त्या रात्री तीन वाजता
त्या रात्री तीन वाजता


गावाकडे असताना रात्री कुठल्याही कारणाने उठायला मी जरा आळसच करायचो. फारच तातडीचे असेल आणि कुणी सोबतीला असेल तरच मी अंथरूण सोडायचो. असा मी खूपच भित्रा. मला कशाचीही भीती वाटायची. जरासा कुठे आवाज आला की, मन नको नको म्हणत असतांनाही भीतभीतच मी चोरून तिकडे बघायचो. त्यामुळे जीवनात अनेक प्रकारचे नुकसान सोसावे लागले. इच्छा असूनही मला कधी पोहायला शिकता आले नाही. सायकल, मोटार सायकल चालवायला शिकता आली नाही.
माणसाला परिस्थितीच कधी तरी धीट बनवत असते म्हणतात. घरच्या बिकट परिस्थितीमुळे १०-११ वर्ष वय असतांनाच शेतातील काम करायला लागायचे. कधी कधी रात्री सुद्धा शेतात जावे लागत असे. खूप भीती वाटायची, पण जावेच लागायचे. तरी बरे शेत गावाला लागून जवळच होते. एखाद्या मित्राला सोबत घेऊनच शेतात जायचं. तिथलं काम आटोपून लगेच परत यायचं. त्या काळी आमच्याकडे भुईमूगाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असे. ते काढण्यासाठी संपूर्ण गावात सांगितले जायचे. ज्याला शक्य असेल तो भुईमूग काढण्या साठी जायचा. मोबदल्यात शेंगा मिळवायचा. मी आणि माझा एक मित्र. आम्ही दोघे एकत्र काम करायला जाऊ लागलो, हळूहळू भीती कमी होत गेली. आम्ही रात्रीही शेतात जायला लागलो. नुसते जायलाच नाही तर कामही करायला लागलो. भुईमूग काढण्यासाठी सांगायला कुणी आले की सांगणारे गावात असतील तोवरच आम्ही त्या शेतात पोहचायचो. शेत कसे आहे? कोणत्या भागात माल चांगला लागलेला असेल? कोणत्या भागात काढायला सोपा असेल? हे हेरून आम्ही रात्रीच चंद्राच्या शीतल प्रकाशात भुईमूग उपटून ठेवायचो. थंडी वाजायला लागली किंवा झोप यायला लागली की तिथेच शेकोटी पेटवायची, तीत भुईमुगाच्या शेंगा भाजायच्या. आणि त्या खातखात जागीच लवंडायचे. भीती वाटायची पण मित्र सोबत असल्यामुळे मस्त झोप लागायची.
अशा रीतीने भीती थोडी कमीकमी होत गेली. मोठा होत गेलो. पुढील शिक्षणा साठी शहरात आलो. वसतिगृहात राहायला लागलो. तिथे मात्र रात्री बेरात्री लघवीला किंवा संडासला जायचे असेल तर कुणाला तरी सोबत घेऊन जायला लागलो. नेहमीच कोण येणार सोबत? सहकारी कंटाळा करायला लागले. शक्य तितके टाळायचो पण तरी कधी कधी जावेच लागायचे. भीत भीत का होईना एकटा जायला लागलो.
नोकरीला लागल्यावर मात्र रात्रीबेरात्री जाण्या वाचून गत्यंतर नव्हते. तिन्ही शिफ्ट मध्ये ड्युटी असायची. जावेच लागायचे. शहर म्हटले की तिथे सर्व प्रकारचे लोक रहायला येणारच. सर्वच इथे पोट भरण्यासाठी येतात, पण मार्ग वेगवेगळे असतात. कुणी प्रामाणिक पणे मजुरी करून, कुणी भाजीपाला विकून, कुणी छोटा मोठा व्यवसाय करून, तर कुणी चोऱ्या वाटमारी करूनही पोट भरतात. कुणी सफेद कॉलर वाले राक्षस सुद्धा असतात. काहीतरी कारण काढून सामान्य जनतेला आपापसात झगडायला लावून तमाशा बघतात, प्रसिद्धी मिळवतात.
औरंगाबाद शहर सुद्धा अशांत शहर म्हणून नावारूपाला आले होते. कोणत्या कोपऱ्यात कधी दंगल उसळेल, याचा नेम नव्हता. कामावर गेलेला माणूस घरापर्यंत सुखरूप आणि वेळेवर येईल याची खात्रीच नव्हती. कोणतेही निमित्त लागत होते. लोकांनी एवढी धास्ती घेतली होती की छोटीसी अफवा सुद्धा माणसाला घाबरवून सोडत असे. एकदा एका भाजी मंडईत भाजीपाला खरेदी करता असतांना मोकाट बैल तिथे आला म्हणून विक्रेत्याने त्याला काठी मारली, बैल पळाला. गल्लीत उभे असलेले दोघेजण पळायला लागले. ते पळत आहेत म्हणून इतरही काहीजण पळायला लागले. बघता बघता शे दोनशे लोक पळत सुटले. आणि दंगल झाली म्हणून बातमी वाऱ्यासारखी शहराच्या काना कोपऱ्यात पसरली.
शहरात असलेल्या विद्यापीठाच्या नामांतराच्या निमित्ताने दंगल उसळलेली होती. संचारबंदीचा आदेश जारी झालेला होता. घरातले घरात आणि कारखान्यातले कारखान्यात कोंडून पडले होते. रस्त्यावर एस आर पी जवान, लष्कराचे जवान, गृह रक्षक दल, पोलीस जवान यांच्या शिवाय इतर कुणीच दिसत नव्हते. पुढाऱ्यांच्या चिथावणी वरून अशा परिस्थितीत सुद्धा या साऱ्यांची नजर चुकवून कुठे कुठे कुणी दंगलखोर जाळपोळ करत होतेच, उभ्या असलेल्या गाड्यांवर दगड फेकत होते. अशीच एक बस रस्त्यावर उभी होती. रात्री बारा साडे बाराच्या सुमारास ती कुणी तरी पेटवून दिली होती. घराच्या खिडकीतून ती आम्हाला दिसत होती. पत्नी, मुले सर्वजण घाबरलेले होते. भीतीने झोप उडून गेली होती. बऱ्याच वेळेनंतर लेकरांना झोपवता झोपवता कधीतरी डोळा लागला.
रात्रीच साधारणतः तीन वाजले असतील दाराच्या कडीचा आवाज आला. अर्धवट झोपेत आवाज ऐकला. भास झाला असेल असे वाटले. लक्ष देऊन ऐकले तेव्हा कुणीतरी खरोखर दार वाजवत होतं. आपापसात बोलण्याचाही आवाज येत होता. पत्नीही जागी झाली होती. ती खूपच घाबरली होती. दार उघडू द्यायला तयार नव्हती. मी दाराजवळ आलो, बाहेर कानोसा घेतला. आवाज तर परिचयाचा वाटत होता. म्हणून पत्नी नको नको म्हणत असतांनाही दार उघडले. बघतो तर दारात मामा उभे असलेले दिसले. दोन मामेभाऊ आणि गावातले आणखी दोघेतिघे खाली बसलेले दिसले. घाईघाईत त्यांना मध्ये घेतले. मामाला विचारले.....
"मामा, एवढ्या रात्री?"
"सांगतो. अगोदर या सर्वांना हातपाय धुवायला पाणी द्या आणि काही खायला करा." मामा उत्तरले.
बाथरूममध्ये पाणी काढले गेले. सर्वजण हातपाय धुवून बसले. पत्नी पिठलं भाकरी बनवली आणि सर्वांना जेवायला वाढले. मामाने मात्र भूक नाही म्हणून जेवण टाळले होते. त्यांनी मला इशारा केला. आम्ही भीत भीतच बाहेर अंगणात आलो. मामा सांगत होते....
"मोठ्या मामांना शेतात सायंकाळी विषारी सर्पाने दंश केला होता. जवळ कुणी नसतांना मामाने विष पसरू नये म्हणून स्वतःच्या हाताने कुऱ्हाडीने घाव करून घेतला होता. मात्र या गडबडीत घाव जास्तच मोठा झाला असावा, खूप रक्तस्त्राव होऊन मामा बेशुद्ध झाले होते. त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये आणले असता ते मृत झाल्याचे डॉक्टरने सांगितले. एम एल सी केली. सकाळी पोस्टमार्टम करावे लागेल म्हणून शव घाटी हॉस्पिटलमध्ये शीगृहामध्ये ठेऊन घेतले.
या सर्वांना तिथे थांबता येत नव्हते. 'सकाळी या' म्हणून यांना बाहेर काढले गेले. बाहेर आल्यावर यांना 'कुठे जावे?' असा प्रश्न पडला. आमची खोली तेथून जवळपास दहा किलोमीटर अंतरावर होती. बाहेर रिक्षासुद्धा मिळत नव्हती. सर्वजण पायीच चालत खोलीवर आले होते. मामांनी ही गोष्ट इतर कुणालाही कळू दिली नव्हती. 'पेशंटला ऍडमिट करून घेतले आहे, सकाळी आपल्याला आत घेतील. तोपर्यंत आपण पाहुण्यांच्या खोलीवर जाऊ.' म्हणून सांगितले होते. चालत आल्यामुळे सर्वजण थकले होते पोटात भूकही लागली होती. जेवण झाल्यावर सर्वजण झोपले मी आणि मामा मात्र रात्रभर जागेच होतो. दुसऱ्या दिवसाचे नियोजन करत होतो.