मी पेन बोलतोय...
मी पेन बोलतोय...
नेहमी प्रमाणे ऑनलाइन क्लास त्याचा अभ्यास आणि इतर विषयांचा अभ्यास करून पुस्तक सुद्धा वाचून झालीत . आता माझं दिवसभऱ्यातील झोपण्यापूर्वीच शेवटचं काम राहीलचं आणि ते म्हणजे कविता लिहिण्याचं.....मी पुढे बोलत नाही तर मला असं वाटलं की कोणातरी माझ्यासोबतचं संवाद साधतय की , म्हणून मी आजूबाजूला पाहिले तर काय ?? बय्या , बय्या , आई शपथ माझा पेनच बोलत होता की !
हां तर मी बोलत होते , ............म्हणजे कविता लिहिण्याचं तेवढ्यात माझा हुशार पेन बोलू लागला , "आणि मी एकदिवस कविता तुझ्याकडून लिहवून घेणार नाही असं अजूनपर्यंत कधी झालं नाही आणि हो , अर्थातच मी होऊ ही देणार नाही." मी म्हंटल , "हो रे . पण तू तर निर्जीव आहेस ना मग , माझ्या सोबत कसा काय बोलतोय ?? मी स्वप्नात तर नाही ना !" तेवढ्यात मी स्वतःला चिमटा काढला , तितक्यात माझा पेन पुन्हा बोलला , "तू खरचं वेडू आहेस गं , मी प्रत्यक्षपणे बोलतोय ना ! तरी लहान मुलांसारखी चिमटा का काढतेय ?"
मी म्हंटल ,"जेम तेम १५ वर्षाची तर आहे रे , असो. तू सांग कसं काय आज माझ्याशी संवाद साधतोय ?" मग तो मला सगळं सांगू लागला आणि आमचा संवाद सुरू झाला .
पेन म्हणाला ,"मी तर एक निर्जीव वस्तू आहे तरी तू माझी इतकी काळजी घेतेस , मला असं वाटत सगळ्याजनांनी आम्हाला अर्थातच पेनला असच सांभाळून ठेवलं पाहिजे आणि पेनला म्हणूनच का , सर्व निर्जीव वस्तूंना सजीवांप्रमाणे वागवलं पाहिजे . तू तुझ्या प्रत्येक वस्तूला सांभाळून ठेवतेस आणि काही झालं नाही तर , लगेच सांभाळून , उचलून पुसून ठेवतेस. म्हणूनच कदाचित तुझी कुठलीही वस्तू दीर्घकाळ टिकते. रोज पुस्तक , खरडा पूसतेस धूळ जमा न व्हावी म्हणून आणि आज मी सगळ्यांना सांगू इच्छितो की , 'द.भा. धामणस्कर' यांनी आपल्या एका कवितेतून विद्यार्थी मित्रांना जो संदेश दिला आहे अगदी त्याचप्रमाणे तुम्ही त्याला वास्तवात उतरवायला हवं . त्यांनी आपल्या 'वस्तू' कवितेत सांगितले आहे की , वस्तूंना सुद्धा भावना असतात मग त्या निर्जीव असल्या तरी , आणि खरचं जश्या भावना तुमच्या मनात असतात , तश्या आमच्या मनात पण असतात , फक्त तुम्ही त्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि समजून घ्यायला हव्या . जर तुम्ही आमची सुद्धा काळजी घेतली तर आम्ही तुम्हाला शेवट पर्यंत साथ देतो . तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांभाळून ठेवलं तर आम्ही अनमोल असं जतन होतो . "
मी म्हंटले , "हो , बरोबर बोललास तू ! मी आधी वस्तूंची काळजी घ्यायचे पण पाहिजे तशी नाही . १० व्या वर्गात 'द.भा. धामणस्कर' यांची कविता समजून घेतल्यापासून मी ते प्रत्यक्ष कृतीत उतरवायला लागले . ते असो . दुसरं काही बोल ना ." मग माझा पेन बोलला ," आमच्या मॅडम च सुरवातीला कौतुक केलय तर ते त्यांना नकोस वाटतंय ! मी फक्त रसिक वाचकांना संदेश देण्याहेतू ते सांगत होतो , नाही तर तुझं कौतुक ते पण मी करणार शक्यच नाही ! असो. मी तुझ्यासमोर माझी खंत सुद्धा व्यक्त करतो ज्याप्रमाणे आधी म्हंटले होते की , आम्हाला सुद्धा भावना