madhuri dipak patil

Inspirational Others

3.7  

madhuri dipak patil

Inspirational Others

आठवण...

आठवण...

5 mins
336


"अगं पण एवढ्या लवकर शाळेत जाऊन काय करणार आहेस?" मम्मी


"काय करणार आहे म्हणजे? अगं तुला नाही माहित... सर्वात पहिला बेंच पकडायचा आहे मला... आणि पाचवीच्या वर्गाचा नियम आहे की पहिल्या दिवशी जो बेंच पकडला जाईल तोच त्याचा पूर्ण पाचवी होईपर्यंतचा बेंच राहिल... त्यामुळे मला लवकर जायचं आहे..." मी


"अगं पण तुझं हायस्कुल तर आज सुरू होणार आहे मग तुला हे सगळं कसं माहीत..." मम्मी


"अगं त्यात काय मोठे... शेजारच्या आठवीतील निशादिदीने सांगितले मला... बरं चल लवकर मला अजून दप्तर भरायचं आहे..."


बररर बाई तू सगळी तयारी केलीच आहेस तर जा नीट... अस म्हणून मम्मी मला छान स्माईल देते.


हा माझ्या आठवणीतील शाळेतील पहिल्या दिवशीचा मम्मी आणि माझ्यातील संवाद... जसाच्यातसा नाही पण साधारणत: सारांश हाच...


त्यादिवशी काही वेगळीच हुरहूर होती मनात... खूप भारी वाटत होतं कारण मी आता जि.प शाळेत खाली सतरंजीवर बसणार नव्हते तर लाकडी बेंचवर बसणार होते... घरातील मोठ्या भावंडांकडून खूप वेळा ऐकलं होतं... 'फर्स्ट ईंप्रेशन इज् दी लास्ट ईंप्रेशन'... त्यामुळे प्रत्येक शिक्षकापुढे अगदी व्यवस्थित दिसायला हवं आपण हा मनाने केला निश्चय... बालमनच ते. कधी, केव्हा, कसला निश्चय करेल सांगता येत नाही... मी सगळी तयारी व्यवस्थित केलेली... दप्तरामध्ये (तेव्हा आम्ही दफ्तरच म्हणायचो नंतर हळुहळू बॅग म्हणायची सवय लागली) सगळ्या वस्तू नीट ठेवल्यात का ते तीन-चार वेळा चेक करून झालं होतं... डबा, पाण्याची बाॅटल भरून घेतली होती. नाही म्हणायला शाळा गावातच होती. घरापासून दिडशे मीटरवर तरीही डबा घेतला होता... का तर मनात भीती होती की आपण सकाळी जो पहिला बेंच पकडू तो दुसर्‍या कोणी घेतला तर... म्हणून निदान पहिल्या दिवशी तरी शाळेत पूर्ण दिवस थांबण्याची तयारी मी केली होती.


तयारी तर झाली होती... एव्हाना सकाळचे दहा वाजून गेले होते... शाळा भरल्याची घंटा साडेअकराला व्हायची... घरातले आम्ही चौघेजण होतो पाचवीत जाणारे. मी, संध्या, पल्लवी आणि गणेश. गणेश तर केव्हाच पोहोचला होता शाळेत... मग मी, पल्लवी आणि संध्या तिघीही गेलो लवकरच... तसे आम्ही चौघं चुलत भावंडे पहिलीपासून दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो... त्यामुळे वर्गात कधी भीती वाटली नाही...


अकरा वाजले तसे शिपाईमामा दार उघडायला आले... आम्ही सगळे विद्यार्थी नवीनच, त्यामुळे सर्वांनीच दरवाज्यासमोर गर्दी केली होती... खूप सारी मुले आली होती... आम्ही गावातील तर होतोच सगळे, आहे असा चौथीचा वर्ग. पण बाहेर गावाहूनही खूप विद्यार्थी आले होते... तसेच काही विद्यार्थी गावातच आपल्या नातेवाईकांकडे शिक्षण घेण्यासाठी आले होते... तशी आमची शाळा होतीच नावलौकिक मिळवलेली... जय भवानी हायस्कुल... शिस्तप्रिय आणि उज्ज्वल भवितव्य घडवणारे विद्यार्थी तयार करणारी... मूळ म्हणजे याचं श्रेय जातं ते शिक्षक स्टाफला!


तर आपण कुठे आलेलो... हा... शिपाईमामाने दरवाजा उघडला रे उघडला आम्ही सगळे एकमेकांना रेटत पाठीवरची बॅग नीट करत कसंबसं वर्गात घुसतो... आणि मी इकडेतिकडे कुठेही न बघता पहिल्या बेंचवरच जाऊन बसते... आणि एकदाचा माझा जीव भांड्यात पडतो... तो आनंद म्हणजे आजच्या ईंजिनिअरिंगची सीट मिळवण्याएवढाच भासतोय मला.


बरं मी फक्त माझा बेंच नाही पकडला तर शेजारच्या मुलींच्या ओळीतील आणखी एक पहिला बेंचपण पकडला... कोणासाठी तर बहिणीसाठी... आम्ही तिघी बहिणी मग एका बेंचवर फक्त दोघीच बसू शकत होत्या... जी राहत होती तिच्यासाठी दुसरा बेंच... काय करणार वडिलांनी पहिल्यापासूनच संस्कार केलेले भावा-बहिणीचा विचार करूनच पुढे जायचं... मग तिथे सख्खे-चुलत हा फरक करण्याचा तर अजिबातच प्रश्न नव्हता. माझे वडील ज्यांना आम्ही आप्पा म्हणतो यांच्याबाबतीत आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे नाती जोडणं आणि ती फुलवणं शिकावं तर त्यांच्याकडून !


पुढच्या अर्ध्या तासात ग्राऊंडवरती मस्त राष्ट्रगीत, प्रार्थना, सुविचार, आजच्या बातम्या, प्रतिज्ञा असे मिळून आमच्यावरती मुल्यशिक्षणाचे संस्कार केले गेले. ज्यामुळे आणखीनच फ्रेश झाले सर्व विद्यार्थी. त्यातील मला आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे प्रार्थना झाल्यावर रांगेत आपापल्या वर्गात जाणे. वर्गात जाऊन बसलो तसं कधी एकदा क्लासटिचर येतायेत असं झालं... आणि ''गुड माॅर्निंग'' असा एक आवाज वर्गात घुमला... तशी मी भानावर आले... पाहते तर समोर आमचे क्लास टिचर डी. आर. जाधव सर आणि त्या विचारातच मी सगळ्यांबरोबर गुड माॅर्निंग म्हणून प्रतिसाद दिला.


पहिला दिवस म्हणजे अर्थातच ईंट्रोडक्शनचा दिवस... त्यादिवशी ओळीने सर्व शिक्षकांनी स्वतचं नाव, कोणता विषय शिकवणार आहे ते आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपलं नाव, गाव सांगून ओळख करून दिली... तेव्हा असं वाटत होतं की फक्त आपणच नवीन आहोत पण आत्ता समजत आहे की आपल्याएवढेच उत्साही आपले शिक्षकही होते आपणाला शिकवायला... पहिलं लेक्चर भारी झालं... इंग्रजी विषयाचं. पहिल्यांदाच शिकत होतो आम्ही इंग्रजी... पण त्यादिवशीपासून तोच विषय माझा आवडता झाला... सरांची कृपा!


मधली सुट्टी झाली... मज्जा आली मैत्रिणींबरोबर भाजीची वाटणी करून डबा खायला... ओळखीही झाल्या नवीन मुलींशी... पण सुट्टी संपून शाळेची बेल व्हायला आणि इकडे आमच्या गणेशचं आणि वर्गातल्या एका नवीन मुलाचं भांडण झालं... मारामारी नाही पण बडबड जोराजोरात... आता भावाचं भांडण मग बहीण कशी गप्प बसणार? परत आमच्या आप्पांचे संस्कार जागे झाले नि मी भावाची बाजू घेऊन त्या मुलाशी भांडले... त्या मुलाचं नाव डोळ्यासमोर आहे पण आत्ता आठवत नाही... सगळं झालं खरं पण तो मुलगा गेला क्लास टिचरला नाव सांगायला... असं काही घडंल हे आमच्या गावीही नव्हतं... स्टाफरूममधून आले की मला आणि माझ्या भावाला आमंत्रण तेही शाळेच्या पहिल्याच दिवशी... मग काय उभे राहिलो सरांच्या पुढे जाऊन... दहा-पंधरा शिक्षक होते... सगळ्यांच्या नजरा माझ्यावर आणि माझ्या भावावर... बर्‍यापैकी सर्वच शिक्षकांना समजलं होतं की माझ्या भावाने भांडण केलं आहे आणि मी त्याची बाजू घेउन भांडले आहे... चूक कोणाची होती हे जाणून न घेताच... बाकीचे शिक्षकही हसायला लागले मला... आणि अहो सोनवलकर असं नसतं प्रत्येकवेळी आपल्या जवळची व्यक्ती बरोबर असेलच असं नाही... मी मनातून खूप खजील झाले... पण त्यादिवशीपासून आजतागायत मी काहीही, कसलाही प्रसंग घडो आणि कोणीही असो... नेहमी सत्याचीच बाजू घेतली... म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं... माझ्यामध्ये एक चांगलं तत्त्व रूजलं गेलं तेही कायमचचं.


शेवटचा तास खेळायचा तास होता... वेळापञक अजून बनवलं गेलं नव्हतं पण मुलांना पहिल्याच दिवशी अडकल्यासारखं व्हायला नको म्हणून खेळायला सोडलं असावं... काहीही म्हणा आमची शाळा हाेतीच भारी... मनात घर करणारी... शाळा सुटल्याची घंटा होण्याअगोदर पाच मिनीटे 'वंदे मातरम' म्हणणे हा शाळेचा नियमही पाळला... आणि आमची शाळा सुटली... आम्ही तिघीजणी गप्पा मारत घरी कधी पोहोचलो समजलंच नाही... घरी आल्यावरती माझ्या चेहर्‍यावरचा उत्साह आणि थोडा थकवा मम्मीला दिसला असावा म्हणूनच तिने शेवयाची खीर बनवली आणि मी ती फस्त केली... शेवटी प्रत्येक आईला आपल्या मुलाचा शाळेतला पहिला दिवस किती महत्त्वाचा असतो ना हे आज प्रकर्षाने जाणवतंय स्वतः आई झाल्यावर.


तर अशी ही माझ्या भावाविषयीची माझी आठवण आजही आठवली तरी मन खूप व्याकूळ होतं भावाला भेटण्यासाठी... आज आम्हा दोघांचीही लग्न होऊन दोघेही आपापल्या संसारात रमलो आहोत... एकमेकांपासून खूप दूर आहोत... त्यात हा लाॅकडाऊन, कोरोनाचे संकट त्यामुळे भेटता नाही येणार... तसंही करिअर, लग्न यामध्ये गुंतल्यापासून खूप कमीवेळा रक्षाबंधन साजरं झालं... पण आमच्यातील भावा-बहिणीचं नातं तितकंच दृढ आहे जेवढं की पाचवीत असताना होतं... आजही माझ्या भावाला कोणी बोललं तर मला राग येतो आणि आजही मी कधी उदास असेल तर हमखास त्याचा फोन मला येतोच... कदाचित एक भक्कम नातं म्हणतात ते यालाच!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational