The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Sandip Patil

Abstract Horror

3  

Sandip Patil

Abstract Horror

वीरभद्राचे आगमन (भाग 1)

वीरभद्राचे आगमन (भाग 1)

7 mins
1.2K


काल रात्रीनंतर तो प्रसन्न वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर झळाळी होती. ओठांवर तेच मधुर हास्य होते जे गेल्या काही महिन्यांपासून दिसत नव्हते. त्याच्यातील चिडचिडेपणा संपलेला होता. त्याचे वडील, मित्र त्याच्यातील या अमुलाग्र बदलाने आनंदात होते. त्याचे कारणही तसेच होते.

    अनिकेत नाव त्याचे. सॉफ्टवेअर अभियंता होता तो व एका नामांकित कंपनीमध्ये फार मोठ्या हुद्यावर कार्यरत होता. आई लहानपणीच वारल्यामुळे त्याचे शासकीय सेवेतुन निवृत्त झालेले वडिल शामराव यांच्यासोबत तो राहात होता.अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला असताना त्याची अन भावनाची ओळख झाली.ओळखीचे रूपांतर कधी प्रेमात झाले दोघांनाही कळले नाही.त्यांचे प्रेम फुलत होते. निस्वार्थी भावनेने ते दोघे एकमेकांना जपत होते. भावनाने एकदा अचानक अनिकेतची ओळख रोहनसोबत करून दिली. रोहन हा त्यांच्याच वयाचा व भावनाचा आतेभाऊ होता. लहानपणापासून भावना व रोहन बेस्ट फ्रेंड होते. रोहन सुटीत भावनाकडे आला की भावनाच्या तोंडी फक्त त्याचेच नाव असायचे. एकदा गंमत म्हणून अनिकेत भावनाला म्हणाला पण की त्याच्या प्रेमात पडून मला विसरशील तेव्हा भावनाच्या डोळ्यात पाणी आले. ती अनिकेतला म्हणाली की तो माझा जीवलग मित्र आहे आणि तू माझा प्राण आहेस. अनिकेत ने तो फक्त गंमत करत होता हे सांगून ती गोष्ट तिथंच मोडली. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असतांना अनिकेतने भावनाला स्वतःच्या घरी नेऊन वडिलांशी तिची भेट घडवून आणली. त्यांना आपल्या प्रेम कहाणीविषयी सांगून भावनासोबत लग्नाची इच्छा प्रगट केली. आई नसलेल्या आपल्या एकुलत्या एका मुलाला शामराव नकार देणे शक्य नव्हतेच. वडिलांकडून होकार मिळविल्यावर अनिकेत व भावनाच्या आनंदाला पारावार उरला नाही. आता फक्त भावनाच्या घरच्यांकडून परवानगी घेणे बाकी होते. भावना अनिकेत ला तिच्या घरच्यांच्या होकाराची खात्री देते व अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यावर तिच्या घरच्यांकडे मागणी घालण्यासाठी येण्याचे अनिकेतला सांगते.

    अभियांत्रिकी पुर्ण होऊन अनिकेत कंपनीत नोकरीवर लागतो. लग्नासाठी तो भावनाला वारंवार विचारतो तशी ती चालढकल करत राहते. अनिकेत अचानक भावनाच्या या व्यवहाराने व्यथीत होतो. तो तीला स्पष्ट कारण विचारतो तेव्हा ती सांगते की तिचे घरचे या लग्नाला तयार नसून घरच्यांच्या मर्जीविना ती अनिकेत सोबत लग्न करू शकत नाही. हे ऐकून अनिकेत खुप दुःखी होतो. भावनाची तो खूप विनवणी करतो, गयावया करतो पण तिला पाझर फुटत नाही.अनिकेतला भावनाचे हे वागणे सहन होत नाही. साहजिकच आहे जिच्यावर जीवापाड प्रेम केले, सोबत जगण्यामरण्याच्या आणाभाका घेतल्या त्या व्यक्तीचे असे अलिप्त वागणे जीवाला यातना देणारे असते.अनिकेत स्वतःला दारूच्या नशेत बुडवून घेऊ लागला. यातच भरीस भर अनिकेतला भावना व रोहन सोबत खूप वेळा एकत्र दिसतात.अनिकेतच) भावनाला भेटायचा, फोन करायचा प्रयत्न करतो पण ते शक्य होत नाही. एकदा अचानक रस्त्यात त्याला भावना व रोहन दिसतात. अनिकेत त्यांच्यासमोर जाऊन भावनाला तिच्या वागण्याचे कारण विचारतो. अनिकेतला पाहताच भावनाचा चेहरा रागाने लाल होतो. तिच्या डोळ्यात खुनशी चमक येते. केस अस्ताव्यस्त होतात. ती अनिकेतला ढकलून देते. तिच्या साध्या ढकलल्याने अनिकेत खूप दूर जाऊन पडतो. एखादया हिंस्र श्वापदासारखी भावना अनिकेतच्या अंगावर धाऊन येते पण तेवढ्यात रोहन मधात येतो. तो अनिकेतला भावनाला न भेटण्याचे व परत तिच्यासमोर न येण्याचे सांगतो आणि जर परत तीला भेटला तर परिणाम वाईट होतील अशी धमकी देतो.

   अनिकेत दिवसेंदिवस खंगत जात असतो. त्याला पाहून शामराव चिंतीत होतात. ते त्याला दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार करतात पण काहीही फरक पडत नाही. अनिकेतला वडिलांची तळमळ समजत असते पण भावनाच्या वागण्यामुळे तो पार कोलमडून पडतो. आणि काही महिन्यानंतर अचानक त्याच्या वागण्यात फरक पडून तो आनंदी व प्रफुल्लीत राहायला लागतो. कारण रोज रात्री त्याची भावना सोबत भेट होत असते. जरी स्वप्नात भेट होत असली तरी ती त्याला प्रत्यक्ष झाल्यासारखी वाटते.असच काल रात्री सुद्धा घडलं. काल ऑफिस च्या कामांमुळे त्याला घरी यायला उशीर झाला होता. वडील म्हणजे शामराव हे जेवण आटोपून झोपायला गेले होते. जेवण करून अनिकेत आपल्या बेड वर पडला. पडल्या पडल्या त्याला गाढ झोप लागली. झोपल्यावर नेहमीप्रमाणे गेल्या दोन तीन महिन्यांपासून सुरू असलेले त्याचे स्वप्न सुरू झाले. तो एका जंगलातल्या पाऊलवाटेने जात.आजूबाजूला उंच उंच झाडी, वेलींनी आच्छादलेले झुडुपे होती, विविध पक्षांचे आवाज येत होते.नागमोडी वळणे घेत ती पाऊलवाट एका झोपडीजवळ आला. झाडाच्या पानांनी, फांद्यांनी साकारलेली ती साधी झोपडी होती. झोपडीच्या समोर तीन चार लोक बसू शकतील एवढा मोठा दगड होता.झोपडीच्या मागे घनदाट जंगल, बाजुला उंच पहाड होते. झोपडी समोरच्या त्या दगडावर भावना बसलेली होती. अनिकेत जाऊन तिच्या बाजूला बसला. भावना म्हणाली आज उशीर झाला त्यावर त्याने ऑफिस चे कारण सांगितले. भावना अनिकेतच्या जवळ आली,त्याच्या मिठीत शिरून त्याला म्हणाली की तसंही खूप उशीर झालेला आहे. फक्त अंताची वाट पाहतेय. ती अशी का बोलतेय हे अनिकेतला समजत नव्हते. तिची हनुवटी वर करून तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला अंत ही पण नवी सुरुवातच असते. आणि त्याने तिच्या उष्ण ओठांवर आपले ओठ टेकवले. तिने सुध्दा त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली व रात्र पुढे सरकू लागली.

पहाटेची कोवळी किरण जेव्हा त्या दोघांच्या अंगावर पडली तेव्हा ते दोघे एकमेकांच्या मिठीत गुरफटून गेलेले होते. सुर्यकिरणांबरोबरच भावनाला जाग आली आणि तिने अनिकेतला उठवून लवकर निघून जायला सांगितले.अनिकेतच्या मनाची तयारी होत नव्हती पण भावनाने त्याला सांगितले की जर तो रोज सकाळी उठून जाणार नाही तर स्वप्नातसुद्धा त्याची व तिची भेट होणार नाही.

       अनिकेत रोज स्वप्नात भावनाशी भेट होते म्हणून आनंदी होता. पण प्रत्यक्ष जीवनात भावना चे त्याला दर्शनही होत नव्हते. फक्त एकदाच योगायोगाने दवाखान्यात त्याने तिला पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. ती अत्यंत कृश झाली होती, डोळे शुन्यात होते. तो तिला भेटायला पुढे जाणार तोच रोहन मधात आला. त्याने अनिकेतला हात जोडून म्हटले की तुझ्या भल्यासाठी सांगतो तिच्यापासून दूर राहा. अनिकेतला काहीच समजले नाही.त्याने रोहनला खूप विनंती केली पण रोहन काहीच ऐकायला तयार नव्हता. शेवटी रोहनचा मोबाईल नंबर घेऊन तो घरी निघाला. घरी आल्यावर तो तिची अवस्था अशी का झाली असेल या विचारातच झोपी गेला. स्वप्नात रात्री ती नेहमीच्या झोपडीसमोरील दगडावर बसलेली त्याला दिसली. तो तिच्या जवळ गेला व त्याने तीला दवाखाण्यातील तीचा प्रसंग व तिची अवस्था सांगितली. त्याचे कारण विचारले तर तिने भयभीत होऊन त्याच्या तोंडावर बोट ठेवले व रडू लागली. त्याने तिला मिठीत घेतली व तिची पाठ थोपटत दोघे तसेच रात्रभर बसून होते.सकाळ होताच तिने धडपडत उठून त्याला जायला सांगितले पण तिच्या कानातले डुल त्याच्या शर्टच्या बाहीत अडकलेले होते. ती ते काढायचा प्रयत्न करत होती पण वेळ होत असल्यामुळे तीने त्याला तसेच ढकलले व तो परत परतीच्या वाटेला निघाला. इकडे प्रत्यक्ष जगात अनिकेतला स्वप्नातून जाग आली. रात्रीच्या स्वप्नाबद्दल विचार करत त्याने ब्रश केला. काल रात्री स्वप्नात अनिकेतच्या प्रश्नाचे उत्तर न देता भावना का रडत होती याचे कोडे काही केल्या त्याच्याकडून सुटत नव्हते. सर्व बाजूंनी विचार केल्यावरही उत्तर मिळत नसल्यामुळे तिरमिरीतच तो आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला.आंघोळीसाठी कपडे काढत असतांना काहीतरी खाली पडण्याचा आवाज आला.अनिकेत काय पडले हे पहायला खाली वाकला आणि डोळे विस्फारून तो पहातच राहिला.खाली भावनाच्या कानातले तेच डुल होते जे काल रात्री त्याच्या शर्टच्या बाहीत अडकलेले होते.अनिकेतचे डोके बधिर झाले. त्याने घाई घाईत आंघोळ आटोपली. रूम मध्ये बसून बराच वेळ विचार केल्यावर तो घराबाहेर पडला.भावनाच्या घराजवळ आल्यावर तिच्या घरात जावे की नाही हा विचार करत असतांना त्याच्या अचानक लक्षात आले की मागे दवाखान्यात त्याने रोहनचा मोबाईल नंबर घेतला होता.त्याने रोहनला फोन लावला. रोहनने हॅलो म्हटल्यावर अनिकेत ने त्याला ओळख देऊन फक्त एकदा भावना ला भेटू द्यायची विनंती केली जी नेहमीप्रमाणे रोहनने धुडकावली. खूप विनंत्या केल्यावरही तो मानत नाही हे पाहून अनिकेत त्याला म्हणाला की तो भावनाच्या घराजवळच असून जर त्याला भेटू दिले नाही तर तो आत्महत्या करेल. हे ऐकून रोहन भेटू द्यायला तयार झाला. रोहन बाहेर येऊन अनिकेतला भावनाच्या घरात घेऊन गेला.भावनाच्या घरात स्मशान शांतता होती. तिचे आईवडील संशयी नजरेने अनिकेत कडे बघत होते.रोहन अनिकेत ला घेऊन भावनाच्या रूममध्ये आला.भावना मोठ्या पलंगावर भिंतीला टेकून खाली मान घालून बसली होती.बाजूला टेबल वर अनेक प्रकारच्या गोळ्या अन सलाईन ठेवलेल्या होत्या. भावना खूप दुबळी झाली होती. अनिकेत ने आवाज दिल्यावर भावना ने वर बघितले आणि अनिकेतला पाहून तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.आतापर्यंत कुठलेही भाव नसलेला तिचा चेहरा उग्र व हिंस्त्र झाला. पाठ ताठ झाली. कुठल्याही क्षणी सावजावर झेप घेऊन शिकार करणाऱ्या शिकाऱ्यासारखा पवित्रा तीने घेतला. तिला या स्थितीत पाहून अनिकेतच्या अंगाचे पाणी पाणी झाले. रोहन तात्काळ अनिकेत ला घेऊन भावनाच्या रूम मधून बाहेर पडला.बाहेर पडताच त्याच्या  

कानांवर भावनाची थरकाप उडवून देणारी किंकाळी आली. रोहनने त्याला घराबाहेर आणून सोडले व पुन्हा भेटायला येऊ नको ही तंबी देऊन निघून गेला.चेहऱ्यावरचा घाम पुसत खिशात हात घालून अनिकेतने ते डुल बाहेर काढले. ज्या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी त्याने भावनाच्या भेटीचा अट्टाहास केला ती गोष्ट बरोबर होती. भावनाच्या एका कानात त्याच्या हातात असलेल्या डुलाशी साधर्म्य दाखविणारे डुल होते तर दुसरा कान रिकामा होता. आपण रोज रात्री स्वप्नात खरोखरच भावना ला भेटतो, तिच्यासोबत प्रेमाचे क्षण घालवतो यावर विश्वास ठेवण्याखेरीज दुसरा कुठलाच मार्ग अनिकेतकडे नव्हता.पण स्वप्नातील भावना त्याच्यावर पूर्वीसारखीच जीव तोडून प्रेम करत होती तर प्रत्यक्ष जीवनातील भावना फक्त अन फक्त त्याचा द्वेष करत होती, त्याच्या रक्तासाठी तहानलेली होती.

       विचारांच्या तंद्रीत अनिकेत घरी आला. या विज्ञानाच्या आधुनिक युगात अस काही घडू शकते काय?? भावनाची तब्येत दिवसेंदिवस खालावत जाण्याचे कारण काय?? सध्या तरी हा प्रकार भयानक नाही वाटला पण तो पुढे होणार नाही याची शाश्वती किती?? या सारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे त्याला शोधायची होती. घरी आल्यावर त्याने ऑफिसला फोन लावून एका महिन्याची वैद्यकीय रजा घेतली. वडिलांशी या विषयावर काहीही बोलायचे नाही असे त्याने ठरविले. कारण वडिलांनी त्याच्यासाठी खूप सहन केले होते, त्याची मानसिक स्थिती बिघडली तेव्हाही त्यांनी खूप कष्ट घेतले असे त्याचे मत होते. वडिलांनी विचारलच तर कंपनीच्या एका प्रोजेक्ट साठी तो काही ठिकाणी जागा पाहायला जाणार व घरी राहूनच त्या प्रोजेक्ट चे आराखडे तयार करणार असे सांगायचे त्याने ठरविले. आता पुढे नेमकी कुठली दिशा पकडायची,त्याच्याशी व त्याच्या आयुष्यातील सर्वांत महत्वाच्या व्यक्तीशी निगडीत या कोड्याची उकल कशी करावी या विचारांच्या गर्तेत तो बुडाला..........

क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract