Mangesh Ambekar

Drama Others

3  

Mangesh Ambekar

Drama Others

ऋणानुबंध

ऋणानुबंध

30 mins
1.2K


सोहम गेल्या चार तासापासून अनोळखी अशा शहरात गल्लोगल्ली पायपीट करत होता. आस होती ती की आजतरी आसरा भेटवा. तहानलेला सोहम, उकड्याने घामाघूम, बेजार होऊन आपलं बुड कुठे तरी टेकवण्यासठी जागा शोधत होता. अखेर त्याला एका आळीत पिंपळाच्या झाडाखाली पाणपोई दिसली. लाल सुती फडक्याने गुंडाळलेला काळा रांजण बघून तो थोडा का होईना पण थंडावला, भलं त्या पाणपोईवाल्याच.  


हताश झालेला सोहम पाणी पिऊन पाणपोईच्या कठड्यावर बसला. रांजणाचा ओलावा घेण्यासाठी त्याचा हाथ नकळत त्या भिजलेल्या लाल कपड्याकडे सरसावला. पांढरी शुभ्र बंडी आणि पायजमा घातलेलं चाळिशीतील प्रोफेसर दामले आपल्या कंपाऊंडमध्ये कंबरेवर हाथ ठेवून बगळा आपल्या माश्याकडे टक लावून बघावं तसं सोहमकडे बऱ्याच वेळापासून एकटक पाहत होते. सोहमचा जसा स्पर्श झाला तसा त्याच्या अंगात एकदम गारवा संचारला पण तो गारवा रांजणाचा नसून दामले ओरडण्याचा होता. दामले त्याच्या अंगावर जोरात खेकसले. "ओ, हॅलो.... पाणी पिऊन झाल्यावर तो रांजण काय फोडायचा का आता, पंधरा दिवसा पूर्वीच एक माकडं पाणी ढोसून फोडून गेलाय, हा नवीन आणलाय आताच." 


सोहम ताडकन जागच्याजागीच उभारला, भर उन्हात दामल्यांनी सोहमला क्षणात गार करून टाकलं होतं. काय बोलावं ते कळेना, भांबावलेल्या अवस्थेत सोहम मिनटभरच्या स्तब्धते नंतर पुटपुटला. "म .... म .... माफ करा काका.... अवो माझा तसा काहीच मतलब नवता ओ, उलट खरंतर तुमचं धन्यवाद की उकड्यात तुमच्यामुळे तहान मिटतिया सर्वांची, लयभारी काम करताय बघा तुमि. माफ करा हा काका, येतो मी." एवढं बोलून पुढे चालू लागला. 


सोहमच असलं बोलणं आणि भाषा ऐकून दामले जागचे थांबले. तसे दामलें मुळात मृदू, बोलके आणि हळव्या स्वभावाचे. दामल्यांना वाटलं या बिचाऱ्याला थोडं जास्तच बोललो. ते थोडेसे भावुक झाले आणि होणार पण का नाही, एकतर सोहमच बोलणं आणि दुसरं म्हणजे गेल्या पाच वर्षापासून ते न चूकता दर उन्हाळ्यात पाणपोई लावत होते पण कधी कोणी त्यांच्या उपक्रमाला साधं "वाह!" म्हणून कौतुकही केलं नव्हतं. पण या मुलाने त्यांचं छटाकभर केलेलं गुणगानही त्यांच मन गदगदीत करून गेलं, मग तर त्याला ते असंच कसं सोडणार. 


"ओ, हॅलो....ऐका" अजून काही बोलण्याच्या आत सोहमला तसाच पुढे चालू लागला. त्याला वाटलं हा बुवा आता काय पंधरा दिवसापूर्वी दुसऱ्याकडून फुटलेल्या रांजनाचे पैसे आपल्याकडे मागतोय की काय? पण दामल्यांच्या दोन-तीन "ओ, हॅलो" ला शेवटी कंटाळुन मागे वळून म्हणाला, "हॅलो काका!अवो माझं नाव सोहम अय ओ ." "अच्छा सोहम काय, अरे माझं तरी नाव कुठे 'हॅलो काका' आहे, मी दामले, वसंत सदाशिव दामले" पाचकळ विनोद मारून दामल्यांनी सोहमला कसतरी बोलतं करण्याचा प्रयत्न केला. दामले हे आपुलकीचे आणि बोलण्याचे भुकेले. 


"तु काही शोधताय का ह्या आळीत?" दामल्यांनी विचारलं.


"अSSSSS अळी SSSS कुठंय अळी, मला कशी नाही दिसली." सोहम अंग चाचपडत बोलला. 


"अरे आळी म्हणजे ती झाडावरची अळी नाही रे बाबा, हि आळी " एक हात डोक्याला आणि दुसरा हात रस्त्याकडे दाखवत दामले ओरडले. 


सोहम हसत हसत म्हणाला, "अररSरSर र र गल्ली मना कि मंग" 

 

"अवोSS काका मी भाड्याची रूम शोधतोय, हाय का इकडं कुटं?" सोहमने मोठया अपेक्षेने त्यांना विचारलं. 


दामले त्याच असलं बोलणं ऐकून त्याच्याकडे डोळे वटारून बघू लागले, त्यांच्या अचानक पाराच चढला "अरे काय बोलतोय काय हे? हे काय बोलणं झालं? मोठ्यांशी कस बोलतात, काही शिकवलं नाही का कोणी?"


सोहम परत घाबरला त्याला काही कळेना कि आता काय चुकलं आपल, " काय झालं काका तुमाला यवड चिडायला, काय चुकलं बिकल का?"


सोहमच असलं बोलणं ऐकून तर दामल्यांना अजून राग भरला, "अरे चुकलं बिकल काय विचारतोय, हि काय पद्धत झाली, कोण हा भाड्या? कोणाबद्दल अशी विचारपूस करता का? आणि तुझ्या भाडयाला आम्ही कस ओळखणार?" 


सोहम आता पुरात कळून चुकलं कि काका का चिडले, त्याने क्षणाचाही विलंब ना करता दामल्यांना थांबवत, "अररSररSरSSर तस नाय ओ काका तुमाला कई यगळंच वाटलं, मी मनलो कि एखादी रूम आहे का भाड्याने रायला इत.... खोली आय का इकड कूट?, असं विचारायचं होत."


दामले शांत झाले, "अरेच्चा.... असं हो, अरे मग असं विचारतात का? मला काही वेगळच वाटलं ना. कशी भाषा वापरतोस, बर ते असो कुठला तू ? मराठवाड्याचा दिसतोय" दामल्यांची हि एक विशिष्ठ सवय आपणच प्रश्न करायचे आणि लागलीच आपणच उत्तर द्याच.


सोहम डोळे विस्फारून आपल्याच अंगाकडे खालीवर मागेपुढे बघू लागला. 


दामले त्याच्याकडे बघत "अरे असं काय बघतोय,आता काय झालं?"  


"नाय तस काय नाय, बगत होतो कि माझ्या अंगावर काय लिवलं बिवल हाय काय. तुमाला कस कळलं कि मी म्हराठवाड्याचा मनून?"


दामले आता पार खळखळून हसायला लागले, "अरे मग अंगा खांद्यावर काय बघतोय स्वतःच्या, तुझ्या बोली वरून लगेच कळलं मला, मी पण बॅचलर असतांना तीन-चार वर्ष औरंगाबादलाच होतो प्रोफेसर म्हणून." 


सोहमने पण हसत हसत "हत्त-तिच्या मारी..... हवका! तेच मनलं तुमाला म्हाज ठिकाण कस गावलं, माझं गाव औरंगाबाद पासून चाळीस किलोमीटरवरच आहे बघा" 


दामले त्याला समजावत, "अरे,कस आहे ना, मराठवाड्याची भाषा आणि टोनींगच वेगळं, महाराष्ट्राचं सेन्टर ना तुमचं शहर त्यामुळे तिथं मालवणी सोडलंय तर खान्देशी, व्हराडी आणि नगरी असं सगळ्याच भाषेचं थोडं थोडं मिश्रण आहे बघ "  


दामल्यांचं लेक्चर ऐकून सोहम धन्य पावला, पण त्याच्या डोक्यात नुसता निवाराशोध घोळत होता, पुढे दामले अजून काही बोलण्याच्या आत त्याने दामल्यांना विसर पडलेला प्रश्न परत टाकला, " हाव अगदी बराब्बर आय बघा तुमचं, म्हराठ्वाडा तो म्हराठ्वाडा त्याची सर नाही कुट, लय बर वाटलं बघा तुमाला भेटून, बरं मी काय मनतो काका, आहे का मंग एखाद रूम इकडं?"

  

"वन रूम का वन बीएचके हवाय का? ........... तसा ह्या आळीत तुम्हाला ते दोन्ही भेटणार नाही" दामल्यांनी एका क्षणात सोहमचा हिरमोड केला.


त्याचा पडलेला चेहेरा बघून दामल्यांनी त्याला थोडं बसवलं. त्याची नेमकी गरज जाणून घेत त्याच्या सोबत तब्बल तासभर गप्पा मारल्या. शेवटी दामले हाडाचा शिक्षक, बायको घरात वामकुक्षी घेत असतांना यांना कोणीतरी बोलायला भेटलं याचा त्यांना आनंद. पण सोहमची सखोल विचारपूस केली. सोहमने पण आपली आपबिती सांगितली


सोहम एका मध्यमवर्गीय घरचा पण मनाने श्रीमंत असं पोरं. तरणाबांड सोहम कित्येकांच्या गळ्यातलं ताईत होता. त्याची सद्सदविवेकबुद्धी आणि बोलकं व्यक्तिमत्त्व त्याला आपलंसं करून टाकायचा. त्याचे आई-बाप तो आठवीत असतानाच अपघातात वारले. नंतर मामाने जमिनीच्या तुकड्यापाई त्याचा ग्रॅज्युएशनपर्यंत कसाबसा सांभाळ केला. मामा आपला सांभाळ का करतोय ही गोष्ट त्यालाही चांगलीच माहीत होती. अभ्यासात तो तसा जेमतेमच, गावाकडच्या कॉलेजमध्ये नकला करत करत कसाबसा काठावर उत्तीर्ण झाला, पण प्रचंड मेहनती, तारुण्याची झिंग त्याच्या अंगात होती. आपलं सर्व शिक्षण शेती करत करत पूर्ण केलं. शिक्षण संपल्यावर अर्धी जमीन मामाच्या नावावर केली, थोडी विकली आणि राहिलेला तुकडा आपल्याकडे ठेवला, पण शेतीत राहिलेल्या तुकड्यात काही भागणार नाही हे तो जाणून होता आणि परत अजून आपला कोणाला त्रास नको म्हणून सोहमने कामासाठी पुण्यात यायचं ठरवलं. 

नोकरी भेटण्यात पराकाष्ठा करावी लागणार हे त्याच त्याला चांगलं ठाऊक होतं. मित्रांनाच्या मदतीने पुण्यात दोन-तीन दिवसांचा आसरा त्याने मिळवला. त्या दोन दिवसांचे दोन आठवठड्यात रूपांतर होतं आले होते. त्याने जंग जंग पछाडले पण त्याला काही केल्या ना नोकरी ना कुठे निवारा भेटेना. 


दामले आधीच भावुक स्वभावाचे एक परोपकारी व्यक्तिमत्त्व. सोहमची आपबिती आणि सध्याची परिस्थिती ऐकून दामले एकदम हळवे झाले. सोहमने त्यांना क्षणात आपलंस करून टाकलं होतं. दामल्यांच्या समोर ते स्वतः जेव्हा या शहरात आले होते त्या स्मृतीचा काळ ओसरला. एवढा गुणी मुलगा डोक्यावर आई वडिलांचं छप्पर नाही. दुसऱ्यांना कोणाला आपला त्रास नको म्हणून, नोकरी करून स्वतःच्या पायावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहतोय. याला आपण कश्या प्रकारे मदत करू शकतो. या विचारात दामले हरवले.


तेवढ्यात सोहम उठला "बर काका, काही असलं तर नक्की सांगा" नमस्कार करून सोहम मागे फिरला. सोहम चार पावलं पुढे जात नाही स्तोवर दामले परत एकदा ओरडले. 


