madhuri dipak patil

Children Stories

3  

madhuri dipak patil

Children Stories

पहिलं बक्षिस...

पहिलं बक्षिस...

4 mins
175


बक्षिस म्हटलं तरी किती भारी वाटतं ना... मनात असंख्य प्रश्न गर्दी करतात... काय असेल बक्षिस, आपल्याला मिळेल की नाही, मिळाल तर कितव्या क्रमांकाचं, त्यासाठी आपणाला किती तयारी करावी लागेल.... वगैरे.....


माझा बक्षिस मिळवण्याचा प्रवास सुरू झाला तो बालवाडीत असतानापासून.... आता तुम्ही म्हणाल हिला बालवाडीत बक्षीस माहीत होतं का? तर हो माहित होतं आणि कळतही होत ..... पण स्पर्धा ऐकून थोडंसं हसू येईल बरं कारण आमच्या बाईंनी (म्हणजे आजच्या मुलांच्या मॅडम) स्पर्धा ठेवली होती; ती जो कोणी स्वतःची पाटी जोरात वाजवेल त्याला बक्षिस.... अशी तीन बक्षिसं होती... पहिलं बक्षिस पेन्सिल (तेव्हा आम्ही याला शीशी म्हणायचो) दुसरं काचेची पट्टी, तर तिसरं बक्षिस खोडरबर....काय आठवतायेत का ही मराठी नाव.... तर आपण कुठे आलेलो हा पाटी वाजवायची तीही जोरात.... तर त्यावेळी मी खुपच कृश, हडकुळी होते. त्यामुळे पाटी वाजवली पण आवाज जोरात नाही आला.... आणि मला तिन्ही नंबरपैकी एकही बक्षिस नाही मिळालं.... मला खूप वाईट वाटलेलं... दुसर्‍या मुलांना मिळालेली बक्षिसं, मी कितीतरी वेळ न्याहाळत होते... नाही म्हणायला माझ्याकडे यापैकी सगळं साहित्य होतं; परंतु बक्षिस हे बक्षिस असतं... खूप अनोखा अनुभव असतो बक्षिस मिळवण्याचा.


मला खूप वाईट वाटलेलं तेव्हा कारण माझ्या भाबड्या मनाला एवढंच कळत होतं की वर्गात मी हुशार होते (म्हणजे तसं आमच्या बाईंचं मत होतं) मग बक्षिसही मलाच मिळायला हवं.... तेव्हा कुठे माहित होतं की अभ्यासात हुशार असण्याच्या स्पर्धा वेगळ्या नी अदर ऍक्टीव्हीटीजमध्ये भाग घेऊन मिळणारी बक्षिसं वेगळी.... पण या गोष्टी हळुहळू जसजसं वरच्या वर्गात जात गेले तशा समजत गेल्या..... मग मागे राहणारी मी ती कसली. सगळ्या स्पर्धेत हिरीरीने भाग घेऊन बक्षिस मिळवण्यासाठी माझे प्रयत्न असायचे.... आई-वडील त्या काळातले बी.ए. झालेले त्यामुळे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दोन्ही मिळायचं. सहसा ज्या स्पर्धेत जास्त स्टॅमिना लागायचा त्या स्पर्धेत मी भाग घ्यायची नाही.... माझ्याच्याने ते होतंच नव्हतं कारण तब्येत खूप बारीक.... बरं या बारीक तब्येतीचं कारण कोण तर मीच.... दिवसातून एकदाच पोटभर भाजी-चपाती खायचे. नंतर भूक लागली की वरचा काहीतरी सुकामेवा खाऊन पोटाला शांत करायचे.... मराठी शाळेचे गुरूजी म्हणायचे माधुरी तुला पाण्याचा ग्लास तरी उचलला जातो का?... माझं मलाच हसू येतं आता या सर्वांचं.


बाकी संगीत खुर्ची, रांगोळी, वक्तृत्व, निबंध, हस्ताक्षर अशा सगळ्या स्पर्धेत मी भाग घ्यायचे... अगदी बारावीपर्यंत..... बरर पण तुम्हाला माझं पहिलं बक्षिस सांगायचं होतं ना तर ते मला मिळालेलं निबंध स्पर्धेत इयत्ता तिसरीत असताना...... आणि विषय काय असेल बरं गेस करा पाहू..............................


मला अजूनही आठवतोय बरं... तसं म्हणायला गेलं तर मला माझ्या जिल्हा परिषद शाळेतील एकूण एक गोष्ट आठवतेय... मनात खूप सुंदर घर केलंय त्या आठवणींनी. त्या शाळेतील शिक्षक, बालमैत्रिणी, मित्र शक्यतो सगळेजण गावातील असायचे.... त्यामुळे सगळ्यांना सगळ्यांविषयी माहित होतं... मुख्य म्हणजे घरचे बोलवत असलेले टोपण नाव. मज्जा यायची. कारण शाळेत एकमेकांशी भांडण झालं की त्या नावाने आम्ही एकमेकांना चिडवायचो.


बरं मी खूपच गप्पा सांगायला लागले तुम्हाला.... असंच होतं जुन्या आठवणी निघाल्या की किती सांगू नि किती नको हो ना... हा तर माझं पहिलं बक्षिस मिळालेल्या निबंधाचा विषय होता 'माझं घर...' साधारणत: ऐंशी ते शंभर शब्दांत लिहायचा होता निबंध...... तिसरीत असताना शंभर शब्द जोडणंच किती कष्टाचं काम वाटायचं..... मग झालं की चार-पाच लाईन झाल्या की शब्द मोजायचे..... असं करत निबंध लिहिला खरा पण शेवटी शब्द मोजल्यावर शब्द जास्त भरले.... किती जास्त ते मला आठवेना. मग मी कोणताही विचार न करता सरळ जेवढे शब्द जास्त झाले ते खोडून टाकले... कारण तिसरीत असताना आम्हाला पेन वापरायची परवानगी नव्हती.... आम्ही पेन्सिलच वापरायचो त्यामुळे खाडाखोडी करायला स्कोप असायचा.


आता ''माझं घर'' हा माझा बक्षिस मिळवून देणारा निबंध सांगते.... पूर्ण जसाच्या तसा आठवत नाही पण जेवढं जमेल तेवढं सांगते....


'माझं घर खूप छान आहे. मला ते खूप आवडतं. माझ्या घरात तीन खोल्या आहेत... एक स्वयंपाकाची खोली, दुसरी पाहुणे बसण्याची, तिसरी खासगी, जिथे मी माझे दफ्तर, पुस्तक, कपडे ठेवते ती खोली. घरात एक टी.व्ही. आहे तो एका टेबलवर ठेवला आहे. कोपर्‍यात दोन खुर्च्या ठेवल्यात. स्वयंपाकखोलीत खूप सारी भांडी आहेत. घरापुढे मोगर्‍याचं झाड आहे त्याला खूप छान वासाची फुलं येतात.'


असा हा मी लिहिलेला निबंध. तेव्हा विरामचिन्हांंचा वापर कसा करायचा तेही कळत नव्हतं. मोडकं-तोडकंच लिहिलेलं पण कदाचित तिसरीच्या मानाने चांगलं असावं म्हणूनच मला बक्षिस मिळालं होतं... बक्षिस काय मिळालं होतं तर एक फुलस्केप दोनशेपानी वही..... त्यावेळीचं त्या वहीच मूल्य आता सांगायचं झालं तर व्यक्त न करता येणारा आनंद! माझ्या लिखाणाची सुरूवात इयत्ता तिसरीपासून झालेली असं कोणाला सांगितलं तर कदाचित विश्वासही बसणार नाही पण हे सत्य आहे.... आणि यासाठी मी स्वतःवरच खूप खुष आहे.


Rate this content
Log in