Abasaheb Mhaske

Tragedy

2  

Abasaheb Mhaske

Tragedy

तू गेल्यावर ...

तू गेल्यावर ...

3 mins
4.1K


आज फारसं कामही नव्हतं म्हणून मस्त लवकर झोपावं म्हटलं तर कसलं काय ? ती आठवलीच पुन्हा नको त्यावेळी. निघून गेली अवेळी अन् आता तिच्या आठवणीही छळतात वेळी अवेळी. काय करणार ? मनाला कोण आवर घालणार ? जाणून बुजून ते काल्पनिक इंद्रिय ? आणि त्याच्यावर कुठं केस फाईल करता येते कोर्टात. हे मन असतं त्याच्या अनिर्बंध सत्तेचा अंनाभिशिक्त सम्राट. सांगताही येईना अन् सहनही होईना ? नवऱ्याने मारले, पावसाने झोडपले, राजाने केलेली शिक्षा, दाद तरी कोणाकडे मागावी ? मनाचेही तसंच असतं. जाऊ द्या आलीया भोगासी असावे सादर.

आज काही सुचेनासं झालं होतं. जग सारं निरर्थक, खोटं -खोटं, फसवं वाटतं होतं. कसंबसं सावरलंही होतं म्हणा स्वतःला. पण खरंच सांगतो मी तुला कधीच विसरू शकणार नाही, तुझ्या प्रेमाला. सोबतीण घालवलेल्या त्या हसऱ्या - बोचणाऱ्या सर्व क्षणांना. का कुणास ठाऊक इतके दिवस झालेत त्या गोष्टीला पण... तुझ्या विरहाची, दुःखाची धार तसूभरही कमी होताना दिसत नाही. भ्रमिष्टासारखा दिंगतात चाललेला हा दिशाहीन प्रवास. हरवल्यात जणू सुखाच्या वाटा, अन् खोटा आनंदाचा आवही आणता येत नाही. काही - काही बदललं नाही. सारं काही पूर्वी होतं अगदी तसंच आहे. त्या उंच - उंच पर्वत रांगा. तो खळाळता निर्झर, वृक्षवेली, फुले - फळे, चिमणी -पाखरं, हिरव्यागार वनराई, ती गुरं- ढोर, पोरं- सोर, फक्त तू नाहीस इतकंच काय ते बदलेलं. तसं, म्हटलं तर सर्व काही पूर्वनियोजित असंच होतंय सगळं. पण कधी कधी स्वप्नवेड्या,प्रेमवेड्या मनाला भयाण वास्तवाला समोर जाणं वाटत तितकं सोप्प नसतं. झालं गेलं विसरून जा, म्हटलं की झालं. खरंच इतकं विसरून जाणं सोप्प असतं ?

तू गेल्यावर का कुणास उगाच वाटतं तू बदललीस तशी ही दुनियाही. कोकिळा सुमधुर गातानाही रिझवत नाही की, श्रावणातला पाऊस... मला आजही आठवतं तू नेहमी म्हणायचीस आपण जसं पाहिलं तसं जग दिसतं आपल्याला. त्यात दोष जगाचा नाही तर आपल्या दृष्टिकोनाचा तो भाग आहे. आपण जसं पाहिलं तसं जग भासतं. जग हे सुंदरच आहे फक्त ते टिपण्याचा खेळकरपणा, निरागसता, हळवेपणा हळुवारपणे साद घालावयास हवी आणि मंगेश पाडगावकरांच्या या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे गाणे गुणगुणायचीस, राहूनराहून वाटतं खरंच तू असायला हवी होतीस. जन्मभराची सोबत करण्यास. माझ्या सैरभैर, चंचल मनाला आवर घालण्यासाठी तर कधी नैराश्याकडे झुकताना जीवननौका सावरण्यासाठी, धडपडताना, अडखळणाऱ्या पावलांना सावरण्यासाठी.

तू नाहीस म्हणून सुनेसुने अंगण, दिवे जणू काजळले की प्रकाशमान होण्याचेच विसरले जणू घरकुल माझे, घर खावयास उठते जणू, हिरमुसून निषेध नोंदवित जाते. आल्यापावलाने परत जाते मानिमाऊ, तिजला पूर्वीचे हसरे बाळ दिसत नाही की त्याने ठेवलेले दूध.. सगळीकडे जणू स्मशान शांतता ... रातकिड्यांची किर्रर्र.. कुत्र्याचा बेसूर आवाज कानी पडताच मस्तकात तिडीक जाते.. अन् प्रसाद मिळाल्यावर तोही कुई -कुई करीत निघून जातो.. खरंच मनातले नकोसे साचलेपण, सर्व वाईट भावना, उदासीनता, नैराश्य हाकलता आले असते तर असं काही तरी तर्कसंगत नसलेले आठवते आणि मला मनातल्या मनात त्या बालिशपणाचे माझे मलाच हसू येते... मी विद्विग्न होऊन छताकडे पाहत बसतो कितीतरी वेळ अवघे विश्वच रजनीच्या बाहुपाशात विलीन होतं माझ्याही नकळत ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy