madhuri dipak patil

Inspirational

3  

madhuri dipak patil

Inspirational

वास्तु-आशीर्वाद

वास्तु-आशीर्वाद

9 mins
403


कोंबड्याने बाक दिली की सुमतीताई उठून कमरेला पदर खोचून कामाला लागायच्या. साधारण: पहाटे पाच वाजता कोंबडा बाक द्यायचा.... त्यावेळी उठल्यापासून ते राञी दहा वाजता झोपेपर्यंत त्यांचा हात चालूच असायचा. ना कामाचा कंटाळा, ना शरीर थकल्याची तक्रार.... त्यांना सगळं कसं चकचकीत आणि टापटिपीत लागायचं...


नागठाणे गावाचं नाव....डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं होतं.....गावातून नदी जायची तिही बारमाही पाणी असलेली...!


गावात एक भलंमोठं खानदानी सोपस्कार पाळणारं घर होतं. महत्त्वाचं म्हणजे हे घर स्ञीच्या नावाने म्हणजे 'सुमतीताईंचं घर' म्हणून ओळखलं जायचं.


सुमतीताईंचं वय पन्नास वर्षे होतं. पती नारायणरावांचा मसाले व्यवसाय होता. तोही परंपरेने चालत आलेला. माञ त्यात प्रत्येक पिढी स्वत:चे कष्ट ओतत गेल्याने आजच्या काळात राणे मसाले पूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले होते... नारायणराव आणि सुमतीताई यांना तीन मुलं आणि एक मुलगी होती. त्यामधील दोघेजण मसाले व्यवसायात गुंतले होते तर तिसर्‍या मुलाने रिअल इस्टेटमध्ये स्वत:चा बिझनेस उभा केला होता. मुलगीही डाॅक्टर असून तिचं लग्न झालं होतं.

सुमतीताईंच्या तिन्ही मुलांची लग्न झाली होती आणि तिन्हीही सुना मुलांना साजेशा आणि सुशिक्षित होत्या. तिघीही जाॅब करत होत्या....रुद्र, ऋग्वेद, जय आणि नंदिनी चौघांवरही सुमतीताई आणि नारायणरावांनी खू प चांगले संस्कार केले होते..... त्यांची "श्रम-साफल्य" वास्तू आणि त्यातील लोक संपूर्ण गावासाठी आदर्श होती.


रुद्र, ऋग्वेद आणि जय तिघांनीही स्वत:च्या पसंतीने लग्न करून निलीमा, मालती आणि ञिशा यांना घरी आणलं होतं. मुलं मोठी झाल्यावर त्यांना त्यांचं बरं-वाईट समजतं; त्यामुळे सुमतीताईंनी मुलांच्या पसंतीला स्वत:ची अनुमती देऊन सुनांना मोठ्या मानाने घरी आणलं होतं....आणि कायम मानाने वागवत होत्या. माञ नंदिनीचं लग्न त्यांनी स्वत: तिच्यासाठी मुलगा पसंत करून केलं होतं.....अर्थातच नंदिनी सुमतीताईंचीच सावली असल्याने तिने आनंदाने आईच्या निर्णयाला सहमती दिली होती व ती तिच्या संसारात खूष देखील होती...!


सुनबाई सुशिक्षीत, हायली एज्युकेटेड त्यामुळे सुमतीताईंचे घरातील काही सोपस्कार त्या मानत नसायच्या. सुमतीताई जरी जुन्या काळातील असल्या तरी त्या शिक्षणाची गोडी आणि हौस असणार्‍या असल्याने त्या सुनांना जास्त काही बोलायच्या नाहीत...त्यांच्या कलेने घेत त्यांना घरातल्या सर्व गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करीत. मग स्वयंपाक करणे असो वा बाहेरील अंगणात सडा मारून रांगोळी काढणं असो....!


तिन्हीही मुलं सकाळी लवकर उठून लवकर त्यांनी सुरू केलेल्या बिझनेसच्या मागे लागत आई-बाबांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडायचे....तसेच घरात येताना पहिल्यांदा घरातील उंबरठ्याला हात लावून नमस्कार करून मगच ते घरात प्रवेश करत....नियमच होता तसा सुमतीताईंचा. रूद्र, ऋग्वेद आणि जय यांना लहानपणापासून ती सवय अंगवळणी पडली होती.


सुमतीताईंच्या मते आपण वर्षानुवर्षे राहत असलेली वास्तु आपणाला आशीर्वाद देत असते. त्या वास्तूचा आदर म्हणून घरात प्रवेश करताना आपण वास्तुचे आभार मानूनच घरात प्रवेश करावयाचा.


निलीमा घरूनच आॅनलाईन गायनाचे क्लास घ्यायची, मालतीचे ज्वेलरी शाॅप होते तर ञिशा सध्या घरीच होती पण फॅशन डिझायनिंगचा क्लास करत होती. तिघी सुनाही फार हुशार आणि कामात व्यस्त असणार्‍या होत्या....पण सुमतीताईंचे नियम त्यांनाही खटकायचे....ते नियम पाळायला त्या कानकून करायच्या. सुनांच्या मते, जग कुठे चाललंय आणि आपल्या सासूबाई अजून घराला नमस्कार करा, अंगणात रांगोळी काढा, घर स्वच्छ-टापटीप ठेवा, पाहुण्यांचं आदरातिथ्य करा, देवपूजा करा या गोष्टींत अडकून पडल्यात. सुमतीताईंना हे कळत होतं, आजकालच्या मुलींना नाही पटायचं हे पण ज्यावेळी त्यांना या मागचं शास्ञ समजेल तेव्हा आज ना उद्या पटेल त्यांना म्हणून त्या सुनांकडून गोड बोलून करून घ्यायच्या. असंही सुमतीताईंची मुलं या सगळ्या गोष्टी मनोभावे करायची, त्यामुळे आपले नवरे करतायेत तर त्यांच्या बायकांना करणं भागच असायचं.


आपल्या सासू-सासर्‍यांनी आपल्या लग्नाला अजिबात कोणतीही ना करत आपणाला एवढ्या प्रेमाने वागवलंय तर काय हरकत आहे त्यांच्या समाधानासाठी हे सगळं करायला इतकी समज तर होतीच मालती, निलीमा आणि ञिशामध्ये... त्यामुळे सुमतीताईंची 'श्रम-साफल्य' वास्तु कशी एकदम भारदस्त आणि दिमाखात उभी दिसायची. बाजूच्या रोडवरून जाणारी कोणीही अनोळखी व्यक्ती नकळत त्या वास्तुला डोळेभरून पाहूनच पुढे जायची....कोणास ठाऊक कसे पण त्या वास्तूत खुप सारी सकारात्मक शक्ती असल्यासारखी भासायची...वास्तूकडे पाहिलं की आपोआपच मन प्रसन्न आणि चित्त शांत व्हायचं.


तिन्ही सांजेच्यावेळी सुमतीताई एका कुंबीत कापुर आणि ओवा पेटवून घराच्या कोपरा न कोपर्‍यातून फिरवून देवासमोर दिवा लावायच्या व नमस्कार करून, देवाची आणि वास्तूची प्रार्थना करत.


"संसारी या आनंदाची नित्य नवी बरसात

उतरला स्वर्ग इथे साक्षात"

अशा भावनेतून त्या वास्तूला म्हणायच्या,

"धरी घरावर चंदनछाया

फुले पसरती सुगंधमाया

सांज लाविते मांगल्याची सदनी या फुलवात"

अशाप्रकारे, सुमतीताईंच्या ओवा-कापुर आणि सांजवातेने घरात खूप प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण होऊन जाई. घरातील अशा प्रसन्न वातावरणाने दिवसभर बाहेरच्या लोकांमध्ये, बाहेरील वातावरणात काम करून घरात माघारी येणार्‍या मुलांचा दिवसभराचा कामाचा थकवा निघून जाई....!


आपसूकच आपल्या हसणार्‍या मुलांना आणि सुनांना त्यांच्या नवर्‍यांना पाहून समाधान वाटून घरातील संपूर्ण वातावरणच हसतं-खेळतं होवून जायचं....हे सगळं पाहून नारायणराव सुमतीताईंसारखी सुसंस्कारी अर्धांगिनी मिळाल्याबद्दल देवाचे मनोमन आभार मानायचे....पण त्यांनाही कधी-कधी प्रश्न पडायचा की कोणी वास्तू नावाची देवता खरंच अस्तित्वात असते का? ते बरेचवेळा सुमतीताईंना विचारायचे देखील....


त्यावर सुमतीताईंचं ठरलेलं उत्तर असतं, "हो वास्तू नावाची देवता खरंच अस्तित्त्वात असते आणि याला विज्ञानाची जोड आहे बररं...अहो आपण ज्या वास्तूत राहतो तिला मान द्यायला नको? अगदी मुलासारखं प्रेम करायला हवं तिच्यावर. तुम्हीच विचार करा, आपण म्हणतो की नाही 'स्वच्छता जिथे, लक्ष्मी वसते तिथे' म्हणूनच आपल्या घरात लक्ष्मी आहे कारण आपल्या घरात स्वच्छता असते. घरातील प्रत्येक वस्तू भलेही ती निर्जीव का असेना आपला जीव असतो तिच्यावर.....वर्षानुवर्षे आपल्या सारख्या सजीवांच्या वावरण्यामुळे निर्जीव वास्तुदेखील सजीव होते. तिलाही कान असतात. म्हणूनच आपण घरी बसून केलेली बाहेरच्या लोकांसाठीची प्रार्थना खरी ठरते....वास्तूतील सकारात्मक शक्ती सगळं काही चांगलं घडवण्याचा अट्टाहास ठेवते."


सुमतीताईंच्या उत्तराने नारायणरावांना धन्य झाल्यासारखं वाटायचं व ते मनोमन वास्तुकडे एक कटाक्ष टाकून वास्तुला धन्यवाद द्यायचे.....नारायणरावांना आठवायचं की 'श्रम-साफल्य' ही स्वत:ची वास्तू उभारण्या अगोदर साधारणत: तीस वर्षांपूर्वी ते आणि सुमतीताई जेव्हा भाड्याच्या घरात राहायचे तेव्हा ते घर सोडतानादेखील त्यांना किती ञास झाला होता. तिथेही सुमतीताईंचे वास्तुविषयक सगळे नियम पाळले जात असल्याने मनावर वेगळेच संस्कार झाले होते; ते भाड्याचं घर असूनही, सोडताना जणू ते म्हणत होतं आमचा आशीर्वाद आहे तुमच्याबरोबर खूप यश मिळवा, मोठे व्हा....घरातून सगळं साहित्य टेम्पोत भरल्यावर पुन्हा सुमती घरात जाऊन चारी भिंतीवर एखाद्या लहान मुलाला कुरवळल्यासारखं हात फिरवून डोळ्यांतील आसवे गाळत उभी होती...शेवटी आपण जाऊन सुमतीला सावरून बळेच बाहेर घेऊन आलो होतो; तेव्हाही घराबाहेर येऊन तिने घराला नमस्कार करून तुझा आशीर्वाद राहू दे आमच्या बरोबर अशी प्रार्थना केली होती...! खरंच आहे आपल्यावर वास्तुचा आशीर्वाद..!


आणखी एक गोष्ट सुमतीताई आवर्जून करायच्या ते म्हणजे आठवड्यातून एकदा घरातील जो काही फ्लश एरिआ होता तिथे मोठं मीठ टाकायच्या....थोडक्यात सांगायचं तर किचन बेसीन, वाॅश बेसीन, टाॅयलेट, बाथरूम सगळीकडे त्या ओंजळ-ओंजळभर मोठं मीठ टाकायच्या. असं केल्याने घरातील नकारात्मकता निघून जाते असं त्यांचं मत आणि अनूभव होता....त्याबरोबरच स्वयंपाक करताना अगोदर गॅस शेगडीला नमस्कार करणे तसेच गाडी चालवण्याअगोदर स्टेरींगला नमस्कार करणे या गोष्टी करणे हा ही एक नियम बनला होता....घरातील सूनबाईंना हे देखील पटायचं नाही पण करावं लागायचं.


सुमतीताईंनी निलीमा, मालती आणि ञिशा तिघींनाही त्यांची कामे वाटून दिली होती. घरातील धुण्या-भांड्याला कामवाल्या मावशी होत्या.....पण स्वयंपाक करणे, झाडांना जातीने पाणी घालणे, अंगणात सडा मारणे, रांगोळी काढणे,  चार-पाच दिवसांनी घरातील असणार्‍या सोफे, बेड, खिडक्यांचे, दारांचे पडदे धुवायला टाकणे, देवपूजा-सांजवात करणे, ओवा-कापूर, मीठ टाकणे, हाॅलमध्ये रोज ताजी फुले ठेवणे सुकलेली फुले टाकणे, फर्नीचर पुसणे, अधुन-मधून धुप जाळणे, पाहुण्यांचं आदराने स्वागत करणे, त्यांना हवं नको ते पाहणे या आणि अशा बर्‍याच गोष्टी सुमतीताईंनी सुनांच्या कामाच्या, क्लासच्या वेळा पाहून आणि त्यांची गैरसोय न होता वाटून दिल्या होत्या.


सुनबाई या सगळ्या जबाबदार्‍या पार पाडत त्यामुळे वास्तू एकदम प्रसन्न, टवटवीत राही. आपसूकच घरातील वातावरण खेळी-मेळीचं होई....हे सगळं त्या तिघी सुमतीताईंच्या सांगण्यावरून, त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी करीत पण मनातून त्यांना वास्तु-आशीर्वाद देते वगैरे या गोष्टींवर तितकासा विश्वास बसत नव्हता....सुमतीताईंच्या तिक्ष्ण नजरेला ते जाणवायचं.....बर्‍याचवेळा सुमतीताईंना हा प्रश्नदेखील पडायचा की, आपल्या मागे यांनी हे सोपस्कार करायचे सोडले तर.....तर नकोच हा विचार पण त्यावर काहीतरी उपाय शोधून काढायला हवा हे दुरदृष्टी असणार्‍या सुमतीताईंना पटत होतं आणि म्हणुनच त्या एक शक्कल लढवतात.


मागील वीस वर्षात....कधीही घर न सोडून राहणार्‍या सुमतीताई महिनाभर बहिणीकडे राहून येते सांगून निघतात. बरोबर नारायणरावांनाही घेतात. सुमतीताई चक्क घरावर एवढं प्रेम असून महिनाभर घर सोडून राहणार या विचाराने मुलांना आणि सुनांना आश्चर्य वाटतं. पण सुमतीताई सर्वांना सगळ्या सूचना देऊन निघतात आणि काळजी करू नका मनाला तेवढंच प्रसन्न वाटावं म्हणून मी चाललेय; येईन लवकरच असं बोलून मुलांना दिलासा देतात. नेहमी "तुझं आहे तुझपाशी, परी का बाहेर शोधिशी" म्हणणारी सुमती आज बाहेर जाऊन मन प्रसन्न करण्याच्या गोष्टी का करतेय हा प्रश्न नारायणरावांनाही पडला होता.


हुशशश.....आईसाहेब एक महिनाभर घरात नाहीत म्हटल्यावर तिघी सुनांना कोण आनंद झाला होता....मनातून हुरळून गेल्या होत्या तिघीही. निलीमाने आज राञी स्वयंपाकाला सूट्टी देऊयात असं ठरवलं त्याला बाकीच्या दोघींनीही सहमती देऊन पार्सल आणायच्या पदार्थांची लिस्ट आपल्या नवर्‍यांना दिली. संध्याकाळी देवासमोर दिवा लावला पण पूर्ण अंधार पडल्यावर आठ वाजता....रूद्र, ऋग्वेद, जय घरी आल्यावरती त्यांना घर वेगळंच भासलं. राञी घरी आल्यावर ना धूप-दीपाचा सुगंध दरवळत होता ना प्रसन्न वाटत होतं...आईचा हसरा चेहराही नव्हता त्यांची विचारपूस करायला.


आई-बाबांची कमी तर भासणारच होती त्या तिघांना....पण ठीक आहे ना आई-बाबा आजवर आपल्यासाठी कधी-कुठे फिरायलाही गेले नाहीत; आता सगळेजण वेल सेट्लड आहेत, तेव्हा फिरून येऊ दे आई-बाबांना या विचाराने तिघांनी आपल्या मनाला समजावलं. राञी जेवणाच्या टेबलावर बाहेरचे पदार्थ बघूनच तिघांचीही भूक अगोदरच गेली होती....झोपायला गेल्यावरही तोच प्राॅब्लेम.....सुमतीताई रोज राञी झोपण्याअगोदर खोबरेल तेल कोमट करून सर्वांच्या डोक्याची मालिश करून द्यायच्या; त्यामुळे रूद्र, ऋग्वेद, जय, निलीमा, मालती आणि ञिशा या सर्वांना छान शांत झोप लागायची. सकाळपासून आई बाहेरगावी गेल्या आहेत म्हणून खूष असलेल्या तिघी सुनांनाही आता सुमतीताईंची आठवण आली. आजच्या फॅशनच्या जमान्यात लोक डोक्याला तेल लावत नाहीत पण त्यामुळे डोकं गरम होतं. त्यासाठी निदान राञी तरी डोकं शांत होऊन झोप लागण्यासाठी डोक्याला तेल लावणं गरजेचं आहे; असं सुमतीताईंचं मत होतं....आणि आज त्याची प्रचिती घरातील सर्वांना आली होती.


दुसर्‍या दिवशी उठायला सर्वांनाच उशीर होतो. कारण राञी कोणाचीच व्यवस्थित झोप झालेली नव्हती......सकाळी उशीरा उठल्यामुळे तिघा मुलांची आणि त्यांच्या बायकांचीही चिडचीड सुरू होते. सुमतीताईंचा घरातील आणखी एक नियम म्हणजे घेतलेली वस्तू जागेवर ठेवण्याची....ही देखील इथे सर्वांसाठी फायदेशीर ठरते...त्यामुळे ते एक टेंन्शन नव्हतं...!


सकाळची देवपुजा मोठ्या सुनबाई निलीमा कशातरी आटपुन घेतात पण देवाला फुले वाहायला त्यांना वेळ मिळत नाही कारण तिचा गायनाचा आॅनलाईन क्लास होता.....त्यामुळे देव्हार्‍यातील फुलाचा सुगंध हरवतोच पण निलीमा नेहमी ज्या सुरात गाणे गात असते, त्यादिवशी तो सुरदेखील बिघडलेला असतो!


संध्याकाळी सर्वजण घरी येतात; तेव्हाही सर्वांना घरात नकारात्मकता जाणवते. तसंही बाहेर असताना देखील सर्वांना नेहमीपेक्षा वेगळेच अनुभव आलेले होते; चिडचीड, किटकीट, भांडण असं काहीसं घडलं होतं प्रत्येकाबरोबर...!


राञी सगळेजण या गोष्टींवर बसून विचार करतात. त्यांना कळून चुकतं की सुमतीताईंनी घरातील जे काही नियम बनवले आहेत; ते योग्य आहेत. फक्त पैसा कमावला म्हणजे सर्व काही होत नाही....तो टिकतो तो वास्तू-आशीर्वादामुळे! आपण ज्या घरात राहतो; ज्या घरासाठी पैसा कमावतो त्याच घरात काम करायला आपणाला वेळ नसतो. घरात काम करणं, घरात स्वच्छता ठेवणं, घरावर प्रेम करणं या गोष्टींमुळे घरातील वातावरण शुद्ध, पविञ राहतं आणि आपोआप त्याचा सकारात्मक परिणाम घरातील सदस्यांवर होतो.

आपली चूक उमगून निलीमा, मालती, ञिशा दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून सगळे सोपस्कार पूर्ण करतात. तेव्हा कुठे घरात प्रसन्नता पसरून घर हसू लागतं.....ज्या कुटूंबावर वास्तू प्रसन्न असते तिथे सदैव गृहस्वामीनीच्या चेहर्‍यावर हास्य आणि जिभेवर प्रसन्न गाणं नक्कीच असतं...!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational