कुंपण
कुंपण
बागेभोवती पाहिले असेल तू
तारेचे कुंपण
" इतकी जागा मालकीची
उरली जागा हद्दीत सामील नाही "
टांगती फलकंही वाचली असशील तू
कुंपणाबाहेरची.
आता जरा आत झाक
बघ , बागेत किती नवी फुले आलीत !
गोडगुलाबी , लालपिवळ्या , केशरी तुरयांची.
फुलपाखरांची राणी त्यावर ऐटीत बसली असेल
कळ्यांचा जन्मसोहळा नुकताच झाला असेल
आता ती गोंडस फुलं
बागेतून बाहेर पडू पाहतात
नव्या जगासोबत मैत्री करू पाहतात
त्यांना हसायचं आहे मनसोक्त
पावसाबरोबर भिजायचंय ,
ताजंटवटवीत राहायचंय
यासाठी तयार आहेत ती
कुंपणाबाहेर पडायला.
त्यांना ठाऊक आहे
सूर्य डुबल्यानंतर आपलं ताजंपण नसेल
कदाचित जमिनीवर पडून पायाखाली तुडवली जाऊ
तेव्हा आपलं अस्तित्वही असणार नाही
पुढल्या जन्माची दूर दूर आस नाही
अशी फुलं कुंपणाची लांबी मोजतात काय ?
प्रस्थानाची इच्छा ठेवून नुसतीच रडतात काय ?
ती हसत हसत आपली वाट निवडतात
जातील तिथं सुगंध दरवळतात
पोरी, त्या फुलांपरि आहेस तू
तुलाही तोडायचं तुझं बंधनांचं कुंपण
अन्
बहरू द्यायचं आहे स्वअस्तित्वाला.