निसर्ग राजाला पत्र
निसर्ग राजाला पत्र


प्रिय निसर्गराजा,
पत्र लिहिण्यास कारण की, सर्वप्रथम तुझी मनापासून माफी मागतो.
तुझे आमच्यावर भरपूर उपकार आहेत, तु आमच्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव केला पण आम्ही परोपकारी लोकांनी तुझा नेहमीच फायदा घेतला. त्यामुळे तुझे आमच्यावर चिडणे साहजिकच योग्य आहे. .
सुंदर, स्वच्छ आणि पवित्र मनाचा तु... तुला व तुझ्या लेकरांना आम्ही छळला, त्याचेच पाप आम्ही आता भोगतोय. तु वेळोवेळी आम्हाला सचेत केला पण आम्ही आमच्याच मस्तीत दंग होतो तिच मस्ती आता जिरली आहे ते म्हणतात ना 'जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही'.तु अक्षरशः अश्रूंचे पुर ढासळले तरीही आमच्या मनाला पाझर फुटले नाही. तु आमच्यावर कितीदा कडाक्याच्या आवाजात रागावला तर आम्ही तुझ्या तोंडावर घराचे दार बंद करून तुझा अपमानच केला. तु रागाने तापला सुद्धा तर आम्ही अक्कलशुन्य लोकं निर्लज्जपणे हसलो, तुझ्यावर विनोद केले,तुझी आज्ञा पाळली नाही, तुझ्या मनाचा विचारच केला नाही रे...
आम्ही मानव जात भूतलावरील सर्वात हुशार म्हणून स्वतःच्याच फुशारक्या मारत टेंभा मिरवतो पण आज आम्हाला आमची लायकी ती काय ते कळाले आहे..
तुझ्या लेकरांना चिरूनफाडून खाल्लं आणि अजूनही खातोय, अगदी कोणालाच नाही सोडला... आमच्या बाळाकडे कोणी डोळे वटारून जरी बघितला तरी आम्ही समोरच्याचे डोळे फोडून टाकायला उठतो.. पण आम्हाला तुझं दुख नाही कळालं..आम्ही स्वार्थी लोकांनी तुझ्या लेकरांना नरकयातना देतांना तुझ्या अंतःकरणाला किती त्रास झाला असेल... तरीही तु मुकाट्याने हे सर्व सहन करत होता, पण एखाद्याने किती सहनशीलता दाखवावी त्यालाही मर्यादा असतात ना.. म्हणून तुझं आता चिडून बदला घेणं सार काही बरोबरच आहे राजा...आणि त्याशिवाय आम्ही सुधारणार पण नाही,पण आता आम्हाला पश्चाताप होतोय, आमचे मुलंबाळं, पती ,पत्नी, आई, बाबा, सर्व नातेवाईक मुंग्यांसारखे मरत आहेत रे...
मान्य ,पैशाच्या मोहापायी डोळ्यावर डेव्हलपमेंट नावाची पट्टी बांधून आंधळे झालेलो आम्ही, कितीतरी झाडांची कत्तले केली, तुझ्या लेकरांची घरे उद्ध्वस्त केली रे... आम्हाला तुझ्या सोबतीने सुद्धा ही डेव्हलपमेंट चांगली करता आली असती पण आम्ही तुला लाथ मारून पुढे जाण्याच्या प्रयत्नात आज फसलो. देव म्हणजे तुच रे आमच्या कर्माची फळे आम्हाला देतोय.
पण निसर्गराजा आता हे थांबव रे.... आम्हाला कळली आहे आमची चूक, आता आम्ही आलोत भानावर जेव्हा क्षणाक्षणाला माणसे मरत आहेत. हे बघून भितीने अंगात कापरे भरत आहेत. तु मोठ्या मनाचा आहे म्हणून तर तु राजा आहेस... तु आम्हाला नक्कीच माफ करशील अशी आशा करतो. आम्ही सुद्धा तुझा संसार पुन्हा उभा करायला मदत करू नक्कीच...कारण तुझा संसार फुलायला लागला की आमचा पण आपोआपच फुलेल... आणि जेव्हा जेव्हा मनुष्य चुकेल तर तुला आमचे येथेच्छ कान पिळायचे अधिकार आहे.... परत आम्ही अशी चूक नाही करणार... आम्हाला वाचव रे... तुझ्या पुढे आम्ही काहीच नाही तुच आमचा विधाता आहेस. घे रे आम्हाला तुझ्या विशाल पदरात पुन्हा...
पुन्हा एकदा तुला विनंती आम्हाला माफ कर.
तुझा आपलाच पण जरा स्वार्थी
मनुष्य