"ओ हॅलो.... सॉरी सॉरी.... सोहम तुला माझ्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहणं आवडेल का? " दामले शक्य होईल तशी मदत त्याला करू इच्छित होते. 


"काय मनता काका ! पळलकी, भिकऱ्याला भीक जेवढी भेटली तेवढी ठीक! कावून नय आवडणार , पण....." सोहमला तर आभाळ ठेंगणं झालं होत, पण त्याच्या "पण" ने दामल्यांचा कपाळावर आढया पडल्या. 


"पण ..... पण काय रे"? दामल्यांनी विचारलं


"पण काका, भाडं किती ? मला अजुक काम-धंधा पण शोधायचाय?" सोहम हळूच पुटपुटला


"अरे, तेवढंच ना ! तू घर बघ पाहिले, मग ठरवू आपण सगळं, आणि बाय द वे, आय विल नॉट आस्क यु समथिंग इर्राशनल. आणि हो हे काका, काका म्हणू नकोस मी फक्त शेचाळीस वर्ष्याचाच आहे, यु कॅन कॉल मी, मीस्टर दामले ऑर जस्ट वसंत, ओके. "


भावुक होऊन दामल्यांनी त्याला मदत केली तर खरी, पण ते हे विसरले होते की अजून आपण आपल्या संगिणीला सांगितलं सुध्दा नाही. हे तिला आवडेल का नाही? पुढे काय लिहून ठेवलं होतं ह्याची त्यांना कल्पना नव्हती. 


भाग-दुसरा 


"ये, सोहम आत ये, मी पाणी आणतो थांब" दामाल्यांनी सोहमला घरात बोलवले. 


सोहम त्यांना थांबवत मिश्कीलपणे "काका....वो नग, एवढा भला मोठा रांजण बाहेर ठेवलाय अजून किती पाणी पिऊ घालणार."  


"अरे हो विसरलोच मी, बर पण ह्याक्षणी तुला अजून काही मी देऊ शकत नाही, आमचं सरकार आत वामकुक्षी घेत आहे, आणि मला पाणी उकळण्या पलीकडे दुसरा कुठला स्वयंपाक येत नाही रे बाबा." दामले बोलले आणि दोघांचा हसण्याचा टोह फुटला. 


हसण्याच्या आवाजामुळे आतल्या खोलीत साखर झोपेत असलेली मधुरा जागी झाली. आपल्या पतीदेवाने भलत्यावेळी आता कोणाला पकडून आणलं हे बघण्यासाठी ती उठली. उठताना तिचा हात बाजूला ठेवलेल्या तांब्यावरच्या पेलाला लागला आणि पेला खाली पडला. 


"ह्या मांजरांनी ना नुसता विट आणलाय बघ, बस तू मी आलोच" दामले आवाज ऐकून आतल्या खोलीकडे वळले. तिथं दिवाणापाशी मधुरा उभी होती. तिच्या चेहेऱ्यावरचे प्रश्न पाहून ते सरळ तिच्याजवळ गेले आणि तिला हलक्या आवाजात सोहम बद्दलची कल्पना देली. 


दोघांना मुलबाळ नव्हते आणि त्याची सल दोघांनाही कायम होती.त्या दोघांच्या वयात सात वर्ष्याचा फरक होता.दामले शेचाळीसचे तर मधुरा  एकोणचाळीस वर्ष्याची. दामले एका कॉलेजात प्रोफेसर आणि मधुरा घरच्या घरी शिवणकाम करत. मधुरा दिवसभर घरी एकटीच असायची. घरात कोणाची तरी सोबत असावी म्हणून त्यांनी एखाद्या मुलीला पेइंगगेस्ट म्हणून ठेवायचं ठरवलं होतं. 

मुलीला पेईंगगेस्ट म्हणून ठवायचं ठरलं असतांना एका मुलाला पेईंगगेस्ट ठेवण्याबद्दल मधुरा थोडी विरोधातच होती. दोघांत थोडीशी खुसपुस झाली. शेवटी दामल्यांनी सोहमला खालची खोली न देता वरच्या खोली ठेवू या अटीवर मधुराचा होकार मिळवला. तसाही वरच्या खोलीचा जिना बाहेरूनच होता जेणेकरून तो कोणालाच त्याचा त्रास नव्हता.


दामले परत हॉल कडे येत सोहमला विचारलं, "अरे चहा घेणार का कॉफी." 


"मांजरान त्वांड घातलं नसलं तर काहीही चालेल काका" सोहमच हसत हसत बोलला, असलं उत्तर ऐकून मधुराला वाटलं हे प्रकरण थोडं आगाऊ वाटलं. 


दामले हसले "अरे बाबा नाही, तसं काही नाही, मांजर नव्हती ती, आपल्या हसण्याचा आवाज ऐकून आमचं खटलं जागी झालं."


"मधु अरे इकडे ये तुला ओळख करून देतो" दामल्यांनी मधुराला बोलावलं. 


मधुरा आपला अवतार सावरत हॉलमधे आली " नमस्कार" 


"ह्या आमच्या सौभाग्यवती मधुरा दामले, आणि मधु हा सोहम, रूम शोधतोय" दामल्यांनी एकमेकांची ओळख करून दिली. 


"मी याला आपली माळ्यावरची खोली दाखवतो, तो पर्यंत तू थोडा चहा ठेव सगळ्यांसाठी. सोहम ये रे..."


वरची खोली फार अडगळीची, सगळीकडे धूळ, जळमट आणि जुन्या पडीक वस्तू. एखाद्या प्राण्याने पण तिथे क्षणभरही थांबू नये एवढं निर्जीवित्व होत तिथं. दामले जुनी झालेली वस्तू तिथे आणून टाकली की वर्षभर परत तिकडे कोणी फिरकत ही नसे. अशी खोली कोणाला आवडणार, तरी सोहमची गरज आवडी-निवडीपेक्षा महत्वाची नव्हती.


"सोहम ही बघ तुझी रूम. थोडी अजागळ परिस्थितीत आहे, पण घाबरू नकोस मी कामवलीला साफसफाई करायला सांगतो, आणि हो हे समान हवं तेवढं तू वापर बाकी एका कोपऱ्यात ठेवू तू आलावर. ओकेSS" दामल्यांनी त्याला पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. 


सोहम रूम निरखून पाहत होता, तेवढयात मधुराचा आवाज आला "वसंता चहा झालाय, खाली या" दोघेही खाली आले, चहा घेतला. एकंदर सोहमच्या वागण्या वरून मधुराला विश्वास होता की, वरची रूम याला काही पटणार नाही. तिने त्याला खोचक प्रश्न केला. "काय आवडली का रूम? थोडी वाईट अवस्थेतच आहे तशी"


सोहमलाही या शिवाय कोणताच पर्याय नव्हता. विचारांचे गोंधळ थांबवत, ".मला आवडली तशी पण अवस्था थोडी नाही भलतीच बिकट आहे हो. पण चिंता नका करू, मी दोन दिवसात व्यवस्थित करून घेईल. काय बी प्रॉब्लेम नाय ! मला चालेल, पण भाडं किती तेवढ सांगा " " सोहम मोठया आत्मविश्वासाने दामले आणि मधुराला उत्तरला. मधुराला हा त्याचा फाजील आत्मविश्वास वाटला.


"बघू रे पुढं, तू ये तर आधी राहायला" दामले सोहमचा प्रश्न टोलला. 


तिने भुवया उंचावून दामल्याना एक कुचित हसू दिलं आणि कपबशी उचलून आत घेऊन गेली. दामल्यांना पुढची परिस्थिती कळून चुकली होती.


सोहम उद्या सामान घेऊन येतो सांगून गेला. दामले सरळ मधुराकडे गेले, "मधू, अगं..काय झालं तुला काही चुकलं का?"


बस.. झालं तर मग ........ मधुराने प्रोफेसरची उजळणी घ्यायला सुरुवात केली, "अरे, तुला काही कळत की नाही, मला काही न विचारता तू होकार देऊन टाकला सुद्धा आणि किती उद्धट आहे हा, काय ठरलं होत आपलं आणि तुला कस पटतं याचं असलं आगाऊ बोलणं."  


एका प्रोफेसरला काहीही बोललं तर तो खपवून घेतो पण "काही कळतं की नाही" असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा तो पेटूनच उठल्याशिवाय राहत नाही, तसंच काहीसं दामले बद्दल झालं.


"अरेच्चा.... काय...काय उद्धटपणा केला त्याने? तुझं हे नेहमीचंच आहे हा मधु. तुझी दुपारची झोपमोड झाली की तू असंच काहीसं करते. आणि राहिला त्याच्या ओपॅनली बोलण्याचा प्रश्न तर मीच त्याला आपल्या सोबत मोकळं बोलायचं सांगितलं होतं."  


"अरे हो पण तुला का एवढा पुळका त्याचा, कोण लागतो कोण तुझा तो" मधूराने प्रतिउत्तर केलं. 


"अगं तसं काही नाही, तू पण त्याची आपबिती ऐकशील तर कळेल तुला " शेवटी दामाल्यांनी मधुरा पुढे काही बोलण्याच्या आत तिच्या समोर सोहमची संपुर्ण व्यथा मांडली. दामले जेवढे भावुक होते तेवढीच मधुरा वास्तविकवादी पण दोघांची कमकुवत बाजू म्हणजे माणुसकी. मधुराही सोहमची व्यथा काहीशी भावनाविवश झाली, पण तिने चेहऱ्यावर अजिबात झळकू नाही दिलं. 


"अच्छा...... तर हे असं आहे सगळं प्रकरण, पण मला त्याच उद्धट बोलणं काही पटलं नाही. मला तो जरासा विचित्रच वाटला बघ. तू पुन्हा विचार कर." मधुरा नकार घंटा चालू ठेवला.


पण सोहमसाठी पेटून उठलेल्या दामल्यांनी विषय तसाच तासभर पुढे चालू ठेवत मधुराला फार विनवणी केली आणि पटवून सांगण्याच्या बाबतीत प्रोफेसराचा धर्म राखला. मधुराने शेवटी कंटाळून

असो...चालू द्या तुमचं, पण त्याला आपल्या जेवायच्या, झोपायच्या वेळा नीट समजावून सांग." एवढं बोलून मधुराने थोडं आवरत घेतलं. मनातून दामल्यांना आनंदच झाला खरा पण आता पुढे याचे येण्याने काय होणार हे त्या दोघांना माहीत नव्हते.भाग-तिसरा 


दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सोहम सगळं समान घेऊन दामल्यांच्या दारात पोहोचला. कदाचित तो फक्त आदली रात्र सरण्याची वाट पाहत होता. दामल्यांनी संध्याकाळीच कामवालीला सांगून रूम बऱ्यापैकी साफ करून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण पडीक सामानाची अवस्था आहे तशीच होती. सोहमने मधुरा कढून चावी घेऊन आपलं समान एकदाच पटकल आणि पहिले जून्या सामानाची व्यवस्था करण्यात गुंतला. दामले सकाळी फेरी मारून आल्यावर मधुराने त्यांना सोहम आल्याचा निरोप दिला. 


सर्व अवरल्यावर दामल्यांनी सोहमला नाष्ट्यासाठी बोलवायच निमित्यकरून सोहमच्या खोलीकडे गेले. त्याला खाली यायच्या पहिलेच मधुराची व्यवस्थित कल्पना देली, " हे बघ सोहम, मी तुला माझ्या बोलण्यावर हि खोली देऊ केलीय नाहीतर आम्हाला पेइंगगेस्ट म्हणून फक्त मुलीच ठेवायच्या होत्या, त्यामुळे मधू थोडी नाखूष आहे, ती काही बोलली तर तिचा राग नको मानू, आणि तिच्या समोर थोडं शिस्तीतच वाग, तिला नवख्यावर विश्वास बसायला वेळ लागतो, सांभाळून घे. "


सोहम खदखदून हसत हसत म्हणाला, "हत्त-तीच्या यवडच ना! काय टेनसन घेऊ नका तुमी, आणि त्यांना मनावं पोरीचं ठेवाच्या असतील तर आताबी ठेवू सकता तुमी, मला कायबी प्रोबलॅम नाही बघा, माज तरी कूट लगीन जालय." 


"हे बघ असा फाझीलपणा पुरे कर आता, नाहीतर ती आताच बाहेर काढेल तुला" दामलेपण हसत हसत बोलले आणि मधुराच्या पुढच्या हाकेवर नाष्टा करायला कदोघे खाली गेले. 


मधुराने सांगितल्या नियमाप्रमाणे नाष्टा करत दामल्यांनी सोहमला , प्रत्येक घासाला एक नियम सांगत नियमावली त्यासमोर मांडली, पण सोहमला कडाडून लागलेल्या भुकेसमोर सांगितलेला प्रत्येक नियम डोक्यात जाण्याऐवजी पोटात गेला. 


"वाSSSवा लयभारी!!!! काय भारी चव आहे या पोयांची..खुप मस्त ." सोहमने दामल्यांकडे दुर्लक्ष करत थेट मधुराला अभिनंदन करत बोलला. बऱ्याच दिवसानंतर एखाद्या भिकऱ्याला अचानक राजभोग भेटावं असं त्याचं झालं होतं. मधुरा ही खऱ्या अर्थाने अन्नपूर्णाच होती दामल्यांनी तिचे हातचे पोहे खाऊनच पसंत केलेलं.


मधुरा सोहमने केलेल्या कौतुकावर भाळली खरी पण मनातली अढी तिच्या बोलण्याला अढसर करत होती, शेवटी थोडं थांबून मौन तुटलंच "खरंच आवडला रे सोहम तुला, थँक्स हं.... नाहीतर हे एक हा आहे जे साठ किलो वरून नव्वदीत पोहोचला पण कधी माझ्या हातच्या जेवणात त्यांना चव सापडली नाही बघ! " 


"अगं तुझं हातचं जेवण सुंदरच....पण माझ्या आईच्या हातची उत्कृष्ट त्याची सर याला कसं येणार. " खऊट बोलण्यात दामले पटाईत. मधुराने जरा डोळे मोठे केलेत आणि दामले निमूटपणे मान खाली घालून खात बसले.


"हे बघा काका, असल्या गोडीला कसलीच तोड नाय. माझी आईपण सेम पोये बनवायची. मला तिच आठवली बघा" सोहम ठासून बोलताना त्याच्या डोळ्यात हलकसे पाणावलेले होते, ते दामले आणि मधुरालाही जाणवलं. त्याचे वाक्य ऐकून तिचेही डोळे पाणावले. वातावरण एकदम भावुक झालं.


"ऑफकोर्स माय डिअर, देअर यु आर. मी हिला हेच सांगतो आपल्या आईच्या हातची चवच सर्वात उत्कृष्ट असते." दामल्यांनी असं बोलून भावुक होऊ घातलेल्या वातावरणाचं तोंड पुन्हा त्यांच्या पाचकळ विनोदाकडे वळवलं. खरंतर दामलेंच्या असल्या विनोदबुद्धी मुळेच मधुराच्या डोळ्यांना कथ्थकलीच्या अष्टदृष्टीभेदाच नृत्यसौन्दर्य प्राप्त झालं होतं. मधुरा तोंडाने कमी आणि डोळ्यांनीच जास्त बोलायची. परत बुबुळांचे नृत्य सादर करत मधुरा बोलली "बस्स पुरे झाला हं तुझा फाजीलपणा, ऊठ आता कॉलेजला उशीर होतोय तुला."


दामलेंनी आवरत घेत, कॉलेजला जायच्या तय्यारीत लागले. सोहमने मांजरबोक्याच भांडणाची मजा घेत नाष्टा संपवला. दुपारी राहिलेलं समान आणतो म्हणून जेवायला नाही येऊ शकणार असं सांगून रूम कडे वळला. 


मधुरा पण आपल्या कामात गुंतली, दुपारच जेवण आणि वामकुक्षी झाल्यावर दुपारी साडेचारच्या सुमारास सोहम आला. त्यानंतर थोड्यावेळाने मधुरा कामवाली बाईला घेऊन ती सोहमच्या रूमकडे काही आवरायचं राहील का ते बघायला गेली. सोहम आणलेलं समान लावत होता. दार उघडच होतं. मधुरा आणि तिची कामवाली रूम बघून आवक राहिल्या. सोहमने बऱ्याच पडीक वस्तूंचा वापर करत, त्या अजागळ रूमचा पुरता कायापालट करून टाकला होता. निर्जीव वस्तूला सजीवत्व प्राप्त झाल्यावर जसा आनंद होतो तसा काहीसा आनंद मधुराच्या चेहऱ्यावर दिसला. सोहम रूम सावरण्यात इतका गुंगला होता की त्याला यांच्या येण्याचं भान पण नव्हतं. मधुराने पण त्याच्या कामात अडथळा न आणता, कामवलीला घेऊन तेथून माघारी फिरली.


आधिच सकाळी नाष्ट्याच्या वेळेसचे सोहमचे पाणावलेले डोळे पाहिल्यापासून मधुराच्या मनात सोहमचे विचार घोळत होतेच. आणि आता त्याचा व्यवस्थितशीर आणि समंजसपणा बघून त्याबद्द्लचा झालेला गैरसमज पूर्णपणे पुसल्या गेला. दामले घरी परतल्यावर तिने पाहिलेला वृत्तांत त्यांच्या समोर मांडला. दामल्यांना सोहमचा आणि त्यापेक्षा थोडं जास्त म्हणजे स्वतःच्या निवडीच जास्त कौतुक वाटलं.


जवळपास वीस दिवस होत आले होते. नाष्टा झाला की सोहम आणि दामलें सोबतच घराबाहेर पडायचे. सोहमची एक चिंता मिटली होती परंतु नोकरीचा शोध सुरूच होता. सोहम वणवण करत ठिकठिकाणी मुलाखती देत आणि दिडच्या सुमारास जेवयाला घरी येत असे. घरी आला की हातपाय धुवून जेवणाच्या ताटावर आधाश्या सारखा तुटून पडायचा. दुपारच्या जेवणाला मधुरा आणि सोहम दोघंच असायचे. हळूहळू मधुराच आणि सोहमच बोलणं वाढतं होतं. काही दिवसांनी तर जेवण थोडं आणि गप्पाष्टक जास्त, दोघे असे निवांत वेळ घालवायचे. तसं दुपारच्या जेवणात मधुरा स्वतःसाठी काही जास्त करत नव्हती पण मधुरा दुपारच्या जेवणाला सोहमच्या आवडीचे नाना तऱ्हेचे पक्वान्न करु लागली आणि त्याच्यासाठी आवर्जून थांबु लागली. याचं दुपारच्या सहवासा दरम्यान दोघे एकमेकांच्या बरीच जवळ आली होती. एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी, जुन्या आठवणी आणि दामल्यांचे किस्से अश्या बऱ्याच गोष्टींवर दोघांच्या चर्चा रंगायच्या. मधुराला आपल्यापेक्षा सोहमच्या भूतकाळाबद्दल जास्त कुतूहल वाटायचं. या गप्पा गप्पात मधुराला सोहमबद्दलचा जवळपास सर्वच गोष्टी कळल्या होत्या. तिच्या मनात सोहम बद्दल सहानुभूती वजा प्रेम निर्माण व्हायला जास्तवेळ नाही लागला. पुढे दोन-तीन महिन्याभराच्या काळातच दोघांमध्ये भरपूर जवळीक वाढली. 


सोहम आल्यापासून मधुराने पण त्याच्यासाठी खास खास पदार्थांची रेलचेल सुरू केली होती. संध्याकाळी दामलें आले की रात्री तिघे सोबत जेवण करत. जेवण उरकल्यावर दामलें आणि सोहम कॅरम खेळत आणि गप्पा मारत. रात्री झोपायच्या वेळी बिछान्यावर मधुरा दामलेंना तासनतास सोहमच्या दिवसभरच्या सर्व गोष्टी सांगायची. एकंदर सर्व गुण्यागोविंदाने चाललं होतं. कोणाची नजर ना लागो यांच्या सुखाला.
क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama