ठेच
ठेच
तू ठेच आहेस माझ्या आयुष्याला लागलेली...
आपल्याला ठेच कधी लागते माहित्ये ना..
चालताना उघड्या डोळ्यांनी बघितलेला खालचा दगड, आपली चालच रक्ताळून टाकू शकतो, याचं जेव्हा आपल्याला भान राहत नाही , तेव्हा...
माझंही तसंच झालं तुझ्या बाबतीत.. नात्याचा एक सुरेख गालिचा अंथरलास तू.. त्यावर पाऊल ठेवल्यावर झालेल्या मऊ स्पर्शानेच भान हरपलं माझं... मला वाटलं पुढची सगळी पावलंही तशीच असतील..
पण नाही...
ते एक पाऊल होतंच माझ्या नशिबात, ज्याने मला 'भानावर' आणलं....
या 'पुन्हा भानावर येण्याला'च "ठेच' म्हणत असावेत बहुदा..
अजूनही तुझ्याशी हजारदा बोलावंसं वाटतं.. खरंच...
पण आधी लागलेली 'ठेच' आठवते, आणि मनच नको म्हणतं..
ते एक वाक्य...
इतक्या खुबीने विणलं होतंस ना पायाखालच्या गालिच्यावर तू... पण हळूहळू रक्ताळला अंगठा त्यानेच....
"आपण फक्त मित्र-मैत्रिण म्हणून राहिलो तर नाही का चालणार..?"