Gauri Kulkarni

Drama Inspirational

3  

Gauri Kulkarni

Drama Inspirational

खरा चेहरा

खरा चेहरा

4 mins
318


ऋतुजा 4 दिवसाच्या सुट्टीनंतर ऑफीसला आली होती. ती आली तसे सगळेच तिच्या आसपास गोळा झाले. कशी झाली ट्रिप वगैरे विचारू लागले. ऋतुजा अगदी मनमोकळी वागणारी आतलं बाहेरचं असं काही नसायचं तिचं त्यामुळे भरपूर मित्रमंडळी जमवलेली. आजही तेच झालं होतं ती आली तसे सगळे बोलण्यासाठी धावले. गर्दीच्या मागे कुणीतरी तिला बघत होते. तिचंही बोलता बोलता त्या व्यक्तीकडे लक्ष गेले. तो चेहरा बघताच ऋतुजाचा चेहरा पडला. कोण होती ती व्यक्ती???


ती होती नयन ऋतुजाची कॉलेजमधली मैत्रीण. ऋतुजा आणि नीरजा ही बेस्ट फ्रेंडची जोडी कॉलेजमध्ये फेमस होती. सगळ्या गोष्टी करताना दोघी सोबत अभ्यासातही आणि मस्ती करतानासुद्धा. अशातच सेकंड इयरला नयनची कॉलेजमध्ये एन्ट्री झाली. नवीनच असल्याने ती फारशी कुणामध्ये मिसळत नव्हती. मग हळूहळू तिची ऋतुजा, निरजाशी ओळख झाली. त्याही ती एकटी पडू नये म्हणून मदत करायच्या. पण नयनला मात्र त्यांची मैत्री खटकू लागली होती. कारण तिला असं जिवाभावाचे कुणीच नव्हतं. नयन सतत त्या दोघींचं निरीक्षण करत असायची. काही दिवसांनी तिच्या लक्षात आलं की ऋतुजा बॅलन्स्ड आहे पण नीरजा मात्र जरा भोळसट आणि पटकन विश्वास टाकणारी आहे. मग नयनने निरजाबरोबर मैत्री वाढवणं सुरू केलं. तसं ते फारसं सोपं नव्हतं पण कॉलेजमध्ये येण्याजाण्याचा दोघींचा रस्ता एकच असल्याने तिला तशी संधी मिळाली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत तिने निरजाला बोलतं करायला सुरुवात केली. मग त्यातून तिला एक नवीन माहिती मिळाली. निरजाचा एक बालमित्र होता जो तिला आवडायचा त्यानेही तिला तसं कबूल केलं होतं. पण शिक्षण पूर्ण होईपर्यंत घरी काही बोलायचं नाही असं त्यांनी ठरवल्याने दोघेही भेटणं बोलणं सगळं एका लिमिटपर्यंत करायचे. त्या दोघांव्यतिरिक्त हे फक्त ऋतुजाला माहीत होतं आणि आता नयनला. अशातच कॉलेजचं ते वर्ष संपत आलं. सगळे परीक्षा, अभ्यासामध्ये बिझी झाले. त्यानंतर मोठ्या सुट्ट्या असल्याने फिरायला जायचं असं ग्रुपमध्ये ठरलं. ग्रुपमध्ये म्हणजे या तिघी आणि निरजाचा मित्र आणि त्याचे काही मित्रमैत्रिणी. 8,10 जण झाले ट्रेकिंग वगैरेचा प्लॅन ठरला. 2 दिवसाचा. हो, नाही करत घरून परवानगी मिळवली आणि सगळे गेले. त्या दोन दिवसात नयनच्या वागण्याबद्दल काही गोष्टी ऋतुजाला खटकू लागल्या तसं तिने निरजाशी बोलून दाखवलं पण असं काही नाही गं असं ती म्हणाली. पहिल्यांदा ऋतुजाला जाणवलं की निरजाच्या मनात वेगळं काही सुरू आहे आणि ती ते मला कळू देत नाहीये. काय सुरू होतं निरजाच्या मनात??


नयनने तिला सतत भरीला घालून तिचं आणि अर्णवचं नातं पुढे नेण्याबद्दल विचार करायला लावला होता. जेव्हा ती ऋतुजाला आवडणार नाही असलं काही असं म्हणाली तेव्हा ऋतुजाला बॉयफ्रेंड नाही म्हणून ती जळते तुझ्यावर आणि म्हणून तुला पुढे जाऊ देत नाही असं सांगितलं. सतत हे बोललं गेल्याने निरजाचा तिच्यावर विश्वास बसत गेला. ती नकळतच ऋतुजापासून दूर होऊ लागली. आणि वेगळ्याच दृष्टीने तिला बघू लागली. अर्णव त्या दोघींचाही मित्र होता पण तो ऋतुजाला बहिणीच्या जागी बघतो हे निरजा विसरली. 2 दिवसांनी सगळे परत आले. ऋतुजाने निरजाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती आता तिला टाळू लागली होती. तिने अर्णवलासुद्धा सांगितले की आमच्या दोघींपैकी एकीला निवड. नयनसोबत फिरणं आता निरजाला आवडत होतं. तिच्या आणि अर्णवबद्दलच्या सगळ्या गोष्टी ती बिनधास्त नयनला सांगू लागली. अशातच कॉलेजमधल्या काही मैत्रिणी निरजाला एकदा भेटल्या. त्यातल्या एकीने सहज हसत हसत अर्णवचा उल्लेख करत तिला टोमणा मारला. तुम्हाला कसं माहीत असं विचारल्यावर तुझ्याच बेस्ट फ़्रेंडने सांगितलं असं म्हणत कुणाचंही नाव न घेता त्या निघून गेल्या. निरजाच्या डोक्यात फक्त ऋतुजा आली. ती तशीच तडक ऋतुजाकडे आली. तिला समोर बघताच ऋतुजाला खूप आनंद झाला. पण निरजाने मात्र पुढचा मागचा विचार न करता तिला धारेवर धरलं. ऋतुजाने शांतपणे तिला बोलू देत सगळं ऐकून घेतलं. मग ती तिला म्हणाली हे जे प्रसंग तू सांगितले ते जेव्हा घडले तेव्हा आपण संपर्कात होतो का?? हा प्रश्न ऐकताच निरजा पटकन खुर्चीवर बसली. तिला समजावत ऋतुजा पुढे म्हणाली, मी तुला हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की तिच्यावर इतका विश्वास टाकू नकोस पण तुझ्या डोक्यावर संशयाचे भूत स्वार होते. असो झाले ते झाले या गोष्टींवर मी आणि अर्णवने आधीच विचार केला होता. हे सगळं बाहेरून घरी कळण्याआधी तो बोलणार आहे तू काळजी नको करुस. ऋतुजाचं बोलणं ऐकून निरजाच्या डोळ्यात पाणी आले,ती तिची माफी मागत गळ्यात पडून रडू लागली. तिला शांत करत ऋतुजा म्हणाली, वेडाबाई आता तरी शहाणी हो आणि लोकांवर लगेच विश्वास ठेवणार नाही असं ठरव. निरजा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव,

ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं, ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. गोड बोलणारा प्रत्येक माणूस आपला हितचिंतक असतोच असं नाही. काही विघ्नसंतोषी असतात तर काही प्रत्येक गोष्टीत स्वतःचा काय फायदा होतो हे बघत असतात. अशी लोकं आपल्या वागण्याने समोरच्याला काय त्रास होईल याचा विचार करत नाहीत. आपण मात्र सगळं गुपित उघड करून नंतर पश्चाताप करत बसतो. म्हणूनच आपल्याला इतरांबद्दल काय वाटतं, चांगलं की वाईट हे फक्त आणि फक्त योग्य व्यक्तीशी बोलावं जो खरंच आपला जवळचा आहे. नाही तर सरळ गप्प बसावं. बाकी ज्याचा त्याचा प्रश्न.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama