अंधारात केले पण उजेडात आले
अंधारात केले पण उजेडात आले




अमावस्येची काळी रात्र हळूहळू पुढे सरकत होती.सगळ जग निद्रिस्त झाले. रातकिड्यांचा किर्रर्र आवाज वातावरणातील भेसूरता अजूनच वाढवीत होता.जोराच्या हवेने हलणारे झाडांचे शेंडे झाडांवर कुणीतरी नाचत असल्याचा आभास करून देत होते.मध्येच एखाद्या कुत्र्याच्या हेल काढून रडण्याने अंगाचा थरकाप उडायचा.अश्या भयाण वातावरणात शेतातील फार्महाऊसमध्ये नागराज शेवंताला घेऊन आला.शेवंता नागराजने ठेवलेली होती व नागराजच्या इशाऱ्यावर त्याच्या वर्तुळातील खास लोकांची शारीरिक गरज पुरवायची.गुन्हेगारी क्षेत्रात नागराजच्या नावाचा दबदबा होता.खून,बलात्कार,अपहरण यासारखे कितीतरी गुन्हे त्याच्या नावावर होते पण राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे तो अजूनही मोकाट होता.अमावस्येची रात्र असल्यामुळे शेवंता त्याच्यासोबत जायला तयार नव्हतीच पण त्याच्या हट्टापुढे तीचे काहीच चालले नाही. फार्महाऊस वरील त्याच्या खास खोलीत आल्याबरोबर नागराजने शेवंताला मिठीत घेतले,तिच्या सर्वांगाला चुंबण्यास सुरुवात केली.चुंबन घेत असतांना दोघांत एकमेकांच्या अंगावरील कपडे काढण्याची स्पर्धा लागली.थोडयाच वेळात दोघेही नग्न होते.नागराज शेवंतांच्या अनावृत्त शरीरावर झुकणार तोच खोलीतील खिळकीची काच खळकन फुटून लाईट गेली.नागराज नाराजीने नग्नावस्थेतच शेवंतापासून दूर होत उठला.चाचपडत टेबलावरील मोबाईल उचलत त्यातील टॉर्च लावली व खिळकीची काच का तुटली हे पाहण्याकरिता खिळकीजवळ आला.फुटलेल्या काचेचे निरीक्षण करत असतांनाच मागून त्याच्या डोक्यावर जोरदार वार झाल्याने तो बेशुद्ध पडला.
थोड्या वेळाने हळूहळू तो शुद्धीवर येऊ लागला.शुद्धीवर येत असतानाच त्याला कुणीतरी मिटक्या मारत चवीने काही खात असल्याचा आवाज येत होता.त्याच्या शरीरात अचानक वेदनांचा आगडोंब उठला.त्याला जोराने ओरडायचे होते पण घशातुन आवाज निघत नव्हता.खोलीतील लाईट गेल्यामुळे त्याला काय होत आहे याची कल्पना करता येत नव्हती, त्याक्षणी खोलीतील लाईट आली.अचानक लाईट आल्यामुळे नागराजने हात डोळ्यांसमोर धरले,डोळे सरावल्यानंतर हात खाली घेत असतांना नागराजचे लक्ष हाताच्या बोटांकडे गेले अन तो जोरात किंचाळला.कारण त्याच्या हाताची तीन बोटे लहान मुलाने एखादी खाण्याची वस्तू चघळावी तशी होऊन त्यातून रक्त टपकत होते.त्याचवेळी त्याला पायात वेदनांची जाणीव झाल्यावर तो धडपडत उठून उभा राहिला आणि स्वतःच्या शरीराकडे लक्ष गेल्यावर हादरला.त्याच्या शरीराचे ठिकठिकाणी लचके तोडल्या जाऊन आजूबाजूला रक्ताचे थारोळे साचले.
कुख्यात गुंड असूनही आयुष्यात प्रथमच नागराज घाबरला. खोलीतील वातावरण बदलुन कमालीचा गारठा आल्यामुळे तो थंडीने कुडकुडत होता.कपडे घेण्यासाठी बेडवर नजर टाकताच त्याच्या सर्वांगाला घाम फुटला.एक सहा वर्षांचा मुलगा बोटासारखे काहीतरी चवीने खात असल्याचे त्याला दिसले.नागराजची नजर पायाकडे वळली व तो पुन्हा एकदा किंचाळला.मुलगा खात असलेले बोट त्याच्याच पायाचे होते.त्याचे लक्ष परत मुलाकडे गेले,मुलाने खाली घातलेली मान वर करून नागराजकडे पाहिले अन नागराजचा उरला सुरला धीर खचला.त्या मुलाच्या डोळ्यात बुब्बुळ नव्हतीच,चेहऱ्यावर भेगा पडलेल्या होत्या.अर्धी मान धारदार शस्त्राने कापलेली असल्यासारखी मध्येच एका बाजूला कलांडायची.नागराजने मदतीसाठी शेवंता कुठे दिसते का हे पाहिले आणि त्याला दुसरा धक्का बसला,शेवंता नग्नावस्थेतच माकड उभे राहते तशी हात व पाय जमिनीवर ठेवून उभी होती.केस चेहऱ्यावर आल्यामुळे तिचा चेहरा नागराजला दिसत नव्हता.नागराजने शेवंताला आवाज दिल्यावर तिने वर मान करून केस बाजूला केलेत.तिचा चेहरा बघीतल्यावर नागराज सुन्न झाला.शेवंतांचा चेहरा भेसुर होऊन एखाद्या मानसिक रोगाने पछाडून मजेखातर इतरांचा जीव घेणाऱ्या सायको किलरसारखा दिसत होता. चेहऱ्यावर खुनशी हास्य होते.तिच्या चेहरा बदलत जाऊन तिथं नवीन चेहरा आला अन तो पाहुन नागराज काय समजायचे ते समजला.शेवंताने खोलीतील मुलाकडे नजर टाकली. ते मूल हळूहळू पावले उचलत नागराज जवळ आले. नागराजने पळायचा प्रयत्न केला पण मंतरल्यासारखे त्याचे पाय एकाच जागी जखडल्या गेले होते.त्या लहान मुलाने जंगली श्वापदासारखी नागराजवर झडप घेतली.नागराज प्राणपणाने किंचाळत होता पण ऐकणारे कुणीही आसपास नव्हते.
दुसऱ्या दिवशी सकाळी फार्म हाऊसवर काम करणारे नोकर आले असता सूर्य डोक्यावर आलेला असतानासुद्धा त्यांना नागराज ची खोली बंद दिसली,खोलीजवळ गेल्यावर त्यांनी आवाज दिले पण आतून काहीच प्रतिसाद नव्हता. खाली दरवाजाकडे लक्ष जाताच ते घाबरले.खोलीच्या दरवाजातुन रक्त येत होते.त्यांनी घाबरत घाबरत फार्महाऊसचे मालक प्रतापराव यांना फोन करून सांगितले तसे प्रतापराव फार्महाऊसकडे निघाले.प्रतापराव नाईक हे शहरातील फार मोठे प्रस्थ होते. शासकीय ठेकेदार म्हणून त्यांचा दरारा होता.वडिलोपार्जित शंभर एकर शेती होती पण जबरदस्तीने जागा बळकावून विकणे, शासकीय योजनांमध्ये निकृष्ठ दर्जाची कामे करून पैसा कमाविणे, सागवान च्या लाकडांना बेकायदेशीर पणे स्वतःच्या कारखान्यात कापून विकणे यासारख्या उद्योगात ते अग्रेसर होते.या कामात त्यांना नागराजची साथ होती.फार्म हाऊस वर पोहचल्यावर ते सरळ नागराज असलेल्या खोलीत घुसले,त्यांच्या मागे नोकर होतेच. खोलीत गेल्यावर समोरचे दृश्य पाहून त्यांचे डोळे विस्फारले, भीतीने अंगावर काटा उभा राहिला.समोर नागराजचे प्रेत ओळखु न येणाऱ्या स्थितीत पडलेला होता.त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता,शरीराचे ठिकठिकाणी लचके तोडलेले होते.पोट फाडुन त्यातील आतडी बाहेर आलेली होती.हात व पायांची बोटे गायब होती.डोळे सताड उघडे होते.प्रतापरावांची नजर बाजूला गेली,तिथे एका कोपऱ्यात शेवंता शुन्यात नजर लावून बसलेली होती. प्रतापराव घामाघूम होत खोलीच्या बाहेर येऊन बसले.नोकराने आणलेले लोटाभर पाणी पिल्यावर त्यांच्या बुद्धीने काम करायला सुरुवात केली.त्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून ओळखीच्या पोलिसांना तिथ बोलावुन घेतले.दुसरा फोन त्यांनी कुण्यातरी अतिमहत्वाच्या व्यक्तीला लावला,कारण त्या व्यक्तीला वारंवार ते साहेब साहेब म्हणत होते.पोलीस आल्यावर नागराजचे प्रेत त्यांनी पाहिले तेव्हा त्यांनासुद्धा धक्का बसला.आपल्या कारकिर्दीत त्यांनी कितीतरी प्रेत बघितले पण इतक्या क्रूर पद्धतीने मारलेले ते पहिल्यांदाच पाहत होते.असे वाटत होते की कुत्र्यांच्या कळपाने मिळून नागराजचे लचके तोडून त्याचा जीव घेतला.त्यांनी खोलीची कसून तपासणी केली पण त्यांना आक्षेपार्ह काहीच सापडले नाही.शेवंताजवळ विचारपुस करायचा प्रयत्न केला पण ती फक्त त्यांच्या तोंडाकडे टकमक पाहत रहायची.प्रेत शवविच्छेदना साठी पाठवून पोलीस शेवंताला घेऊन निघाले.ती गाडीत बसत असतांना तीला प्रतापराव पोलिसासोबत बोलत असल्याचे दिसले.ती त्यांच्याजवळ आली व खी..खी .. खी..खी..खी..खी हसत म्हणाली "पुढचा नंबर तुमचा आहे बरं" आणि प्रतावरावांची दातखिळी बसली.
प्रतापरावांना गेले काही दिवस अस्वस्थ वाटत होते.रात्री त्यांना झोपतांना सतत आपल्यावर कुणाचीतरी नजर आहे,कुणीतरी आपल्या आसपास वावरत असल्याचा भास होत होता. रात्री बेरात्री ते किंचाळत उठत,कधी कधी स्वतःशीच रात्रभर बडबड करत होते.त्यांच्या अश्या वागण्याने त्यांची पत्नी,मुले चिंतित होती. नागराज प्रकरणात पोलीसांचा संशय शेवंतावर होता पण ती काहीच बोलत नव्हती.प्रतापरावसुद्धा तिला भेटायला गेले तेव्हा ती फक्त वेड्यासारखी हसत रहायची.प्रतापरावांना पण वाटायचे ती नाटक करते म्हणून.काही महिन्यांनी शेवंताची रवानगी वेड्यांच्या दवाखान्यात झाली.
ती रात्र नेहमीपेक्षा वेगळीच होती.सकाळपासूनच रिपरिप सुरू असलेल्या पावसाने रात्री आपला जोर वाढविला होता. पावसाबरोबर वारा स्पर्धा लावत होता.बेडकांचे डराव डराव ओरडणे वातावरण अजून गंभीर बनवीत होते.प्रतापरावांना सागवान लाकडाची खूप मोठी ऑर्डर मिळाली होती.त्या ऑर्डर ची रक्कम त्यांना आज मिळणार होती.व्यवहार चोरट्या मार्गाने असल्यामुळे त्यांनी समोरच्या पार्टीला रात्री लाकडांच्या कारखान्यात पैसे घेऊन बोलाविले होते.आपली गाडी घेऊन ते त्या रात्री कारखान्याकडे निघाले पण जाण्याअगोदर एकदा त्यांनी भिंतीवरील कॅलेंडर पहायला हवं होतं.त्या दिवशी अमावस्या होती. कारखान्यातील सर्व नोकर सहा वाजताच घरी गेले होते.कारखान्यात पोहचल्यावर ते त्यांच्या वरच्या केबिन मध्ये पोहचले.आपल्या खुर्चीवर बसून त्यांनी थोडा वेळ ऑफिसचे रेंगाळलेली कामे केली.काही वेळ गेल्यानंतर त्यांनी घड्याळात पाहिले,रात्रीचे 9:30 वाजले होते.बाहेर पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता.व्यवहाराची रक्कम घेऊन येणाऱ्या व्यक्तीला कदाचित पावसामुळे उशीर होत असेल असे समजून प्रतापरावानी आपल्या ऑफिस मधील कपाट उघडून त्यातुन व्हिस्कीची बॉटल काढली.ग्लास भरून ते खुर्चीवर बसले, व्हिस्कीचे घोट घेत घेत त्यांनी सिगरेट पेटविली.ग्लासावर ग्लास ते भरत होते.अचानक कारखान्याचा दरवाजा कुणीतरी वाजवत असल्याचे त्यांना जाणवले,ग्लास खाली ठेवून ते कारखान्याच्या बाहेरील दरवाजाजवळ आले,त्यांनी दरवाजा उघडून पाहिले पण बाहेर कुणीच नव्हते.ते दरवाजा बंद करून परत केबिनमध्ये आले.ग्लासात उरलेली व्हिस्की त्यांनी पोटात रिचवून घड्याळात बघितले घड्याळ साडेअकराची वेळ दाखवीत होते. ते केबिनमधून उतरून खाली कारखान्यात आले.त्यांनी पैसे घेऊन येणाऱ्या व्यक्तीला फोन केला तेव्हा समोरची व्यक्ती बोलली "मी सांगितले होते ना की पुढचा नंबर तुमचा आहे बरं".