kanchan chabukswar

Drama Tragedy

3.3  

kanchan chabukswar

Drama Tragedy

तिसरा मजला

तिसरा मजला

8 mins
343


बऱ्याच वर्षांनी अहमदनगरला जायचा योग आला, म्हटलं चला आपले आजोबा राहत होते ते घर बघून येऊया. बघते तर काय, एवढा मोठा तीन मजली वाडा पाडून तिथे आता एक मॉल झाला होता. अर्थात जमाना मॉलचा आहे. एकदम आजोबांच्या घराची फार आठवण आली, उणीपुरी चार वर्षच देशमुखांच्या वाड्यामध्ये भाडेकरू म्हणून राहिले, मग आमचा सावेडी ला बंगला झाला आणि दिल्ली दरवाजा जवळचा देशमुखांचा वाडा सुटला. माझं लग्न झालं तेव्हा पाया पडायला मी देशमुखांकडे गेले होते, नेहमीप्रमाणे काकूंच्या पाया पडल्यावर त्यांनी डोळ्याला पदर लावला, म्हणाल्या," स्वानंद जिवंत असता तर त्याचं लग्न झालं असतं की नाही?"

स्वानंद अण्णासाहेबांचा चौथा मुलगा, शेंडेफळ.


अण्णासाहेब देशमुख हे अहमदनगर मधलं बडे प्रस्थ. त्यांची शंभर एकर पसरलेली शेती, आणि चालत असलेली सावकारी त्याच्यामुळे त्यांचं जुन्या अहमदनगर मध्ये फार वजन होत. सहा फूट उंचीचे अण्णासाहेब गोरेपान आणि अतिशय देखणे होते, लक्ष्मी काकू देखील त्यांना साजेशा, गोऱ्यापान, भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या, नेहमी जरीच्या काठाची लुगडं नेसून, हातात पाटल्या, बांगड्या, हिरवा चुडा घालून, गळ्या मधले मंगळसूत्र बरोबरचे दोन पदरी गंठण चाचपत, आपल्या जोडवयांचा आवाज करत त्या देशमुखांच्या वाड्यात वावरायच्या. अण्णासाहेबांचा मोठा मुलगा दिनकर, दुसरा भास्कर, तिसरी सुशीला, आणि चौथा स्वानंद, या मुलांसोबत मी आणि माझी भावंडे जेव्हा आजोबांकडे जाऊ तेव्हा खूप खेळत.


       अण्णा साहेबांची सावकारी जोरदार चालायची, पैसे घेणारे आणि ते वसूल करणारे यांची त्यांच्या पेढी वरती नेहमी गर्दी असायची. बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांना त्यांनी कर्ज दिली होती. आठवड्यातून दोन वार, अण्णासाहेब, दिनकर आणि भास्कर ला घेऊन शेतावर जायचे. त्या रात्री त्यांचा मुक्काम शेतावरच असायचा. शेतीवाडी, बैल जोड्या, गाई-म्हशींचे तबेले, असा भरपूर पसारा अण्णासाहेबांचा होता. दिनकर आणि भास्कर त्यांच्यावर कुंभी प्रमाणे अण्णा साहेबांना मदत करत.

सुशील बरोबर आमची फार गट्टी होती, करण भातुकलीच्या खेळामध्ये तिच्या घरून खरेखुरे चांगले चांगले पदार्थ यायचे. नवरात्रीच्या भोंडल्या मध्ये देखील सुशीला चा डब्बा सगळ्यात पहिले उघडला जायचा. जरीचा परकर पोलकं, हातात दोन जाड बांगड्या, आणि गळ्यामध्ये जाड साखळी घालून, आपके आपली झुमके हलवत सुशीला आमच्याशी खेळायची. दिनकर भास्कर सुशीला कुटुंबाच्या श्रीमंतीची जाणीव होती पण गर्व नव्हता.

           

        रोज सकाळी उठल्यावरती अण्णा साहेब माझ्या आजोबांना हात मारत, दोघेजण अंगणात बसून मोठे मोठे मगभरूनभरून चहा पीत, मग दोघेजण शेताच्या दिशेने फिरायला निघत, दोन तीन किलोमीटर चालून झाल्यावर दोघेही परतीची वाट पकडत, पण ती वाट घराकडे नसून आप्पा हलवायाच्या दुकानाकडे असायचे असायची. नऊ-साडेनऊ च्या सुमारास अप्पा हलवायाकडे गरम जिलबीचा तरी घाणा चालू असायचा किंवा रबडी वाटत असायची, कधी गुलाबजाम, रसगुल्ले, न वळलेले मोठे पेढे, बुंदीच्या कळ्या, सर्वत्र जणू सुवास पसरला सुवास , गल्लीभर भर त्याचा घमघगल्लीमाट पसरे . आजोबा आणि अण्णासाहेब अप्पा हलवायाकडेच आपला नाश्ता करायचे, असेल ते पदार्थ विकत घेऊन आपल्या घरी परतायचे. मग माझे आजोबा अकराच्या सुमारास कोर्टाच्या दिशेने रवाना व्हायचे. अण्णासाहेब सकाळी दोन तास आपल्या पेढीवर बसत. त्यांचे मुनीम त्यांना सगळे हिशोब सांगत, बाराच्या ठोक्याला, लक्ष्मी काकूची हाक यायची आणि अण्णासाहेब जेवण्यासाठी घरांमध्ये जायचे. रविवारी मात्र समस्त कुटुंबासोबत दुपारचे जेवण अण्णा साहेबांकडे हसत खेळत व्हायचे.


सुरुवातीला अण्णासाहेबांचा वाडा 10 खोल्यांचा आणि एक मजली होता, त्यांना काय वाटलं माहिती नाही, तीन मुलगे होते, माहित नाही एकत्र राहतील का? म्हणून त्यांनी एका बाजूच्या वाड्या वरती माड्या बांधायला सुरुवात केली. हळूहळू दर्शनी भागामध्ये अण्णा साहेबांनी तीन मजली माडी बांधली.

प्रत्येक माडी ,मध्ये प्रत्येक खोली मध्ये रंगीत काचेच्या खिडक्या असत, त्याच्यामुळे खोलीमध्ये फार मजेशीर प्रकाश पडायचा. रात्रीच्या चंद्र प्रकाशात, रंगीत काचांमधून गमतीशीर प्रकाश खोल्यांमध्ये आत घ्यायचा. समस्त अहमदनगरला अण्णासाहेबांचा हेवा वाटायचा. कुठलंही व्यसन नाही, कोणावर राग नाही, कोणापासून धोका नाही, अण्णासाहेबांच एक आदर्श कुटुंब होतं.

    

स्वानंद वागणं विचित्र वागायचा. स्वतःबरोबरच बोलायचा, नवीन आलेल्या पाहुण्यांचा त्याला फार राग यायचा, कोणी नवीन माणूस आलं तर स्वानंद सरळ आपल्या खोलीमध्ये जाऊन बसायचा. शाळेमध्ये पण त्याला कोणी मित्र नव्हता. त्याला एकटक, टक लावून बघायची सवय होती. एखादा माणूस एखाद्या व्यक्तीकडे पंधरा वीस सेकंद बघेल पण स्वानंद मात्र 10, 10 मिनिट त्याच्याकडे बघत राहायचा. शेंडेफळ म्हणून त्याच्या काही

दुर्गुण दुर्लक्षित पण केले जायचे. पण तो जसा मोठा होत होता तसं त्याचं वागणं जास्तच विचित्र होत.

        

जेवायला बसल्यावर त्याला भानच राहायचं नाही किती पोळ्या खायच्या, एक दिवशी काकूच लक्ष नव्हतं तर स्वानंद चक्क बारा पोळ्या खाल्ल्या. आणि मग दिवसभर पोट दुखतं म्हणून ओरडत राहिला. दूध तर भांड भर दूध प्यायचा. त्याचे हात पाय विचित्र व्हायला लागले होते. डावा डोळा तो कधी कधी विचित्र फिरवायचा. आजोबांनी एकदा सल्ला दिला स्वानंदला कुठल्यातरी चांगल्या डॉक्टरला दाखवा,

       

अण्णासाहेबांच्या पण लक्ष्यामध्ये स्वानंदच विचित्र वागणं येत होतं. पण त्यांना वाटलं की आपल्याकडे पैशाला काय कमी आहे? त्यांनी जन्मभर काहीही नाही केलं तरी तो बसून खाऊ शकेल. अहमदनगर मध्ये त्याकाळी कोणीही मानसोपचारतज्ञ नव्हता. त्यावेळेस मानसोपचाराच्या कडे जाणे म्हणजे वेडे असण्याचे लक्षण होतं.

स्वानंद ला तिसऱ्या मजल्यावर ची रंगीत खिडक्यांची खोली फार आवडायची. दिवसातला बराच वेळ तिथे बसून स्वतःच्याच मनाशी बडबड करत राहायचा. किंवा काही खेळ खेळायचा, एकटाच. त्याला कोणा बरोबर खेळायला जमायचं नाही. अण्णासाहेबांच्या पैशाकडे बघून येणारे-जाणारे फुकटचा सल्ला देत, कोणी म्हणे त्याला पिंपळा वरच्या मुंजाने पकडले आहे. तर कोणी म्हणे,” अण्णासाहेब दानधर्म करा”


अहमदनगरच्या कुडमुड्या ज्योतिषांनी तर हजारो रुपयांच्या अंगठ्या अण्णासाहेबांच्या गळ्यात मारल्या, आणि छातीठोकपणे सांगितले ते अंगठ्या घातल्या तर स्वानंद पूर्ण बरा होईल. कसलं काय आणि कसलं काय, लक्ष्मी काकू बिचारी उपास-तपास, व्रत वैकल्य, पिंपळाखाली दिवा लावणे असले उपाय करायचे.


        एके दिवशी तर कहरच झाला, लक्ष्मी काकू ने, नेहमीप्रमाणे स्वानंद जेवण्यासाठी हाक मारली, दोन-तीन वेळा, तरी स्वानंद काही लक्ष नव्हतं म्हणून काकूने जोरदार आवाजात रागावून स्वानंद ला हाक मारली. लक्ष्मी काकूंनी त्याला खालूनच हाक मारली तर स्वानंद राग आला, खिडकी उघडून खोलीमध्ये असलेलं सगळं सामान,वस्तू खाली टाकताना, स्वानंद विचित्र खिदळत होता, आणि प्रत्येक वस्तूबरोबर म्हणत होता,” हा घे स्वानंद, हा घे आला स्वानंद.” दुपारच्या वेळेस रस्त्यावरती कोणी नव्हतं म्हणून बरं.

असं पहिल्यांदा झाल्यावर लक्ष्मी काकू हादरली, त्यारात्री अण्णासाहेबांनी पहिल्यांदा स्वानंदला चांगलेच ठोकून काढले आणि दम भरला की तो परत असं काही करणार नाही.

आजोबांनी अण्णा साहेबांना सांगितलं कि स्वानंदला चांगल्या डॉक्टरकडे दाखवायला पाहिजे, स्वानंद लक्षण काही ठीक नाही. अण्णासाहेब आणि लक्ष्मी काकू आपल्या नशिबाला दोष देत राहिले आणि तरीपण कुठल्या डॉक्टरकडे जायचं किंवा मानसोपचार तज्ञाकडे जाण्यासाठी त्यांची काही तयारीच नव्हती.


असाच एक आठवडा गेला, एकेदिवशी पाच वाजता माझे आजोबा कोर्टातून परत येत होतो, अण्णासाहेब पडवीत, बसलेले होते त्यामुळे त्यांनी आजोबांना हाक मारली, आजोबा अंगणात उभे होते आणि अण्णासाहेब पडवीत, दोघ बोलत असताना अचानक वरुन एक लाकडी खुर्ची खाली आली, आणि आजोबांच्या बाजूला येऊन पडली. आजोबा थोडक्यात वाचले. वरती बघतात तर स्वानंद जोरजोरात हसत होता.

      

त्या दिवशी संध्याकाळी अण्णासाहेब लक्ष्मी काकू स्वानंद ला घेऊन पुण्याला गेले, तिथे प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉक्टर परेरा यांच्याशी त्यांनी भेट घेतली. सगळ्या तपासण्या झाल्या, डॉक्टर परेरा म्हणाले की स्वानंद ला जन्मजातच स्वमग्नतेचा दोष आहे. फक्त त्याच्या हिंसक उसळून वागण्या वरती काही औषध देण्यात येतील त्यांनी स्वानंद झोपून राहिल आणि त्याच्या वागण्यामध्ये फरक करायचा असेल तर त्याच्याशी कायम प्रेमाने बोलत राहावे लागेल, रागावून ,मारून, स्वानंद चा रोग अजूनच बळावेल. डॉक्टरांनी अण्णा साहेबांना स्वानंद साठी एक शिक्षक नेमायला सांगितले जो घरी येऊन स्वानंदला काही शिकवेल.


दिनकर, भास्कर, सुशीला आपल्या आपल्या शाळेमध्ये मग्न होते, दिनकर आणि भास्कर अण्णा साहेबांना मदत पण करत होते. पण त्या कुटुंब मधला आनंद स्वानंद नि हिरावून घेतला होता. कुठल्याही लग्नसमारंभात किंवा अजून कुठल्या समारंभात स्वानंद ला नेता येत नव्हतं. अण्णासाहेब त्याला शेतावरच्या घरावर घेऊन जायचंआणि तिथेच आठ दिवस राहायचे. औषध दिल्यावर ती स्वानंद एखादा लोळागोळा होऊन झोपून जायचा, जर तो दिवसा झोपला तर रात्रभर वाड्यावर हिंडत राहायचा तो रडत रडत राहायचा आणि सगळ्यांना त्रास द्यायचा. जसा तो मोठा होत होता तसं त्याच्या अंगात भरपूर ताकद येत होती. लक्ष्मी काकुला तो कधीच आवरायचा नाही.

      

असंच एक वर्ष गेलं, लक्ष्मीपूजनाची रात्र होती, अण्णासाहेबांच्या वाड्या वरती दिव्याची रोषणाई झाली होती, त्यांच्या तीन मजली माडीला अतिशय सुंदर सजवण्यात आलं होतं. मोठेमोठे आकाश कंदील, पणत्या दिव्यांच्या माळा, झेंडूची फुले यामुळे घर फार सुंदर दिसत होतं. अण्णा साहेबांच्या कडे लक्ष्मीपूजनाचा वेगळाच थाट असायचा, शेतावरच्या गडीमाणसं पासून ते ओळखीपाळखी च्या सगळ्या कुटुंबांना त्यांच्याकडे फराळाचा आमंत्रण असायचं. भरपूर मोठा घाट असायचा. दिमाखात आणि दणक्यात लक्ष्मीपूजन व्हायचं. लक्ष्मीच्या आरती च्या वेळेला अंगणामध्ये आणि रस्त्यावर मोठाले फटाके फुटायचे, भुईनळे, चक्र, बांध, गुलछडी, सुपारी, लक्ष्मी बॉम्ब, सुतळी बॉम्ब, बघायलाच नको. गडी माणसांच्या मुलांनादेखील भरपुर फराळ, नवीन कपडे नवीन कपडे, आणि फटाके दिले जायचे. त्यादिवशी अण्णासाहेबांच्या चौरंगावरती मोजकेच पण जड दागिने ठेवले जायचे. लक्ष्मी पूजन पार पडलं, फराळ घेऊन ओळखीचे, नातेवाईक, माणसं सगळी तृप्त होऊन आपापल्या घरी गेली. दिवसभराच्या दगदगीमुळे अण्णासाहेब, लक्ष्मी काकू आणि मुलं ताबडतोब झोपी गेली.


दिवाळीच्या कामांमध्ये स्वानंद च्या औषधांच्या दिनचर्येत मध्ये फरक पडला होता, आणि आज तर त्याला औषध दिलं गेलं नव्हतं. पूर्ण समारंभात स्वानंद गप्प बसून होता त्यामुळे त्याच्याकडे कोणाचे लक्ष गेलं नाही. मध्यरात्री तिसऱ्या मजल्यावरच्या खिडकीची काच फुटल्याचा आवाज झाला आणि अंगणामध्ये धप्पकन आवाज झाला, आवाजाबरोबर स्वानंद ची “आई “अशी किंकाळी पण ऐकू आली. सगळ्या वाड्यामध्ये जाग आली सगळे भाडेकरू आणि अण्णांचा कुटुंब अंगणाच्या दिशेने धावले, बघतात तर काय, चौरंगा वरती ठेवलेले सगळे दागिने गळ्यात घालून स्वानंदने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. त्याचं डोकं फुटलं होतं, हात आणि पाय वाकडे झाले होते, आजोबांनी त्याच्या नाका पाशी हात धरला तर श्वास जाणवला नाही, तरीपण दिनकर आणि अण्णा स्वानंदला घेऊन डॉक्टरांकडे धावले. काय होणार? एवढा साठ किलो वजनाचा स्वानंद चाळीस फूट उंचीवरून खाली पडलेला, अंगणामध्ये दगडी फरश्या होत्या त्याच्यामुळे वाचण्याची शक्यताच नव्हती. त्या रात्री स्वानंद गेला.

  

       दिवाळीनंतर अण्णा साहेबांकडे लक्ष्मी पूजन झाले नाही. बऱ्याच वेळेला तिसऱ्या मजल्यावरून स्वानंद च्या हसण्याचा आवाज ऐकू यायला लागला. लोकांनी वावड्या उठवल्या. काही नातेवाईकांनी तर अशी हूल उठवली की रात्री त्यांची पांघरुण ओढली गेली. शेतावरच्या गडी येथे रात्री वाड्यावर राहायला आला होता, तिसऱ्या मजल्यावरच्या माडीवरती झोपला होता, असं त्याला वाटलं, आणि सकाळी उठला तर अंगणामध्ये. उठल्यावरती, ठणा ठणा बोंब मारून तो घरातून पळाला. सुशीलच्या स्वप्नात कधी कधी स्वानंद द्यायचा पण त्याने तिला कधीच त्रास दिला नाही, ना त्याने कुठल्या भावंडांना त्रास दिला ना आई-वडिलांना. उगाच उठणाऱ्या वावड्या मुळे लक्ष्मी काकूंनी हायच खाल्ली.


        कुठल्याही ज्योतिषांनी अण्णासाहेबांना स्वानंदच्या अल्पायुष्याबद्दल सांगितलं नव्हतं. आमचं बंगला झाल्यामुळे आजोबांनी वाडा सोडला, आणि आमचा अण्णा साहेबांची संबंध संपला. दिनकर भास्कर सुशीला यांच्या लग्नाच्या पत्रिका आमच्याकडे आल्या, आजोबा गेले पण होते, अण्णासाहेब अजूनही त्याच वाड्यात राहत होते. बराच वेळ ते तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीत जाऊन बसत होते? जणू ते स्वानंदला विचारायचे की "बाळ तुला काय झालं होतं?"

      आधी लक्ष्मी काकू वारली आणि त्यानंतर आण्णासाहेब.

दिनकर आणि भास्कर तो वाडा विकून टाकला आणि आता तिथे एक मॉल झाला आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama