उपरती
उपरती
"तुह्या सारकी सून मिळाया लय भाग्य लागतं बई,तुला सांगते तुहे सासू-सासरे लय नशीबवान ज्यासनी तू गावलीस बग." वसुदाकाकी मालतीच्या चेहऱ्यावरून हाथ फिरवत तिची स्तुती करत होती. काकींचा गावावरून आल्यापासून परत निघोस्तोवर मालती नावाचा कौतुक सोहळा थांबायचं नाव घेत नव्हता. मालती सोबत हे काही पहिल्यांदा घडत नव्हतं. तिला गेल्या दोन-तीन वर्षांपासून अशा कौतुकांची जणु सवयच झाली होती, पण ती कधी या कौतुकांच्या वर्षावात हुरळून नाही गेली.
अक्कांच्या पायाशी बसलेली वसुदाकाकी परतीच्या प्रवासासाठी उभी ठाकली.
"तुमचं पण ना...... काहीतरीच हं काकी...... असं नव काही केलं नाही मी...... असो, नमस्कार करते हा काकी" मालती वसुदाकाकींच्या पाय पडत बोलली.
"सुखी ऱ्हा पोरी....., रावू दे माय असच परेम अन माया रावू दे समद्यांवर...... येते म्या" एवढं बोलून काकी विनायकचा हात पकडून त्याच्या सोबत स्टेशनला निघाली.
"काकी, सावकाश जा.... आणि पोहचल्यावर बंडूला फोन करून कळवायला सांगा.... इथली अजिबात काळजी करू नका, स्वतःची काळजी घ्या " मालतीने आपुलकीच्या अनेक सूचना देत काकींना निरोप दिला.
"अहो ...जाताजाता काकींसाठी वाटेत काही फळ घ्या त्यांना जेवणाच्या डब्ब्याखेरीज बाकी काहीच देता नाही आलं." मालतीने विनायकला हळूच कानात सांगितले. विनायकनेपण नुसत डोकं वरखाली करत होकार दिला.
वसुदाकाकी गेली तशी मालती परत अक्कांच्या देखभालीत व्यस्त झाली. पण ह्या वेळेस वसुदा काकींच्या अतिस्तुतीचा अहं मालतीच्या निरागस मनाला स्पर्शून गेला. 'सगळयांना माझ्याबद्दल आपुलकी वाटते पण आपल्या घरात कोणालाच त्याच मोल नाही', असं आज पहिल्यांदा तिला मनोमनी वाटून गेलं. त्याचं कारणही म्हणजे अक्का एक खाष्ट सासू आणि विनायक मितभाषी पण तापत स्वभावाचा होता त्यातल्यात्यात अण्णांच्या जाण्यानंतर तो अजूनच मितभाषी झाला होता. विनायकला कधी कोणती गोष्ट नावडेल ह्याचा काही नेम नव्हता आणि ह्या अगदी उलट मालती जी की कायम स्वयंप्रेरित, सगळ्या बाबतीत प्रचंड हौशी आणि भरपूर बडबडी. तीची बडबड फक्त विनायक समोर आल्यावरच आपसूकच थांबायची, ज्याचं कारण त्याचा राग आणि एक अनामिक भीती.
तीन वर्षांपूर्वी अक्कांचे पती अण्णा गेले तशे अक्कांनी अंथरून धरले. मालती आणि विनायकचे तेव्हा नुकतेच लग्न होऊन चार महिनेच झाले होते. अर्धांगवायूच्या झटक्याने अक्का पूर्णपणे मालतीवर विसंबुन होती. मालतीने पण आपला कर्तव्यनिष्ठपणा जपत-जपत अक्कांचा अगदी कुकुल्याबाळा सारखा सांभाळ करत आली होती. अक्कांना काय हव,काय नको, शु-शी आणि आजारामुळे होणारी त्यांची प्रचंड चिडचिड एवढं सगळं ती निमूटपणे खरंतर खूप समजूतदारपणे सांभाळत होत
ी. तिचा पूर्ण दिवस फक्त नि फक्त अक्कांना सांभाळण्यातच जायचा.
अक्काचा दवाखाना, घराचा खर्च ह्या सगळ्यात गुरफटलेला विनायक एका खाजगी कंपनीत सर्वसाधारण पदावर कार्यरत होता. जेमतेम पगारावर संपूर्ण घरच्या जबाबदाऱ्या पेलवत कसाबसा संसार चालला होता. विनायक फक्त संसाराचा गाडा हाकणे आणि पुत्रधर्म बजावणे यातच स्वःताची धन्यता मानत होता. तो नवरा या नात्याने अगदीच शून्य होता. त्याने कधीच आपल्या बायकोच्या कोणत्याच इच्छा-आकांशाची कधीच दाखल घेतली नाही.
बघायला गेलं तर मालती एक पदवीधर मुलगी होती आणि तिला बाहेर काम करायची तीव्र इच्छा होती पण ती कधी विनायकांशी बोलू शकली नाही, त्यातल्यात्यात अक्कांनी अंथरून धरल्यापासून तर तिने आपल्या सगळ्या इच्छा अपेक्षेवर पाणी सोडल होतं. अगदी बाळाच्या इच्छेवर सुध्दा.
विनायक कामाला गेला कि मालती किचनमध्ये काम करत-करत हॉलमध्ये झोपलेल्या अक्कांशी तासनतास बोलत बसत. या घरात तीच हक्काच असं कोणी नव्हतं जे तीच म्हणणं ऐकून घेईल किंवा तिच्याशी हितगुज साधेल. ती फक्त अक्कांपुढेच आपलं मन मोकळ करायची. "अक्का आज वरण भात करते हा आपल्यासाठी...... काकी तुमची फार आठवण काढत होत्या...... आता दिवाळीजवळ येतेय आपण दोघी छानशी साडी घेऊ....... मी पण बाहेर काम करून हातभार लावेल यांना....... ती शेजारची राधा ह्या सुट्ट्यात काश्मीरला जाणार बघा....... आपणही जाऊयात कुठे तरी फिरायला........ अक्का मी आत्ता खालून कडीपत्ता घेऊन आले तीन शिट्ट्या झाल्यातर लक्ष राहू द्या हा......" अश्या असंख्य आणि अगणित गप्पा मालती अक्कांशी मारत असे, जणू काही त्या आत्ता उठुन मालतीशी गप्पा मारतील. मालतीने अक्का आजारी आहेत असं ना कधी समजलं ना कधी तस त्यांना भासु दिल. ती अगदी त्या घरात पाऊल ठेवल्यापासून जशी बोलायची तशी आजही अक्कांशी बोलत.
एका सकाळी मालती अशीच गप्पा मारत असतांना तिला "मालू" अशी हाक ऐकू आली, तिने दाराकडे पाहिले तिला कोणी दिसलं नाही. पुन्हा आपल्या कामात मग्न झाली परत आवाज आला "मालू".... तिने अक्कांकडे पाहिलं तेव्हा त्या काहीतरी हालचाल करताना दिसल्या आणि परत एकदा आवाज आला "मालू" . मालती जोरजोरात किंचाळु लागली, अंगात आल्यासारखी उड्या मारु लागली, वेड्यासारखी टाळ्या वाजवू लागली, तिचे डोळे क्षणात चिंब भिजले, चेहऱ्यावर नुसता आनंद ओसंडून वाहत होता आणि तोही का बर नसावा, ती हाक चक्क अक्कांच्या तोंडून आली होती. जणू मालतीच बाळ आज पहिल्यांदा बोललं होतं.
मालतीने ताबडतोब विनायकाला फोन केला, "अहो ... आपली अक्का.... अक्का..." अतीव हर्षोउल्हासापाई तिला पुढे काही बोलायला श्वासच अपुरा पडू लागला.