STORYMIRROR

madhuri dipak patil

Others

4.1  

madhuri dipak patil

Others

वेश्या आईसुद्धा आईच असते...!!

वेश्या आईसुद्धा आईच असते...!!

7 mins
1.0K


"चल रिधीमा आवर बेटा....." मिराताई


"आवरतेयच ग...पण मला समजत नाही की तु माझ्या प्रत्येक वाढदिवसाला त्या गार्डनमध्ये कशासाठी नेत असते....मान्य आहे लहानपणी मी तुला त्या गार्डनमध्येच सापडलेले पण याचा अर्थ असा नाही की त्या गार्डनने मला जन्म दिलाय.... रिधीमा


"हो ग पण आपण जाणार आहोत नेहमीप्रमाणे...चल"


"होय....जावुयात" अस म्हणतच रिधीमा तिच्या पर्समधील तीचा पाच वर्षांची असतानाचा आईबरोबरचा फोटो पाहत मनातच "का ग आई मला सोडून गेलीस...मला एकदाही भेटावस वाटत नाही का तुला? वरून जरी रिधीमा खूप प्रॅक्टीकल आहे अस दाखवत असली तरी ती आतून खुप हळवी होती.....फोटो परत पर्समध्ये ठेऊन डोळ्यातील आसव खाली गालावर पडण्याआधी टिपून घेते.


तेव्हड्यात मिराताई येतात...त्यांच्या नजरेतून ते सुटत नाही...कारण प्रत्येक वाढदिवसादिवशी आपल्या मनात कुठेतरी दाबून ठेवलेल्या आईच्या आठवणींचा कोपरा अश्रूरूपाने रिधीमाच्या डोळ्यातून बाहेर यायचा. मीराताई तीच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतात तशी रिधीमा आपल्या खर्‍या आईची आठवण बाजूला सारून मीराताईंंना मिठी मारते...आणि "मम्मी आय लव्ह यु."


प्रत्येकवर्षा प्रमाणे मिराताई रिधीमाला जरी गार्डनमध्ये घेऊन जाणार असल्या तरी यावर्षी रिधीमाच्या एकवीसाव्या वाढदिवसादिवशी त्यांनी मनातून रिधीमाला तिच्या खर्‍या आईला भेटवायच ठरवल होत....हे ना त्यांनी रजनीबाईंना सांगितल होत ना रीधीमाला. लहानपणापासूनच इंद्रधनुष्याच कुतूहल असणार्‍या रिधीमाच्या आयुष्यात आजचा दिवस खर्‍या अर्थाने इंद्रधनुष्य ऊमटवणारा ठरणार होता.


मीराताई आणि शामरावांनीच रिधीमाला लहानाच मोठ केल होत.....रिधीमाला आई-वडीलांच प्रेम दिल होत. आज रिधीमा एकवीस वर्षांंची झाली होती. सहा वर्षांची असताना भेटली होती ती मीराताईंना जवळच्याच एका गार्डनमध्ये. खूप प्रयत्न केल्यानंतर डाॅक्टरांनी मीराताई व त्यांच्या मिस्टरांना स्पष्ट सांगितल होत तुम्ही कधीही आई-बाबा नाही बनू शकत. मन हेलावून गेल होत दोघांच.....मीराताईंना तर लहान मुलांची खूप आवड होती. खूप मोठा धक्का बसला होता त्यांना. हाॅस्पीटलमधून घरी जात असताना त्या शामरावांना तुम्ही जा घरी, मी मागून येते म्हणून त्या गार्डन मध्ये जातात. शामरावही अडवत नाहीत.....होऊ दे हीच मन मोकळ म्हणून एकटेच जातात घरी.


मिराताई एका बाकावर बसून समोरच खेळत असलेल्या लहान मुलांकडे कुतूहलाने पाहत असतात. तेव्हड्यात त्यांना शेजारीच एका बाकावर बसलेल्या माय-लेकींचा संवाद ऐकू येतो. सहा वर्षांची ती मुलगी हट्ट करत होती की "मी नाही येणार त्या अंधार्‍या वाड्यात....इथ बघ कसा लख्ख प्रकाश आहे, छान वारा आहे, ते बघ ते इंद्रधनुष्य कस ऊमटलयं....त्या वाड्यात सगळा अंधार असतो....माझा जीव गुदमरतो तिथं" त्यावर आई समजावत असते, "पिल्लू अस नको म्हणूस ग....आपल घर आहे ते. तिथ नाही जायच तर मग कुठे राहयच आपण? तुझा वाढदिवस छान केला की नाही आपण.....पुढच्या वाढदिवसाला परत येऊयात...पण आत्ता चल ग राणी....दिवेलागणीची वेळ झालेय.....जायला ऊशीर झाला तर ठकुराईन आपल्याला शिक्षा करतील ग."

हा सगळा संवाद मीराताईंनी ऐकल्यावर त्यांना थोडाफार अंदाज येतो की या माय-लेकी कोणत्या ठिकानाहून आल्यात....त्या मुलीची आई खुप समजावत होती तिला पण मुलगी चांगलीच हट्टाला पेटली होती..."मी नाही म्हणजे नाही येणार त्या अंधार्‍या कोठडीत...तू जा तुला जायचय तर....मला खेळायच आहे त्या मुलांबरोबर" अस म्हणत ती त्या समोर खेळणार्‍या लहान मुलांकडे बोट दाखवते व धावत पळत त्या मुलांजवळ जाऊन त्यांचा खेळ पाहत बसते. आई आपली दु:खी होऊन अथवा कशी समजावू मी हिला हा विचार करत मुलीच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत बसते.

मीराताई त्या मुलीच्या आईजवळ जातात व मी काही मदत करू शकते का अस विचारतात. तेव्हा त्या आईला राहवत नाही "मी रजनीबाई....एक वेश्या आहे. ही माझी मुलगी रिधीमा. हीचा जन्म झाला वेश्यांच्या वाड्यातच. लहानपणापासूनच बाहेरच्या जगाची, प्रकाशाची हीला ओढ.....तीला अजून नीटस कळत नाही की आपली आई कसला व्यवसाय करतेय.....ती अशा अंधार्‍या कोठडीत का राहतेय.....पण तीला कस समजावू की मी माझ्या ईच्छेने राहत नाही इथं....परिस्थितीने मला ढकललं आहे या खाईत...अहो मलाही मनापासून वाटत माझ्या मुलीनेही बाहेरच्या जगात रहाव....शिकून मोठ व्हाव. इंद्रधनुष्याप्रमाणे सातही रंगाची ऊधळण करणारी व्हाव तीनं...पण माझ दुर्भाग्य म्हणा किंवा नशीब मी काहीच नाही करू शकत....." अस म्हणून रजनीबाई पदराने डोळे पुसतात.


मीराताई "तुम्ही रडू नका हो ताई...मी काही मदत करू शकते का तुमची?"


रजनीबाई "अहो रिधीमा जनमली आणि त्यादिवशीपासुन मला धास्ती लागली....की आपली मुलगी पण या नरकात पडून रहायला नको. तीची काहीतरी व्यवस्था करा...जेणेकरून तिला त्या वेश्यांच्या नरक यातना सोसायला नको बस्स....माझ आयुष्य गेलच आहे त्यात. माझ्या मुलीची आयुष्य खुप चांगल व्हाव एवढीच ईच्छा आहे. "


मीराताई ही सगळी कहाणी ऐकून आणि आईच्या काळजाची व्यथा जाणून मनाशीच काहीतरी ठाम निश्चय करून बोलतात "मी मीरा राजमाने....डाॅक्टरांनी सांंगितलय तुम्ही आई होऊ शकणार नाही....मी बाळ दत्तक घेण्याचा विचार करतच होते तोवर तुम्हा मायलेकींचा संवाद कानावर पडला आणि इथे आले.....तर मी कोणतेही आडेवेडे न घेता विचारतेय तुम्हाला....तुमची रिधीमा देता मला? मी करीन तिचा सांभाळ. शिकवेन, आई बनेन, प्रेम देईन, सगळी स्वप्न पूर्ण करीन तिची."


रजनीताईंच मन खूप व्याकूळ होत....आपली मुलगी अशी कशी द्यायची कोणाला या विचाराने....नाजूक परी होती ती रजनीताईंची....वाढदिवसादिवशी तिच्या हट्टापाई वाड्यातील ठकुराईनचा रोष ओढवून घेउन आल्या होत्या त्या तिला गार्डनमध्ये......माझी रिधीमा, माझ पिल्लू, माझी राणी मला सोडून गेल्यावर कशी राहू मी त्या कोठडीत....तिच्याकडे पाहून तर रोज

च्या दिवसाची सुरूवात व्हायची नी त्या कोठडीतही ऊजेड पडल्याचा भास व्हायचा आपल्याला पण आता तीच नसेल तर कोणाकडे पाहून ऊरलेल आयूष्य जगू मी.....असे एक ना अनेक प्रश्न रजनीबाईंच्या हळव्या मनात गर्दी करू लागले.

हळव्या झालेल्या आईच्या मनाला धीर देत मीराताई पुढे येऊन "बाई, काही घाई नाही. तुम्ही पूर्ण विचार करून मला सांगा....आणि हो तुमच ऊत्तर नाही असेल तरीही हरकत नाही. माझ्या मनात आलेला विचार मी बोलून दाखवला. असही मी मुल दत्तक घेणारच आहे...मग रिधीमा नसेल तरी दुसर कोणीतरी घेईनच पण तुमच्या दोघींचा संवाद आणि तुमची रिधीमाच्या भविष्याविषयीची काळजी ऐकून मी हा प्रस्ताव तुमच्यासमोर ठेवला इतकचं....खुप कठिण आहे हे सगळ एका आईसाठी आपली मुलगी अशी परक्या माणसाकडे सोपवण...पण काळजी करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा."


रजनीबाई "नाही हो मीराताई तुमच्यावर विश्वास बसला आहे माझा....नाहीतरी एका वेश्याच्या मुलीला दत्तक घेण्यासाठी खूप मोठ मन हवय....ते तुमचं आहे. शरीराची भूक भागवण्याव्यतिरीक्त कोणी कधी एवढ्या आपुलकीने बोललं नाही ओ आजपर्यंत....तुमच्या रूपाने देवच भेटला आहे मला....तोही माझ्या मुलीच्या आयुष्यात इंंद्रधनुष्यरूपी रंगाची ऊधळण करणारा."


मीराताई "खूप धन्यवाद बाई तुम्ही माझा हेतू समजून घेतलात म्हणून....आणि अस नाही की मी रिधीमाला घेऊन जाणार आहे म्हणजे तुमची तिच्याशी कायमचीच ताटातूट करणार आहे, तर तिच्या प्रत्येक वाढदिवसाला मी तिला गार्डनमध्ये घेऊन येईल, तुम्ही तिला भेटू शकता, डोळे भरून पाहू शकतात...शेवटी तुमच्यामुळे मला आईपण भेटणार आहे...हे ऊपकार मी कधीच नाही विसरू शकणार."


रजनीताई आपले आनंदाश्रू पुसतच "मीराताई खरंच तुम्ही किती स्वच्छ मनाच्या आहात....मी रिधीमाची खरी आई तिला भेटल्यावर ती माझ्याकडे परत आली तर...याची जराही भिती मनात न ठेवता तुम्ही मला माझ्या मुलीला भेटण्याची परवानगी देत आहात...खरच खूप नशीबवान आहे माझी रिधू तीला तुमच्या रूपात एक नवीन आई मिळणार आहे.....आता मी निश्चिंत झाले बघा रिधीमाला तुमच्याकडे सोपवण्यासाठी." अस म्हणून रजनीताई हातातल्या पिशवीतला त्यांचा आणि रिधीमाचा एक फोटो काढतात व मीराताईंना देतात. "हा फोटो राहुद्यात...नंतर रिधीमाने माझ्याबद्दल विचारल्यावर तिला द्या.....कारण इथूनपुढे रिधीमा तुमची....मी तिला प्रत्येकवर्षी या गार्डनमध्ये भेटायला येईन पण लांबूनच पाहीन तिला....जवळ येऊन तिच्याशी बोलून मला तिच्या मनातील तुमच स्थान कमी नाही करायचं...खुप खूप धन्यवाद मीराताई....मी निघते....वाडा माझी वाट बघत असेल...माझ्या मुलीला सांभाळा....खूप हट्टी आहे पोरं..तिला ना ओल्या नारळाची वडी खूप आवडते....नंतर या रंगाचा फ्राॅक आवडतो, तशे शूज आवडतात पण मी नाही देऊ शकले, राञी झोपताना माझ्या कुशीत झोपायला आवडतं" अस म्हणून रजनीताई दुखाचा आवंडा गिळतच तिथून पाय काढतात....

त्यानंतर मीराताई रिधीमाकडे वळतात व तुझी आई तुला माझ्याकडे सोडून गेलेय थोडे दिवस....तुला आवडत ना बाहेर खेळायला, फिरायला आपण मस्त खेळुयात, फिरूयात अस समजावून रिधीमाला स्वत:च्या घरी नेतात.....एवढ मोठ घर, मोठ्या-मोठ्या खिडक्या, खुप सारी खेळणी, खुप सारा खाऊ पाहून रिधीमा आईला त्यादिवशी तरी पूर्ण विसरून जाते. खेळण्याच वयच ते.. नंतर राञी तिला आपल्या आईची कुस आठवते पण मीराताई एवढ्या प्रेमळ असतात की ती मीराताईंजवळ झोपी जाते. हळुहळू दिवस जातात....तशी मधुनच रीधीमा आठवण काढायची आईची पण तिला ती अंधारी कोठडी आठवली की ती मनातली आईची आठवण पुसून टाकी आणि तिच्या व आईच्या फोटोला पाहून परत नव्या ऊमेदीने नवा दिवस पाही. ती जशी मोठी होईल तशी मीराताईंनी तिच्या आईविषयी, आईच्या व्यवसायाविषयी सगळ सांगितल होत तिला....फक्त तीची आई प्रत्येक वाढदिवसाला तिला पाहयला येते हे माञ सांगितल नव्हत कारण तस न सांगण्याच रजनीबाईंनीच वचन घेतल होत.


रजनीबाई रिधीमाच्या प्रत्येक वाढदिवसाला गार्डनमध्ये येऊन रिधीमा किती मोठी झालेय, कशी दिसतेय हे लांबूनच एकटक लावून न्याहळत बसायच्या....जणू त्यांच्या आयुष्यातील इंद्रधनुष्यच अनुभवायच्या त्या. आज तो दिवस ऊजाडला होता. सोळा वर्षांनी माय-लेकींची भेट घडवली जाणार होती मीराताईंन करवी. मीराताई पाहतात की एका झाडामागून रजनीबाई रीधीमाला पाहत आहेत...तेव्हा त्या रिधीमाला घेऊन थेट रजनीबाईंकडे चालू लागतात...रजनीबाई खूप घाबरतात की रीधीमा त्यांच्या दिशेन येतेय. अखेर मीराताई रिधीमाला रजनीबाईंसमोर ऊभा करतात आणि बाजुला जाउन बसतात....आता मायलेकींना समजत नव्हत की काही सूचत नव्हत....रिधीमाने जस कळायला लागल तस फोटोतील आईलाच पाहील होत...समोरची बाई तशीच दिसत होती फक्त थोडी थकली होती, केस पांढरे दिसत होते, चेहर्‍यावर सुरकूत्या होत्या.....रजनीबाई तर काहीच न सुचून फक्त स्तब्ध होत्या.....रिधीमाला आठवतो तो दिवस, आईकडे बाहेरच्या जगासाठी, मोकळ्या हवेसाठी केलेला हट्ट आणि ती मनातून खूप दु:खी होते..."आई मला माफ कर. मीच तुझी अपराधी आहे...तुला त्या अंधार्‍या कोठडीत ठेउन मी ऐशोआरामाच आयुष्य जगतेय. खरच मला माफ कर. अग मला कळत नव्हत त्यावेळी पण तु तू कशाला स्व:त मुलीच्या विरहात राहून मला चांगल जीवन दिलस? बोल आई बोल..." अस म्हणून रिधीमा रजनीबाईंना हलवते....तो मुलीचा स्पर्श...त्या स्पर्शाची कीती वाट पाहीली होती रजनीबाईंनी....त्यांच्या डोळ्यातून फक्त आसव वाहत होती....मुलीच्या विरहाची.


प्रिय वाचकहो या कथेतून सांगायच म्हणजे; अस बर्‍याचवेळा होत की बाहेरील क्षणभंगुर इंद्रधनुष्य पाहण्यासाठी, जगण्यासाठी आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तींपासून दूर जातो, ते कसे दुर जातो स्वतलाही समजत नाही पण आपण काहीतरी हरवलय ही पोकळी मनाच्या खोलवर कुठेतरी असतेच...आणि जेव्हा ती पोकळी मिटली जाते तेव्हाच आयुष्यात खरे इंद्रधनुष्य ऊमटतात.


कथा आवडल्यास नावासह शेअर करावी...तसेच माझ्या आणखी अशाच कथा वाचण्यासाठी मला फाॅलो करा.



Rate this content
Log in