक विचारांचे होते. त्यामुळे अंतर जातीय विवाहाला ते संमती देतील का याबद्दल त्याच्या मनात शंका होती. पण या सर्व गोष्टींसाठी अजून बराच वेळ होता. पहिलं त्याला कॉलेजची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणं गरजेचं होतं. एकदा ग्रॅज्युएट झाला की मग नोकरी. तशी त्याला पोटापाण्यासाठी नोकरी करायची काहीच गरज नव्हती. पण त्यालाच स्वतःला सुरुवातीची काही वर्षतरी नोकरी करायची होती. 

वृषाली कॉलेजात पोहोचली. एवढ्या दिवसांचा आभ्यास आता तील भरून काढायचा होता. अर्थात राजेश मदतीला असल्यामुळे वृषालीला तशी काळजी नव्हती. त्याची शिकवणी सुद्धा पुन्हा सुरू झाली होती. आता परीक्षा तोंडावर आली होती. संदीपचा तर रात्रंदिवस जागून आभ्यास सुरू होता. राजेशला स्वतः पेक्षा वृषालीचीच जास्त काळजी होती. आधीच या आजारपणामुळे तिचा बराच वेळ गेला होता. आणि तसाही राजेश मुळातच जास्त हुशार होता. थोडा वेळ आभ्यास केला तरी त्याला चालायचं. अभ्यासात फार पटापट वेळ जात होता. पाहतापाहत परीक्षेचा पहिला दिवस उजाडला. पहिला पेपर मॅथसचा असल्यामुळे वृषालीला फार टेन्शन आलं होतं. पण राजेशने जेवढा वेळ मिळाला तेवढ्यात तिची चांगली तयारी करवून घेतली होती. त्यामुळे तिला पेपर अपेक्षेपेक्षा चांगला गेला. तसेच पुढचे सर्व पेपर चांगले गेले. राजेश आणि संदीपचा तर प्रश्नच नव्हता. वर्गातल्या पहिल्या चार मुलात त्यांचं नाव असणारच होतं. 

परीक्षा संपताच राजेशच्या वडिलांनी त्याला गावाला बोलावलं. शेतीची कामे सुरू होणार होती. तसे त्यांच्या शेतावर बरेच कामगार होते पण राजेशने पण जरा शेतीकडे लक्ष द्यावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. खरंतर शेतात काम करायला राजेशला फारसं आवडायचं नाही. पण त्याला जबाबदारीची जाणीव होती. तसेच वडिलांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे असं तो समजायचा. आईवडिलांना, गावातल्या मित्रांना भेटून देखील आता बरेच दिवस झाले होते. पण आता महिनाभर तरी वृषालीला भेटता येणार नाही याचीच त्याला खंत होती. त्याने गावाला जायच्या आधी वृषालीची भेट घेतली व तो गाडीत बसला. गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसताच नेहमीप्रमाणे यावेळी देखील त्याचं मन गावात जाऊन पोहोचलं. काही महिन्यांपूर्वी जेव्हा तो असाच घरी गेला होता तेव्हा घडलेल्या चमत्कारिक प्रसंगाची आठवण त्याला झाली. अजूनही बरेच प्रश्न अनुत्तरित होते. 

गाडी गावात पोहोचली. यावेळी संपत राजेशला नेण्यासाठी बसस्टँडवर येऊन थांबला होता. बसमधून उतरताच राजेश संपतच्या मागे बसला. त्याने संपतला विचारलं, “काय संपत काका कसे आहात? आणि घरी सगळं ठीक आहे ना?” “मी एकदम झाक अन घरचे पन एकदम मस्तायत बगा.” संपतने नेहमीप्रमाणेच हसत हसत उत्तर दिलं. थोड्याच वेळात ते वाड्यावर पोहोचले. राजेशची आई दारातच उभी होती. मुलगा येणार म्हणून ती फार खुश होती. तिने दोघांना हातानेच दारात थांबायची खूण केली व आतून ती भाकर घेऊन आली व तिने राजेशची दृष्ट काढली. राजेश येणार म्हणून त्याचे वडील देखील घरीच थांबले होते. राजेशला पाहताच त्यांच्या धीरगंभीर चेहेऱ्यावर किंचित हास्याची लकेर उमटली. त्यांनी राजेशकडे कॉलेज, परिक्षा वगैरेची चौकशी केली. बराच वेळ बापलेकांच्या गप्पा चालू होत्या. मग आईने जेवण तयार असल्याची घोषणा केली व त्यांच्या गप्पा थांबल्या. आज कितीतरी दिवसांनी राजेश आईच्या हातचं खाणार होता. 

जेवण आटोपल्यावर राजेश त्याच्या वडिलांबरोबर शेतावर गेला. त्याच्या वडिलांनी त्याला कामाचं स्वरूप समजावून सांगितलं. आजचा दिवस आराम करून राजेशला उद्यापासून कामाला लागायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश शेतावर पोहोचला. थोडावेळ काम केल्यावर त्याला वृषालीची आठवण आली. त्याने तिला फोन लावला. आपण शेतात काम करत असल्याचं त्याने वृषालीला सांगितलं. तिला फार कौतुक वाटलं व राजेशचा हेवादेखील वाटला. तिचं आत्तापर्यंतचं सारं आयुष्य शहरात गेलं होतं. त्यामुळे तिला शेतीबद्दल फारशी माहिती नव्हती. पण तिच्या मनात ग्रामीण जीवनाबद्दल कुतूहल मात्र होतं. एखादा दिवस तरी एखादया खेड्यात राहण्याची, चुलीवरची गरम गरम पिठलं भाकरी खाण्याची तिला इच्छा होती. 

संध्याकाळ होताच शेतीची कामे संपली व राजेश नदीकडे गेला. सूर्य अस्ताला आला होता. आकाशात सर्वत्र केशरी रंगाची उधळण करणाऱ्या मावळत्या सूर्याच्या गोळ्याकडे पाहून राजेशला फार छान वाटे. संध्याकाळचं हे गूढरम्य वातावरण त्याला आवडायचं आणि मग त्याचं कवीमन जागं व्हायचं. क्षितीजाच्या एका टोकावर सूर्य मावळताच दुसऱ्या टोकावर उगवणाऱ्या चंद्राकडे पाहून मावळणारा सूर्य चंद्राला काय म्हणेल याची तो कल्पना करी-

चंद्रा, या अवकाशावरचं माझं राज्य आता संपलं 

सारं अवकाश तुझ्या शितलतेने भारून टाक

मी पुन्हा येईनच हा अंधकार दूर करायला

आता उद्या भेटूयात याचवेळी, शुभरात्री

अशा काही ओळी राजेशच्या मनात घर करत. मावळत्या सूर्याचा निरोप घेऊन राजेश परत वाड्यावर आला. रात्रीचं जेवण आटोपल्यावर राजेशने बराच वेळ आईबरोबर गप्पा मारल्या. अर्थात सर्वकाही त्याने आईला नाही सांगितलं. वृषालीबद्दल राजेशने एक शब्द देखील काढला नाही. कारण आईची प्रतिक्रिया काय असेल याचा राजेशला अजून अंदाज आला नव्हता. मात्र राजेशने एक असा प्रश्न विचारला जो त्याच्या आईला बिलकुल अपेक्षित नव्हता. राजेश त्याच्या आईला म्हणाला, “आई, आपल्या घराण्यात पूर्वी कोणी अंतरजातीय विवाह केला आहे का?” त्याच्या आईला काय बोलावे तेच कळेना. थोडा विचार करून ती म्हणाली, “नाही, पण तू का विचारतोयस?” “अगं मी आपलं सहज विचारलं, आपल्या घरण्याबद्दल माहिती असावी म्हणून.” राजेशला जे सुचलं ते तो बोलला. यावर त्याची आई काहीच बोलली नाही. राजेशचं धाडस अजुन वाढलं. “आई, अंतरजातीय विवाहबद्दल तुझं काय मत आहे?” त्याने विचारलं. आता मात्र राजेशच्या आईच्या मनात वेगळीच शंका आली. ‘हा अचानक असा का विचारतोय? कुणाच्या प्रेमात तर पडला नाही ना?’ असा विचार तिच्या मनात येऊन गेला. मनात आलेला विचार ती बोलली नाही. “माझं मत काहीका असेना. मला कोण विचारतं या घरात.” असं थोड्या नाराजीच्या सुरात ती बोलली. यावर राजेशने काहीच प्रतिक्रिया न देता तो विषय तिथेच थांबवला.

सकाळी उठून नाष्टा करून शेतात जायचं. दिवसभर शेतात काम करायचं. बरोबर आणलेल्या डब्यातलं दुपारी जेवायचं. संध्याकाळी नदीवर जाऊन सूर्याचं दर्शन घ्यायचं व घरी परतायचं असा राजेशचा रोजचा दिनक्रम ठरला होता. रोज वृषालीला एकदा तरी फोन व्हायचा. पण काहीवेळा फोन लागायचा नाही. मग वृषालीशी बोलणं नाही झालं तर राजेशला खूप उदास वाटायचं. 

पाहतापाहता निकालाचा दिवस उजाडला. राजेश संदीपला फोन लावणार होता तितक्यात वृषालीचा फोन आला. “अभिनंदन” राजेश काही बोलायच्या आतच वृषाली म्हणाली. “तू वर्गात तिसरा आलास.” राजेशला हे अपेक्षितच होतं, त्यामुळे त्याला काही वेगळं वाटलं नाही. “थँक्स. तुझं काय झालं. झालीस का मॅथस मध्ये पास.?” राजेशने विचारलं. “हो झाले एकदाची. मी काही तुझ्यासारखी टॉपर नाही पण मलापण सत्तर टक्के गुण मिळाले.” वृषाली म्हणाली. “अभिनंदन. आता मी आलो की आपण जोरदार पार्टी करूयात.” राजेश म्हणाला. “हो नक्की” एवढं बोलून वृषालीने फोन ठेवला. राजेशच्या फोनवर संदीपचे पाच मिसकॉल दिसत होते. त्याने संदीपला फोन लावला. फोन उचलतात संदीप सुरू झाला, “अरे मित्रा कुठे बिझी होतास! कितीवेळा फोन केला तुला! आपला रिसल्ट आला. अभिनंदन!” “मला कळला रिसल्ट. तुलाही अभिनंदन. कितवा आलास? पहिला की दुसरा?” राजेशने विचारलं. “आता समजलं एवढा वेळ कोणाशी बोलत होतास ते.” संदीप चेष्टेत म्हणाला. “अरे मी पहिला आलो वर्गात.” संदीप पुढे म्हणाला. “अरे वा! घरचे जाम खुश असतील ना?” राजेशने विचारलं. “हो, अजून घरी नाही गेलो, कॉलेजवरच आहे पण फोनवर बोलणं झालं. आता जातो पेढे घेऊन घरी.” संदीप म्हणाला. “बर, आणि माझ्या वहिनीचं काय झालं?” राजेश चिडवण्याच्या सुरात म्हणाला. “कोण रे? अच्छा तिचाही रिसल्ट चांगला लागला. बाकी कधी येतोयस पुण्यात परत?” संदीपने विचारलं. “हा आठवडा गावातच रहायला लागेल. पुढच्या आठवड्यात येईन. बर चल मी फोन ठेवतो. अजून घरी रिसल्ट सांगायचा आहे.” एवढे बोलून राजेशने फोन ठेवला. 

निकालामुळे राजेशच्या घरचे सगळे खूप खुश होते. घरात उत्साहाचं वातावरण होतं. वडील तर एवढे खुश होते की त्यांनी राजेशला नवीन बाईक घेण्याची घोषणा केली. 


X X X X X X


आता पुण्याला परत जाण्याची वेळ आली होती. राजेशने आई-वडिलांचा, संपत काकांचा, सर्व मित्रांचा निरोप घेतला व तो पुण्याच्या बसमध्ये बसला. इतके दिवस घरी राहून परत जाण्याची इच्छा त्याला होत नव्हती. आई-वडिलांची आठवण येणार होती तसेच आईच्या हातच्या जेवणाला तो मुकणार होता. पण जावं तर लागणारच होतं. तसेच वृषालीला आता भेटता येईल या विचाराने तो सुखावला होता. तिला भेटताच इतके दिवस जी गोष्ट तो करू नाही शकला ती तो करणार होता. आपल्या मनातील भावना तो वृषालीसमोर व्यक्त करणार होता. तिचा प्रतिसाद काय असेल याची जरी त्याला कल्पना असली तरी मनात एक प्रकारची धाकधूक होतीच. पण त्या धकधुकीपेक्षाही उत्साह जास्त होता. 

कॉलेज सुरू व्हायला अजून एक आठवडा बाकी होता. वृषालीला प्रपोज कसं करायचं हेच राजेशला समजत नव्हतं. इतर लोक करतात किंवा जसं फिल्ममध्ये दाखवतात तशा रटाळपणे त्याला प्रपोज करायचं नव्हतं. त्याला असं काहीतरी करायचं होतं जे आयुष्यभर दोघांच्याही स्मरणात राहील. पण त्याला काहीच सुचत नव्हतं, शेवटी त्याने रवीला विचारायचं ठरवलं. 

नेहमीप्रमाणे रवी रात्री उशिरा घरी पोहोचला. राजेशला पाहताच तो म्हणाला, “कधी आला गावावरून अन अजून कसाकाय जागा. उद्या कॉलेज नाही का?” “आजच दुपारी पोहचलो. कॉलेज पुढच्या आठवड्यात सुरू होईल.” राजेश रवीला म्हणाला. रवी फ्रेश होऊन आला व राजेशच्या बाजूला बसला. थोड्या वेळानंतर राजेशला म्हणाला, “तुला झोपायचं नाही का?” ”मला तुला काही विचारायचय.” राजेश गंभीर आवाजात म्हणाला. “विचार की मग.” रवी म्हणाला. “तुला मी मागे एका मुलीबद्दल बोललो होतो.” “अच्छा, आता मला समजलं तू एवढा वेळ जागा का ते.” रवी मिश्कीलपणे म्हणाला. “अरे मला पूर्ण सांगू तर दे.” राजेश म्हणाला व पुढे बोलू लागला, “खरंतर मला वृषाली फार आवडते आणि तिलाही मी आवडतो. पण अजूनपर्यंत आम्ही दोघेही याबद्दल एकमेकांशी काहीच बोललो नाहीये.” “अरे मग बिंदास्त बोल. डायरेक्ट जायचं अन बोलायचं, मला तू फार आवडते. अजिबात घाबरायचं नाय.” रवी म्हणाला. “मला तिला प्रपोज करायचंय पण टिपिकल फिल्मी स्टाईलने नाही तर काहीतरी वेगळं करायचंय, जे आमच्या कायम लक्षात राहील. पण काय करावं तेच कळत नाही म्हणून मी तुला विचारतोय. एखादी हटके कल्पना सुचव ना.” राजेशने मनातलं सांगितलं. रवी विचारात मग्न झाला. बराच वेळ विचार करून तो म्हणाला, “तुला काहीतरी वेगळं करायचंय ना? मग एक काम कर. एखादी मस्त रोमँटिक कविता लिही अन तिला पाठव. खाली तुझं नाव नको लिहुस. तीचं जर खरच तुझ्यावर प्रेम असेल तर तिला समजायचं ते समजेल.” “अरे मला कविता सुचतात पण मुद्दाम लिहायला गेलं तर नाही सुचत आणि तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. काहीतरी दुसरं सांग ना.” राजेश म्हणाला. परत थोडा वेळ विचार करून रवी म्हणाला, “मग असं कर, तुझ्या एका मित्राला तिला सांगायला सांग की तुझा जोरदार एक्सिडेंट झालाय. तू म्हणतोस तसं जर तिचं तुझ्यावर प्रेम असेल तर ती धावत येईल. मग ती आली की तुझ्या मनातील भावना बोलून टाक.” “नको रे. एक्सिडेंटवरून आधीच मोठं रामायण झालंय. असं काही नको करायला.” राजेश म्हणाला. “तू मला म्हंटला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून तुला सांगितलं. आता अजुन काय सांगणार.” रवी राजेशला म्हणाला. “ठीक आहे. तरी तूला अजून काही भन्नाट सुचलच तर मला सांग. मी आता झोपतो.” एवढे बोलून राजेश अंथरुणावर आडवा झाला.

राजेश अंथरुणावर बराच वेळ पडून होता. काही केल्या त्याला आज झोप लागत नव्हती. उद्या काय करायचं याचेच विचार त्याच्या मनात येत होते. बराचवेळ विचार केल्यानंतर एक कल्पना राजेशला सुचली व त्याने काय करायचं ते मनोमन ठरवलं.


X X X X X X


सकाळी उठताच राजेशने पटापट आवरलं. आज त्याच्या मनात एक वेगळीच हुरहूर, एक वेगळाच उत्साह संचारला होता. खरंतर कालची निम्मी रात्र तो जागा होता पण थकवा बिलकुल जाणवत नव्हता. संध्याकाळी काय काय करायचं याची त्याने मनात उजळणी केली व वृषालीला फोन लावला. आज संध्याकाळी सहा वाजता टेकडीवर ये, तुला काहीतरी सांगायचंय असं राजेशने वृषालीला सांगितलं व फोन ठेवला. 

राजेश संध्याकाळी साडेपाच वाजताच टेकडीवर पोहोचला. अजून सूर्यास्त व्हायला बराच वेळ होता. उन्हाळ्याच्या दिवसात उगवणाऱ्या रान फुलांनी सारी टेकडी बहरली होती. पांढऱ्या पाकळ्या व पिवळ्या रंगाचे परागकण असलेली ती फुले अतिशय मोहक दिसत होती. राजेशने बरीच फुलं पटापटा खुडली व एका पिशवीत भरली व तो जवळच्या गुहेत गेला. राजेश एकेक फुल एकाखाली एक मांडत होता. पाहता पाहता एकेक अक्षर तयार होऊ लागलं. शेवटचं अक्षर होताच राजेश थोडा मागे सरकला व ती अक्षरे पाहू लागला. त्याच्या मनातील कल्पना सत्यात उतरत होती. राजेश जवळच्याच खडकावर वृषालीची वाट पहात बसला. 

सहा वाजून गेले होते. सूर्य बिंब खाली सरकत होतं. थोड्यावेळाने काही अंतरावरून वृषाली येताना राजेशला दिसली. जांभळ्या रंगाच्या फुलांची नक्षी तिच्या ड्रेसवर होती. त्या ड्रेसमध्ये वृषाली फारच मोहक दिसत होती. ती जशी जवळ येईल तशी राजेशच्या हृदयाची धडधड वाढत होती. वातावरण फार आल्हाददायक होतं. राजेश गुहेतून बाहेर आला व पायवाटेवर थांबला. वृषाली धापा टाकतच तिथे पोहोचली. “सॉरी, मला थोडा उशीर झाला.” वृषाली कसंबसं बोलली. अजूनही तिचा श्वास स्थिर झाला नव्हता. “अगं, थोडा आराम कर मग बोल. चल आपण त्या बाकावर बसूयात.” असे म्हणून राजेश आणि वृषाली टेकडीच्या टोकावरच्या बाकावर बसले. समोरचं दृश्य अतिशय विलोभनीय होतं. सूर्याचा लालभडक गोळा पलीकडच्या डोंगराआड अर्धा बुडाला होता. क्षितिजावर जांभळट केशरी रंगाची झालेली उधळण अवर्णनीय होती. थोडा वेळ दोघेही काहीच बोलले नाहीत. मग वृषालीनेच विचारलं, “आज अचानक इथे का बोलावलस मला?” राजेशने एक दीर्घ श्वास घेतला व तो म्हणाला, “खरंतर काहीतरी सांगायचंय तुला.” “मग बोल ना.” वृषाली म्हणाली. ‘याला नक्की काय सांगायचं असेल?’ वृषालीच्या मनात विचार आला. राजेश बोलू लागला, “वृषाली, मी जेव्हा गावी गेलो होतो, तेव्हा मी शेतात खूप काम केलं. पहिल्यांदा मला फार कंटाळा यायचा पण नंतर ते काम मला आवडायला लागलं.” “हे सांगायला मला एवढ्या लांब बोलावलस!” वृषाली वैतागून म्हणाली. “नाही अजूनपण काही सांगायचंय.” राजेश म्हणाला. “बोल ना.” वृषाली लाडात येऊन म्हणाली. राजेश बोलू लागला, “खरंतर मी ठरवलं होतं की गावी गेल्यावर तिथल्या मित्रांबरोबर कुठेतरी फिरायला जायचं पण कोणालाच वेळ नव्हता. सगळे शेतीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे कुठे जाणं झालंच नाही.” “हे सारं तू फोनवर सुद्धा सांगू शकत होतास.” वृषाली पुन्हा वैतागून म्हणाली. “अगं आजूनपण काही सांगायचंय, ऐकून तर घे.” राजेश म्हणाला व पुढे बोलू लागला, “रिसल्टच्या दिवशी घरचे सगळे एवढे खुश होते, बाबांनी तर मला नवीन बाईक घेण्याची घोषणाच केली.” “वा छान. पण मला असं वाटतंय तुला अजुनही काही सांगायचंय.” वृषाली मिश्कीलपणे म्हणाली. तिला राजेशला नक्की काय सांगायचंय याची कल्पना आली होती. “जे तुझ्या मनात आहे ते बोलून टाक.” ती राजेशला म्हणाली. “खरंतर मला एवढंच बोलायचं होतं. आता थोड्याच वेळात अंधार पडेल आपल्याला निघायला हवं. निघुयात आपण आता.” राजेश अगदी निरागसपणाचा आव आणून बोलला. आता मात्र वृषाली राजेशकडे मारक्या म्हशीसारखी पहात होती. ती काहीतरी बोलणार इतक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला व वृषाली आडोशासाठी गुहेच्या दिशेने चालू लागली. राजेशही तिच्या मागे जाऊ लागला. पावसात भिजू नये म्हणून वृषाली झपाझप पावले टाकत होती. राजेशमात्र अगदी निवांतपणे चालत होता. 

वृषाली गुहेत पोहोचली. तिने मागे पाहिले. राजेश अजूनही निम्म्यापर्यन्त पोहोचला होता. “अरे, येना पटापट. पूर्ण भिजून जाशील.” वृषाली काळजीच्या सुरात म्हणाली. “पाऊस हा भिजायसाठीच असतो. पावसापासून पळायचं नसतं तर मनसोक्त भिजायचं असतं.” राजेश एखाद्या फिल्मचा डॉयलॉग बोलावा तसा म्हणाला. 

राजेश गुहेत पोहोचला तेव्हा सर्वत्र अंधार होता. त्याच्या प्लॅनचा शेवटचा भाग बाकी होता. तो एका खडकावर बसला. समोरच्या खडकावर वृषाली बसली होती. राजेशने खिशातून मोबाईल काढला व मोबाईलचा टॉर्च ऑन केला व वृषालीच्या दिशेने वळवला. वृषाली थंडीने कुडकूडत होती. पावसाचे थेंब तिच्या केसांवरून ओघळत तिच्या गालावर स्थिरावले होते. तीचं हे मोहक रुपतर हृदयात साठवण्यासारखंच होतं. राजेश तर तिच्याकडे पाहतच राहिला. “हे सगळं तुझ्यामुळेच झालं. का बोलावलस मला इथे.” वृषाली चिडून म्हणाली. “अगं, आता मलातरी काय माहीत पाऊस येईल म्हणून.” यावर वृषाली काहीच बोलली नाही. तिच्या मनातला राग अजून उतरला नव्हता. “थोडं सांभाळून बस वृषाली. मी असं ऐकलंय की गुहेमध्ये रात्री सापांचं राज्य असतं.” तिला घाबरवण्यासाठी राजेश म्हणाला. “असं अभद्र का बोलतोयस राजेश! ही काय चेष्टा करायची वेळ आहे का!” वृषाली अजूनच चिडून म्हणाली. “अगं घाबरू नकोस. मी आहे ना आणि मी खरच चेष्टा केली. पाहिजे तर टॉर्च मारून दाखवतो. साप वगैरे काही नाहीयेत इथे.” एवढे बोलून राजेशने टॉर्च वळवला व फुलांची अक्षरे नजरेसमोर आली. वृषालीचं लक्ष तिकडे गेलं. तिने अक्षरे वाचताच तिचा राग कुठल्याकुठे पळाला. आता तिला दुसरं काहीच सुचत नव्हतं. ‘I ❤️ U VRUSHALI' ही अक्षरं तिच्या मनात नाचत होती.

राजेशला जसं हवं होतं तसच सगळं घडलं होतं. राजेशने टॉर्च परत वृषालीच्या दिशेने रोखला. ती जणू एखाद्या वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखी दिसत होती. चेहेऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. नजर राजेशवर खिळली होती. राजेश उठला व वृषालीजवळ गेला. अजूनही तिच्या चेहेऱ्यावरचा आनंद थोडादेखील ओसरला नव्हता. पाऊस अजूनही अव्याहतपणे कोसळत होता. “वृषाली” राजेशने हाक दिली. पण त्याचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचत नव्हते. त्या फुलांच्या जादुई अक्षरांनीच तिचं मन भारलं होतं. अचानक दूरवर मोठा प्रकाश दिसल्यामुळे राजेशचे डोळे चमकले व त्यापाठोपाठ वीज कोसळून झालेल्या आवाजामुळे वृषाली भानावर आली व घाबरून नकळतच तिने राजेशला मिठी मारली. वृषालीची नजर राजेशच्या नजरेला भिडली होती. राजेश काहीतरी बोलणार होता इतक्यात अगदी सहजपणे वृषाली बोलली – आय लव यु टू. आता खुश होण्याची वेळ राजेशची होती. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. आता त्याला वृषाली सोडून इतर काहीच दिसत नव्हतं. ना पावसाच्या धारा, ना कडकडणाऱ्या विजांचा प्रकाश, फक्त आणि फक्त वृषाली! त्याचं भान हरपलं होतं.

दोघांचीही नजर एकमेकांच्या नजरेला भिडली होती. दोघांच्याही मुखातून शब्दच बाहेर निघत नव्हते. त्यांचे डोळेच आता संवाद साधत होते. एखाद्या अलौकिक शक्तीने भारल्यासारखे राजेशचे ओठ वृषालीच्या ओठांजवळ जात होते. अंतर हळूहळू कमी होत होतं आणि अखेरीस राजेशच्या ओठांचा ओलसर स्पर्श वृषालीच्या ओठांना झाला व राजेश भानावर आला. दोघांच्याही गालावर लाली फुलली होती. हळूहळू मिठी सैल झाली. नजाणे कितीवेळ ते एकमेकांच्या मिठीत कैद होते. आता पाऊस पूर्णपणे थांबला होता. रातकिड्यांची किरकिर आणि बेडकांचं ओरडणं सोडलं तर सगळीकडे शांतता होती. दोघेही आता भानावर आले असले तरी हा अनुभव ते जन्मभर विसरणार नव्हते. राजेश आणि वृषाली गुहेतून बाहेर आले. टॉर्चच्या प्रकाशात ते दोघे टेकडी उतरू लागले. पण पूर्णवेळ कोणच काही बोललं नाही. बोलायचं काही बाकी राहीलच नव्हतं.


