Gauri Kulkarni

Drama Romance Inspirational

4  

Gauri Kulkarni

Drama Romance Inspirational

घर हक्काचं गौरीहर्षल

घर हक्काचं गौरीहर्षल

4 mins
478


घर हक्कच भाग १

‘ती’ दिसायला सामान्य . इतरांच्या दृष्टीकोनातून तर अगदी ugly वगैरे कॅटेगरीत मोडणारी. आपल्या वाट्याला फारसं कौतुक कधी येणार नाही याची जाणीव तिला खूप लवकर झाली. कारण इतरांचे टोमणे ऐकून जेंव्हा ती आईकडे आशेने बघायची तेंव्हा आई नकळत दुर्लक्षच करायची. 

आईचं वागणं तिला कमी वयात बरंच काही शिकवून गेलं. ती आता स्वतःच स्वतःला समजवण्यात पटाईत झाली होती. चुकून कधी वेळ आलीच तर हळूच स्वतःलाच टपली मारत ती म्हणायची, तू नं वेडी आहेस ‘मयुरा’. आणि स्वतःच खुदकन हसत कामाला लागायची. तिचा प्लस पॉईंट  होता तिचं दिलखुलास हसणं जे समोरच्याला एका क्षणात तिच्याशी बांधून टाकत असे एका समंजस नात्याने अपवाद फक्त तिच्या घरच्यांचा. प्रचंड मेहनतीने यश मिळवत आज मयुरा सेटल होती पण तिच्या घरच्यांना मात्र जसा तिच्या दिसण्याबद्दल प्रोब्लेम होता तसच तिच्या प्रगतीशीही त्यांना काही देणंघेणं नव्हतं. प्रत्येकवेळी तिची मित्रमंडळी मात्र तिचं यश दणक्यात साजरं करत.

    अशाच एका छोटयाशा पार्टीत तो तिला दिसला. वयाच्या थोड्याफार इफेक्टमुळे तिला नकळतच त्याच्याबद्दल आकर्षण वाटलं. पण आत्तापर्यंतच्या अनुभवांमधून शहाणी झालेली मयुरा शांत राहून त्याला पारखत होती. थोड्याच दिवसांत तिला दिसतं तसं नसतं हा अनुभव आलाच. त्याचं देखणेपण हे फक्त त्याच्या चेहऱ्यापुरतच मर्यादित आहे हे तिला कळलं. मग आपसूकच त्याच्याबद्दल जाणवणारी ती नाजूक भावनाही कोमेजली. मैत्रीच्या नात्याने त्याने पुढे केलेला हात तिने स्विकारला. मैत्रीच्याच कारण ती काही मॅरेज मटेरियल नव्हती, जिला चारचौघात ट्रॉफीसारखं मिरवता येईल. तिला या सगळ्याचा अंदाज असल्यानेच तिने त्याला फारसं महत्व दिलं नाही. त्याची एक खास मैत्रीण होती. तिला लग्नासाठी विचारण्याच्या खटपटीत तो होता. पण ती काही दाद देत नव्हती. मग हिलाच त्याची दया आली. तिने मोकळ्या मनाने त्याची मदत केली. त्या मैत्रिणीलाही ह्याची धडपड समजू लागली. अन् एक दिवस त्याच्या प्रस्तावाला तिने हिरवा कंदील दाखवला. तो खूष होऊन आनंद शेअर करण्यासाठी हिच्याकडे आला. ती मनापासून त्याच्या आनंदात सामील झाली. 

हळूहळू तो तिच्या आयुष्यातून  काहीसा गायब होऊ लागला. ती तर आधीपासूनच कुणाच्याच खिजगणतीतही नव्हती. घरच्या आघाडीवर तर ती आधीच हरली होती,आता मनाची आघाडीही विस्कटली पूर्णपणे. पण तरीही ती मात्र खंबीरपणे चालत होती तिची वेगळी वाट...

दोन वर्षं उलटून गेली ह्या सगळ्या घटना घडून. पहिलं प्रेम, त्याच्या कडू आठवणी घेऊन कुठेतरी हरवलं होतं. आज मयुरा फक्त विद्यार्थीप्रिय प्रोफेसरच नव्हे तर यशस्वी चाइल्ड सायकोलॉजीस्ट, समुपदेशक बनली होती. घरच्यांनी तिच्या कुठल्याच वैयक्तिक गोष्टीत रस न दाखवल्याने तिने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होताच वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. अशातच एका रात्री कुठूनतरी परतताना तिला कोपरयावरच्या कचराकुंडीजवळ खूप गर्दी दिसली. कधीही अशा ठिकाणी न वळणारी तिची पावले आज मात्र थांबली तिथे जाऊन...

भाग २

काय होतं तिथं? गर्दीला दूर करत मयुरा पुढे गेली. तिथे ’शारदाश्रम’ संस्थेची एक कार्यकर्ती हातात कसलंतरी गाठोडं घेऊन उभी होती. मयुरा त्या भागात तिचं काम, स्वभाव यामुळे बरीच प्रसिध्द होती. तिला पाहताच त्या कार्यकर्तीने ते गाठोडं पुढे केलं आणि म्हणाली, “बघा नं मॅडम, किती सुंदर मुलगी आहे?” तिच्या शब्दांनी भानावर येत मयुराने बघितलं तर खाली जमिनीवर पैश्यानी भरलेली बॅग पडली होती. आणि तिच्या हातातल्या गाठोड्यात एक छानसं गुटगुटीत बाळ. न राहवून मयुराने त्या बाळाला जवळ घेतलं. बाळालाही तिच्या कुशीत सुरक्षित वाटलं असावं त्याने इवल्याश्या मुठीत तिचं बोट घट्ट पकडलं. थोड्याच वेळात पोलीस आले आणि सर्व सोपस्कार पूर्ण होऊन आई किंवा वडिलांचा शोध लागेपर्यंत बाळाला संस्थेच्या ताब्यात देण्यात आलं. 

मयुरा घरी परतली पण बाळाच्या विचारांना सोबत घेऊनच. अंदाजे १५ दिवसांचा जीव, पण जन्म देणार्यांना त्याला टाकून देताना काहीच कसं वाटलं नाही? काय झालं असतं त्या जीवाचं जर ते सापडलं नसतं कुणालाच तर??? विचार करतच मयुराला रात्री खूप उशिरा झोप लागली. दुसरया दिवसापासून मयुराचा दिनक्रम बदलला. दुपारी लेक्चर संपली कि तिची पावलं आपसूक शारदाश्रम कडे वळू लागली. त्या बाळासोबतच इतर सर्व मुलंही तिच्या दिवसाचा आणि पर्यायाने आयुष्याचा भाग झाली. रात्रीच्या अंधारात सापडल्यामुळे बाळाचं नाव निशा असं संस्थेत लिहील गेलं. निशा आता ६ महिन्यांची होत आली होती पण अजूनही तिच्या घरच्यांचा काहीच पत्ता लागला नव्हता. तिला आश्रमातल्या सगळ्यांबरोबरच किंबहुना जास्तच मयुराचीही सवय लागली होती. मयुरालाही तिचा लळा लागला होता. 

    अशातच एका कॉन्फेरेंस साठी मयुराला आठवडाभर बाहेर जावे लागणार होते. निशाला काय आणि कसं समजवायचं या विचारातच मयुरा आश्रमात आली. ती निशाला शोधतच होती तेवढ्यात तिला कुणीतरी सांगीतल कि दत्तक घेण्यासाठी आलेल्या एका जोडप्याला निशा आवडली आहे. निशा त्यांच्यासोबतच ऑफिसमध्ये आहे. क्षणभर मयुराला धक्काच बसला पण कधीतरी हे होणारच होत याची अपेक्षा असल्याने ती लगेच सावरली आणि ऑफिसमध्ये पोहोचली. संस्थेकडून होणारं समुपदेशनाच काम मयुराच बघत असल्याने तिला प्रत्येक मुलाच्या प्रोसेसमध्ये रिपोर्ट द्यावा लागत असे. ती ऑफिसमध्ये पोहोचली आणि समोरचं दृश्य बघितल्यावर तिचे पाय जागीच थबकले.....

तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना इतक्या मजेत निशा त्या कपलच्या सोबत हसत होती. कपलही बऱ्यापैकी सुशिक्षित आणि सधन घरातले वाटत होते. इतक्यात त्यांच्यामधल्या स्त्रीने मयुरा तू????? असे म्हणत मयुराला मिठी मारली. मयुराने तिला पुन्हा एकदा निरखून पाहिलं तर ती तिची मैत्रीण अदिती होती. लग्न लवकर झाल्यामुळे पुढे मयुराचा तिच्याशी संपर्कच नव्हता. अदितीला बरीच वर्षं मूल न झाल्याने तिने व तिच्या नवऱ्याने दत्तक मूल घेण्याचं ठरवलं होतं. आश्रमात येताच तिला निशा दिसली आणि निशाही खूप जुनी ओळख असल्यासारखी तिच्याकडे झेपावली. दत्तकविधान प्रोसेस खूप मोठी असल्याने आता सतत भेट होईलच असं प्रोमीस करत अदिती मयुराला हक्काने तिच्या घरी येण्याचं आमंत्रण देऊन गेली. काहीवेळापूर्वी उगाच आपल्याला किती वाईट वाटलं होत हा विचार आता मयुराला हसू आणत होता. अदितीला खूप चांगल ओळखत असल्याने निशा अतिशय आनंदात राहील यावर आता मयुराला खात्री होती.

त्या आनंदातच मयुरा कॉन्फरन्स साठी गेली. तिथे पोहोचून ती निशा साठी संस्थेत फोन करतच होती कि तिला एक व्यक्ती खूप गडबडीत येऊन धडकली. आणि स्वतःच्याचं नादात सॉरी म्हणत तो निघूनही गेला. पुढे कॉन्फरन्स साठी ती हॉलमध्ये पोचली तेवढ्यात तिला कुणीतरी आवाज देत आहे असं वाटलं. तितक्यात तो तिच्याजवळ आला आणि तिला म्हणाला,” मिस मयुरा आपणच का? मी डॉ. शिशिर, मघाशी चुकून माझा तुम्हाला धक्का लागला मी सॉरी म्हणण्यासाठी आलोच होतो पण तोपर्यंत तुम्ही इकडे निघून आलात.” “इट्स ओके, होतं असं गडबडीत”,असं म्हणत मयुराने विषय संपवला आणि ती तिच्या जागेवर बसण्यासाठी निघून गेली. तिला पाठमोरी जाताना बघून नकळतच डॉ. शिशिरच्या चेहऱ्यावर हसू उमटले. कॉन्फरन्समध्ये एकामागे एक होणाऱ्या चर्चांमधून दोघांनाही एकमेकांविषयी बरीच माहिती मिळाली आणि नकळतच एकमेकांविषयी आदरही वाटू लागला. डॉ. शिशिर लहान मुलांचेच डॉक्टर असल्याने मुलांशी निगडीत समस्यांबद्दल त्यांचाही अभ्यास होताच. त्यात त्यांना मानसशास्त्राबद्दल कुतूहल असल्याने त्याबाबतीतहि ते बरीच माहिती बाळगून होते. मयुरा आणि त्याचं काही मुद्द्यावर पटत असल्याने त्यांच्यात चर्चा होत होतीच. त्याशिवायही शिशिर मयुराच्या इतक्या लहान वयात मिळवलेल्या यशामुळे थक्क झाला होता. मनोमन त्याला मयुरा आवडली होती. फक्त आता मयुराला ते कधी कळतय याची तो वाट बघत होता.  लवकरच तशी वेळही येणार होती.........

भाग ३

इकडे आदितीचीही गडबड चालू होती निशाला लवकर घरी आणण्यासाठी. पण त्याच बरोबर तिला अजून एका व्यक्तीचं स्वागत वाजतगाजत करण्याची उस्तुकता लागली होती.

अदितीच्या नवऱ्याचा एक जुळा भाऊ होता. अदितीचा नवरा आमोद  इंजीनियर त्यामुळे त्याचं शिक्षण लवकर संपून तो सेटलही लवकर झाला होता. पण शिशिर, हो शिशिरच... तोच जो मयुराला कॉन्फरन्समध्ये भेटला. तर त्याला डॉक्टर व्हायचं होत त्यामुळे त्याने घरच्यांना लग्न हा विषय काढण्यासाठी सक्त मनाई केली होती. पण आदितीकडून बर्याचदा मयुराच नाव घेतलं जाऊ लागल मग त्याला कुतूहल वाटलं आणि तो कुणालाही न सांगता एकदा मयुराला तिच्या नकळत पाहून आला. तिचं काम तिचा स्वभाव यामुळे त्याला तिच्याबद्दल आदर वाटू लागलाच होता. त्यातच मयुरा त्याला कॉन्फरन्समध्ये भेटली मग दोघांची हळूहळू गट्टीही जमली. आपल्याला मयुरा आवडते आहे हे कळल्यावर त्याने हि गोष्ट अदितीच्या कानावर घातली. अदितीला तर काय करावे हेच सुचेना. पण शिशिरने तिला सांगितलं को जोपर्यंत मयुराकडून हवा तसा रिस्पोन्स मिळत नाही तोपर्यत घरात काही सांगायचं नाही. 

    मयुरा आणि शिशिर कॉन्फरन्सवरून परत आले. बऱ्याच वर्षांनी मयुराने कुणाशी तरी मैत्री केली होती. शिशिर एक माणूस म्हणून चांगला आहेच पण त्याला आपल्या दिसण्याने फरक पडत नाही हे शिशिरच्या तिला अटेन्शन देण्यावरून तिच्या लक्षात आलं होतं. तिने आयुष्यात कधीही हा अनुभव घेतलाच नसल्याने हे नक्की प्रेम आहे कि आणखी काही हे मात्र तिला कळत नव्हत. याच कन्फ्युजन मध्ये असताना तिला अदितीचा मेसेज आला, भेटतेस का? म्हणून. मग हा विषय आदितीशिवाय कुणाजवळ बोलणार हे लक्षात येताच तिने हो असा रिप्लाय करत भेटण्याची वेळ आणि जागा ठरवली. 

    दोघीजणी भेटल्या आदितीलाही मयुराला शिशिरविषयी काय वाटत हे जाणून घ्यायचच होत. तर मयुरानेच विषय काढला आणि तिने  भेटल्यादिवसापासूनची स्टोरी सांगितली जी अदितीला आधीपासून माहित होती. पूर्ण कथा ऐकल्यावर अदितीने तिला विचारल कि, “तुला नेमक काय वाटतय?” त्यावर मयुराने पुन्हा एकदातरी शिशिरला भेटून त्याला खरच असं काही वाटत का हे कळायला हवं असं सांगितलं. अदितीने नकळतच सुटकेचा श्वास सोडला. 

    शिशिर अनेक संस्थांमध्ये स्वतःहून मोफत सेवा करत होता. त्याने त्या अंतर्गतच मयुरा जात असलेल्या संस्थेत भेट दिली आणि तो निशालाही भेटला. निशाला तर काका खूपच आवडल्याने तिने तो निघाल्यावर रडून गोंधळ घातला. हे सगळं बघून मयुरा मनातून नकळतच सुखावली. पण अजूनही तिला अदिती आणि शिशिर एकमेकांना ओळखतात हे माहित नव्हते. एकीकडे निशाची दत्तक प्रोसेस पूर्ण होत आली होती तर दुसरीकडे मयुरा आणि शिशिर एकमेकांमध्ये गुंतले होते. निशा सोबत आता खूप थोडे दिवस राहता येणार म्हणून मयुराला खूप वाईट वाटत होत पण निशाला हक्काचं आणि विशेष म्हणजे खूप प्रेम करणारं घर मिळणार म्हणून आनंदही होत होता. १५ दिवसांनी निशा कायमची आदितीकडे जाणार होती. अदितीच्या घरी निशाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली होती. त्यानिमित्ताने तिने मयुराला खूप आग्रह करून घरी नेलं. अदितीने शिशिर सोडून सगळ्यांना मयुरा आल्यावर घरीच असायला पाहिजे असं सांगितलं होतं. त्यावरून घरच्यांना थोडासा अंदाजही आला होताच पण कुणी काही बोललं नाही.

    मयुराने दबकतच अदितीच्या भल्यामोठ्या बंगल्यात पाय ठेवला. तिला बघताच खूष झालेली अदिती नेहमीप्रमाणे धावत येऊन तिच्या गळ्यात पडली. तिला आत नेऊन तिने उत्साहाने सगळ्यांशी तिची ओळख करून दिली. अर्धा पाउण तास मस्त सगळ्यांच्या गप्पा झाल्या. मयुरा जायला निघाली तेंव्हा अदितीने सगळ्यांच्या वतीने तिला निशासाठी होणाऱ्या घरगुती स्वागत समारंभासाठी आमंत्रण दिले. इतक्या छान लोकांकडे निशा येणार या आनंदात मयुरा घरी परतली. 

    मयुरा गेल्यानंतर अदितीने सगळ्यानाच शिशिरच्या मनात काय चालू आहे याची कल्पना दिली आणि मयुरा कशी वाटली हे विचारलं. घरात सगळेच रूपापेक्षा बुद्धिमत्तेला जास्त महत्त्व देणारे असल्याने शिशिरची निवड सगळ्यांनाच पटली. त्याच्या आईने तर पुढे जाऊन निशा येणार त्या दिवशीच शिशिरने मयुराला लग्नाची मागणी घालावी अशी कल्पना मांडली. आणि मंडळी तयारीला लागली. 

    निशा ज्या दिवशी अदितीच्या घरी येणार होती त्या दिवसासाठी अदितीने आपल्याला का छान आवरून यायला सांगितले आहे हे मयुराला  काही केल्या कळत नव्हते. पण मैत्रिणीचा हट्ट मानून ती छान आवरून अदिती सोबतच तिच्या गाडीत घरी पोचली. दाराजवळ जाताना सामान विसरल्याचा बहाणा करत ती गाडीकडे परत गेली. मयुरा चालत चालत दारासमोर असलेल्या सजवलेल्या पोर्चमध्ये पोचली. तोच तिच्यावर मस्त अशा गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. आणि ती काही बोलणार इतक्यात कुणीतरी येऊन तिचे डोळे अलगद झाकले. आणि तिच्या कानाजवळ एक सुरेल ओळ गुणगुणली, “तेरा मुझसे है पहले का नाता कोई, युंही नहीं दिल लुभाता कोई.....” हात दूर झाले. अदितीने हळूच मयुराला गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेली पाउलवाट दाखवली. तिकडे बघताच मयुराला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. माझी काकू होशील का असं शिशिरच्या कुशीत बसलेली निशा तिला तोडक्यामोडक्या भाषेत विचारत होती. तिने धावत जाऊन निशाला हातात घेत शिशिरच्या हातात हात गुंफले आणि डोळ्यातल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्या दिवशी फक्त निशालाच नाही तर मयुरालाही तिचं हक्काचं घर आणि प्रेम करणारी माणसं मिळाली. 


समाप्त



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama