विचारांचे रंग
विचारांचे रंग
आज होळी आणि उद्या रंगपंचमी. रस्त्यावर आधीच रंगांची धुंदी पसरली आहे. हशा , आवाज , गुलाल... सगळं काही रंगीत झालं आहे. पण माझ्या मनात मात्र वेगळाच उत्सव सुरू आहे; त्याचा उत्साहही अगदी वेगळाच आहे.
स्वतःची इतरांशी तुलना , कुठल्याही बाबतीतील असुरक्षितता आणि संकुचित स्वार्थ हे सगळं जाळून सत्सत्विवेकबुद्धीने आत्मजाणीव , प्रगल्भता , शांत स्वातंत्र्य आणि समाजहिताची भूमिका या रंगांनी स्वतःला रंगवायला माझा कल जास्त जाणवतोय.
खरं तर होळी , रंगपंचमी हा माझा आवडता सण आहे. मला रंग खेळायला आवडत नाही असं नाही; पण कदाचित मी थोडी अंतर्मुख आहे. गोंधळात माझं मन हरवतं , शांततेत मात्र ते स्वतःला सापडतं. बाहेरचे रंग मला क्षणभर आनंद देतात , पण विचारांचा रंग मला स्थैर्य देतो.
कधीकाळी माझी होळी गुलाबी-पिवळ्या रंगांची नसेल , तर प्रश्नांच्या निराळ्या रंगांची असेल , असं मला वाटलंच नव्हतं. पण काळासोबत जाणवतय बाह्य रंगांपेक्षा अंतर्मनाचे रंग अधिक खोल असतात.
त्वचेवरचा बाह्य रंग तात्पुरता असतो; पण विचारांचा रंग शाश्वत असतो. तो व्यक्तिमत्त्वावर, मनावर आणि कृतीवर उमटतो.
म्हणूनच यावर्षी मी बाहेरून तशी फारशी रंगलेली नाही , म्हंटल एक सण वैचारिकरीत्या साजरा करून बघावा याच कारणास्तव यावेळी माझी होळी ही गुलालाची , रंगांची नाही तर विचारांची आहे.
~वेदश्री
