यु टर्न - भाग४
यु टर्न - भाग४
पूर्वार्ध – नेहा, प्रथितयश वेब डिझायनर पण त्यासोबतच अत्यंत हट्टी आणि स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार. याच हट्टापायी सारंगने तिच्या प्रेमाला दिलेला नकार तिला काही पचवता आला नाही. आणि मग सुडाच्या भावनेने तिने सारंग आणि सानिका याचं ठरलेलं लग्न शक्य ते सगळे प्रयत्न करून मोडलं. पुढे जाऊन तिनेही प्रेमात पडून राघवशी लग्न केलं पण लग्नानंतर आयुष्यात येणारे चढउतार पार करताना मात्र तिला स्वतःची चूक कळली. तीच नेहा पुन्हा एकदा फिरून सानिका समोर येते आणि नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तिचीच मदत घेते. सारंगही स्वतःची चूक मान्य करत नेहाला माफही करतो आणि मदतही करतो.
आता पुढे...
नेहा आणि राघवची तर गाडी मार्गावर आली होती. पण सानिका आणि सारंगच काय? ते दोघे तर अजूनही काहीच पुढाकार घ्यायला तयार नव्हते. सानिकाच्या आत्यानेही तिच्या लग्नासाठी आता स्थळांचा विचार करू म्हणून तगादा सुरु केला होता.ही गोष्ट अमेयच्या कानावर येताच त्याने स्वरुपामार्फत सारंग पर्यंत पोचवली. त्यात भरीस भर ही पडली की इतके दिवस या गोष्टीना नकार देणाऱ्या सानिकाला आत्या आणि बाकी लोकांनी इमोशनल ब्लॅकमेल करत तयार केलं. मनातून जरी सानिकालाही सारंगला पुन्हा भेटावं वाटत होतं. पण त्यावेळेस तिची चूक नसतानाही त्याने तिला दिलेली वागणूक ती विसरू शकत नव्हती. त्याचा आपल्यावर असलेला विश्वास इतका कमकुवत असेल तर आयुष्यभर कसं निभावणार हा प्रश्न तिला रोखत होता. पुढे दोन दिवसांनी तिला एका मुलाला भेटायचं आहे असं आत्याने सांगितलं. थोड्याशा गोंधळलेल्या मनःस्थितीतच सानिका त्या मुलाला भेटली. दुसऱ्या दिवशी जेंव्हा अनिताने तिला त्या मुलाबद्दल विचारलं तिला साधं त्याच नावही लवकर आठवेना. हे बघितल्यावर अनिताने तिला पुन्हा एकदा सारंगबद्दल विचार कर असं सुचवलं. पण भारतात येऊन, नेहाच्या केसमध्ये मदत करूनही सारंगने स्वतः अजून सानिकाला एक मेसेजही केला नव्हता. त्यामुळे आधीच्या घटनांमुळे दुखावलेली सानिका अजूनच दुखावली गेली. तिने तस अनिताजवळ कबुलही केलं.
इकडे सानिकाशी काय बोलावे याचा विचार करत असतानाच सारंगला तिने लग्नासाठी स्थळांना भेटायला होकार दिल्याचं समजलं. आता मात्र आपण काहीतरी करायला हवं हे त्याला कळून चुकलं. त्यासाठी नेहा आणि अनिताच आपली मदत करू शकतात हे त्याला माहित होतं. त्याने पहिला फोन अनिताला लावला तस तिच्याकडून सानिकाशी झालेलं सगळं बोलणं त्याला समजलं. अजूनही सानिकाच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी आहे हे कळून त्याला जरासं हायस वाटलं. आता तो पुढच्या तयारीत गुंतला. कितिही झालं तरी सानिकाचा राग त्याला झेलावाच लागणार होता. त्याने फोनवर सानिकाचा नंबर डायल केला. पण तिने फोन उचललाही नाही अन् काहीच रिप्लाय केला नाही. दोन,तीन दिवस ह्यातच गेले. शेवटी आता वेगळं काहीतरी करावं लागणार हे सारंगला समजलं.
तिकडे नेहालाही मनोमन या दोघांना परत एकत्र आणण्यासाठी काहीतरी करायचं होतं. नेमकं काय केलं म्हणजे निदान सानिका आणि सारंग समोरासमोर येतील ह्यावर तीही विचार करत होती. त्या विचारातच मनाशी काही ठरवत ती कामाला लागली.
आकाशात मात्र लवकरच येणारी पौर्णिमा नव्याने चंद्राला भेटायचं म्हणून उगाच गालातल्या गालात हसत होती.
(क्रमशः)