असतात हे खरं आहे . परंतु , काही मुलं आमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्नच नाही करत . म्हणजेच स्पष्ट सांगायचं तर , मुलं हातात पेन पकडतात-पकडतात आणि १सेकंड न घालवता लगेच तोंडात टाकतात आणि काही मुलं तर चावून चावून आमचे हाल बेहाल करून सोडतात , कधी आमची पण जागा घेऊन पहा कसं वाटतं ते ? अंदाज बांधू शकता किती गलिच्छ वाटत ते ? आम्ही सहन तरी करतो एवढं सगळं ! तुम्ही करू तरी शकाल काय ?? नाही ना ! ही एक गोष्ट बऱ्याच जणांनी सुधरवायला हवी आणि हो , एक तर राहिलंच शाळेत तास सुरू असताना किंवा मधल्या सुट्टीत बरेच मुलं पेन फाईट हा खेळ खेळतात हा खेळ तर परंपरेने चालत आलेला आहे. खरं तर आम्हाला एकमेकांसोबत काही कारण नसतांना उगाच मारा-पिटी करायला आवडत नाही . त्यानी आम्हाला किती ईजा पोहचतात , जाम लागते ना राव !! "
मी म्हंटले , "पेनबुआ, पेनबुआ इतका का चिडतोय ? मी तुला सर्वांकडून माफी मागतो बघ . फक्त तू तुझा तेवढा राग शांत कर नाही तर मी तुला आणखी एक उपमा देईल , ' चिडका बिब्बा ' म्हणून......पहा बा आता , हो की शांत ! "
मग तो म्हणाला , "हो , हो होतो मी शांत मी माझा राग कधी नाकावर नाही ठेवत तुझ्यासारखा आणि काय गं , तुला तर त्यात पण मस्करी सुचते . तू मला म्हणालीस काय चिडखोर बिब्बा , तूच तर आहे चिडखोर बिब्बी कुठली ! असो , मला तुझ्यासोबतच रोजचा एक क्षण फार आवडतो आणि तो म्हणजे जेव्हा तू रोज रात्री कविता / चारोळी लिहितेस. तो क्षण फक्त तू , तुझे शब्द , मी आणि कागद बस्स आणखी कोणीच नाही . शब्द तुझ्या ओठून जसं जसे ओघळतात , तस तसं तुझ्याहस्ते माझ्याकडून कागदावर त्याचा वार होतो आणि ती कविता लिहिता-लिहिता आणि वाचता-वाचता तू मी आपण दोघेही त्या कवितेत रमून जातो . आज नाही सुचत म्हंटल्यावर हातात फक्त मला आणि कागदाला घेतल्यावर ते पान सुद्धा सुवर्णाक्षरांनी कसं कोरल्या जात काही कळतच नाही आणि खरं तर , सगळे लेखक-लेखिका , कवी-कवयित्री जेव्हा जेव्हा आमच्या साहाय्याने काही तरी नवीन लिहितात ना तेव्हा आम्ही अप्रत्यक्षपणे हे जग अनुभवतो . त्यामध्येच हरवून जातो . यांना एक शब्दच पुरेसा असतो ते एक शब्दापासून अनेक शब्दांची वेणी गुंफत-गुंफत आपला लेख , कविता पूर्ण करतात . "
तितक्यात मी बोलले , "हो , खरचं तो क्षण तर पूर्ण दिवसातून माझा सुद्धा आवडता क्षण असतो . लोक म्हणतात वाईट गोष्टींची सवय लवकर लागते पण , मला तर कवितेची , साहित्याची (मराठी) सवयचं लागलीय . एकप्रकारे लेखक-लेखिका , कवि-कवयित्री लेखनाच्या आहारी जातात आणि मी पण थोडी का होईना मराठी साहित्य , कवितेच्या आहारी जाऊन त्यांची व्यसनी झाली आहे , आणि खरचं एक शब्द भेटला ना तर त्यावर लिहायला जास्त वेळ नाही लागत . आणि जर तुझं बोलणं झालं असेल आणि तू शांत मुकट्याणे राहणार असशील तर आपण आता कविता लिहिण्याचं काम हाती घ्यावं का ? आपल्या आनंदी क्षणाची वेळ जवळच आहे ! " पेन उत्तरला , " हो , हो हो तुझ्यासोबत संवाद साधून बरं वाटलं गं ! " मी पण बोलले , " हो , मलाही ." अखेर आमचा संवाद इथेच थांबून आम्ही कविता लिहायला लागलो .
