Niranjan Niranjan

Drama

3  

Niranjan Niranjan

Drama

वेडा बाळू - अंतिम भाग

वेडा बाळू - अंतिम भाग

9 mins
410


रावसाहेब वाड्यावर पोहोचले तेव्हा त्यांचं मन पश्चातापाने व्यापलं होतं. बाळूवर आपल्या मुलावर आपण किती अन्याय केले हा एकच विचार त्यांच्या मनात घोळत होता. वाड्यात येताच बाळूला शोधत पूर्ण वाडा त्यांनी पालथा घातला. शेवटी ते गोठ्यात गेले. तिथे बाळू गाईंना चारा देण्यात मग्न होता. बाळूला पाहताच रावसाहेबांनी त्याला आलिंगन दिले आणि ते लहान मुलासारखे रडू लागले. रडक्या घोगऱ्या आवाजात ते बोलत होते, “मला माफ कर बाळा, माफ कर! तुला गुरासारखा वागवला, वाटेल ते बोललो, पाठीत लाथा हणल्या, तुझा गाल सुजवला, मी चुकलो बाळा मी खूप मोठी चूक केली, माफ कर, मला माफ कर!” रावसाहेबांच्या अश्रूंमुळे बाळूचा मळका शर्ट खांद्यापाशी भिजला होता. बाळूच्या चेहेऱ्यावर मात्र काहीच बदल नव्हता. त्याचं ते नेहमीचं वेडगळ हसू जणू त्याच्या चेहेऱ्याला कायमचंच चिकटलं होतं. रावसाहेब रडतायत हे त्याला कळत होतं. पण ते आश्रू आनंदाचे, दुःखाचे की पश्चातापाचे आहेत याची त्याला तिळमात्र कल्पना नव्हती.

        

     रावसाहेबांचं बाळूप्रति वागणं आता पूर्णपणे बदललं होतं. त्यांच्या वागण्यात पुत्राबद्दलचं प्रेमतर होतच पण अपराधीपणाची भावना देखील होती. आता ते त्याला सकाळी हवा तेवढा वेळ झोपू देत होते. एवढंच नाही तर तो झोपेतून उठताच रावसाहेब स्वतः चहा बनवून बाळूला देत होते. मधूनच केव्हातरी त्यांची पश्चाताप बुद्धी जागी व्हायची. ‘आपण बाळूसोबत इतके कसे क्रूरपणे वागलो’ या विचाराने त्यांना गहिवरून यायचं. एक दिवस रावसाहेब तालुक्याला जाऊन बाळूसाठी नवीन कपडे घेऊन आले. वाड्यात येताच त्यांनी बाळूला बोलावले व कपड्यांचा ढीग त्याच्यासमोर टाकून ते म्हणाले, “हे बघ बाळू, आता असले मळके, फाटके कपडे वापरायचे नाही.” एवढं बोलून ते म्हणाले, “सांग बरं मी काय म्हणालो ते.” “वववववापरायचे नननननाही” बाळू म्हणाला. “काय वापरायचे नाही?” एखाद्या लहान मुलाशी जसं मोठी माणसं बोलतात तसे रावसाहेब म्हणाले. “फफफफाटके ककककपडे!” हे ऐकून रावसाहेब म्हणाले “बरोबर!” आणि त्यांनी टाळी वाजवली. पुढे रावसाहेब म्हणाले, “आता हे छान छान नवीन कपडे वापरायचे!” “सांग काय वापरायचं?” ते पुन्हा म्हणाले. “ननननवीन ककककपडे.” बाळूने उत्तर दिले. “शाब्बास” रावसाहेब खुश होऊन म्हणाले. एक दिवस रावसाहेब न्हाव्याकडे गेले. रावसाहेबांना पाहून तो एकदम दचकला. रावसाहेब न्हाव्याला म्हणाले, “बबन, उद्या वाड्यावर चक्कर टाक. आमच्या बाळुचे केस कापायचे आहेत.” हे ऐकून न्हावी उडालाच. त्याला काय बोलावं तेच कळेना.


रावसाहेबांना वेड लागलय हे त्याने ऐकलं होतं. पण हे त्याच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. रावसाहेबांना तिथून घालवण्यासाठी तो कसाबसा “हो” म्हणाला. रावसाहेबांनी दिवसभर न्हाव्याची वाट पाहिली पण न्हाव्याने काही दर्शन दिलं नाही. शेवटी न्हाव्याला शिव्यांची लाखोली वाहून रावसाहेबांनी हातात कात्री घेतली, बाळूला पाटावर बसवला व ते बाळुचे केस कापू लागले. बाळूची वेडीवाकडी वाढलेली दाढीही रावसाहेबांनी कात्रीने कापली आणि ते बाळूच्या बदललेल्या रुपाकडे कौतुकाने पाहू लागले. वेड्या बाळुचे केस कापायला रावसाहेबांनी न्हाव्याला वाड्यावर बोलावलं ही बातमी आता घरोघरी पोहोचली आणि गावात चर्चांना उधाण आलं. रावसाहेबांच्या वेडाने आता परिसीमा गाठली आहे अशी खात्री संपूर्ण गावाला झाली होती. गावात सर्वात जास्त शिकलेला माणूस, ज्याने एकेकाळी आर्मीत ब्रिगेडियर पदापर्यँत झेप घेऊन गावाचं नाव आख्या जिल्ह्यात गाजवलं होतं अशा माणसाची ही अवस्था पाहून गावातील जुनी जाणती माणसं दुखावली होती. सर्वात जास्त वाईट गज्याला वाटत होतं. आपल्या मित्राला काहीही करून यातून बाहेर काढायला हवं असं त्याला फार वाटायचं. पण खूप विचार करुनदेखील काहीच मार्ग सापडत नाही हे पाहून तो हतबल झाला होता. त्याने काहीच प्रयत्न केले नाहीत असही नव्हतं. एकदा त्याने त्याच्या ओळखीतल्या एका मानसोपचारतज्ञाला फोन लावला. फोनवरून त्याने रावसाहेबांबद्दल थोडक्यात माहिती डॉक्टरना सांगितली. पण खूप आग्रह करूनदेखील डॉक्टर गावात यायला तयार नव्हते. मी तिथे येऊन काहीही उपयोग होणार नाही. तुम्हालाच त्यांना घेऊन माझ्या हॉस्पिटलमध्ये यावं लागेल. असं डॉक्टरांनी गज्याला सांगितलं. पण हे शक्य नव्हतं.

        

  नदीकाठी रावसाहेब आणि बकुळाच्या गाठीभेटी अजूनही सुरू होत्या. असच एकदा बोलता बोलता ते बकुळाला म्हणाले, “इतके दिवस मी आपल्या बाळूबरोबर फार वाईट वागत आलो. त्याला वाटेल तसं बोललो. अजूनही हे सगळं आठवलं की स्वतः चाच राग येतो.” हे ऐकून बकुळा डोळ्यात पाणी आणून म्हणाली, “लै तरास झेललाय हो माज्या पोरानं. फकस्त तुमीच नाय तर समद्या गावानेच त्येला लै तरास दिलाय. आता तरी त्येला सांभाळा.” “आता मी आपल्या बाळूला हातावरच्या फोडसारखा जपेन. मी त्याच्यासाठी नवीन कपडे देखील आणलेत. मी स्वतःच्या हाताने त्याचे केस कापलेत. तू वाड्यावर एकदा येऊन पहाच कसा राजबिंडा दिसतो आपला बाळू.” हे बोलताना रावसाहेबांचा कंठ दाटून आला होता. 

         

 दुसऱ्या दिवशी रावसाहेब नेहमीप्रमाणे पहाटे उठून नदीकाठावर गेले. बराच वेळ झाला तरी अजून बकुळा तिथे आली नव्हती. रावसाहेब अस्वस्थ झाले होते. इतक्या दिवसात बकुळाने कधी वेळ चुकवली नव्हती. आता क्षितिजावर केशरी रंगाची उधळण करत सूर्याने दर्शन दिलं. बकुळाने मात्र अजूनही रावसाहेबांना दर्शन दिलं नव्हतं. आता मात्र ते चांगलेच वैतागले व तिथून निघाले. वाड्यात पोहोचताच ते झोपायच्या खोलीत गेले व त्यांनी खोलीचं दार आतून लावून घेतलं. पूर्ण दिवसभर ते खोलीबाहेर आले नाहीत. दुपारचं जेवणही ते जेवले नाहीत. दुसऱ्या दिवशी पहाटे ते नदीवर पोहोचले. आजही बकुळा येईल की नाही अशी शंका त्यांच्या मनात होती आणि त्यांची शंका खरी ठरली. बकुळा आली नाही. बराच वेळ वाट पाहून ते वाड्यावर परतले. सलग चार दिवस हेच झालं. बकुळा असं का वगतीये तेच रावसाहेबांना समजत नव्हतं. ‘आपलं काही चुकलं तर नाही ना?’ हा विचार त्यांच्या मनात येऊन गेला. पण खूप विचार करून देखील या प्रश्नाचं योग्य असं उत्तर त्याना मिळत नव्हतं. आतातर रावसाहेबांना जेवणही जाईना. जेवणाचं ताट समोर येताच ते दोन चार घास कसे बसे खायचे व उरलेलं ताट बाजूला सारायचे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खंगत चालली होती. रात्री झोपही लागत नव्हती. ते रात्रभर अंथरुणावर लोळत पडायचे. पहाटे केव्हातरी त्यांना झोप लागायची. असच एकदिवस पहाटे त्यांना झोप लागली असताना एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात बकुळा आली. स्वप्नातच तिला त्यांनी खूप प्रश्न विचारले तेव्हा तिने सांगितलं, “आता तुमास्नी भेटायला मला जमनार न्हाय.” हे ऐकून काकुळतीला येऊन रावसाहेब म्हणाले, “असं करू नकोस ग बकुळा. का मला असा त्रास देतेयस. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय.” “म्या तरी काय करू. माजा बी नाविलाज हाय. माजं जगच आता येगळ हाय. तुमच्या जगात आता मला येता येनार न्हाई.” ती जेकाही बोलली त्यातलं राव साहेबांना काहीच कळत नव्हतं. ते म्हणाले, “मग तुझं जग कुठे आहे सांग मीच तिथे येतो.” हे ऐकून बकुळा म्हणाली, “माज्या जगात यायला पैलं तुमाला मराया लागल.” बकुळा काय बोलली हे रावसाहेबांना समजायला थोडा वेळ जावा लागला. आता रावसाहेबांचा निर्णय झाला होता. हा निर्णय त्यांच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता. पण बकुळासाठी मरायलाही ते तयार होते. ते खंबीरपणे म्हणाले, “ठीक आहे, मी मरायला तयार आहे.” हे ऐकताच बकुळा गायब झाली आणि रावसाहेब स्वप्नातून जागे झाले. 

       

   थोड्या वेळाने आपण काय करून बसलो याची त्यांना जणीव झाली. पण आता माघार घेणं शक्य नव्हतं. आता त्यांना बाळूची काळजी वाटत होती. आपण मेल्यावर बाळूचं कसं होणार या काळजीने त्यांचं मन त्रस्त झालं होतं. त्यांनी वकिलाला फोन लावला व तातडीने वाड्यावर यायला सांगितलं. कुलकर्णी वकील रावसाहेबांचे मित्रच होते. त्यांनाही रावसाहेबांच्या वेडाबद्दल समजलं होतं. पण रावसाहेबांनी आपल्याला एवढ्या तातडीने का बरं बोलावलं असेल या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांना सापडत नव्हतं. थोड्याच वेळात ते वाड्यावर पोहोचले. अंगणात बाळू झाडांना पाणी घालत होता. रावसाहेब व्हरांड्यात बसले होते. ते फारच थकल्यासारखे दिसत होते. चेहेऱ्यावर मात्र एक प्रकारचं समाधान दिसत होतं. कुलकर्णी वकिलांना पाहताच रावसाहेब खुर्चीवरून उठले. त्यांनी हातानेच आत येण्याची खूण केली व वकिलांना खुर्चीवर बसण्यास सांगितलं. इकडचं तिकडचं काहीच न बोलता रावसाहेबांनी थेट विषयालाच हात घातला. ते म्हणाले, “माधव, आज मी माझं मृत्यपत्र लिहिणार आहे आणि त्यासाठीच मी तुला बोलावलंय.” हे वकिलसाहेबांना बिलकुल अपेक्षित नव्हतं. ते म्हणाले, “अरे पण तू मृत्यपत्र….” “का लिहितोयस असच तुला म्हणायचं आहे ना? तू फक्त मी सांगतो ते कर बाकी प्रश्न विचारू नकोस.” वकिलसाहेबांना मध्येच तोडून रावसाहेब म्हणाले. आता बोलण्यात काही अर्थ नाही हे वकिलसाहेबांनी ओळखलं व बॅगेतून एक कागद काढला. “सांग काय लिहायचं.” वकिलसाहेब म्हणाले. “माझी सगळी प्रॉपर्टी या वाड्यासकट माझ्या मृत्यनंतर बाळूच्या नावावर करावी.” हे ऐकून वकीलसाहेबांना धक्काच बसला. पण बोलायची सोय नव्हती. त्यांनी मुकाट्याने रावसाहेबांचे शब्द कागदावर उतरवले. “माझा अंत्यविधी बाळूच्या हातून करावा.” रावसाहेबांनी दुसरा मुद्दा सांगितला. हे ऐकून तर वकिलसाहेब उडालेच. त्यांनी तोही मुद्दा लिहिला व कागद रावसाहेबांकडे देऊन त्यांना सही करायला सांगितली. सही करून झाल्यावर वकिलसाहेबांना आपल्याकडून एक चूक झाली आहे हे लक्षात आलं. मृत्युपत्रासाठी दोन विटनेसची सही लागणार होती. एक सही ते स्वतः करू शकत होते. अजून एक सही लागणार होती. त्यांनी हे रावसाहेबांना सांगायचा प्रयत्न केला पण “तूच काय ते पाहून घे.” असं ते तिरसटपणे म्हणाले. रावसाहेबांचा निरोप घेऊन वकिलसाहेब तिथून निघाले.

        

 रावसाहेब स्वतःचं काहितरी बरवाईट तर करणार नाहीत ना? अशी शंका वकिलसाहेबांच्या मनात आली. वाडयातुन निघताच त्यांनी थेट गज्याचं घर गाठलं. गज्या नेमका काही कामानिमित्त तालुक्याला गेला होता. त्याचा फोनही लागत नव्हता. शेवटी बऱ्याचवेळाने गज्याचा फोन लागला. वकिलसाहेबांनी रावसाहेबांच्या वाड्यावर घडलेलं सर्व काही गज्याला सांगितलं. मी लगेच इथून निघतो असे सांगून गज्याने फोन ठेवला.

       

  वकिलसाहेब जाताच रावसाहेब पुन्हा त्यांच्या झोपायच्या खोलीत आले. कपाटातुन त्यांनी एक डायरी बाहेर काढली. डायरीच्या शेवटच्या पानावर त्यांनी काहीतरी लिहिलं. लिहिताना त्यांचे हात थरथरत होते. लिहून झाल्यावर त्यांनी डायरी बाजूला ठेवली व टेबलवरची झोपेच्या गोळ्यांची डबी उचलली व बूच उघडलं. डबीत फक्त दोनच गोळ्या शिल्लक पाहून रावसाहेब निराश झाले. आता त्यांना मरणासाठी दुसरा मार्ग शोधणं भाग होतं. बराच वेळ विचार केल्यावर त्यांना मार्ग सापडला. रावसाहेबांनी पुन्हा कपाटाचं दार उघडलं व आतून एक डबी बाहेर काढली. काही वर्षांपूर्वी रावसाहेबांनी उंदीर मारण्यासाठी ही विषाची डबी आणली होती. त्यांनी डबीचं झाकण उघडलं. रावसाहेबांचा हात आता थरथरत नव्हता. चेहेऱ्यावर वेगळंच समाधान होतं. कारण आता लवकरच ते बकुळाच्या जगात जाणार होते. रावसाहेबांनी विष घशात ओतून डबी रिकामी केली आणि दोन्ही हातांनी तोंड दाबून धरलं. काही क्षणातच मासा पाण्याबाहेर येताच जसा तडफडतो तसं रावसाहेबांचं पूर्ण शरीरच तडफडू लागलं. तोंडातून फेस आला. थोड्यावेळाने ही तडफड थांबली. 

           

तालुक्यातून येताच गज्या थेट वकिलांकडे गेला. दोघेही तात्काळ वाड्याकडे निघाले. वाड्यावर पोहोचताच दारातच बाळू बसलेला त्यांना दिसला. तो शेरुकडे पाहत काहीतरी पुटपुटत होता. दोघेही थेट रावसाहेबांच्या खोलीत गेले आणि समोरचं दृश्य पाहून आपण पोहोचायला उशीर केला याची त्यांना जाणीव झाली. समोर बेडवर रावसाहेब निःचेष्ट पहुडले होते. त्यांच्या तोंडून फेस आला होता. त्यांच्या बाजूलाच बेडवर एक छोटी डबी होती. गज्याने पुढे जाऊन टेबलवरची डायरी उचलली. तिच्या प्रत्येक पानावर रावसाहेबांनी बकुळासोबत झालेला संवाद लिहिला होता. गज्याने डायरीचं शेवटचं पान उघडलं. त्यावरचा मजकूर वाचून त्याला धक्काच बसला. त्यावर लिहिलं होतं-

 

प्रिय गज्यास,


तुला मी फार त्रास दिला ना रे? मी तुझ्या अंगावर ओरडलो. पण तू मला माफ करशीलच याची मला खात्री आहे. मी तरी काय करू रे! तुला तर माहीतच आहे माझं बकुळावर किती प्रेम आहे! आता मी हे जग सोडून चाललोय. कायमचा. आता मी बकुळाच्या जगात जाणार आहे. तसही तुम्ही सगळ्यांनी मला वेडा ठरवलच आहे. पण माझी काळजी करू नकोस. जाता जाता तुझ्यावर एक मोठी जबाबदारी टाकून जात आहे. माझ्या पश्चात माझ्या लाडक्या बाळूला सांभाळ. असही मी माझी सर्व प्रॉपर्टी त्याच्या नावावर केली आहे, पण कोणीही त्याला फसवू शकतो. फार भोळा आहे रे तो. पुन्हा भेटू असं लिहायची फार इच्छा आहे पण ते आता शक्य नाही. 


तुझाच लाडका रावसाहेब


गज्याच्या डोळ्यातले आश्रू थांबत नव्हते. तो गहिवरल्या आवाजात वकीलसाहेबांना म्हणाला, “अंत्यविधीची तयारी करा.” रावसाहेबांच्या अंत्यविधला पूर्ण गाव हजर होतं. रावसाहेबांचा मृतदेह तिरडीवर ठेवला होता. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी झाली होती. चार जणांनी मृतदेह उचलून सरणावर ठेवला. गज्याने बाळूच्या हातात मृतदेह जाळायसाठीची काठी दिली. गज्याने सांगताच बाळूने त्या काठीने सरण पेटवलं. बाळूला अग्नि देताना पाहून लोकांची कुजबुज वाढली. नेहमीप्रमाणे वेडगळ हसत रावसाहेबांच्या मृतदेहाला अग्नी देणाऱ्या बाळूकडे पाहताना कोणाचाच स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

         

गज्याचं लक्ष बाजूलाच उभ्या असलेल्या एका स्त्रीकडे वेधलं होतं. त्या स्त्रीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. त्याला तिचा चेहेरा ओळखीचा वाटत होता. चेहेऱ्यावरील सुरकुत्यांमुळे वय जाणवत होतं. तरीपण ती तरुणपणी फारच सुंदर असणार हे तिच्याकडे पाहून कोणीही सांगितलं असतं. आता गज्याने त्या स्त्रीला ओळखलं होतं. अंत्यविधी उरकताच तिच्याशी बोलायचं गज्याने मनोमन ठरवलं. लोकांची कुजबुज अजूनही सुरूच होती. एकदाचा अंत्यविधी संपला व हळूहळू गर्दी पांगली. गज्याचं लक्ष मात्र त्या स्त्रीकडेच होतं. तीने जळणाऱ्या चितेकडे पाहून दोन्ही हात जोडून नमस्कार केला व ती मागे वळून रस्त्याला लागली. गज्यापण तिच्यामागे जाऊ लागला पण काही क्षणातच तो थांबला. आता बोलून काहीच फायदा नाही याची जाणीव त्याला झाली होती. ‘आधीच आली असतीस तर हा दिवस पाहावा लागला नसता’ तो मनातच त्या स्त्रीला उद्देशून म्हणाला व तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला.

        

  अंत्यविधी संपताच गज्याने गुरुजींचा निरोप घेतला व तो बाळूसोबत वाड्यावर आला. आजची रात्र तो वाड्यावरच थांबणार होता. आता रात्र झाली होती. शेजारच्या घरातल्या काकूंनी पिठलंभात दिला होता. तो खाऊन दोघेही झोपले. बाळूला लगेच झोप लागली. गज्याला मात्र काहिकेल्या झोप लागत नव्हती. लागेल तरी कशी? पहाट होताच कोंबडा अरवला तसा बाळू जागा झाला. त्याने बाजूलाच झोपलेल्या गज्याकडे पाहिले व चहा करण्यासाठी तो स्वयंपाकघरात गेला. चहा तयार झाल्यावर त्याने कपात ओतला. कप हातात घेऊन तो व्हरांड्यात गेला. मात्र त्याला तिथे रावसाहेब दिसले नाहीत. आता बाळू रावसाहेबांच्या खोलीकडे गेला. त्याने दरवाजा हाताने ढकलला व आत डोकावून पाहिलं. तिथेही रावसाहेब दिसेनात हे पाहून तो तिथेच दारापाशी खाली बसला. त्याने एकदा समोरच्या चित्राकडे पाहिले व चहाचा कप ओठांना लावला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama