दादा म्हणायचं राहून गेलं....
दादा म्हणायचं राहून गेलं....


दादा स्वतःला आवडणारी राखी स्वतः आणायचा आणि छोटीच्या हातात द्यायचा. छोटीचे इवले इवले हात राखी घेऊन भावापुढे यायचे. छोटीला अजुन राखी बांधता येत नाही म्हणून भाऊच छोटी समोर हात पुढे करून तिच्या हाताने आपल्या मनगटावर फक्त राखी ठेवुन घ्यायचा आणि नंतर ती राखी आई कडून घट्ट बांधून घ्यायचा. ओवळता येत नव्हते म्हणुन तिच्या लुटपुट्या हातातली थाली पकडायचा आणि स्वतःच ओवाळून घ्यायचा. आदल्या दिवशी बाबाकडून पैसे घेऊन आपल्याकडचे सर्व पैसे टाकून, इतरांच्या बहिणीपेक्षा सगळ्यात सर्वात सुंदर भेट छोटीसाठी आणायचा. एवढा सर्व आटापिटा कश्यासाठी तर फक्त छोटीच्या बोबड्या आवाजातली 'दादा' नावाची ती गोड हाक ऐकण्यासाठी आणि ते दादापण जपण्यासाठी. अख्या गल्लीभर दादा नावाचा टेम्भा मिरवायचा.
छोटी पहिलीला होती त्यावेळेस आई वारली. तेव्हापासून बाबाने आणि दादाने तिची सर्व जबाबदारी घेतली. दादा सोबतच दिवस सुरू व्हायचा आणि त्याच्या कुशीतच संपायचा. शाळेपासुन कॉलेजापर्यंत सगळीकडे तिची पाठराखण करायला तो तिच्या सोबत असायचा. ती तशीच सर्व भार त्यावर सोपवुन बिनधास्त जगायची, फुलपाखरं सारखं उडायची. लग्नासाठी कितीतरी नाकार तो त्याच्या माथी घ्यायचा. वेगवेगळी कारण सांगून बाबांना पटवायचा. अखेर मनासारखं राजपुत्र तिने दादाकडे मागितला. कुवतीपेक्षा मोठ्या घरात लग्न लावुन देणं हे बाबांच्या हाताबाहेरच होतं . तरी बाबांनी लग्नासाठी होतं-नव्हतं ते सर्व पणाला लावलं तरी अर्ध्यावरही पोहचु नाही शकले. शेवटी दादाने त्यांना धीर देत, सावकारांकडून कर्ज उचललं आणि छोटीच लग्न एकदम थाटात लावून दिलं. तरीही राजपुत्राचा सुर नावडतीचाच होता. शेवटी पैश्याचा देखावा तो, फाटक्या खिशाने कसा भरणार.