विदर्भातल्या गावातील एक कुटुंब
विदर्भातल्या गावातील एक कुटुंब
(रमेश काका घरातून अंगणात आले, तर कांताकाकू ओरडत म्हणाल्या)
कांताकाकू-आओ..... हे घ्या ह्यानं हात धुवित जा... निरा त्या सॅनिटाइजर ना हातं चोयत बसता... जरा पाणी लावून धुवित जा..
रमेश अण्णा-आवं हेम्बाडे समझते काय तुले? ह्यानं बी हात चोयले तं चालते म्हने... मगं पाण्याचा नासोडा करण्यापेक्षा बरं हाय ना हे... अजून बोमलतं ना मंग हापशीऊन पाणी आणून आणून कंबर तुटली म्हणून....
कांताकाकू-ओ पण दिवसातून निदान दोनचार वेळा पाणी लावून या हॅन्डवाॅशनं धुवित जा... कई केला का आपलं लावलच व्हय ते सॅनिटाइजर...
रमेश अण्णा-तु बी लावून पाय मस्त वास येते ह्याचा त्या रंग्या मेडीकल वाल्यानं देलं मले हे....
कांताकाकू-नगं बाप्पा माय तर हॅन्डवाशंच बर हाय... अन् बाहेर जाता तं रिकाम्या गोष्टी हाकत नका बसत जाऊ आन् जरा दूर उभे राऊन बोलत जा कारण तुमच्या सारखीच गावातल्या बर्याच लोकाईले थुका उडवत बोलाईची सवय हाय... लवकर घरी येत जा..
(रमेश काका हॅन्डवाॅशनी हात धूवत म्हणाले)
रमेश काका-हावं ना समजते ना मले, अडाणी थोडी हाय मी.,
कांताकाकू-हाव आन् त्या तुमच्या माय ले बिक सांगा ह्यानं हात धुवाले... संडासहून आली की निरा बुढी मातीत हात घासते... घ्यून बसण मंग कोरूना उरावर...
(कमला आजी जवळ जात)
रमेश अण्णा-अवं आई हे घे ,ह्यानं हात धुई... आता सद्या करुना हाय ना मग स्वच्छ हात धुवा लागते ह्यानं मंग होत नाई....अन् बुढ्या बाढायले लवकर खपवते म्हणते तो... धुई ह्यानं हात तुले अजून शंभरी व्हाले तीन वर्षे बाकी हाय...
(कमला आजी जरा घाबरली)
कमलाआजी-अरे बाप्पा.... दे आन हिकडे...
(रमेश अण्णा डोक्यावर हात मारत)
रमेश अण्णा-अवं..अवं ...अवं ..अवं.. पुर्या अंगाले थोड चोया लागते ते फकस्त हात धुवायले म्हटलं तुले...
कमला आजी-(चिडून)अरे माट्या...त्यो कोरन्या फकस्त हातावर थोडीच बसीत असीन पुर्या अंगावर बसीत असीन ना मंग फकस्त हात धुवुन थोडी चाललं.... अन् मले झाला तं तुयी बायकू मले हाकलन्ना घरातून...
(रमेश अण्णा चिडूनआतल्या खोलीत जातजात म्हणाले)
रमेश अण्णा-ते कायले हाकलन तुले... जाय बाप्पा,यकतं घरात बसून हाडं झिजून राईले आन् तुमच्या दोघीच्या मंदात पडला का मायी चटणीच होते त्या पेक्षा मी टिवीवर रामायण पायत बसतो...