X X X X X X


कॉलेज पुन्हा सुरू झालं. राजेशचं मात्र कशात लक्षच लागत नव्हतं. तो एका वेगळ्याच विश्वात वावरत होता. वृषालीच्या बाबतीतही तसच काहीसं झालं होतं. टेकडीवरच्या प्रसंगानंतर राजेश आणि वृषाली एकमेकांशी एक शब्ददेखिल बोलले नव्हते. दोघांनाही एकमेकांना पाहताच शरमल्यासारखं व्हायचं व काही न बोलताच ते निघून जायचे. मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. जे घडलं होतं ते फारच सुखद होतं. कॉलेजमधल्या इतर मुलामुलींना देखील त्यांच्यातला हा बदल जाणवला होता. शेवटी संदीपने राजेशला विचारलं, “तुझ्यात आणि वृषालीत काही बिनसलंय का? एकमेकांकडे पाहायला पण तयार नाही तुम्ही.” राजेश काहीच बोलला नाही पण त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले. संदीपने त्याचा मुद्दा सोडला नाही व शेवटी राजेशने सर्वकाही सांगितलं. “अरे, मग तर आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. मी मनालीला सांगतो. तू पण लगेच वृषालीला सांग. आपण रात्री पार्टी करूयात.” संदीप उत्साहात म्हणाला. “हे सगळं आत्ताच करायला हवं का?” राजेश म्हणाला. “अरे लाजतोस काय मुलींसारखा. ते बघ तिथे वृषाली उभी आहे. तिच्यापाशी जा आणि बिंदास्त बोल! का मी बोलू?” “नको मी बोलतो.” राजेश नाईलाजाने म्हणाला. राजेश वृषाली जिथे उभी होती तिथे गेला. तिने राजेशकडे पाहिलं. “वृषाली संदीप म्हणत होता की आज रात्री पार्टी करूयात. तुला जमेल का यायला?” “हो पण कुठे जायचं आपण?” वृषालीने विचारलं. “मी तुला संध्याकाळी कॉल करतो मग आपण ठरवूयात.” राजेश म्हणाला.

कॉलेजमधून घरी पोहोचताच राजेशने वृषालीला फोन लावला. “वृषाली, मनालीने एक हॉटेल सुचवलय डेक्कनजवळ. तिथे फारशी गर्दीही नसते. तुला चालेल का?” राजेशने विचारलं. “हो मला चालेल पण किती वाजता भेटायचं?” “रात्री आठ वाजता भेटुयात. मी तुला पत्ता पाठवतो” “बर” असे म्हणून वृषाली फोन ठेवणार होती तेवढयात राजेश म्हणाला, “थांब वृषाली, मला जरा बोलायचंय” एवढं बोलून राजेश पुढे बोलू लागला, “परवा टेकडीवर जे काही घडलं ते फार छान होतं. त्याबद्दल थँक्स.” “हो मलाही फार छान वाटलं आणि तुला पण थँक्स.” वृषाली म्हणाली व दोघेही हसू लागले. 

राजेश आणि संदीप हॉटेलात पोहोचले. थोड्याच वेळात मनाली आणि वृषलीही पोहोचल्या. जेवता जेवता चौघांच्या अगदी छान गप्पा रंगल्या होत्या. जेवून झाल्यावर राजेशने घड्याळात पाहिले. रात्रीचे दहा वाजले होते. आता निघायला हवं होतं. त्यामुळे त्यांनी गप्पा आवरत्या घेतल्या व चौघेही आपापल्या घरी जायला निघाले. 

टेकडीवरच्या त्या क्षणांची जादू आता हळूहळू राजेश आणि वृषालीवरून उतरत होती. पूर्वीसारखेच ते आता एकमेकांशी मोकळेपणाने वागत, बोलत होते. कॉलेजमध्ये दोघांची भेट रोज व्हायची पण तिथे बोलायला फारसा वेळ मिळत नव्हता व इतर मुलामुलींसमोर मोकळेपणाने बोलताही येत नव्हतं. आज रविवार असल्यामुळे राजेशकडे वेळचवेळ होता. त्याने वृषालीला फोन लावला. “आज काय प्लॅन आहे तुझा?” राजेशने वृषालीला विचारलं. “खूप कंटाळा आलाय. नेमके आईबाबा पण बाहेरगावी गेलेत. येतोस का घरी? मस्त सँडविच बनवते तुझ्यासाठी. मग आपण मुव्ही पाहू.” वृषाली म्हणाली. “ठीक आहे. लगेच येतो. आणि चीझ वगैरे काही आणायच आहे का येताना?” राजेशने उत्साहात विचारलं. “काही नको आणूस. सगळं आहे घरात आणि गाडी जोरात नको चालवू. चल मी फोन ठेवते, बाय.” एवढं बोलून वृषालीने फोन ठेवला. राजेशने घाईतच कसंबसं आवरलं व तो घरातून बाहेर पडला. थोड्याच वेळात राजेश वृषालीच्या घरापाशी पोहोचला. त्याने बेल वाजवली. समोर नाईट गाऊन मधल्या वृषालीला पाहताच तिला मिठी मारायची तीव्र इच्छा त्याला झाली. पण त्याने स्वतःला आवरलं. खरंतर ती नुकतीच झोपेतुन उठून आल्यासारखी दिसत होती. पण तरीसुद्धा ती फार सुंदर दिसत होती. 

राजेशची प्रश्नार्थक नजर पाहून वृषाली म्हणाली, “अरे मी आत्ताच उठले. सकाळी तुझा फोन आला तेव्हा नुकतीच जाग आली होती. पण फ्रेश वाटत नव्हतं. आधीच सर्दीमुळे काही सुचत नव्हतं म्हणून परत झोपले ते आत्ता उठले. मी जरा आवरते तोपर्यंत तू टीव्ही पाहा.” एवढे बोलून ती आत जाणार तेवढ्यात राजेश तिला म्हणाला, “कशाला आवरतेस, अशीच छान दिसतेस!” हे ऐकून वृषाली लाजली व “काहीतरीच काय” असं म्हणून आतल्या खोलीत गेली. 

थोड्यावेळाने आंघोळ आटोपून वृषाली हॉलमध्ये आली. तिच्या एका हातात फोन तर दुसऱ्या हातात टॉवेल होता. ती तिच्या आईशी फोनवरून बोलत होती व दुसऱ्या हातातल्या टॉवेलने ओले केस पुसत होती. राजेशने तिच्याकडे पाहिले व बोटानेच “छान” अशी खूण केली. वृषाली राजेशकडे पाहून हसली. थोड्यावेळाने वृषालीने फोन ठेवला व राजेशला म्हणाली, “ही आईपण ना सारख्या सूचना देत असते. हे करू नकोस, ते करू नकोस, बाहेर जास्त फिरू नकोस. मी काय आता लहान आहे का?” 

“इतकी सुन्दर मुलगी असल्यावर कोणत्याही आईला काळजी वाटणारच.” राजेश मिश्कीलपणे म्हणाला. राजेश आज जरा जास्तच रोमँटिक मूडमध्ये होता. राजेशच्या शब्दांनी वृषाली खुश झाली पण तसे दाखवू न देता विषय बदलून ती म्हणाली, “राजेश, माझी मैत्रीण सांगत होती की शाहरुखची परवाच रिलीज झालेली मुव्ही फारच छान आहे. खाऊन झाल्यावर आपण लगेच निघू.” खरंतर राजेशला शाहरुखच्या मुव्हीज फारशा आवडायच्या नाहीत. पण नाही म्हणायचं त्याचं धाडस नव्हतं. आणि तसही वृषालीच्या सानिध्यात राहायला मिळतय यातच तो खुश होता. वृषालीला सर्दी झाली होती. त्यामुळे खरंतर तिने जरा विश्रांती घेणं गरजेचं होतं. पण आता काही बोललं तरी वृषाली ऐकणार नाही हे राजेशला माहिती होतं. त्यामुळे तो म्हणाला, “जशी आपली आज्ञा राणीसरकार.” 

थोड्याच वेळात खाऊन झाल्यावर ते घराबाहेर पडले. थेटरमध्ये पोहोचताच राजेशने दोन तिकिटे घेतली. वृषाली अतिशय मन लावून मुव्ही पाहात होती. राजेशचं लक्ष मुव्हीपेक्षा वृषालीकडेच जास्त होतं. पाहतापाहता मुव्ही संपली. तिथून ते थेट वृषालीच्या आवडत्या रेस्टॉरंटपाशी पोहोचले. “पुढचा काय प्लॅन आहे?” जेवण आटोपतच राजेशने वृषालीला विचारलं. “तुला कंटाळा नसेल आला तर मला थोडं शॉपिंग करायचंय. जवळच एक नवीन मॉल झालाय तिथे खूप छान ड्रेस मिळतात असं मी ऐकलंय.” वृषाली म्हणाली. “थोडं” या शब्दाला काहीच अर्थ नाही हे राजेशला माहिती होतं. तो “ठीक आहे” एवढंच म्हणाला. पण त्याच्या आवाजात नेहमीसारखा उत्साह नव्हता. हे वृषालीला जाणवलं. “काळजी करू नकोस. इतर मुलींप्रमाणे बॉयफ्रेंडच्या पैशांवर शॉपिंग करणारी मी नाही.” वृषाली म्हणाली. खरंतर राजेशला पैशांचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्याला शॉपिंगचा कंटाळा होता. तसा तो वृषालीबरोबर पहिल्यांदाच शॉपिंगला जात होता. पण त्याने बऱ्याच मित्रांकडून त्यांचे अनुभव ऐकले होते. वृषालीने पैशांवरून असं बोललेलं राजेशला आवडलं नाही. “मी पैशांचा विचार करतो असं तुला का वाटलं.” तो थोडा चिडून म्हणाला. “अरे मला तसं नव्हतं म्हणायचं.” वृषाली म्हणाली. यावर राजेश काहीच न बोलता बाईकवर बसला व त्याने बाईक चालू केली. “तुला कंटाळा आला असेल तर आपण पुन्हा कधीतरी जाऊ.” वृषाली समजावणीच्या सुरात म्हणाली. “बस बाईकवर.” राजेश म्हणाला. त्याच्या मनातला राग केव्हाच निवळला होता. 

थोड्याच वेळात ते मॉलपाशी पोहोचले. मॉलमध्ये पोहोचताच वृषालीने बरेच ड्रेस पाहिले व एक ड्रेस निवडला. चेंजिंग रम मध्ये जाऊन ती ड्रेस चेंज करून आली. “कसा वाटतोय?” तिने राजेशला विचारलं. “छान” राजेश म्हणाला. तिने तो ड्रेस बास्केटमध्ये ठेवला. वृषालीने दुसरा ड्रेस घेतला व ती पुन्हा चेंजिंग रूममध्ये गेली. बाहेर येताच तिने राजेशला विचारलं, “हा कसा वाटतोय?” राजेशचं पुन्हा तेच “छान”. अजून दोन ड्रेस वृषालीने ट्राय केले. पण राजेशची प्रतिक्रिया एकच-छान. शेवटी वैतागून वृषाली राजेशला म्हणाली, “प्रत्येक ड्रेसला छान काय म्हणतोयस. यातला कुठला घेऊ सांग ना.” “तुझ्यावर कुठलाही ड्रेस छानच दिसतो.” राजेश म्हणाला. “तरीपण यातला कोणता घेऊ सांग ना?” वृषालीने पुन्हा विचारलं. “सगळे घे.” राजेश सहजच म्हणाला. वृषालीनेही आज्ञाधारकपणे सगळे ड्रेस बास्केटमध्ये टाकले व ती पेमेंट करायला काउन्टरपाशी गेली. राजेशही तीच्या मागे गेला. तिने बॅगेतून तिची पर्स काढली. पर्समधून ती तिचं कार्ड शोधत होती. एकदाचं कार्ड तिच्या हाताला लागलं. तिने कार्ड काउंटरमागे बसलेल्या मुलीच्या हातात दिलं. पण त्या मुलीने कार्ड वृषालीला परत दिलं व ती म्हणाली, “मॅडम सरांनी ऑलरेडी पेमेंट केलंय.” वृषाली राजेशकडे पाहतच राहिली. राजेश काही नबोलता मॉलमधून बाहेर आला. तो बाईकवर बसला व म्हणाला, “मला फार झोप येतीये. जवळच माझ्या एका मित्राचं कॉफीशॉप आहे. आपण मस्त कॉफी पिऊयात.” “अरे शॉपवर नको आपण माझ्या घरीच कॉफी पिऊयात. माझ्या हातची कॉफी एकदा पिऊन बघ. परत कधी बाहेरची पिणार नाहीस.” वृषाली उत्साहात म्हणाली. “जशी आपली आज्ञा राणीसरकार.” राजेश चेष्टेत म्हणाला. राजेशने बाईक चालू केली व ते दोघे वृषालीच्या घराकडे निघाले. घरी पोहोचताच फ्रेश होऊन कॉफी बनवण्यासाठी वृषाली स्वयंपाकघरात गेली. तिने दुधाचं पातेलं गॅसवर ठेवलं व कपाटात पाहिलं. कॉफी संपली होती. दुसरं पाकीट हॉलमधल्या कपाटात ठेवलं होतं. वृषाली ते पाकीट घेऊन स्वयंपाकघरात आली. तिने गॅस चालू केला. तेवढ्यात तिचा फोन वाजला. फोनच्या नादात ती बर्नर पेटवायला विसरली होती. शेगडीचं बटन तसच चालू होतं. तिला तिच्या एका मैत्रिणीचा कॉल आला होता. फोनवर बोलत ती हॉलमध्ये आली. थोड्यावेळाने अचानक फोन बंद झाला. तिच्या फोनची बॅटरी संपली होती. आपण गॅसवर दूध ठेवलय याची तिला आठवण झाली व ती स्वयंपकघरात गेली. पूर्ण स्वयंपाकघरात गॅस भरला होता. पण वृषालीला सर्दीमुळे वास येत नव्हता. तरीही तिला थोडा वास आल्यामुळे गॅस तसाच चालू राहिलाय हे समजलं व तिने लगेच शेगडीचं बटन बंद केलं. वृषालीने तिथल्याच एका पॉइंटला चार्जर लावला व स्वीच ऑन केला. हीच तिच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली. स्विच ऑन केल्यामुळे हवेत पसरलेला गॅस विद्युतलहरींच्या संपर्कात आला व एका क्षणात मोठा स्फोट झाला. 

राजेश वरच्या खोलीत निवांत कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत होता. स्फोटाच्या प्रचंड आवाजामुळे तो भानावर आला व धावतच खाली गेला. तो स्वयंपाकघराच्या दाराशी आला व समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वयंपाकघराची एक भिंत अर्धी कोसळली होती. एका कोपऱ्यात वृषालीचा अर्धवट जळालेला देह निश्चेष्ट पडला होता. समोर जे होतं ते फक्त निर्जीव शरीर होतं. वृषाली केव्हाच हे जग सोडून गेली होती. समोरचं दृश्य पाहताच राजेशची शुद्ध हरपली. तो जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा डोळे उघडताच त्याला त्याची आई बेडच्या बाजूला बसलेली दिसली. ती राजेशच्या डोक्यावरून हात फिरवत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. राजेश तब्बल दोन दिवसांनी शुद्धीवर आला होता. तो शुद्धीवर येताच त्याच्या आईने डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी अजून थोडे दिवस तरी विश्रांती घ्यायचा सल्ला दिला. काही दिवसांनी पुन्हा तपासणी करून डॉक्टर त्याला डिस्चार्ग देणार होते. 

राजेशच्या मनावर फार मोठा आघात झाला होता. त्याला घडलेलं सर्वकाही आठवत होतं. त्याचं शरीर जरी शुद्धीवर आलं असलं तरी त्याचं मन अजून ताळ्यावर आलं नव्हतं. त्याची लाडकी वृषाली त्याला कायमचं सोडून गेली होती. त्याच्या मनावरची जखम फार खोल होती. ती इतक्या सहजासहजी भरून निघणार नव्हती. 

डॉक्टरांनी डिस्चार्ग देताच राजेश त्याच्या गावी गेला. त्याच्या आईवडिलांना त्याची फार काळजी वाटत होतं. सगळं चांगलं चाललं असताना नियतीने अचानक वेगळं वळण घेतलं होतं. वृषालीच्या आठवणीने राजेशचं मन वारंवार व्याकुळ होत होतं. घरीसुद्धा एरवी भरभरून बोलणार राजेश आता दिवसभर त्याच्या खोलीत बसत होता. तो कोणाशीच बोलत नव्हता. अगदी आईशीसुद्धा नाही. अन्नही तो नुसतं पोटात ढकलत होता. त्याची जगायची इच्छाच हळूहळू मरत चालली होती. या प्रचंड दुःखात त्याच्या उदास मनात उमटणाऱ्या काव्योक्तींवरून त्याच्या मनातील दुःखाचा अंदाज येऊ शकतो.


ज्या पावसात चिंब भिजलो होतो तोच आज नकोसा वाटतोय

तुझी आठवण होताच नकळत कंठ दाटतोय

तुझं दिसणं, तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझं चालणं

सारच एखाद्या गोड स्वप्नासारखं होतं की स्वप्नच होतं?

जर स्वप्नच असेल तर या स्वप्नातच मला जगू दे

जर स्वप्न नसेल तर मी जगून तरी काय करू

विष पिऊन की उडी घेऊन, सांग मी कसा मरू


X X X X X X


वृषालीच्या अकस्मात मुत्यूमुळे राजेश पूर्णपणे खचला होता. अजूनही तो धक्क्यातून बाहेर आला नव्हता. त्याचे आईवडील सुद्धा फार काळजीत होते. संदीप आणि मनालीनेसुद्धा राजेशला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण राजेशवर काहीच परिणाम होत नव्हता. त्याला ते स्वप्न आठवत होतं. काही महिन्यांपूर्वी त्याला जे अभद्र स्वप्न पडलं होतं त्याप्रमाणेच सगळं घडलं होतं. मग ते स्वप्न म्हणजे एक प्रकारची पूर्वसूचनाच होती का? राजेशला काहीच समजत नव्हतं. 

एक दिवस रात्री राजेश त्याच्या खोलीत झोपला होता. खिडकी जोरात आपटल्यामुळे मोठा आवाज झाला व त्या आवाजामुळे राजेशला जाग आली. राजेशने खिडकीच्या दिशेने पाहिलं. एक प्रकाशाचा लालसर गोळा खिडकीतून आत आला. ‘आपण स्वप्नात तर नाही ना’ राजेशच्या मनात विचार आला. त्याने हाताला हळुच चिमटा काढला. हे स्वप्न नव्हतं. राजेश घाबरला. तो प्रकाशाचा गोळा पुढे येऊन राजेशसमोर थांबला. हळूहळू तो प्रकाशाचा गोळा नाहीस झाला व त्याच्या जागी एक मनुष्याकृती प्रकट झाली. राजेशची झोप आता चांगलीच उडाली होती. त्याला ओरडायचं होतं पण तोंडातून शब्दच निघत नव्हते. “घाबरू नकोस” त्या आकृतीच्या तोंडून आवाज आला. “मला माहितीये तू मला ओळखणार नाहीस पण आपण यापूर्वी भेटलोय.” ती आकृती म्हणाली. राजेश वेड्यासारखा पाहात होता. ती आकृती पुढे बोलू लागली, “काही महिन्यांपूर्वी तू तुझ्या मित्रांबरोबर अलिबागला गेला होतास. तिथेच आपली भेट झाली होती, पण आता तुला यातलं काहीच आठवत नसेल.” राजेशने नुसती मान डोलावली. “तिथेच थांब” असे म्हणून ती आकृती राजेशजवळ गेली व तिने आपला एक हात राजेशच्या डोक्यावर थोडा वेळ ठेवला. हात काढताच ती आकृती म्हणाली, “आता तुला सगळं आठवेल.” 

त्या आकृतीने डोक्यावरून हात काढताच मुंबईच्या लोकलमध्ये माणसं चढावीत त्याप्रमाणे राजेशच्या मनात विचारांची गर्दी झाली. आता त्याला सर्वकाही आठवत होतं. राजेश त्याच्या गावी गेला होता. तेव्हा त्याच्या गावातल्या मित्रांचं अलिबागला जायचं ठरलं. राजेशही त्यांच्या बरोबर निघाला. ते सर्वजण सकाळी लवकर निघाले व दुपारी अलिबागला पोहोचले. जेवण वगैरे आटोपून सर्वांनी तिथेच आराम केला. थोडावेळ आराम करून सर्वजण समुद्राच्या पाण्यात उतरले. मित्रांची पाण्यात मस्ती चालू होती. सगळे एकमेकांवर पाणी उडवत होते. राजेश एकटाच बाहेर थांबला होता. त्याला पाण्याची फार भीती वाटायची. सर्वांनी आपले कपडे, पाकीट, मोबाईल, चष्मा ई. साहित्य राजेशजवळ दिलं होतं. 

त्यांचा खेळ बराच वेळ चालू होता. सूर्य आता पूर्ण मावळला होता. एकेकजण बाहेर येत होता. राजेशमात्र पोहत पोहत बराच पुढे गेला होता. गणेशने राजेशला हाक मारली पण राजेशपर्यंत त्याचा आवाज पोहचला नाही. राजेशने मागे वळून पाहिलं. त्याचे मित्र किनाऱ्याकडे जाताना त्याला दिसले. राजेशसुद्धा परत फिरला व किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागला. आता लाटांचा आकार वाढला होता. एखादी मोठी लाट आली की राजेशच्या नाकातोंडात पाणी जात होतं त्यामुळे त्याला पोहणं कठीण होत होतं. अचानक एक प्रचंड आकाराची लाट आली, त्सुनामीच जणू. त्या लाटेच्या प्रचंड वेगामुळे राजेश खोल पाण्यात बुडाला. तो वेगात खाली गेल्यामुळे समुद्राच्या तळाला एका दगडावर आपटला. कपाळावर आपटुन राजेश बेशुद्ध झाला. 

त्या दगडा शेजारीच एक माणूस ध्यानावस्थेत बसला होता. समुद्राच्या तळाशी पाण्याच्या प्रचंड दबावाखाली देखील तो माणूस अतिशय निश्चल, स्थिर होता. तो समाधी आवस्थेत होता. त्याच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता जो शब्दात वर्णन करण्यासारखा नव्हता. राजेश दगडावर आपटताच त्या माणसाला कसलीतरी जाणीव झाली व त्याने डोळे उघडले. समोर राजेशचं शरीर पडलं होतं. त्याच्या कपाळातून रक्त वाहत होतं. राजेशच्या शरीराभोवती वेगवेगळ्या प्रकारचे मासे जमले होते. काही मासे राजेशच्या कपाळावरून वाहणारं रक्त पित होते. राजेशला पाहताच तो माणूस जागचा उठला. त्याने राजेशचा हात पकडला व तो पोहत वर आला. ते किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा सगळीकडे गडद अंधार पसरला होता. अमावस्या असल्याने आकाशात ताऱ्यांची गर्दी झाली होती व ताऱ्यांच्या मंद प्रकाशाने समुद्राचं पाणी चमकत होतं. किनाऱ्यावर ना कोणतं हॉटेल होतं ना कोणी माणूस दिसत होता. किनाऱ्याच्या मागे घनदाट जंगल दिसत होतं.  

राजेश अजून शुद्धीवर आला नव्हता. किनाऱ्यावर पोहोचताच त्या माणसाने राजेशला वाळूत झोपवलं व त्याच्या छातीवर दाब देऊन त्याच्या छातीतलं पाणी काढलं. पण तरीही राजेश शुद्धीवर आला नाही. जवळच एक कापड पडलं होतं. ते उचलून त्याने राजेशच्या जखमेभोवती गुंडाळलं. त्याने आपला हात राजेशच्या डोक्यावर ठेवला व काही क्षणात राजेश शुद्धीवर आला. राजेशला काही कळायच्या आतच त्या माणसाने राजेशच्या तोंडावर हात ठेवला. राजेशला काहीच समजत नव्हतं. अंधारामुळे काहीच दिसत नव्हतं. फक्त एक सावळी आकृती दिसत होती. राजेशचं डोकं प्रचंड ठणकत होतं. पण त्या माणसाने तोंडावर हात ठेवल्यामुळे ओरडताही येईना. त्या माणसाने राजेशच्या डोळ्यांसमोर दुसरा हात धरला व एका विशिष्ट पद्धतीने तो हाताची बोटे हलवू लागला. थोड्याच वेळात राजेशच्या मनातील सर्व विचार थांबले. आता त्याच्या मनात एक वेगळाच आवाज घुमू लागला. त्या आवाजाने राजेशला आज्ञा दिली. “एक शब्दही न बोलता माझ्या मागून ये.” राजेशही मनातच “हो” म्हणाला व उठून उभा राहिला. तो माणूस जंगलाच्या दिशेने चालू लागला. राजेशही त्याच्या मागून चालत होता. ते दोघेही बराच वेळ चालत होते. वाट जंगलातली होती. आजूबाजूला गर्द झाडी होती. रातकिड्यांची किरकिर सतत सुरू होती. थोड्यावेळाने ते एका झोपडीपाशी पोहोचले. त्या माणसाने झोपडीचं दार वाजवलं. एका स्त्रीने दार उघडलं. तो माणूस आत गेला. त्याने राजेशला आत यायची खूण केली. राजेशही आत गेला. कंदिलाच्या उजेडात त्या स्त्रीचा सावळा चेहरा चमकत होता. तिचा पेहेराव एखाद्या आदिवासी स्त्रीप्रमाणे होता. तिचं शरीर अतिशय बांधेसूद, आकर्षक होतं. कंदिलाच्या उजेडात पहिल्यांदाच राजेशला त्या माणसाचा चेहेरा दिसला. तो माणूस देखील सावळा होता. त्याची उंची जेमतेमच होती. पण त्याचं शरीर अतिशय मजबूत दिसत होतं. त्याने केवळ कम्बरेभोवती वस्त्र गुंडाळलं होतं. त्याचं बाकी शरीर पूर्ण उघडं होतं. आत येताच त्याने त्या बाईला काहीतरी सांगितलं. त्याची भाषा मराठीसारखीच होती पण मराठी नव्हती. ती बाईही काहीतरी बोलली आणि जवळच पडलेलं एक फडकं त्या माणसाच्या हातात दिलं. त्या माणसाने ते फडकं राजेशकडे दिलं व तो म्हणाला, “अंग पूस या फडक्याने.” राजेशने फडक्याकडे संशयाने पाहताच तो माणूस म्हणाला, “फडकं स्वच्छ आहे.” राजेशने ओलं अंग त्या फडक्याने पुसलं. त्या माणसाने राजेशला खाली अंथरलेल्या कापडावर बसावयास संगितलं व तो म्हणाला, “थोडा वेळ आराम कर मी चहा घेउन येतो.” तो माणूस आत गेला. चहाचं नाव ऐकून राजेशला नुसत्या विचारानेच तरतरी आली. या अशा ठिकाणी आपल्याला चहा मिळेल असा त्याने विचारच केला नव्हता. 

थोड्या वेळाने तो माणूस एका ताटात दोन मातीची वाडगी घेऊन आला. त्यातलं एक वाडगं त्याने राजेशच्या हातात दिलं व तो म्हणाला, “चहा घे.” राजेशला नुसत्या वासानेच घेरी आली. “वासावरून जाऊ नकोस. चहा पिऊन बघ. एकदा प्यायलास की तुमच्या त्या दुधातल्या चहाचं नावसुद्धा काढणार नाहीस.” तो माणूस राजेशला म्हणाला. राजेशने तोंड वाकडं करतच चहाचा एक घोट घेतला. एका घोटानेच राजेशच्या मनावरची मरगळ नाहीशी झाली. डोकं दुखायचंही कमी झालं. खरंच त्या चहात काहीतरी जादू होती. चवीला थोडा कडवट होता पण तो माणूस म्हणाला ते राजेशला पटलं. 

चहा पिऊन झाल्यावर तो माणूस बोलू लागला, “मला माहितीये तुझ्या मनात आता खूप प्रश्न असतील. पण जरा धीर धर तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील.” राजेशचा चहा पिऊन झाला. त्याने वाडगं ताटात ठेवलं. आता त्याला अतिशय ताजंतवानं वाटत होतं. पण तो माणूस म्हणाल्याप्रमाणे राजेशच्या मनात अनेक प्रश्नांची गर्दी झाली होती. हा माणूस कोण? हा इथे जंगलात का राहतो? आदिवासी म्हणावा तर मराठी इतकं शुद्ध कसं काय बोलतो? हे आणि यासारखे बरेच प्रश्न राजेशला पडले होते पण तो काही बोलला नाही. शेवटी तो माणूसच सांगू लागला, “माझं नाव रिवा. आमच्या भाषेत सूर्याला रिवा म्हणतात म्हणून माझ्या वडिलांनी माझं नाव रिवा ठेवलं” राजेशने नुसती मान डोलावली. रिवा पुढे बोलू लागला, “ही माझी बायको. हिचं नाव जांदी. आमच्या भाषेत जास्वंदीच्या फुलाला जांदी म्हणतात. त्यांमुळे हिचं नाव जांदी.” राजेशने रिवाच्या बाजूलाच बसलेल्या बाईकडे पाहिले. रिवा पुढे सांगू लागला, “तुला आमचे कपडे, आमची राहणी बघून आम्ही एखाद्या आदिवासी जमतीतले लोक वाटत असू. हो, आम्ही आदिवासीच आहोत. पण काही गोष्टींमध्ये आम्ही तुम्हा शहरी लोकांपेक्षा खूप प्रगत आहोत. जसं की आम्ही एकमेकांशी मनातूनच संवाद साधू शकतो. जसं थोड्यावेळापूर्वी मी तुझ्या मनाशी बोलून तुला सूचना दिल्या.” राजेशला आता आठवलं जेव्हा तो शुद्धीवर आला होता तेव्हा त्याच्या मनात काही शब्द उमटले होते त्या शब्दांच्या आज्ञेनुसारच तो रिवाच्या मागे गेला होता. राजेश हे ऐकून अचंबित झाला. आता पर्यंत आशा गोष्टी त्याने पुस्तकात वाचल्या होत्या. आत्ता पहिल्यांदाच तो प्रत्यक्षात अनुभवत होता. “अजूनही बऱ्याच गोष्टी आम्ही करू शकतो ज्याची प्रचिती तुला उद्या येईलच.” रिवा पुढे म्हणाला, “आता तुला हाही प्रश्न पडला असेल की आदिवासी असून पण मी मराठी इतकं चांगलं कसं बोलतो.” राजेशने पुन्हा मान डोलावली. “सांगतो, आमची जी भाषा आहे ती मराठीपासूनच तयार झाली आहे. खरंतर काहीशे वर्षांपूर्वी आमचे पूर्वज मराठीच बोलायचे पण मग आमच्या त्यावेळच्या राजाला असे वाटले की आपली स्वतः ची भाषा असायला पाहिजे. तेव्हा त्याने आमची भाषा तयार केली.” रिवा म्हणाला. “ठीक आहे. आता तू आराम कर. उद्या सकाळी पुन्हा बोलूयात.” एवढे बोलून रिवाने झोपडीचा आतला पडदा सरकवला व तो पलीकडे गेला. राजेशच्या मनातले विचार थांबत नव्हते. त्याला सर्वकाही एखाद्या गूढ स्वप्नाप्रमाणे वाटत होतं. रात्री बऱ्याचवेळाने राजेशला गाढ झोप लागली.

सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने राजेशला जाग आली. चांगलं उजाडलं होतं पण जंगलातल्या दाट झाडीमुळे सूर्याची किरणे कुठेच दिसत नव्हती. राजेश उठून ऊभा राहिला. त्याने झोपडीचा आतला पडदा सरकवला व आत डोकावून पाहिलं. आत कोणीच नव्हतं. एका बाजूला चूल होती. चुलीजवळ मातीची भांडी होती. एका कोपऱ्यात एक लोखंडी पेटी होती. राजेश आत गेला व त्याने हाळूच पेटीचं झाकण उघडलं. पेटीत काही पुस्तके होती. राजेशने वरचं पुस्तक ऊचललं. पुस्तकावर काहीतरी लिहिलं होतं पण वेगळ्याच भाषेत असल्यामुळे राजेशला काही समजलं नाही. त्याने पुस्तकाची पानं उलटली. पानांवरचा मजकूर समजत नव्हता. राजेशने पुस्तक बंद करून परत पेटीत ठेवलं. पेटी बंद केली व तो जाण्यासाठी वळला. समोर रिवा उभा होता. रिवाला असा अचानक समोर उभा पाहून राजेश दचकला. “घाबरू नकोस. मी काहीही करणार नाही.” रिवा शांतपणे म्हणाला. “माणसाच्या मनात उपजतच भीती असते पण जेव्हा त्याला एखाद्या गोष्टींबद्दल कुतूहल वाटतं तेव्हा काही वेळासाठी ही भीती नाहीशी होते.” रिवा एखाद्या तत्वज्ञाच्या आवेशात म्हणाला. रिवाचे विचार ऐकून याला आदिवासी म्हणावं का असा राजेशला प्रश्न पडला. “मला माहिती आहे तुला त्या पुस्तकात नक्की काय लिहिलंय याबद्दल कुतूहल आहे. पण ती भाषा तुला समजत नसल्यामुळे तुला वाचता येत नाहीये. तर सांगतो. ते आमच्या जमातीचं मुख्य पुस्तक आहे. तुम्हा हिंदूंसाठी जशी भगवत गीता तसं आमच्यासाठी हे पुस्तक आहे. आज आम्हाला ज्या काही विद्या, ज्या काही सिद्धी प्राप्त आहेत त्या आम्ही या पुस्तकातूनच शिकलोय.” रिवा सांगत होता. “बरं आता मी आपल्या दोघांसाठी चहा बनवतो.” असे म्हणून रिवाने चहाचं पातेलं चुलीवर ठेवलं.

थोड्यावेळाने चहा पिऊन झाल्यावर रिवा आणि राजेश झोपडीच्या बाहेर आले. आता अंधार थोडा कमी झाला होता. काही सूर्यकिरणे झाडांचा अडथळा पार करून जमिनीपर्यंत पोहोचली होती. झाडांच्या फांद्यांना चुकवत मातीला स्पर्श करण्याची जणू त्यांच्यात स्पर्धा सुरू होती. राजेशने समोर पाहिले. पुढच्या बाजूला वेगवेगळ्या आकाराच्या बऱ्याच छोट्या मोठ्या झोपड्या दिसत होत्या. रिवा आणि जांदी सारखा पोशाख केलेले बरेच स्त्री-पुरुष दिसत होते. काही लहान मुलेही होती. रिवाच्या मागून राजेश चालत होता. वाटेतली माणसं राजेशकडे एखादा एलियन दिसल्याप्रमाणे आश्चर्य आणि कुतूहलाने पाहात होती. त्या सर्व लोकांकडे पाहून राजेशला आपण फार उंच असल्यासारखं वाटत होतं. कारण ती माणसं रिवाप्रमाणेच उंचीला कमी होती. विशेष म्हणजे स्त्रियाही पुरुषांच्या इतक्याच उंच होत्या. सर्व स्त्री-पुरुष अतिशय निरोगी आणि काटक दिसत होते. काही वृध्द पुरुष सोडले तर कोणाच्याच शरीरावर चरबी दिसत नव्हती. सर्वांचा रंगदेखील अगदी एकसारखा सावळा होता. एका माणसाने राजेशचं लक्ष वेधून घेतलं. त्या माणसाचा वेषसुद्धा आदिवासींसारखाच होता. पण तो दिसायला इतर आदिवासींपेक्षा अगदीच वेगळा होता. त्याचा चेहेरा जरी थोडा काळवंडला असला तरी मूळचा गोरा रंग लपत नव्हता. तो राजेशपेक्षाही उंच होता. हा माणूस इथे काय करतोय असा राजेशला प्रश्न पडला. जणू राजेशच्या मनातलं ओळ्खल्याप्रमाणे रिवा म्हणाला, “तो समोरचा माणूस थोडा वेगळा वाटतो ना? हो तो वेगळाच आहे. तो मूळचा आमच्यातला नाही. तुला त्याच्या बद्दल माहिती हवी असेल तर तोच तुला सांगेल. चल आपण त्यालाच विचारू.” असे म्हणून रिवा राजेशला त्या माणसाकडे घेऊन गेला. ज्या आश्चर्याने राजेश त्या माणसाकडे पाहात होता तीतक्याच आश्चर्याने तो माणूस राजेशकडे पाहात होता. रिवाने त्या माणसाला त्याच्या भाषेत काहीतरी सांगितलं. त्या माणसाने राजेशला बसण्याची खूण केली. राजेश समोरच्या दगडावर बसला. तो माणूस बोलू लागला, “माझं नाव मंगेश देसाई. पण मला इथे सगळे गरू नावाने ओळखतात. गरू म्हणजेच मराठीत गोरा.” मंगेश म्हणजेच गरू पुढे सांगू लागला, “आता तुला प्रश्न पडला असेल की मी इथे काय करतोय. तर ऐक, मी पूर्वी एक संशोधक होतो. कॅन्सर पूर्णपणे बरा करण्यासाठी औषध बनवण्याचं माझं स्वप्न होतं. त्यासाठी वेगवेगळ्या दुर्गम भागात जाऊन तिथल्या दुर्मिळ वनस्पती मी गोळा करायचो व त्यावर संशोधन करायचो. माझ्या एका मित्राकडून मी या जंगलाबद्दल ऐकलं होतं. म्हणून काही नवीन मिळतंय का पाहायला मी इथे आलो होतो. गावातल्या लोकांनी मला आडवायचा खूप प्रयत्न केला. बऱ्याच कथा मला ऐकवल्या. इथे भुताटकी आहे, एकदा आत गेलेला माणूस परत येत नाही, वगैरे. पण मी काही त्यांचं ऐकलं नाही. मी इथे एक टेंट टाकुन राहात होतो. पण एक दिवस तीनचार लोकांनी मी झोपलो असतानाच मला उचलला व एका झाडाला बांधून ठेवलं. आशी माणसं मी पहिल्यांदाच पाहात होतो. पण मला का बांधलंय तेच कळत नव्हतं. कदाचित त्यांना माझ्यापासून काहीतरी धोका आहे असं वाटत असेल असा मी विचार केला. मी त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो की मी तुमचा मित्र आहे, मला सोडा पण ते मला सोडायलाच तयार नव्हते आणि त्यांच्यातला कोणी काही बोलतही नव्हता. थोड्या वेळाने एक वयस्कर माणूस तिथे आला आणि त्याने मला “तू इथे का आला आहेस?” असं विचारलं. त्याचं मराठी ऐकून तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं होतं. मी त्याला माझ्या संशोधनाबद्दल सगळं सांगितलं. त्या माणसाने मला लगेच मोकळं केलं. तो माणूस एकाला त्यांच्या भाषेत काहीतरी बोलला. तो दुसरा माणूस एका झोपडीत गेला व थोड्यावेळाने हातात एक मातीचं वाडगं घेऊन आला. “चहा घ्या.” ते वाडगं माझ्या हातात देत तो म्हणाला. त्या वाडग्यातून खूप उग्र वास येत होता. त्यात चहा नव्हताच. वेगळंच लालसर रंगाचं द्रव्य होतं. मला काही ते प्यावसं वाटेना. थोडावेळ मी नुसताच पाहात होतो. त्या माणसाने मला सांगितलं, “एकदा पिऊन तर बघा.” मी नाईलाजाने त्या द्रव्याचा एक घोट घेतला आणि एका घोटातच मला फार ताजतवानं वाटू लागलं. चवीला थोडा कडवट होता पण नक्कीच काहीतरी जादू होती त्या चहात. चहा संपवताच मला जणू हवेत असल्यासारखं वाटत होतं. मी त्या माणसाला चहाबद्दल विचारलं तेव्हा त्याने मला सांगितलं की हा औषधी वनस्पतींपासून बनवलेला चहा आहे. पुढे तो मला म्हणाला की या जंगलात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती आहेत. आमच्या पूर्वजांनी फार वर्षांपूर्वीपासून संशोधन केलं आहे. तुम्ही दोन दिवस इथे राहिलात तर तुम्हाला अजून बरच काही पाहता येईल. मी इथे अजून दोनचार दिवस राहायचं ठरवलं. त्या दोन दिवसात मी जे काही पाहिलं जे काही अनुभवलं ते खरच फार अद्भुत होतं. तेव्हापासून म्हणजेच दोन वर्षांपासून मी इथेच राहतोय.”

आता राजेशचं कुतूहल चांगलंच वाढलं होतं. राजेशने गरूला विचारलं, “तुम्हाला दोन वर्षात इथे काय अनुभव आले मला सांगाल का?” “मी सांगण्यापेक्षा तूच थोडे दिवस इथे रहा आणि स्वतः च अनुभव घे.” गरू म्हणाला. राजेशलाही ते पटलं. “तुम्ही म्हणालात की तुम्ही इथे दोन वर्षांपासून राहताय. मग तुमच्या घरच्यांनी तुम्हाला किती शोधलं असेल.” राजेशने गरूला विचारलं. “जवळचं असं मला कोणीच नाही. आईवडील दोघेही मी लहान असतानाच आजारपणामुळे वारले. घरची परिस्थिती बेताची होती त्यामुळे उपचारासाठी पैसे नव्हते. मी लग्न केलं नाही त्यामुळे बायकोमुलांचाही प्रश्न नाही.” गरू राजेशला म्हणाला. 

स्वतःच्या कुटुंबाबद्दल मात्र राजेश पूर्णपणे विसरला होता. त्या वातावरणातच जादू होती. त्याचं मन एका वेगळ्याच गूढ शक्तीने व्यापलं होतं. राजेशने अजून काही दिवस तिथे राहायचं ठरवलं. गरूचा निरोप घेऊन रिवा आणि राजेश एका मोठ्या झोपडीपाशी पोहोचले. “इथे आमच्या जमातीचे प्रमुख राहतात.” रिवा म्हणाला. रिवा झोपडीत गेला व थोड्या वेळाने बाहेर आला. त्याच्या मागून एक वृद्ध माणूस बाहेर आला. रिवाने त्यांच्या भाषेत त्या माणसाला काहीतरी सांगितलं. त्या माणसाने राजेशकडे पाहिले व तो म्हणाला, “आमच्या वस्तीत तुझं स्वागत आहे. आता थोडे दिवस राहूनच जा. इथलं जग बाहेरच्या जगापेक्षा फार वेगळं आहे.” “हो मी नक्की राहीन.” राजेश म्हणाला. तिथून थोडे पुढे गेल्यावर रिवा राजेशला म्हणाला, “तुला आता भूक लागली असेल ना? हे पान खा.” असे म्हणून रिवाने जवळच एक पिवळ्या रंगाची पानं असलेल्या झाडाचं एक पान तोडलं व राजेशच्या हातावर ठेवलं. “हे कसलं पान आहे?” राजेशने विचारलं. “अरे खाऊन तर बघ.” रिवा म्हणाला. राजेशने पान तोंडात टाकलं व तो ते चावू लागला. वरून जरी कोरडं वाटत असलं तरी आतून ते पान रसरशीत होतं. जसा जसा त्या पानाचा रस राजेशच्या पोटात जात होता तसं राजेशला पोट भरल्यासारखं वाटत होतं. पूर्ण पान खाऊन झाल्यावर तर राजेशने चक्क ढेकर दिली. पूर्ण ताट भरून जेवल्याप्रमाणे राजेशचं पोट भरलं होतं. त्याने रिवाकडे आश्चर्याने पाहीलं. “हे पान तर फार छोटी गोष्ट आहे, अजून बरच काही पाहायचं आहे तुला.” रिवा राजेशला म्हणाला. 

थोडं पुढें जाताच समोरचं दृश्य पाहताच राजेशचे पाय अचानक थांबले. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. समोर एका झाडाखाली एक मोठा वाघ बसला होता. दोन लहान मुलं त्या वाघाशी खेळत होती. वाघाची शेपटी ओढ, त्याच्या पाठीवर बस असे त्यांचे रानटी खेळ सुरू होते. आता मात्र राजेश खरच घाबरला. रिवा त्या वाघाजवळ गेला व त्याने वाघाच्या डोक्यावरून हात फिरवला. रिवाने वाघासमोर हात धरला. एखाद्या पाळीव कुत्र्याप्रमाणे त्या वाघाने अतिशय लाडीकपणे आपला भव्य पंजा अलगद रिवाच्या छोट्या हातावर ठेवला. आता वाघाच्या डोळ्यात मैत्रीपूर्ण भाव दिसत होते. हे सर्व पाहून राजेश जागीच थिजला होता. “अरे ये ना इकडे. तो काहीही करणार नाही तुला.” रिवा राजेशला म्हणाला. पण काही केल्या राजेशचे पाय जागचे हालेनात. तेव्हा रिवाने वाघाच्या गळ्याला कुरवाळले व त्यांच्या भाषेत काहीतरी बोलला. तसा वाघ जागेवरून उठला. रिवा राजेशजवळ आला. वाघही रिवाच्या मागे गेला. “लाव हात काहीही करणार नाही तो तुला आणि अशी संधी पुन्हा मिळणार नाही तुला.” रिवा म्हणाला. रिवाच्या बोलण्याचा राजेशवर परिणाम झाला व तो घाबरतच वाघाजवळ गेला. त्याने हळूहळू एक हात वाघाच्या डोक्याजवळ न्हेला व डोक्यावरून अलगद हात फिरवला. तसं ते उमदे जनावर लाडात आलं व राजेशला घासू लागलं. राजेशच्या मनातली भीती आता कुठल्याकुठे पळाली होती. 

रिवाने सांगताच वाघ राजेशपासून दूर गेला व पुन्हा त्या झाडाखाली बसला. रिवा आणि राजेश पुढे चालू लागले. “तुला फार आश्चर्य वाटलं असेल ना वाघाला असा शांत बसलेला, लाडात आलेला पाहून? खरंतर हे वन्यजीव आपण समजतो तेवढेही क्रूर नसतात रे. तेही प्रेमाचे भुकेले असतात.” रिवा राजेशला म्हणाला. थोड्यावेळाने ते परत रिवाच्या झोपडीपाशी पोहोचले. झोपडीत पोहोचताच राजेशने रिवाला विचारलं, “तुम्ही लोक टीव्ही, मोबाईल काहीच वापरत नाही. मग तुमचा वेळ कसा जातो?” “आम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहतो आणि निसर्गालाच देव मानतो. इथे राहिल्यावर वेळ कसा जातो कळतच नाही. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी आम्हाला टीव्ही, मोबाईलसारख्या कृत्रिम साधनांची गरजच नाही.” रिवा राजेशला म्हणाला. 


X X X X X X


राजेशला तिथे राहून आता आठ दिवस झाले होते. विशेष म्हणजे या आठ दिवसात त्याला आई-वडिलांची, मित्रांची आठवण एकदाही आली नव्हती. तो एका वेगळ्याच मानसिक अवस्थेत वावरत होता. इतक्या दिवसात त्याला त्या जमातीतील माणसांकडे असलेल्या वेगवेगळ्या अद्भुत शक्तींबद्दल समजलं होतं. काही शक्तींचा तर प्रत्यक्ष अनुभव देखील आला होता. लहान पणापासूनच राजेशला एका गोष्टीबद्दल जाणून घ्यायची फार इच्छा होती. ती गोष्ट म्हणजे भविष्य. एक दिवस त्याने रिवाला विचारलं, “तुम्हा लोकांना इतक्या वेगवेगळ्या सिद्धी अवगत आहेत. मग तुम्हाला भविष्यात काय होणार आहे हे सांगता येतं का?” “हो, भविष्यात काय होणार आहे हे मी पाहु शकतो.” रिवा सहजपणे म्हणाला. राजेश काहीतरी बोलणार होता तेवढ्यात एक माणूस धावतच झोपडीत आला. तो त्यांच्या भाषेत रिवाला काहीतरी म्हणाला. “आमच्या प्रमुखाने तातडीने सर्वाना बोलावलंय. मी थोड्यावेळात परत येतो. तू इथेच थांब.” एवढे बोलून रिवा झोपडीतुन बाहेर पडला. थोड्यावेळाने रिवा परत आला. चेहेऱ्यावरून तो फार चिडलेला दिसत होता. तो रागातच राजेशला म्हणाला, “तुम्ही शहरातले लोक समजता काय स्वतःला. हे जग काय तुमच्या बापाचं आहे काय! निसर्गाची हानी करण्याचा आधीकार दिला कोणी तुम्हाला.” “तुम्ही जरा शांत व्हा आणि काय झालंय मला सविस्तर सांगा.” राजेश रिवाला म्हणाला. रिवा आत जाऊन माठातलं पाणी प्यायला व थोडा शांत झाला. तो बाहेर आला व बोलू लागला, “आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतल्या एका उद्योगपतीला आमच्या जंगलाच्या जागेवर मोठं हॉटेल बांधायचं आहे. त्यासाठी पाहणी करायला तो गावात आलाय. गावातल्या लोकांनी त्याला बरच समजावलं की ही जागा शापित आहे, इथे भुताटकी आहे, पण तो काही ऐकायला तयार नाही. कोणा मंत्र्याच्या नात्यातला हा माणूस आहे. त्यामुळे त्याला वरून मंजुरीही मिळाली आहे.” राजेशलाही अशा राजकारण्यांचा पहिल्यापासूनच राग होता आणि अश्याप्रकारे निसर्गाची हानी करून आपण निसर्गाचच नाही तर स्वतःचही नुकसान करतोय असं राजेशचं स्पष्ट मत होतं. “मग आता तुम्ही काय करणार आहात?” त्याने रिवाला विचारलं. “आम्ही पहिलं त्याला समजावणार पण तरीही नाही ऐकलं तर त्याचं काही खरं नाही.” रिवा म्हणाला. 


X X X X X X


जगदीश यादव हॉटेलमधून बाहेर पडले. सकाळची वेळ होती. जंगलाची पाहणी करण्यासाठी ते निघाले. बोटीत त्यांच्याबरोबर आणखी चार माणसं होती. त्यांनी गावातील लोकांनाही खूप आग्रह केला पण कोणीही यायला तयार झालं नाही. बोटीने ते पलीकडच्या बाजूला गेले. समोर दाट जंगल एखाद्या राक्षसासारखं दिसत होतं. जगदीश बोटीतून उतरले व जंगलाच्या दिशेने जाऊ लागले. त्यांची पूर्ण देहबोलीच एखाद्या माजलेल्या रेड्यासारखी होती. चालण्यात तोरा होता. चेहेऱ्यावर मग्रुरी होती. बोटीतील दोन माणसं त्यांच्याबरोबर चालू लागली. दोन जण बोटीतच थांबले. बरच पुढं गेल्यावर त्यांना एका बाजूला ओळीने बांधलेल्या झोपड्या दिसल्या. रिवा त्याच्या झोपडीच्या दारातच बसला होता. त्याने जगदीश यादवला समोरून जाताना पाहिले. तो एकटा असता तर त्याला पकडतापण आलं असतं. पण मागून दोन धिप्पाड माणसांना येताना पाहून रिवाचा विचार बदलला. आत्ताच घाई करण्यात काहीच अर्थ नव्हता. थोड्यावेळाने जगदीश परत फीरला व बोटीत बसून हॉटेलपाशी पोहोचला. त्याला ही जागा फार आवडली होती. तिथे एक भव्य रिसॉर्ट तो बनवणार होता.

रात्रीचं जेवण झाल्यावर जगदीश एक फेरफटका मारावा या विचाराने हॉटेलमधून बाहेर आला. त्याने सिगारेट शिलगावली व सिगारेट ओढतच तो येरझाऱ्या मारू लागला. रिवा त्याच्या तीन सहकाऱ्यांसह हॉटेलच्या मागच्या बाजूला झाडीत लपून बसला होता. राजेशही त्याच्या बरोबर होता. खरंतर रिवा राजेशला बरोबर न्ह्यायला आधी तयार नव्हता पण राजेश हट्टाला पेटला तेव्हा रिवाचा नाईलाज झाला. समोर येरझाऱ्या घालणाऱ्या जगदिशला पाहताच रिवा त्याच्या साथीदारांना काहीतरी बोलला. जगदीश एकटाच होता व जवळपास कोणीच दिसत नव्हतं. त्यामुळे रिवासाठी ही चांगली संधी होती. थोड्या वेळाने जगदीशने अर्धी जळालेली सिगारेट पायाखाली चिरडली व तो हॉटेलच्या दिशेने चालू लागला. इतक्यात रिवा हलक्या पावलांनी अतिशय चपळाईने त्याच्या मागे गेला व त्याने जगदीशच्या मानेत एक तार खुपसली. एका क्षणात जगदीश बेशुद्ध झाला. रिवाने त्याच्या सहकार्यांना हाताच्या खुणेने बोलावले. सर्वांनी जगदीशला उचलले व होडीत टाकले. होडी पलीकडच्या किनाऱ्याला लागली. सर्वांनी मिळून जगदीशला उचलले व ते त्याला त्यांच्या प्रमुखाच्या झोपडीत घेऊन आले. 

जगदीश जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याला एका झाडाला बांधलं होतं. त्याच्यासमोर अनेक सावळ्या रंगाची, बुटकी, तोकड्या कपड्यातील माणसं उभी होती. त्यांच्यातील एक वयस्कर व थोड्या स्थूल बांध्याचा माणूस पुढे आला व म्हणाला, “तुम्हाला आम्ही का बांधलंय हे माहितिये का तुम्हाला?” जगदीश संतापला होता. तो म्हणाला, “तुम्हाला माहितीये का मी कोण आहे? तुमची लायकी तरी आहे का माझ्याशी बोलायची.” अजूनही जगदीशचा माज उतरला नव्हता. “आमच्या दिसण्यावरून आणि कपड्यांवरून जाऊ नकोस. हे जंगल हा निसर्ग आम्हाला मातेसमान आहे. या जंगलातल्या एका जरी झाडाला तू हात जरी लावलास तर तुझी चामडी उचकटून टाकीन.” प्रमुख आता चांगलाच तापला होता. “अरे झाड काय आता अक्ख जंगलच संपवणार आहे मी. आता इथे माझं रिसॉर्ट उभं राहिलं.” जगदीश कुत्सितपणे म्हणाला. अजूनही त्याला आपण किती खोलात फसलोय याची जाणीव झाली नव्हती. आता मात्र प्रमुखाचा संयम सुटला. त्याने आदेश देताच दोन जण पुढे आले व त्यांनी दोरी सोडली व जगदीशला पकडला. जगदीश स्वतः ला त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी पूर्ण जोर लावत होता पण त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. ते दोघे दिसायला जरी छोटे असले तरी त्यांच्यात प्रचंड ताकद होती. त्यांनी जगदीशला प्रमुखासमोर उभा केला. जगदीश प्रमुखाकडे रागाने पाहात होता. प्रमुखाने त्यादोघांना त्यांच्या भाषेत काहीतरी सांगितलं. ते दोघे जगदीशला घेऊन प्रमुखाच्या मागे चालू लागले. त्यांच्या मागे अक्खी जमातच चालत होती. राजेशही त्यांच्यामागून चालत होता. पुढे काय होणार हे जाणून घ्यायची त्याला उत्सुकता होती.

थोड्यावेळाने ते एका झाडासमोर थांबले. समोरचं दृश्य पाहून जगदीशचा सगळा माज उतरला. त्याचं पूर्ण शरीर भीतीने थरथर कापू लागलं. समोर एक मोठं झाड होतं. त्या झाडाखाली वाघ बसला होता. वाघाला पाहताच जगदीशची भीतीने गाळण उडाली. तो आता गयावया करू लागला. “सोडा, मला जाऊद्या” असं ओरडू लागला. वाघ समोर येताच त्याचं मांजर झालं होतं. वाघ शांतपणे झोपला होता. प्रमुखाने हातातल्या काठीने वाघाला हळूच टोचलं. तसा वाघ जागा झाला व गुरगुरु लागला. प्रमुखाने एक वेगळाच आवाज काढला व वाघ गुरुगुरायचा थांबला. वाघ समोर उभ्या असलेल्या जगदीशकडे रोखून पाहात होता. आता तर भीतीने जगदीशच्या तोंडून शब्दच निघत नव्हते. प्रमुखाने पुन्हा एक विचित्र आवाज केला. आता वाघ जागचा उठला व जगदीशच्या दिशेने जाऊ लागला. त्याची भेदक नजर अजूनही जगदीशवरच स्थिरावली होती. त्या दोघांनी आता जगदीशचे हात सोडले. जगदीशचं हृदय वाऱ्याच्या वेगाने धडधडत होतं. तो वाघ आता जगदीशच्या पायापाशी गेला व जगदीशला चाटु लागला. जगदीश आता फक्त वेडा व्हायचा बाकी होता. “बघितलस किती प्रेमळ जनावर आहे ते, पण तुला त्याचं खरं रूप पाहायचं असेल तर सांग. माझं सगळं ऐकतो तो.” प्रमुख म्हणाला. जगदीशच्या तोंडून शब्दच निघेनात, त्याने फक्त मान हलवली. प्रमुखाने परत एक वेगळा आवाज काढताच वाघ मागे फिरला व परत झाडाखाली जाऊन बसला. “आता पळ इथून.” प्रमुख जगदीशला म्हणाला. एक क्षणाचाही विलंब न करता जगदीश किनाऱ्याच्या दिशेने पळाला. त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. तो कसाबसा किनाऱ्यापर्यंत पोहोचला व तिथेच कोसळला. 

प्रमुख किनाऱ्यावर आला. जगदीशच्या डोक्यावर हात ठेवून त्याने जगदीशला शुद्धीवर आणलं. त्याच्याकडे पाहण्याचंही जगदीशला धाडस होत नव्हतं. प्रमुखाने जगदीशच्या डोळ्यांसमोर हात धरला व तो त्याची बोटं एका विशिष्ट पद्धतीने हलवू लागला. जगदीशच्या मनात आवाज घुमू लागला- “आज तुला मिळालेला धडा पुरेसा आहे अशी मी अपेक्षा करतो. परत इथे दिसलास तर काय करीन हे सांगायची गरज नाही. आज जे काही घडलं ते तू विसरशील आणि परत जंगलाचा विचारसुद्धा करणार नाहीस.” प्रमुखामागून आलेल्या चार जणांनी जगदीशला उचललं व होडीत टाकलं. होडी हॉटेलसमोर येऊन थांबली. मध्यरात्र झाली होती त्यामुळे किनारा सुनसान दिसत होता. चौघांनी जगदीशला उचललं व हॉटेलसमोर टाकलं व ते होडीने पुन्हा पलीकडे पोहोचले.


X X X X X X


राजेशने जे काही पाहिलं होतं ते खरच अद्भुत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याने पुन्हा भविष्याचा विषय रिवासमोर काढला. पण रिवा त्याला म्हणाला, “मी कुणाचंही भविष्य पाहू शकतो पण कोणाला त्याचं भविष्य सांगत नाही. जे भविष्यात घडणार आहे त्याचा विचार करण्यापेक्षा आजचा क्षण आनंदाने जगावा असं मी मानतो. त्यामुळे एखाद्याचं भविष्य सांगून त्याला चिंतेत टाकणं किंवा खुश करणं, दोनीही मला योग्य वाटत नाही.” काहीकेल्या रिवा आपलं भविष्य सांगत नाही हे पाहून राजेश थोडा नाराज झाला. तेव्हा रिवा त्याला म्हणाला, “मी काही झालं तरी तुला तुझं भविष्य सांगणार नाही. पण जर तुलाच तुझं भविष्य पाहता आलं तर?” “म्हणजे?” राजेशने काही न समजून विचारलं. “म्हणजे असं की आमच्या ग्रंथात एक विधी सांगितलाय, तो जर केला तर माणसाला स्वतःचं भविष्य दिसतं. भविष्य म्हणजे पूर्ण भविष्य नाही तर भविष्यात घडणाऱ्या काही घटना त्याला आधीच दिसतात. तुझी इच्छा असेल तर मी तुझ्यासाठी तो विधी करेन. पण त्यासाठी तुला पौर्णिमेपर्यंत इथे थांबावं लागेल.” रिवा राजेशला म्हणाला. “चालेल. माझी तयारी आहे थांबायची.” राजेश खुश होऊन म्हणाला. 

चारच दिवसांनी पौर्णिमा होती. त्यामुळे राजेशला अजून चार दिवस तिथेच थांबावं लागणार होतं. त्या रात्री राजेश झोपला असताना लोकांच्या ओरडण्याच्या आवाजाने त्याला जाग आली. रिवालाही जाग आली. एक माणूस झोपडीत आला व त्याने रिवाला काहीतरी सांगितलं. राजेशने रिवाला विचारलं तेव्हा तो सांगू लागला, “चिदुचा आठ वर्षांचा मुलगा अचानक तापाने मेला. त्याचा अंत्यविधी करणार आहेत. त्यासाठी मला बोलावलंय.” राजेशने झोपडीच्या बाहेर पाहिलं. बाहेर तिरडीवर एका लहान मुलाचं प्रेत ठेवलं होतं. चार जणांनी तिरडी खांद्यावर घेतली होती व त्यांच्यासमोर माणसं चक्क आनंदाने नाचत होती. एवढंच नाही तर त्या मुलाचा बापदेखील नाचत होता. “हा काय विचित्र प्रकार आहे?” राजेशने रिवाला विचारलं. रिवा म्हणाला, “मरण हा शेवट नसून एक नवी सुरुवात आहे असं आम्ही मानतो. त्यामुळे कोणाच्याही मारणाचं दुःख न मानता उलट आम्ही ते एखाद्या सणाप्रमाणे साजरं करतो.” हे मात्र राजेशला फारच विचित्र वाटत होतं. आता रिवाही बाहेर जाऊन त्या लोकांबरोबर नाचू लागला. त्याने राजेशलाही बोलावलं पण राजेशची इच्छा होईना त्यामुळे राजेश झोपडीतच थांबला. 

दिवस पटापटा पळत होते. पाहतापाहता पौर्णिमेची रात्र आली. वर आकाशात चंद्र झाडाच्या फांदीतून लटकणाऱ्या एखाद्या टपोऱ्या फळासारखा दिसत होता. विधीची वेळ झाली होती. रिवा आणि राजेश झोपडीतून बाहेर आले. राजेश रिवाच्या मागून चालत होता. बराच वेळ चालल्यावर ते एका मोठ्या झाडापाशी आले. रिवाने एका वाडग्यात पाणी घेतलं व त्या झाडाची दोन लाल रंगाची पानं खुडली. ती पानं त्याने वाडग्यातल्या पाण्यात कुस्करली. ते वाडगं हातात घेऊन रिवा व राजेश पुढे चालू लागले. बराच वेळ चालल्यावर जंगल संपलं व ते एका छोट्या टेकडीवर पोहोचले. रिवाने ते वाडगं राजेशच्या हातात दिलं व राजेशला ते चंद्राच्या दिशेने धरायला सांगितलं जेणेकरून चंद्राचा प्रकाश त्या वाडग्यातल्या पाण्यावर पडला पाहिजे. आता रिवाने मन्त्र म्हणायला सुरुवात केली व ते मन्त्र राजेशला म्हणायला सांगितले. रिवा एक ओळ म्हणत होता व त्याच्यानंतर तीच ओळ पुन्हा राजेश म्हणत होता. थोड्याच वेळात सगळे मन्त्र म्हणून झाले. रिवाने ते पाणी राजेशला प्यायला सांगितलं. तो राजेशला म्हणाला, “या पाण्याची चव चांगली नाही. कदाचित तुला उलटी करावीशी वाटेल पण हे पाणी पूर्णपणे तुझ्या पोटात गेल्याशिवाय हा विधी पूर्ण होणार नाही.” त्या पाण्याला अतिशय कुबट वास येत होता. राजेशने नाक दाबून एका घोटात सगळं पाणी घशाखाली उतरवलं. विधी पूर्ण झाला होता. दोघेही परत झोपडीत येऊन झोपले. सकाळी उठताच रिवा राजेशला म्हणाला, “आता तुला परत जायला हवं. तू कुठल्या गावावरून आला होतास?” राजेशला काहीच आठवत नव्हतं. खूप विचार करून देखील त्याला आठवेना. शेवटी तो म्हणाला, “मला काहीच आठवत नाही.” “काळजी करू नकोस. या जागेचीच ती जादू आहे. तुला इथून दूर गेल्यावर आपोआप सर्व आठवेल.” रिवा राजेशला म्हणाला. “खरंतर इथून पाय निघत नाही पण मला जायलाच हवं.” राजेश म्हणाला. “हो मला माहितीये. गरू तुझ्याबरोबर येईल. इथून पुण्यात जाण्यासाठी रात्री एक बस निघते. गरू तुला पुण्याच्या बसमध्ये बसवेल. मग तिथून तुला पाहिजे तिथे तू जा.” रिवा राजेशला म्हणाला. “पण बसच्या तिकिटासाठी पैसे लागतील. माझ्याकडे तर एक रुपयादेखील नाही. हे अंगावरचे कपडे पण गरूने दिलेत.” राजेशने मनातील शंका बोलून दाखवली. “पैशांची काळजी तू करू नकोस. ते गरू बघेल.” रिवा म्हणाला. 

राजेशने रिवाचा व जमातीतील इतर लोकांचा निरोप घेतला व तो तिथून निघाला. तो आणि गरू होडीत बसले. रिवा किनाऱ्यावरच उभा होता. पंधरा दिवसात राजेश आणि रिवाची चांगली मैत्री जमली होती. त्यामुळे निघताना राजेशला फार उदास वाटत होतं. होडी पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचली. राजेश आणि गरू होडीतून उतरले. “मला माहितीये, तू खूप चांगला मुलगा आहेस. पण इथे तू खूप काही गोष्टी पाहील्या, अनुभवल्या आहेस. त्या जर बाहेर पसरल्या तर ते जमातीसाठी चांगलं होणार नाही. त्यामुळे मला तुझ्या मनातून इथल्या आठवणी पुसाव्या लागतील. काळजी करू नकोस, तुला काही सुद्धा त्रास होणार नाही. फक्त माझ्या बोटांकडे पाहा.” असे म्हणून गरू राजेशच्या डोळ्यांसमोर एका विशिष्ट पद्धतीने बोटं फिरवू लागला. थोड्याच वेळात राजेशच्या मनात गरूचा आवाज घुमू लागला – “थोड्याच वेळात तू पुण्याच्या बसमध्ये बसशील. पुण्यात बसस्टँडला पोहोचल्यावर तिथेच झोपशील. सकाळी उठल्यावर तुझ्या मनातील मागच्या पंधरा दिवसातल्या आठवणी नाहीश्या झालेल्या असतील व त्यापूर्वीच्या सर्व आठवणी परत येतील. तू अलिबागला आला होतास हेही तू विसरशील. आता माझ्याबरोबर चल.” आवाज बंद झाला. राजेश गरुच्या मागे चालू लागला. थोड्याच वेळात ते बसस्टँडपाशी पोहोचले. रात्रीचे सात वाजले होते. गरुने राजेशच्या खिशात पैश्याचा नोटा ठेवल्या. पुण्याची बस येताच राजेशने गरुचा निरोप घेतला व तो बसमध्ये बसला. 

मध्यरात्री राजेश स्वारगेटला पोहोचला. त्याच्या मनातले बाकीचे विचार पूर्ण थांबले होते. गरुचा आवाज पुन्हा राजेशच्या मनात घुमला – पुण्यात बसस्टँडला पोहोचल्यावर तिथेच झोपशील. राजेश एका बाकावर पहुडला. काही क्षणातच त्याला गाढ झोप लागली. सकाळी जेव्हा राजेशला जाग आली तेव्हा अलिबाग, जंगल, रिवा, गरू यातलं काहीसुद्धा त्याला आठवत नव्हतं. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न होता – आपण इथे का झोपलो होतो?


X X X X X X


राजेशला आता सर्वकाही आठवत होतं. अलिबागची ट्रिप, ते अद्भुतरम्य जंगल, जंगलात राहणारे आदिवासी, रिवा, गरू, वाघ आणि अगदी जगदीश यादव सुद्धा. “मला माहितीये तुला वृषालीची फार आठवण येते.” रिवा राजेशला म्हणाला. एवढा वेळ जुन्या आठवणींमध्ये बुडालेला राजेश वृषालीचं नाव ऐकताच भानावर आला. तो रिवाला म्हणाला, “रिवा मला माहितीये तुझ्या कडे खूप गूढ शक्ती आहेत. काहीही कर पण माझ्या वृषालीला पुन्हा जिवंत कर. मी नाही जगु शकत तिच्या शिवाय.” राजेश अगदी काकुळतीला येऊन बोलत होता. “माणूस एकदा मेला की परत येत नाही.” रिवा म्हणाल. “तूच असं म्हणालास तर मी काय करायचं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माझ्या सारख्या सामान्य माणसासाठी अशक्य आहेत त्या तू अगदी सहजपणे करतोस. मग मेलेली व्यक्ती परत जीवंत करणं तुला का जमणार नाही?” राजेश रिवाला म्हणाला. राजेशची अवस्था रिवाला पाहवत नव्हती. बराच वेळ विचार करून रिवा म्हणाला, “ठीक आहे. मी प्रयत्न करेन. पण हा प्रयोग यशस्वी होईलच याची मी खात्री देऊ शकत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे सर्व निसर्गाच्या विरुद्ध आहे त्यामुळे याचे विपरीत परीणाम होऊ शकतात. परिणामांना सामोरं जाण्याची तुझी तयारी आहे का?” “हो माझी तयारी आहे. मला फक्त माझी वृषाली हवी आहे.” एका क्षणात राजेश म्हणाला. तो आता फार उतावळा झाला होता. “ठीक आहे. मला त्यासाठी एक विधी करावा लागेल. मी आता जातो व तो विधी पूर्ण होताच परत येतो.” एवढे बोलून रिवाची आकृती तिथून गायब झाली.

वृषाली परत येणार या विचारानेच राजेशच्या मनातली उदासी नष्ट झाली. तो रोज रिवाच्या येण्याची वाट पहात होता. एक दिवस राजेश रात्री झोपला असताना अचानक खिडकी जोराच्या वाऱ्याने उघडली. रिवा परत आला होता. राजेशला जाग आली. रिवाला समोर पाहून तो फार खुश झाला. रिवा बोलू लागला, “माझा विधी आता पूर्ण झालाय. रविवारी रात्री बारा वाजता कर्वे उद्यानात जायचं. वृषाली तुला तिथेच भेटेल.” “रिवा तुझे खरंच फार उपकार आहेत माझ्यावर.” राजेश रिवाला म्हणाला. “अरे आपण मित्र आहोत. मैत्रीत कसले उपकार. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्या बद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाही. अगदी आई-बाबांना सुद्धा नाही. चल मी निघतो आता.” असे म्हणून रिवा तिथून गायब झाला. 

राजेशला आता एक वेगळाच उत्साह वाटत होता. त्याच्या मनावरची मरगळ कुठल्या कुठे पळाली होती. कधी एकदा आपण वृषालीला भेटतो असं त्याला झालं होतं. पण रविवारपर्यंत वाट पाहावी लागणार होती. 

राजेशमध्ये गेल्या काही दिवसात झालेला सकारात्मक बदल पाहून त्याचे आई-वडीलही खुश होते. संदीपचा वाढदिवस आहे व त्याने आपल्याला पार्टीसाठी बोलावलंय असं सांगून तो पुण्याला जायला निघाला. पुण्यात पोहोचताच त्याने रवीलाही हेच कारण सांगितलं. आम्ही सगळे एका मित्राच्या घरीच नाईट आऊट करणार आहोत असही तो रवीला म्हणाला. राजेश वृषालीच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर आलेला पाहून रवीलाही बरं वाटलं. पण थोडं आश्चर्यही वाटलं. त्यात राजेशच्या वडिलांचा रवीला फोन आला होता. त्यांनी रवीला राजेशवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. 

रात्री साडे आकरा वाजता राजेश घरातून बाहेर पडला. “मीही तुझ्या बरोबर खाली येतो. घरी बसून फार कंटाळा आला आहे अन आज जेवणही जरा जास्त झालंय. एखादा फेरफटका मारीन अन परत येईन.” रवी राजेशला म्हणाला. “मी आता निघतो. मला उशीर होतोय.” राजेश गडबडीत म्हणाला आणि पळतच खाली गेला. रवीला राजेशचं वागणं थोडं विचित्र वाटलं. तसेच राजेशच्या वडिलांनी सांगितलेलं त्याला आठवलं. तो राजेशच्या पाठोपाठ घराबाहेर पडला. 

राजेश उद्यानाच्या दिशेने चालत होता. रवीही त्याच्या मागून चालू लागला. रवीचा संशय आता अजून वाढला. राजेश त्याला मित्राकडे जाणार आहे असं म्हणाला होता. आता तर राजेश उद्यानाच्या दिशेने जात होता, तेही चालत. राजेश थोड्याच वेळात उद्यानाच्या गेटपाशी पोहचला. गेटजवळ कोणी गार्ड नव्हता. गेटला कुलूप सुद्धा लावलं नव्हतं. राजेश गेटमधून आत गेला. राजेश त्याच्या नेहमीच्या बाकावर जाऊन बसला. त्याने आजूबाजूला पाहिले. उद्यानात कोणीच नव्हते. आमावसेची रात्र असल्यामुळे आकाशात चांदण्या चमकत होत्या. राजेशने हातावरच्या घड्याळात पाहिले. बरोबर बारा वाजले होते. अजूनही वृषालीचा पत्ता नव्हता. रिवाने सांगितल्याप्रमाणे वृषाली खरच येईल का अशी शंका राजेशच्या मनात आली. पण त्याने स्वतःच्या मनाला समजावलं.

रवी उद्यानाच्या गेटपाशी पोहोचला. त्याने आत पाहिले. राजेश त्याला एका बाकावर बसलेला दिसला. ‘एवढ्या रात्री हा इथे कशासाठी आलाय?’ रवीच्या मनात विचार आला. तो उद्यानात गेला व दुसऱ्या बाजूने चालत राजेश जिथे बसला होता त्या बाकाच्या मागे एका झाडामागे लपला. 

बारा वाजून दहा मिनिटे झाली होती. अजूनही वृषाली आली नव्हती. आता मात्र राजेशचा धीर संपला. त्याला एका जागी बसवेना. तो बाकावरून उठला व उद्यानाच्या गेटपाशी गेला. त्याने डाव्याबाजूला पाहिले. ज्या रस्त्याने वृषाली नेहमी उद्यानात यायची तिथे कोणीच दिसत नव्हते. पूर्ण रस्ता रिकामा होता. राजेश तिथून जाणार तेवढ्यात त्याला खूप लांबून एक आकृती येताना दिसली. राजेशने ओळखले, ती वृषालीच होती. राजेशने जेव्हा तिला टेकडीवर प्रपोज केलं होतं तेव्हा तिने जो ड्रेस घातला होता तोच ड्रेस तिने आज घातला होता. पंढऱ्या रंगाच्या जांभळ्या फुलांची नक्षी असलेल्या त्या ड्रेस मध्ये वृषाली फारच सुंदर दिसायची. 

राजेश परत बाकावर जाऊन बसला. थोड्यावेळाने वृषाली उद्यानात पोहोचली व राजेश जिथे बसला होता तिथे आली. तिने संपूर्ण शरीर झाकलं होतं. चेहेऱ्यावर स्कार्फ गुंडाळला होता. पायतही शूज होते. राजेशला थोडं विचित्र वाटलं, कारण वृषाली कधीच असा स्वतःचा चेहेरा झाकत नसे. “बस” राजेश वृषालीला म्हणाला. वृषाली बाकावर बसली पण काहीच बोलली नाही. “स्कार्फ का गुंडाळलायस चेहेऱ्याभोवती? काढ ना तो स्कार्फ.” राजेश उतावीळपणे म्हणाला. वृषालीने आजूबाजूला पाहिले व कोणी नाही याची खात्री करून चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला. वृषालीचा सुंदर चेहेरा पुन्हा एकदा पाहून राजेश खुश झाला. तो एवढा खुश झाला की आनंदाने त्याचे डोळे पाणावले. आता राजेशला राहवलं नाही. तो बाकावरून उठला. त्याने वृषालीचा हात धरला व तिला उभं केलं. बराच वेळ दोघे एकमेकांकडे नुसते पाहात होते. 

रवी झाडाआड लपून पाहात होता. ‘कोण आहे ही मुलगी?’ रवीला प्रश्न पडला. अजुन त्याला तिचा चेहेरा दिसला नव्हता. राजेश आणि वृषाली बराचवेळ काहीच न बोलता फक्त एकमेकांकडे पाहात उभे होते. अचानक राजेशने वृषालीला आपल्या मिठीत घेतलं. आता मात्र रवीला राहवलं नाही. तो हळूच चालत पलीकडे गेला. रवीने त्या मुलीच्या चेहेऱ्याकडे पाहिले व तो अर्धवट जळालेला चेहरा पाहून रवीची बोबडीच वळाली व एक क्षण ही तिथे न थांबता तो धावत सुटला.


X X X X X X


जोशींकाकांनी पेपरवाल्याने दारात टाकलेला पेपर उचलला व ते घरात येऊन सोफ्यावर बसले. वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावरील एका बातमीने त्यांचं लक्ष वेधलं. कर्वे उद्यानात आढळला एका युवकाचा मृतदेह. रोज कर्वे उद्यानात जॉगिंग साठी जाणाऱ्या डॉक्टर शिंदेंना जॉगिंग ट्रॅकजवळ एक व्यक्ती मृतावस्थेत आढळली. त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले. मृत व्यक्तीचे वय अंदाजे अठरा ते वीस वर्षे असावे. पोलिसांच्या अहवालानुसार मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला आहे. 

जोशींकाकांनी बातमी नेहमीप्रमाणे काकूंना वाचून दाखवली व ते बोलू लागले, “काय आजची पिढी. हे काय वय आहे का हृदयविकाराने मरायचं. खावा, अजून पिझ्झा, बर्गर खावा. दिवसभर मोबाईलवर बोलायचं, रात्री जागरण करायचं, कसलं ताळ तंत्रच नाही या मुलांना.” जोशींकाकांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. “हु. माहितीये तुम्ही किती फिट आहात ते. भाजी संपली आहे. जरा बाजूच्या दुकानात जाऊन भाजी घेऊन या. आणि कांदे जरा बघून आणा. मागच्या वेळी त्याने फार जून कांदे दिले होते.” जोशींकाकूंनी नेहमी प्रमाणे काकांची बोलतीच बंद केली व काका हातात पिशवी घेऊन निघाले.



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama