Pain Of पेन
Pain Of पेन
बॉसच्या केबिनमध्ये फाईलींची जोरदार आदळआपट चालू होती. "यु आर अॅब्सुलेटली नॉट ऐट ऑल सिरियस अबाऊट युअर वर्क!!!!! आजपण लेट???? काय चाललंय काय तुझं????? काय आज काय नवीन कारण????" हे बोलताना लालेलाल झालेले डोळे, चेहऱ्यावर मला खाऊ का गिळूचे पाशवी भाव आणि मनात 'आज कसा गावला लेका' असा आसुरी आनंद बॉसच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. या अतीव आनंदाचं कारण म्हणजे 'मी', जो दुसऱ्या दिवशीही ऑफिसला उशिरा येऊन बॉस समोर पडलेल्या मस्टरवर सही करण्यासाठी अगदी निरागसपणे (खरतर निर्लज्जपणे) बॉसलाच पेन मागत होतो.
"असुदे आता प्रेझेंटी लावायची गरज नाहीए, मी पहिलेच तुझ्या रकाण्यावर लाल ठळक अक्षरात शेरा मारालाय!" असं चिडून ओरडत बॉसने रागाच्याभरात चुकून मला देण्यासाठी काढलेले पेन परत खिशात ठेवले.
"तुझं जर असंत चालू राहिलं तर आय हॅव टू टेक डिसिजन!" या पेटंट वाक्याची कुऱ्हाड कानी पडायच्या आत मी बॉसला जगातला सर्वात सुंदर असा एक शब्द चिपकवुन निर्लज्जपणे "सॉरी" म्हणत कॅबिनच्या बाहेर पडलो.
"गप-गुमान खाली मुंडी, गाढवच लागता साहेबांच्या तोंडी." असं मानणारा गरीब नोकरदार मी, बॉसला पुढे अजून काही समजावून सांगण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हतोच. तसाच कॅबिनच्या बाहेर पडलो. बॉसला, नोकरीला आणि उरलं-सुरलं नशिबाला चार-पाच शिव्या हासडत थेट स्वतःच्या क्युबिकलमध्ये जावून बसलो. याखेरीज माझ्यासारखा एक सामान्य माणूस अजून काही वेगळं करु शकतही नाही आणि जो करतो तो सामान्य नाही.
ऑफिसातले अगदी खास असणारे मित्र कधीच कोणत्या कामाच्या वेळी जवळ येऊ ना येऊ पण बॉसच्या चार शिव्या खाल्लेल्याकडे पहिले पोहचतात. बॉसच्या त्या गरमागरम तव्यावर खरपूस शेकलेल्या अशा चपातीचा आस्वाद घेण्यासाठी, स्वतःच्या सांत्वनरुपी लोणच्यासोबत आपल्यासमोर येऊन उभी ठाकतात. यातच अशा नारदांना खरा आनंद, बाकी काम-बीम गेलं फाट्यावर.
"काय रे काय झालं, आज परत खिरापत का?" एका नारदाने माझ्या खांद्यावर हाथ ठेवत मला विचारले. अशा परिस्थितीत नारदाचं खांद्यावर हाथ ठेवणे म्हणजे नुकत्याच खरचटल्या जखमेवर लगेच डेटॉल ओतण्यासारखं.
"काय करू आता, बॉसला खरं सांगूनसुद्धा विश्वास बसत नाही, अरे परवा ओपन-डे म्हणून मी फुल-डे सुट्टी टाकली होती आणि आज मुलीच्या शाळेत गोवर-रुबेलाची लसीकरण मोहीम होती म्हणून उशीर..."
"पण मी काय म्हणतो लसीकरणला कुठे एवढा वेळ लागतो मी पण तर आज सकाळीच गेलो होतो मुलाच्या शाळेत." स्वतःच्या मुलांच्या शाळेची कधी पायरीही न चढलेला हा नारद, घुशीसारखा जमीन पोखरून अजून खोलात शिरू पाहत होता. खरंतर याची बायको सगळं "चूल, मूल आणि स्कुल" सांभाळते म्हणून याचं धकतं, नाहीतर तुम्ही जर याला विचारलं की तुमचा मुलगा कितवीत आहे तर तेही हा एका झटक्यात सांगू नाही शकणार असा हा कामचुकार, अजाणता बाप.
"अरे काय सांगू आजचा दिवसच खराब...... या कर्तव्यदक्ष बापाला काल कळलं की, आज लसीकरण आहे म्हणून मी सकाळी सकाळी आठ वाजताच शाळेत पोहोचलो, सर्व मुलांचे आई-वडील आलेले, खास करून आयाच जास्त, वडील बिचारे जेमतेमकरून तीन-चारच असतील..... ते पण आपल्या सारखेच होमलोनकरी असणार. बरं पुढे साडेआठच्या सुमारास लसीकरण पण झालं. वाटलं चला आता मुलीला घरी सोडून साडेनऊला आरामशीर ऑफिसात पोहोचूया, पण कसलं काय शेवटी दिडतास उशीर झालाच!"
असो... पण मी आज त्याची उत्कंठा फार शिगेला न पोहोचवता आणि माझी खरी कथा बॉसपर्यंत पोहचण्याच्या गोड गैरसमजाला भुलून, माझी आपबिती त्याला एकदाची सांगायला सुरवात केली.
"अरे लसीकरण झाल्यावर क्लास टीचरने क्लासमध्ये बसायचं सांगितलं. पाच-दहा मिनिटांनी टीचर आल्या आणि हातात एक कागद टेकवून रिकाम्या जागा भरायच्या सांगितल्या. अर्थात लेडीजफर्स्ट म्हणत सर्वप्रथम महिलावर्ग कागद घेण्यासाठी पुढे गेला आणि त्यानंतर आम्हा उरलेल्या दोन-चार पुरुषांना पुढे जाण्याची मुभा मिळाली.
माझ्या हाती कागद पडणार तेवढ्यात एका ताईने माझ्याकडे पेन मागितले. सवयीप्रमाणे स्वतःचं स्त्रीदाक्षिण्य जपत मीही ते कुठलाच विचार न करता निमिषार्धात देऊन टाकले आणि माझा कागद घेण्यास पुढे गेलो.
कागद घेतल्यावर पेन परत घेण्यासाठी त्या ताईंपाशी गेलो. तर ताई घोळक्यात दिसेनाशा झाल्या. पाच-सहा बायका त्यांच्यापाशी जमल्या होत्या. त्यांचा एकोपा बघून हेवा वाटला. मनात विचार आला की आपण पुरुष मंडळी एकमेकांशी कसे तुटके-तुटके, एकलकोंड्यासारखे वावरतो आणि त्याउलट स्त्रिया बघा सर्व गोष्टी कशा एकमेकींशी मिळुनमिसळून एकीने प्रश्न सोडवतात.
थोड्यावेळाने त्यांच्या गोटात काही क्षणासाठी किलबिलाट सुरु झाला, कसलीतरी ओढ-ताण होताना दिसली म्हणून उत्सुकतेपोटी त्यांच्या जवळ जाऊन पाहिलं आणि तेव्हा कळलं की, मी गृहीत धरलेला तो एकोपा प्रश्नांच्या हितगुजीसाठी नसून, तो मी दिलेल्या
एकुलत्या एक पेनसाठी एक अभेद्य घेराव होता.
त्यांच्या हातात लटकलेल्या सुंदर सुंदर हॅन्डबॅग बघून मला पहिले त्या बॅगेची आणि नंतर पेनची कीव आली. त्यादिवशी कळलं की, बायकांच्या भल्यामोठ्या हॅन्डबॅगमध्ये लिपस्टिक, नेलपेंट, पावडर, फेसवाॅश, कंगवे, आरसा, जुन्या पिना, रबर, सुई धागा ई...... (थांबलेलं बरं नाहीतर ही यादी नाही संपणार आणि हो ही यादी माझ्या 'अगं' ची पर्स ढवळून लिहिली आहे, उगाच मनात नको ते विचार न आलेले बरे) असं सर्व काही सापडेल. थोडक्यात सांगायचं म्हणजे एकवेळेस यांच्या बॅगेत ब्रह्मांडातल्या सर्व वस्तु मिळतील पण एक साधा पेन नाही मिळणार याचा प्रत्यय आज मला आला. त्या बिचाऱ्या पेनाच्या वाट्याला आलेली केवढी मोठी ही शोकांतिका.
उपस्थित असलेल्या लेडीजपैकी फक्त एक-दोन अपवाद सापडल्या, ज्यांच्याकडे त्यांच्या बालवाडीतल्या खोडकर पाल्यामुळे चुकून पेन होते. बर ही परिस्थिती फक्त हाऊसवाईफची असते तर कळू शकतं पण सो कॉल्ड वर्किंगवुमनसुद्धा याला अपवाद नव्हत्या...
बाकीचे सर्व पेनवाले दोन-तीन हुशार पुरुषमंडळी (हुशारांमध्ये आजदेखील माझा नंबर येतायेता राहिला) ज्यांनी वर्गातला गोंधळ पाहून गुपचूप आपापला कागद घेऊन चोरांसारखा स्वतःचाच पेन लपवत लपवत गुपचूप बाहेर पडले.
आता तर माझ्याकडे काही पर्याय उरला नव्हता, पोपटात जीव अडकलेल्या राक्षसासारखा मी त्या घोळक्यात माझा जीव सापडत होतो आणि हा राक्षस जेव्हा जेव्हा त्या पोपटाला पकडायला जात होता तेव्हा तेव्हा तो पोपट एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडवल्या जात होता. पण यापेक्षा माझ्यासारख्या भोळ्याभाबड्या राक्षसाला खरी चिंता होती ती ऑफिसात टक लावून वाट पाहत बसलेल्या भाबड्या बॉसची. माझं लक्ष सतत पेन आणि घड्याळाकडे.
एक ताई प्रश्नपत्रिका जशी सोडवावी तसा तो कागद निरखून पाहात होत्या. त्यांचा चेहरा एकदम धीरगंभीर झालेला जसा की यातील कोणत्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नाही आणि आता आपण नक्की फेल होणार. कदाचित लहानपणी सुद्धा प्रश्नपत्रिका एवढी नीट वाचली नसेल ते आज होताना दिसत होतं.
इकडे माझ्या डोक्यात आज बॉसकडून होणाऱ्या सन्मानपूर्वक आदरतिथ्याची कल्पना आतून भयभीत करून जात होती. सहसा माझ्यासारख्या सर्वसाधारण होमलोनधारकांसोबत असंच होतं. तरी मी अशा गोष्टींना आतून कितीही घाबरत असलो तरी, बाहेरून भीकसुद्धा घालत नाही म्हणून बरं.
अर्धा मिनिटात लिहून होणाऱ्या कागदासाठी त्या ताईंनी तब्बल दहा मिनिटे घेतली आणि एकदाची त्यांची सही ठोकली. माझा हात पेन घेण्यासाठी पुढे सरसावला तोवर बाजूला बसलेल्या त्यांच्या अजून एका मैत्रिणीने ताईंच्या बाजूने हात घालून त्या पेनावर कब्जा मिळवला.... सत्यानाश..... अजून वाट....
"ओ ताई माझं पेन...." मी बोललो.
"थांबा हो... किती वेळपासून थांबली आहे मी.." त्या माझ्याकडे डोळे वटारून बोलत होत्या.
"अहो, ऐका तर... माझं पेन." मी बोलण्याचा परत प्रयत्न केला.
"थांबा हो..." त्या बाळासाहेबांसारखे हातवारे करत बोलल्या.
माझं नेमकं असंच होतं ज्यावेळेस आवाज वाढायला हवा असतो नेमका त्याच वेळेस तो अचानक म्यूट होतो. पण नाही..... म्हटलं यावेळेस सायलेंट मोडवर नाही राहायचं, भले समोर कोणी असो.
"अहो ते माझंच पेन आहे," शेवटी धाडसाने बोललो.
"हो का!..... अहो मी कुठे घेऊन चाललीय, थांबा की थोडं!”
त्यांच्या या बोलण्यावर शेवटी मी हताश होऊन पेनाची अपेक्षा सोडली आणि दुसऱ्या पेनाच्या शोधात क्लासबाहेर पडलो.
कोणाला दया येवो ना येवो कदाचित देवाला माझी दया आली, आणि तेवढ्यात समोरून माझा एक ओळखीतला मित्र पेनासकट धावून येताना दिसला. हिरमुसलेल्या पिल्लाला मालक दिसताच जसा आनंद होतो तसंच काहीतरी मला पेन बघितल्यावर झालं आणि मीही पिल्लाप्रमाणेच पण जिभेऐवजी हात पुढे करत त्याकडे तसाच झेपावलो. त्याला वाटलं मी त्याची गळाभेट घ्यायला आलो आहे म्हणून त्यानेही आपले दोन्ही हात पुढे केले. पण मी निर्लज्जपणे ते पुढे सरसावलेले हात झिडकारून त्याच्या खिशातलं पेन हिसकवलं.
शेवटी माझं पेन परत मिळण्याच्या आशेला स्वतःच्या हाताने मुखाग्नी दिला आणि कागद परत करून मुलीचा हात पकडून झरझर बाहेर निघालो. बाहेर पडता पडता माझ्या पेनकडे एक शेवटचा कटाक्ष टाकावं म्हणून परत माघारी नजर फिरवली तर ते बिचारं अजूनही त्या गराड्यातच अडकलेलं, बायकांच्या ज्वलंत विचारांच्या आगीत होरपोळुन होरपोळुन जळत होतं."
एवढा इतिवृत्तांत नारदापुढे मांडल्यावर नारद माझ्या शोकांतिकेवर हसून हसून बेजार झाला आणि त्या नालायकाचा हसण्याचा आवाज ऐकून, बॉस कॅबिनच्या बाहेर येऊन माझ्याकडे तिरस्काराचा भेदक कटाक्ष टाकत ऑफिसबॉयला मला तात्काळ आत धाडण्याचा फर्मान सोडून गेला.