STORYMIRROR

Nagesh S Shewalkar

Tragedy Others

5.0  

Nagesh S Shewalkar

Tragedy Others

वेड मोबाईलचे!

वेड मोबाईलचे!

9 mins
825


    सायंकाळची वेळ होती. शहरातील एका नामांकित आणि मोठ्या दवाखान्यात अतिदक्षता विभागाच्या बाहेर कमलाकर आणि कुसुम हे तरुण जोडपे बसून होते. दोघेही अत्यंत निराश आणि रडवेले चेहरे करून बसले होते. कुसुमचे डोळे रडून रडून सुजले होते. दोन दिवसांपासून जेवण घशाखाली उतरत नसल्यामुळे, अत्यंत दुःखामुळे चेहरा सुजला होता. घसा बसला होता. घशातून आवाजही निघत नव्हता. परिस्थिती तशी नाजूक होती. कमलाकर, कुसुम यांचा तिसऱ्या वर्गात शिकणारा अजय नावाचा मुलगा अतिदक्षता विभागात गंभीर अवस्थेत होता. त्याचे आजारी पडण्याचे कारण म्हटले तर गंभीर होते, म्हटले तर क्षुल्लक होते. त्याच्या तशा परिस्थितीचा दोष कुणाला द्यावा हा प्रश्न होता. जो कुणी दवाखान्यात भेटायला येई त्याला कुसुम सांगायची, "अजयच्या आजच्या परिस्थितीतला मीच जबाबदार आहे. वेळीच त्याला सावरले नाही आणि तो त्या चक्रव्युहात शिरला. आई म्हणून सुरुवातीला मी त्याचे कौतुकाने लाड केले, हट्ट पुरवत गेले त्यामुळेच त्याची ही अवस्था झाली आहे...." ऐकणारा तिची जमेल तशी समजूत काढण्याचा प्रयत्न करीत असे.

        

कमलाकर सतत इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. मध्येच ज्या दालनात अजयला ठेवले होते त्या दरवाजाला असलेल्या एका गोल छिद्रातून तो आत डोकावून बघत असे. अजयला सातत्याने सलाईन सुरू होते. अजयकडे पाहिले की, कमलाकरला वाटत होते, अजय काही तरी पुटपुटत आहे, काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे ओठ सारखे हलल्याप्रमाणे दिसत होते. दाराजवळ खुर्चीवर बसलेली कुसुम भूतकाळात गेली होती.

        

 कमलाकर-कुसुम यांच्या लग्नाला एक वर्ष झाले असताना त्यांना अत्यंत गोंडस असा मुलगा झाला. सर्वांना खूप आनंद झाला. भेटायला येणारा प्रत्येक जण बाळाचे कौतुक करत होता. बारशाच्या दिवशी बाळाचे नाव अजय असे ठेवले. अजय खरेच सुरेख होता. पाहताक्षणी उचलून घेऊन पापा घेण्याचा मोह सर्वांनाच होत असे. अजय खूप शांत होता, खेळकर होता. लहानपणापासून मुळीच रडका नव्हता. हळूहळू अजय मोठा होत होता. त्याची चंद्रकलेप्रमाणे वाढ होत होती तसतसा तो खेळकर, खोडकर होत होता. कमलाकर-कुसुम दोघेच त्या शहरात राहत होते. दोघांचेही आईवडील नोकरीला असल्यामुळे अजय दोन महिन्याचा होईपर्यंत आलटून पालटून दोघांच्याही आई राहत होत्या. अजय दोन महिन्याचा झाला आणि ते दोघेच त्याला घेऊन राहू लागले. वयाच्या मानाने अजयचा काहीही त्रास नव्हता. त्याच्या साऱ्या वेळा सांभाळल्या की, तो आपला आपण मस्त खेळत असे. दोन्ही आजोबा-आजी दररोज सकाळ-संध्याकाळी व्हिडीओ कॉल करून अजयसोबत गप्पा मारत असत. अजयशी गप्पा मारल्या, त्याच्याशी खेळले, त्याला मनसोक्त पाहिले की, सर्वांना खूप आनंद होत असे, एक समाधान मिळत असे. एखादेवेळी अजयचा मुड बघून मोबाईलवर खास बालकांसाठी असलेली बालगीते अजयला ऐकवल्या जाऊ लागली. अजयही काही समजत नसले तरी शांतपणे पडून ती गाणी ऐकत असे. ती गाणी ऐकण्याचा त्याला कुणाच्याही नकळत छंद लागला. गाणी ऐकायची रोजची वेळ झाली की, तो हातपाय आपटत असे, इकडे तिकडे बघत असे, मधूनच ओरडत असे तर कधीकधी रडतही असे. त्याचा तो गाणी ऐकण्याचा छंद सर्वत्र औत्सुक्याचा विषय झाला. आजोबा-आजीसोबत मावशी-मामा, काका-काकू, आत्या-मामा अशा अनेक नातेवाईकांपर्यंत त्याची आवड पोहोचू लागली, त्याचे कौतुक होऊ लागले.


अजय सहा-सात महिन्याचा झाला आणि त्याला हळूहळू जेवण द्यायला सुरुवात झाली. प्रथम अजय मजेने खात होता पण नंतर त्याला कंटाळा आला, इच्छा नसली की, तो खात नसे. मानेला झटके देत समोर आलेला घास खायला नकार देत असे. प्रसंगी रडतही असे. ते पाहून कुसुमला एक उपाय सुचला. एकेदिवशी त्याने चार-पाच तास काही खाल्ले नाही हे पाहून कुसुमने बालगीताचा व्हिडिओ लावून अजयसमोर लावला आणि काय आश्चर्य दुसऱ्याच क्षणी अजयने वरणभात गटागटा खाल्ला. सहज म्हणून केलेला तो प्रयोग नंतरनंतर रोजच सुरू झाला. मोबाईल लावल्याशिवाय अजय घासही घेत नव्हता. अधूनमधून येणाऱ्या दोघांच्या आईवडिलांच्या लक्षात तो प्रकार आला. कुसुमची आई म्हणाली, "कुसुम, हा मोबाईलचा नाद बरा नव्हे ग. एवढ्या लहान वयात तो असा मोबाईलच्या आहारी जात असेल तर पुढे त्याला आणि तुलाही खूप त्रास होईल बरे."

"अगं, आई, तू सकाळी बघितलेस ना, गाणे लावेपर्यंत तो एक तरी घास घेत होता का? गाणे लावताच कसे शांतपणे जेवण केले ते." कुसुम म्हणाली.

"पाहिले आम्ही. आधी कौतुक वाटले पण नंतर भविष्याचा विचार केला. त्याला अशीच सवय लागली तर उद्या तू नोकरीवर हजर होशील तेव्हा पाळणाघरात अशी व्यवस्था नसली तर मग काय करशील? तो राहिल का तिथे? सध्या रजेवर आहेस, घरी आहेस तर ही सवय तोडून टाक." कुसुमचे बाबा म्हणाले.


त्याचदिवशी सायंकाळी कुसुमने ताजाताजा वरणभात घेतला आणि अजयला मांडीवर घेऊन त्याला घास भरवायला सुरुवात केली पण अजयचे तोंड गच्च मिटलेले. कितीही प्रयत्न केले, त्याला आवाज दिला तरी तो तोंड उघडायचे नाव घेत नव्हता. कुसुमने बळेबळे एक घास त्याच्या तोंडात अक्षरशः कोंबला पण अजयने लगेचच तो घास बाहेर टाकला.

"आई, बघितलेस का? खातोय का एक घास तरी...."

"थांब थोडे. भूक लागली की, खाईल आपोआप. न खाऊन कुणाला सांगेल." कुसुमची आई म्हणाली आणि कुसुमने ताट बाजूला सरकवले. काही क्षण गेले आणि बहुतेक भूक लागल्यामुळे अजयने रडायला सुरुवात केली.

"बघ त्याला भूक लागलीय. आता कसा मटामटा खातो का नाही? भूक लागली की सारे नखरे बंद होतील." कुसुमची आई म्हणाली. तसा कुसुमने वरण-भाताचा एक घास घेतला आणि रडणाऱ्या अजयच्या तोंडात पटकन टाकला पण घास जीभेवर टेकला न टेकला की, अजयने तो बाहेर फेकला. पाठोपाठ जोरजोरात रडायला सुरुवात केली. डोळ्यातून पाणी गळू लागले. चेहरा लालभडक झाला, घामाने डबडबला, हातपाय आपटू लागला.

"आई, बघतेस ना तू? सांग आता...." असे म्हणत कुसुमने मोबाईलवर गाणे सुरू केले आणि काय आश्चर्य एका क्षणात अजयचे रडणे कमी झाले. पाठोपाठ कुसुमने ओठाजवळ आणलेला घास अजयने हुंदके देत पटकन तोंडात घेतला ते पाहून कुसुमची आई त्याच्याकडे बघत दोन्ही हात जोडून हसत म्हणाली,

"धन्य आहे ग बाई. एवढुसं बाळ नाही पण अक्कल किती आलीय ना? काही खरे नाही ग बाई तुझे."

        

काही दिवसांनी कुसुमचे सासू-सासरे आले त्यावेळीही तसाच प्रकार घडला. अजयला जेवताना गाणे ऐकायची आवड आहे. गाणे लावले की, तो आवडीने, चवीने जेवण करतो ही त्याची कौतुकास्पद कामगिरी सर्वत्र पसरली. एखाद्या नातेवाईकांच्या, मित्राकडील कार्यक्रमात कमलाकर-कुसुम गेले की, तिथेही अजयचे जेवण सांग्रसंगीत होत असे. हा कौतुकसोहळा इथेच थांबला नाही तर अजयला शी-शू करतानाही गाणी लावून द्यावी लागत होती. सुरुवातीचे कौतुक, औत्सुक्य नंतर त्रागा करण्यात, राग राग करण्यात, संताप करण्यात बदलले. जिथे अजयला प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल लागत असे तिथे कालांतराने त्रस्त झालेल्या त्याच्या आईबाबांची अवस्था रागावणे, हात उगारणे आणि शेवटी मारणे इथपर्यंत गेली.

        

यथावकाश अजयला पाळणाघरात ठेवून कमलाकर-कुसुम नोकरीवर जाऊ लागले. सुरुवातीला काही दिवस अजय मोबाईल न लावल्यामुळे पाळणाघरात खूप गर्दा, आरडाओरडा, रडणे अस प्रकार करु लागला पण नंतर काही इलाज चालत नाही हे पाहून त्या छोट्या, गोंडस बाळाने त्या परिस्थितीशी जुळवून घेतले मात्र घरी आला की, प्रत्येक गोष्टीसाठी त्याला मोबाईल द्यावाच लागे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन-अडीच वर्षे वय असलेला अजय हळूहळू मोबाईलवर गाणी लावायला शिकला. आपली आवडती गाणी लावून तो साऱ्या नैसर्गिक प्रक्रिया करू लागला. झोपताना त्याला गाणे लावून द्यावे लागे. रात्री ही त्याला मोबाईल जवळच लागत असे. रात्री जाग आल्यावरही जवळ असलेल्या मोबाईलवर तो गाणे लावायचा आणि ऐकत झोपी जायचा. त्यामुळे कमलाकर-कुसुम यांची झोपमोड होत असे.

       &

nbsp;

पाळणाघरातून अजयचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्ले ग्रुपमध्ये प्रवेश झाला. नंतर एक-एक पायरी तो यशस्वीपणे पार करत गेला. मुळात अजय अत्यंत तल्लख बुद्धीचा, एकपाठी असा मुलगा होता. शाळेचे असो वा घरचे असो सारे काही तो लगेचच आत्मसात करीत होता. त्यामुळे तो शाळेतही शिक्षकप्रिय होता. शाळेतील प्रत्येक शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचा सहभाग असायचा. पाऊल पडते पुढे याप्रमाणे तो तिसऱ्या वर्गात गेला. त्यावर्षी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने स्वतःसाठी स्वतंत्र मोबाईलची मागणी केली नव्हे तो हट्टालाच पेटला. काही केल्या अजय ऐकत नाही हे पाहून कमलाकर म्हणाला,"एका अटीवर तुला मोबाईल मिळेल..." बाबांना थांबवत अजय म्हणाला,

"मी शाळेचा, शिकवणीचा गृहपाठ नियमितपणे करेल. शाळेत वेळेवर जाईन. अभ्यास झाल्यावर मगच मोबाईल हातात घेईन. अजूनही काही अटी असतील तर सांगा..." शेवटी अजयच्या मनाप्रमाणे झाले. त्याला तिसऱ्या वर्गात शिकत असताना, जेमतेम नऊ वर्षे वय असताना स्वतःचा मोबाईल मिळाला. अजयची तिसऱ्या वर्गाची प्रथम सत्र परीक्षा झाली त्यामुळे स्वारी आनंदात होती. दिवसभर फक्त मोबाईल आणि मोबाईल! दुसरा कोणताही खेळ त्याला आवडायचा नाही. दिवाळी तोंडावर असताना कुसुमला अजयच्या वर्गशिक्षिकेचा फोन आला.

"कुसुमताई, आज तुम्हाला वेळ मिळेल का? शाळेत येऊन भेटाल का?"

"का हो? काही महत्त्वाचे काम आहे का?"

"म्हणून तर भेटायला बोलावत आहे."

"अजयबद्दल काही बोलायचे आहे का? सारे व्यवस्थित आहे ना?"

"प्लीज तुम्ही या ना. भेटल्यावर बोलूया. आणि हो अजयलाही घेऊन या" असे म्हणत बाईंनी फोन बंद केला.

"अजय, चल शाळेत जायचे आहे..." कुसुम अजयला म्हणाली. कमलाकर सकाळीच कार्यालयात गेला होता. त्याला तसे फोनवर कळवले.

"आई, शाळेत? सुट्टी आहे ना?"

"हो. पण तुझ्या बाईंचा फोन आला होता. आपल्याला दोघांनाही बोलावले होते."

"काय पण बुवा. सुट्टी असूनही..."

"अजय, खरे सांग, तू शाळेत काही गोंधळ घातला नाहीस ना? कुणाशी भांडण वगैरे तर केले नाही ना? चल पटकन. मला पुन्हा कंपनीत जायचे आहे." कुसुम म्हणाली आणि काही वेळातच ते दोघे अजयच्या बाईंच्या समोर होते.

"या. या. बसा. काय अजय, काय म्हणतात सुट्ट्या?" बाईंनी अजयला विचारले.

"मस्त चालू आहे."

"अरे व्वा! मज्जा आहे तुझी. मोबाईल खेळतोस की नाही? बरे, तू परीक्षेच्या शेवटच्या दिवशी आला नव्हतास का? आजारी होतास काय?" बाईंनी विचारले आणि कुसुमने आश्चर्याने अजयकडे पाहिले तसा अजयने चेहरा दुसरीकडे वळवला.

"म्हणजे? अजय परीक्षेला नव्हता? असे कसे शक्य आहे?"

"आम्हालाही आश्चर्य वाटले. महत्त्वाचे म्हणजे ज्या विषयांची त्याने परीक्षा दिली आहे त्यातही त्याची प्रगती फारशी समाधानकारक नाही."

"कशी असणार? वर्गात मोबाईल आणून खेळत बसायचा. शिकवण्याकडे त्याचे बिल्कुल लक्ष नसायचे. आम्ही तुम्हाला दोन वेळा पत्रं दिली आहेत. अजय, तू पत्रं नाही दिली का?" दुसऱ्या बाईंनी विचारले.

"नाही हो. मला एकही पत्र मिळाले नाही. हा मोबाईल शाळेत आणतोय हेही आत्ता समजले. सकाळी लवकर निघावे लागते म्हणून मी रात्रीच याचे दप्तर आवरून द्यायचे त्यामुळे सकाळी मी पुन्हा दप्तर पाहायचे नाही. याचा अर्थ मी दप्तर तयार करून दिल्यावर तू मोबाईल टाकत होतास तर....?" कुसुमने रागारागाने विचारले.

"हे बघा. अजय आजारी असल्याचे शेवटच्या दिवसाचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणून द्या आणि दुसऱ्या सत्रात विशेष काळजी घ्या तरच तो पुढील वर्गात जाईल. या आता. आणि हो, त्याला शिक्षा वगैरे न करता समजावून सांगा..."


बाई काय बोलतात याकडे लक्ष नसलेल्या अवस्थेत कुसुमने अजयचा हात धरून त्याला फरफटत बाहेर आणले. ऑटो करून घरी परतताना कुसुमने कंपनीत रजा कळवली आणि कमलाकरला फोन करून घरी बोलावले. मोठ्या कष्टाने स्वतःच्या रागावर ताबा मिळवलेल्या कुसुमचे घरी पोहोचताच स्वतःवरील नियंत्रण सुटले आणि तिने अजयला दणादण मारायला सुरुवात केली. कमलाकर घरी पोहोचला. पाहतो तर काय अजय आणि कुसुम दोघेही रडत होते. अजयच्या गालावर माराचे वळ होते. त्याचा चेहरा सुजला होता. त्या दोघांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहणाऱ्या कमलाकरला कुसुमने सारे काही ऐकवले. ते ऐकून कमलाकरचाही रागाचा पारा चढला. त्यानेही अजयला मारायला सुरुवात केली. त्याचा रट्टा चुकवताना अजयचा तोल गेला आणि तो पलंगावर आदळत असताना पलंगाचा काठ त्याच्या डोक्याला लागला. तिथे खोच पडली. भळभळ रक्त वाहत असल्याचे पाहून दोघेही घाबरले. कमलाकरने तातडीने त्याला उचलले. खिशातून रुमाल काढून जखमेवर गच्च बांधला. अजयला घेऊन दोघेही दवाखान्यात पोहचले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आणि काय घडले अशी चौकशी केली. कमलाकर-कुसुमने सारे काही सांगितले. ते ऐकून डॉक्टर म्हणाले, "तुम्ही आजचे पालक इथेच चुकताय. पराकोटीचे लाड, हट्टही पुरवता आणि मग रागही असा काढता. अगोदर स्वतःला त्रास होऊ नये म्हणून मोबाईलची सवय लावता आणि मग डोक्यावरून पाणी जाऊ लागले, प्रकरण हाताबाहेर गेले की, ही अशी शिक्षा करता. नशीब चांगले की, जखम खोल नाही पण माराचा आणि घडलेल्या प्रकरणाचा मनावर फार मोठा परिणाम झाला आहे..."

"पण डॉक्टर, त्याला काही होणार तर नाही ना?" कुसुमने विचारले.

" शुद्धीवर आल्याशिवाय काही सांगता येणार नाही."


       खुर्चीवर बसलेली कुसुम भूतकाळात हरवलेली असताना अतिदक्षता विभागाचा दरवाजा उघडून डॉक्टर बाहेर आलेले पाहून कमलाकर, कुसुम आणि दोघांचेही आईवडील तिकडे धावले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून डॉक्टर म्हणाले,

"तो अजूनही शुद्धीवर आलेला नाही पण कालपेक्षा आज प्रकृतीत सुधारणा आहे....."

"पण मग डॉक्टर, काही औषधोपचार?" कमलाकरने विचारले.

"आहे. एक इलाज आहे...."

"मग... मग डॉक्टर, विचार का करताय? पैशाची चिंता..."

"नाही प्रश्न तो नाही तर मोबाईलचा आहे..."

"म्हणजे?"

"अजय बेशुद्ध असला तरीही त्याचे ओठ काही तरी पुटपुटत आहेत. आम्ही अंदाज काढला की, तो मोबाईल... मोबाईल असे म्हणतोय..."

"काय? म्हणजे?"

"होय. त्याच्या आवडीचे गाणे मोबाईलवर लावून त्याला ऐकवा. माझा अंदाज आहे, काही क्षणातच तो बोलायला लागेल, उठून बसेल. मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचे ते पण सध्या तरी औषधापेक्षा रामबाण उपाय तोच दिसत आहे. हळूहळू आपल्याला त्याचे मोबाईलचे वेड वेगळ्या मार्गाने दूर करता येईल." शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कमलाकर आणि कुसुम अजयजवळ पोहोचले. पाठोपाठ डॉक्टर आणि दोघांचेही आईवडील होते. अजयजवळ बसून कुसुमने अजयच्या आवडीचे गाणे मोबाईलवर लावले आणि मोबाईल अजयच्या कानाजवळ धरला. गाणे सुरू झाले. एक कडवे होते न होते तोच अजयने हातपाय हलवले. दुसरे कडवे होईपर्यंत त्याने डोळे उघडले आणि गाणे संपेपर्यंत अजय सर्वांकडे पाहून केविलवाणा हसू लागला. दुसरे गाणे संपत असताना मोबाईल बंद करून तो म्हणाला,"आई, ठेवून दे मोबाईल. बाबा, तो मोबाईल दुकानदाराला वापस करून टाका. मला नकोय आता. मला आता खूप अभ्यास करायचा आहे." अजय तसे बोलत असताना कुसुमने त्याला घट्ट आवळले आणि त्याचे असंख्य पापे घेतले.


        काही महिन्यांनंतरची सकाळ. अजयची वार्षिक परीक्षा संपली होती. त्याला सुट्ट्या होत्या. त्याच्यासोबत राहता यावे म्हणून कुसुमनेही महिन्याभराची रजा टाकली होती. दोघे मिळून दिवसभर मजा करत होते. तितक्यात कुसुमचा मोबाईल वाजला. त्यावर अजयच्या बाईंचे नाव पाहताच तिला धस्स झाले. थरथरत्या हाताने अजयकडे बघत तिने मोबाईल उचलला आणि म्हणाली,

"म...म...मॅडम...."

"अजयच्या आई, अशा घाबरू नका. अजयची दुसऱ्या सत्रातील प्रगती सांगावी म्हणून फोन केला आहे. अहो, दुसऱ्या सत्रात अजय वर्गात प्रथम आला आहे." बाई काय सांगताय याकडे लक्ष न देता हातातला मोबाईल तसाच दिवाणवर फेकून कुसुम धावत अजयजवळ गेली. अजयला कवेत घेऊन तिने त्याचे असंख्य पापे घेत त्याला घट्ट कवटाळले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy